चित्र-चरित्र

राजा गोसावी
राजा गोसावी
अभिनेता
२८ मार्च १९२५ --- २८ फेब्रुवारी १९९८

मराठी रंगभूमीवरील आणि मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते राजा गोसावी यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील माणदेश भागातल्या सिद्धेश्‍वर कुरोली येथे झाला. एकूण २६५ मराठी चित्रपटांत आणि ५ हिंदी चित्रपटांत त्यांनी भूमिका केल्या; तर अनेक नाटके आणि त्याचे शेकडो प्रयोग त्यांनी केले.

मेळे, गाणी, नकला आणि नाटके या गोष्टीत रमण्याची लहानपणापासून आवड असलेल्या राजाभाऊंनी घरातून काढता पाय घेतला आणि थेट गंगाधरपंत लोंढेंच्या ‘राजाराम संगीत मंडळी’त प्रवेश मिळवला. तेथे पडद्यामागील कामे करत असतानाच त्यांनी मा. विनायकांच्या ‘प्रफुल्ल पिक्चर्स’मध्ये नोकरी पत्करली. ही नोकरी करत असतानाच चित्रपटाच्या विविध भागात थातूरमातूर कामे केल्यावर त्यांना ‘चिमुकला संसार’ या चित्रपटात पहिले किरकोळ काम मिळाले. नंतर त्यांनी ‘गजाभाऊ’ आणि ‘बडी मॉं’ या चित्रपटांतही किरकोळ कामे केली. ‘गजाभाऊ’च्या निमित्ताने त्यांचा दामूअण्णा मालवणकरांशी परिचय झाला, तेव्हा त्यांनी मालवणकरांच्या ‘प्रभाकर नाट्य मंदिर’ या नाट्यसंस्थेत प्रवेश केला. तेथे त्यांना नाटकाचे प्रॉम्टिंग करण्याचे काम व हळूहळू नाटकात उभे राहण्याची संधी मिळाली

प्रथम त्यांना या संस्थेच्या ‘भावबंधन’ या नाटकातील स्टेशन मास्तरच्या पहारेकर्‍याचे काम मिळाले. नंतर ते त्या नाटकात मोरू, फौजदार, मनोहर व धुंडिराज या भूमिका करत असत. धुंडिराजचा भाबडेपणा ते बेमालूम व्यक्त करीत. भावी काळात त्यांनी नाटकांत आणि चित्रपटांत प्रेमळ मनाच्या आणि साध्या स्वभावाच्या विविध व्यक्तिरेखा रंगवल्या, त्याची मूळ प्रेरणा धुंडिराज व्यक्तिरेखेत होती. त्यानंतर राजा गोसावी यांनी ‘उधार उसनवार’, ‘एकच प्याला’, ‘सौभद्र’, ‘संशयकल्लोळ’, ‘शिवसंभव’ अशा असंख्य नाटकात लहानसहान कामे केली. ५ जुलै १९४९ रोजी त्यांचे लग्न झाले आणि प्रपंचाचा खर्च भागविण्यासाठी त्यांनी पुण्याच्या ‘भानुविलास’ थिएटरमध्ये बुकिंग क्लार्कची नोकरी पत्करली. नाटकात ते काम करत होते. दत्ता धर्माधिकारी यांच्या ‘अखेर जमलं’ या चित्रपटाचे साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करताना त्यांनी याही चित्रपटात छोटीशी भूमिका केली होती. कोडे सोडवण्यार्‍या माणसाची त्यांनी रंगवलेली व्यक्तिरेखा राजा परांजपे यांच्या नजरेत भरली आणि त्यांनी ‘लाखाची गोष्ट’ या चित्रपटात काम दिले. हे विनोदी चित्र कमालीचे गाजले. ज्या ‘भानुविलास’मध्ये ते बुकिंग क्लार्क होते, तेथेच हा चित्रपट हाऊसफुल गर्दी खेचत होता. चित्रपटाला महोत्सवी यश मिळाले. अल्पावधीतच ते ‘हिरो’ बनले. या यशामुळे चित्रपट निर्माते त्यांच्याभोवती फिरू लागले. ‘चिमणी पाखरं’, ‘बोलाविता धनी’, ‘सौभाग्य’, ‘अबोली’, ‘गंगेत घोडं न्हालं’, ‘आलिया भोगासी’, ‘आंधळा मागतो एक डोळा’, ‘दोन घडीचा डाव’, ‘पसंत आहे मुलगी’, ‘इन मीन साडेतीन’, ‘देवघर’, ‘उतावळा नवरा’, ‘नवरा म्हणू नये आपला’, ‘झालं गेलं विसरून जा’ असे त्यांचे अनेक चित्रपट गाजले. त्यांचे हे यश बघून मद्रासच्या रा.व्ही. राम या विख्यात चित्रसंस्थेने ‘गाभी’ व ‘स्कूल मास्टर’ या हिंदी चित्रपटांत त्यांना महत्त्वाची भूमिका दिली. दत्ता धर्माधिकारी यांच्या ‘महात्मा’ या हिंदी-मराठी-इंग्रजी चित्रपटातील त्यांची भूमिका विशेष लक्षात राहिली. ‘लाखाची गोष्ट’नंतरच्या दशकात राजाभाऊंचे लागोपाठ साठ-सत्तर चित्रपट आले. त्यांची अमाप लोकप्रियता पाहून होमी वाडियांनी ‘राजा गोसावीची गोष्ट’ हा बोलपट काढला. यात राजा गोसावी यांनी तिहेरी भूमिका केली.

