माझी लाल रंगाची सायकल खांद्यावर घेऊन शाळेच्या दाराशी उभे असलेले विनूका ... कॅम्पातून रास्तापेठेतील शाळेत स्वतःच्या सायकलवरून माझी सायकल वाहात आणताना झालेले श्रम माझ्या लकाकणाऱ्या डोळयांकडे पाहात विसरणारे विनुका.... परतीच्या प्रवासात रस्ता क्रॉस करणाऱ्या माणसांच्या पुढून सायकल काढताना घाबरून मी ओरडू लागले की विनुका पट्कन पुढे येत आणि माझी सायकल हाती धरून पुढे काढताना समजावत, 'शामराव, रस्ता क्रॉस करणाऱ्या माणसांसमोरून सायकल न्यायची नसते, मागून न्यायची, म्हणजे बिचारे तेही सुखात रस्ता क्रॉस करतात आणि आपल्यालाही घाबरून ओरडावंसं वाटत नाही.'
रात्रीची वेळ. जेवण झाली... सारे अंगण गप्पा मारत आहेत. पुण्यातलं घर म्हणजे छोटेखानी गावच. त्यातच विनू मुंबईहून आलेला असावा. सगळ्या आत्या, काका, भाचे, पुतणे एकत्र गप्पा मारत बसत. जुन्या आठवणी - जुनी गाणी .... 'बा निज गडे निज गडे लडिवाळा.... नको वाटू देऊ तिळभर मुली वाईट मना...' याच गडबडीत मला झोप येतीयशी पाहून विनुका म्हणत "श्यामराय आकाश निळे केले, वारी रवि - शशी, तारेही बैसविले.' अशा प्रकारे विनुका माझी आणि चिरडताऱ्यांची दोस्ती करून देतात. विनुका मुंबईला गेले तरी कानी स्वर येतच राहतो....
'श्यामराये आकाश '..... माझ्या नकळत मी भावविध तयार करू लागते. नेहमीचं जगणं हे केवळ जगणं आणि भावविश्वातलं जगणं हे 'जगणं जपण'. नुसतं जगण खरं नाही. जगणं जपण हे खरं. असे कितीतरी जगलेले क्षण जपलेत... आनंदा गेल्यानंतर हमशाहमशी रडणारे विनुका मुंबईहून आल्यानंतर सर्वांच्या हौशी - मौजी पुऱ्या करणारे विनुका... घरात होणाऱ्या वितंडवादात तितक्याच हिरीरीने पडून तो वाद मिटवणारे विनुका- कुठल्याही लग्नकार्यात उत्सवमूर्ती म्हणून मानले जाणारे आणि तितक्याच पोटतिडिकीने काम करणारे विनुका - लग्नाचा सोहळा फिका - फिका पडावा इतक्या दणक्यात नागेंद्राची मुंज करणारे विनुका - असे घरातील विनुका मराठी चित्रपटसृष्टीत आले आणि घरा - घराचे विनका झाले.
गुंडाना धाक
लग्नकार्यात सदगदित पण खणखणीत आवाजात मंगलाष्टका म्हणणारे विनुका लालबागच्या भारतमाता सिनेमाच्या दारात उभं राहून तिथल्या गुंडांना रागवू लागले की अवघ लालबाग दणदणायाचं. आपल्या बोलण्यात अनेक फुल्या - फुल्या घालून बोलणाऱ्या विनुकांचा हातही जोरात चालायचा. मला मात्र भीती वाटत राहायची आता या दारुड्या गुंडाने विनुकांना उलट उत्तर दिलं तर, उलट्या हाताने ठेवून दिली तर ? पण मजा म्हणजे असं कधीच घडलं नाही.
