चित्र-चरित्र

त्यागराज बाबूराव पेंढारकर
त्यागराज बाबूराव पेंढारकर
छायालेखक
११ फेब्रुवारी १९२६ --- २८ सप्टेंबर २०१८

बाबूराव पेंढारकर यांचे सुपुत्र म्हणून जगाला परिचित असले तरी एक संवेदनशील छायाचित्रकार म्हणून त्यागराज पेंढारकर चित्रपटसृष्टीला परिचित आहेत. त्यागराज पेंढारकर हे चित्रपटसृष्टीसाठी लोकप्रिय असणाऱ्या करवीर नगरीत जन्मले. घरातूनच कलेचा वारसा लाभलेल्या त्यागराज यांनी इंजिनिअर होण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी व्ही. जे. टी. आय. इंजिनिअरिंगची परीक्षाही त्यांनी दिली. पण दोनदा अनुत्तीर्ण झाल्यानंतर कोल्हापूरपासून लागलेला छायाचित्रणाचा छंद जोपासण्यासाठी भालजींच्या स्टुडिओत कॅमेरा विभागामध्ये ते दाखल झाले. पण लवकरच व्ही. शांताराम यांच्या ‘राजकमल’ स्टुडिओत 'परछाई' चित्रपटाच्या वेळी जी. बाळकृष्ण यांना छायालेखनात सहाय्यक झाले . ‘दो आँखे बारह हाथ ' या चित्रपटाच्या वेळी जी. बाळकृष्ण आजारी पडल्याने त्यागराज यांना छायालेखनाची संधी मिळाली. यानंतर 'मौसी ' आणि टेक्निकलर 'नवरंग 'नंतर ‘राजकमल’ सोडून ते मुक्त छायालेखक-छायाचित्रकार म्हणून काम करू लागले. ‘जेमिनी’चा 'पैसा या प्यार ' व अन्य चित्रपट, काही गुजराती चित्रपट याबरोबरच दादा कोंडकेंचा 'आली अंगावर', 'आंधळा मारतो डोळा', 'यशोदा', 'राजा शिवछत्रपती', 'चव्हाटा' , 'बाल शिवाजी', 'आघात' , 'अभिलाषा' इ. मराठी चित्रपटही केले. त्यागराज यांचे 'पडद्यामागचा माणूस ' हे आत्मचरित्र प्रकाशित झाले आहे.

चित्रपटांचा चालता बोलता इतिहास म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ छायाचित्रकार त्यागराज पेंढारकर (९३) यांचे २८ सप्टेंबर २०१८ रोजी सकाळी कोल्हापुरात निवासस्थानी कमी रक्तदाबाने निधन झाले. ज्येष्ठ अभिनेते बाबुराव पेंढारकर यांचे चिरंजीव होत. - सुधीर नांदगावकर



चित्र-चरित्र