विनुकांनी श्रीमुखात दिलेल्या एका थपडीने भेलकांडत जाणारे ते मवाली (?) नाही साहेब, चुकलो साहेब, माफ करा साहेब म्हणत राहायचे. तासा - दोन तासाने सिनेमाच्या मागील अंगी असलेल्या घरी येऊन बसले की विनुका त्या मवाल्याला बोलवायचे आणि आईला सांगायचे. 'रुश (शरयूचा शॉर्टफॉर्म) जरा याला काही खायला घाल, माझा एखादा शर्टही दे, मघाशी मारताना फाटला माझ्या हातून? रूशची या सगळ्यालाच कधीच ना नसायची. मला या मवाल्यांचं मोठं कौतुक वाटतं. मी मवाली हा शब्द वापरतीय खरी पण फार खटकतोय तो. विनुकांनाही हा शब्द कधी आवडला नाही. ते त्या मुलांना नावाने हाक मारीत. या मवाल्यांचं कौतुक अशाकरिता की एकदा कुणाला आपलं म्हंटलं की त्याच्याकरिता जीव घाण टाकतील. खरी माणुसकी यांच्यात दिसते. मला आठवतेय 'मध्या'. रस्त्यात अडवून माझ्या पंचधातुंच्या बांगड्यांना सोन्याच्या समजून त्या काढून घेणाऱ्या एका माणसाला या मध्याने बदड -बदड बदडला आणि घरी येऊन मोठ्या भावाच्या थाटात म्हणाला. 'ताई, (मी पाचवीत तर हा विशी - पंचविशीचा) चांगला हाणला... ह्या बांगड्या घे, यापुढे एकटी जाऊ नकोस इ. इ. हे बोलतानाही तो बोलतोय की बरळतोय, असा प्रश्न पडावा इतका तो प्याला होता, तरीही माझ्याशी बोलताना, ताई!' आणि जाणवलं ह्या टाईपणाकरिता मी काहीच केलेले नाही. ही सारी 'साहेबां'ची पुण्याई. मार-मार मारतील शिव्या देतील पण खायला - ल्यायलाही देतील. प्रसंगी पोलिसांच्या तावडीतून सोडवतील, अडीअडचणींना धावून जातील हा विश्वास होता म्हणूनच विनुकांबद्दल श्रद्धायुक्त आपलेपण होतं. मुंबईत कधीही संप होवो, दंगा होवो, मारामाऱ्या होवोत, दोन्ही बाजूंचे मवाली येऊन सांगत, 'साहेब काळजी करू नका, भारतमातेच्या एका विटेलाही धक्का लागणार नाही,' आणि लागलाही नाही. अशाच मदत केलेल्यांमध्ये कालचा बूट पॉलिशवाला आज सबइन्सपेक्टर आहे. काही सिनेमातच काम करताहेत.
माणुसकीचा वसा
हा माणुसकीचा वसा विनुकांनी कुठून बरे घेतला ? मला आठवतंय, मी खूप लहान होते पण आई - विनुकांची सांगून सांगून ही आठवण ताजी ठेवलीय. दादरच्या पर्णकुटीच्या घरी सानेगुरुजी येत, मला खांद्यावर घेऊन खेळवत. विनुकांची दोन महत्वाची श्रद्धास्थान - माननीय श्री एस. एम. जोशी आणि आचार्य अत्रे. आचार्य अत्रे तर विनुकांचे गुरूच होते. त्यांच्या घरी जेंव्हा मला विनुका घेऊन जात तेंव्हा ते तर भारावलेले असतंच पण ते प्रचंड व्यक्तिमत्व बघून मीही दडपलेली असायची. पी. एस. पी. ची निशाणी झोपडी होती. त्यावेळेस एस. एम. जींची भाषणं ऐकायला विनुका नेत हे आठवतं. आता वाटतं अजून थोडी कलत्या वयात असते तर या लोकांच्या अनिध्याचा माझ्यावर काही वेगळाच परिणाम झाला असता- जीवनकडे बघण्याचा वेगळा दृष्टिकोण मिळाला असता. या थोर - मोठ्यांची भाषणं असोत व सानेगुरुजी कथामाला, व्याख्यानमाला असो, विनुका मला बरोबर नेत, प्रसंगी भाषण करायला सांगत, सभा धीटपणा तिथेच आला. 'गद्य' प्रकाराबरोबरच विनुका पं. भीमसेन जोशी, पं. मल्लिकार्जून मन्सर, श्रीमती शोभा गुर्टू , श्रीमती प्रभा अत्रे (माझी प्रभाताई )इत्यादींच्या शास्त्रीय सांगिताला घेऊन जात आणि त्या सुरात वाहून जायची मनमुराद संधी देत. लहानपणी "श्यामराये"च्या बालगीतात चंद्र - चांदण्यांच्या भावविधान रमणारी श्यामा भीमसेनच्या 'प्रिया मिलन की आस'च्या आर्ततेत वेगळं भावविश्व साकारू लागली. भविश्वातलं जगणं जपण्याच्या प्रयत्नाला विनुकाही नकळत हातभार लावत. त्यातून निर्माण झालेली 'जन्म सोबत्याची' परिकल्पना आजही मनात घर करून आहे. मनाचीही तरलता, त्यात रमण्याची कला विनुकांमुळे मला साधली. त्यामुळे नेहमीच्या धकाधकीच्या आयुष्यात त्रासलेली असले की मी एक मंत्र म्हणते, 'मीट डोळे' अन मग रमून जाते भावविश्वात, डोळे उघडले की सगळ्या टेन्शन्सना पार करायला परत मी ताजीतवानी.
आपण समाजाचं काही देणं लागतो हे विनुकांच्या मनी मानसी इतकं भिनलं होतं की कोणतीही कल्पना कोत्या स्वरूपात त्यांच्या डोक्यात येतच नसे. जे असेल ते भन्नाटच. १९६२ साली चीनने हमला केला तेंव्हा चित्रपट व्यावसायिक मंडळी समाजाबाहेरची जमात नाही हे जाणवून बाबुजी (सुधीर फडके ), अण्णा (गदिमा ), अण्णा ( सी. रामचंद्र) प्रभृतींच्या बरोबर संरक्षण सहाय्यक समितीची स्थापना केली आणि त्यावेळी सरकारला साडेतीन लाख रुपये मिळवून दिले.
सामाजिक बांधिलकी
चित्रपट हे केवळ मनोरंजनाचे माध्यम नव्हे तर अवघ्या जनमानसाला बहुश्रुत करण्याचं ते एक अमोघ शास्त्र आहे असे ते मानीत. माणसाला देवत्व प्राप्त होतं ते त्याच्या लोकविलक्षण गुणांमुळे. या जाणिवेतूनच निर्माण झाला 'संत निवृत्ती ज्ञानदेव'. 'ज्ञाना'चा 'ज्ञानेश्वर' करण्याचं गुरुकार्य निवृत्ती - नाथांनी केलं. त्यांचं मोठेपण जगाला कळावं म्हणून ही निर्मिती. मला आठवतंय, राजाकाकांना (राजा ठाकूर ) संतपट दिग्दर्शित करायचा नव्हता, पण विनुकांनी सांगितलं की हा संतपट नव्हेच. गोरा कुंभार हा सच्चा माणूस. खरा सचोटीचा माणूस. संसारात कितीही संकटं आली तरी आपल्या श्रध्येला धक्का बसू देत नाही, आपली जीवनमूल्ये जपतो. गोरा कुंभाराच्या या गुणांनीच लोकांनी त्याला संतपण बहाल केलं. ही भावना लोकांपर्यंत पोहचणं महत्वाचं. राजाकाकांनीही मग गोरोबाला एक 'माणूस' म्हणूनच चित्रित केलंय. चित्रपटनिर्मितीच्या बरोबरीने मराठी चित्रपट व्यावसायिकांच्या स्नेहसंम्मेलनाची कल्पना निघाली; त्यातूनच पुढे 'महामंडळाची' स्थापनाही झाली. या महामंडळाच्या स्थापनेमुळे व्यवसायातील लहानथोर सर्वांसाठी कल्याणकारी योजना आकार घेऊ लागली. त्याकाळी चित्रपटसृष्टीला प्रेत्येक माणूस स्वतःचं घर आणि चित्रपट याखेरीज सामाजिक बांधिलकीचं बंधन मानून झटत असे. 'माझ्या' पेक्षाही 'आपण' महत्वाचे हा भाव सर्वांचा होता. मुंबईला झालेलं पहिलं सम्मेलन मराठी चित्रपट व्यवसायाच्या इतिहासातलं सुवर्णाक्षरांच पान होय. श्रीमती लीला गांधींचा मुलगा अस्वस्थ होता, पण तरीही त्या स्पेशल गाडीने मुंबईस आल्या आणि म्हणाल्या, "इथे सर्वांची हजेरी लागणार; फक्त मीच नसेन. असं कसं ? राहवेना म्हणून आले. एकच करा, लवकर कार्यक्रम घ्या माझा. मी लगेच परत जाईन." आणि या बाई अशा बेफाम नाचल्यात म्हणून सांगू. त्या जेव्हा विंगेत आल्या तेंव्हा स्वतः शांतारामबापू आत धावले, संध्याबाई पदराने लिलाबाईंचा घाम पुसत होत्या. हे इतकं एकमेकांना धरून राहणं, व्यवसायाकरता झटणं ही वृत्ती फार कमी होत चालली आहे.
पुणे - मुंबई - कोल्हापूरची व्यावसायिक मंडळी तर नित्य घरी असतच. पण साहित्यिक आणि राजकारणी धुरंधरही असत. पपा (गदिमा ) चोरघडेकाका (वामनराव चोरघडे ) हे तर घरचेच. त्यांच्या पंक्तीला कधी पु. भा. भावे, गोविंदराव तळवलकर, जयंत साळगावकरही असत. या लोकांचे साध बोलणंसुद्धा इतकं प्रासादिक असे, बोलण्यात इतकं वैविध्य असे की मीही आपोआप बहुश्रुत झाले. दिनकर साक्रीकरजी, श्री. दामू केकरे, श्री. प्रभाकर कुंटे यांच्याचप्रमाणे बाबूजी, सी. रामचंद्रही खूप जिव्हाळ्याचे मित्र होते. साहित्यिक, नाट्य-चित्रपट सृष्टीतील मित्रांव्यतिरिक्त राजकारणातली माणसही विनुकांना मित्रत्वाच्या नात्याने भेटत. श्री. मधुसूदनजी वैराळे (वैराळेकाका) आणि श्री. मधुकररावजी चौधरी (चौधरीकाका) यांच्याशी तर घरोब्याचे संबंध आहेत. तसेच माननीय श्री. यशवंतरावजी चव्हाण, श्री. शरदचंद्र रावजी पवार व श्री. सुशील कुमारजी शिंदे हे स्वकीयच होत. या सर्वांशी असणाऱ्या निःस्वार्थ मैत्रीचा परिपाक म्हणूनच की काय, ही माणसंही आपआपल्यापरीने त्याव्यवसायाच भलं व्हावं म्हणून योजना करीत - अमलात आणीत. मराठी निर्मात्याला वरदान ठरणारी करपरतीची योजना हा त्या मैत्रीचाच प्रकट उद्गार.
आपलेपणाचं नातं
इतक्या विविध क्षेत्रातील, विविध स्तरांवरच्या लोकांशी मित्रत्वाचं, आपलेपणाचं नातं जपण खरं तर सहजशक्य नाही. विनुकांना हे सहज साध्य झालं कारण निरांजनाच्या वातीप्रमाणे सतत शांतपणे तेवणाऱ्या आईची त्यांना पूर्ण साथ होती. मला मनापासून वाटतं, आईची जर साथ नसती तर विनुका कधीच इतक्या भराऱ्या मारू शकले नसते. आईच्या या सोबतीमुळेच विनुकांच्या प्रत्येक मित्राला केवळ मित्र मिळाला नाही तर एक 'घर'. या घराच्या जिव्हाळ्याने जी नाती जोडली गेली त्याचे बंध इतके घट्ट आहेत की आज आई आणि विनुका दोघेही नाहीत, पण त्यांचा हा मित्र परिवार आम्हा दोघा भावंडांवर मायेची पाखर घालायला तप्तर आहे.
गेल्या तीन पिढ्यांच्या संबंधाने रक्ताच्या नात्यापेक्षाही जास्त जवळ असणारे बाबाकाका (बाबासाहेब भोपटकर भारतमाता सिनेमाचे मालक) वडीलकीच्या नात्याने आम्हाला मार्गदर्शन करीत आहेत. प्रभादाचा (प्रभाकर पेंढारकर ) फोन आल्यावर मी रडत त्याला सांगू लागले, "प्रभादा, माझं माहेर संपलं रे. " तर एकच वाक्य त्यानं सुनावलं, "मुंबईत आत्ती (सुलोचनाबाई ) आणि पुण्यात चारूका (चारुदत्त सरपोतदार ) असेपर्यंत तरी हे वाक्य उच्चरण्याचा तुला अधिकार नाही. " आणि माझी चूक मलाच कळली. व्यवसायाच्या निमित्ताने ओळख झालेली ही दोन माणस घरची माणसं म्हणून घरात केंव्हा सामावली हे कळलंच नाही. घरच्या बाबींमध्ये काही सांगायचे असेल, अगदी तक्रारही करायची असेल तर विणुकांना 'सुनावण्याची' ताकद फक्त चारुकांची. आत्ती जरा प्रेमाने समजुतीने आईची बाजू मांडणार. परवा चौधरीकाका - काकू (मधुकररावजी चौधरी ) घरी आले तर निघताना प्रेमळ आवाजात बजावत राहिले, "आम्ही मुंबईत आहोत तोवर तुझं माहेर आहे हे नेहमी लक्षात ठेव. " ऐकलं अन उभ्या जागी हुंदका फुटला. मनोहर रणदिवेंनी (पपा) छोटूची काळजी स्वतः घ्यायला सुरुवात केली. जसा किशोर तसा छोटू हे आधीपासून होतच. आता ती मिठी जास्त दृढ झाली. एका घराच्या छपराखाली इतकी सारी घर नव्हे 'माहेर' मला मिळवून देणारे विनुका आज नाहीत... ही सारी मांणसं, त्यांचं प्रेम, त्यांचं आपलेपण हे सारं भरपूर मिळत असतानाही 'विनुका' या हाकेसरशी गळ्यात आवंढा येतो, डोळे भरून येतात आणि जाणवतं ते एकच, 'बाबूल मोरा नैहर छूटो ही जाय ....
- श्यामला ठाकूर