धुंडिराज, कामण्णा (भावबंधन), तळीराम (एकच प्याला), नूपुर (पुण्यप्रभाव), गोकुळ (प्रेमसंन्यास) या राम गणेश गडकरींच्या नाटकातील विनोदी भूमिका राजा गोसावी यांनी गाजवल्या. चित्रपटांतील त्यांच्या विनोदी भूमिकांनाही प्रेक्षकांचा अमाप प्रतिसाद मिळाला.

पाच फूट सात इंच उंच, नाकीडोळी नीटस असे राजा गोसावी यांचे अव्यंग व्यक्तिमत्त्व होते. मराठीतील इतर विनोदी नटांपेक्षा त्यांचे व्यक्तिमत्त्व अधिक उठावदार होते. सहजता हा त्यांच्या अभिनयाचा सर्वात मोठा गुण होता. घरीदारी वावरावे इतक्या सहजतेने ते रंगमंचावर व चित्रपटात वावरत. त्यांच्या संवादफेकीत कृत्रिमतेचा लवलेश नव्हता. मिळालेल्या भूमिकेचे मर्म ओळखून ते त्यांचे दर्शन नेमकेपणाने घडवत. निर्व्याज, भाबडा व निरागस माणूस उभा करणे त्यांना सहजगत्या जमत असे.

चित्रपटातल्या यशामुळे त्यांच्याकडे नाटकातल्या - विशेषत: विनोदी नाटकातल्या भूमिकांची रीघ लागली. बाबूराव गोखले यांच्या ‘श्री स्टार्स’ या नाट्यसंस्थेतर्फे ‘करायला गेलो एक’ हे फार्सिकल नाटक आणले. त्यातील हरिभाऊ हर्षेंची भूमिका त्यांनी बहारीने सादर केली. याच वेळी ‘रंग श्री’ नावाची स्वत:ची नाट्यसंस्था स्थापन करून त्यांनी अनेक जुनी-नवी नाटके रंगमंचावर आणली व महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात त्याचे शेकडो प्रयोग केले. ‘हा स्वर्ग सात पावलांचा’, ‘या घर आपलंच आहे’, ‘लग्नाची बेडी’, ‘तुझे आहे तुजपाशी’, ‘वरचा मजला रिकामा’ अशा अनेक नाटकांतील त्यांच्या भूमिका गाजल्या, तर ‘संशयकल्लोळ’मधील फाल्गुनराव व वसंत सबनीस यांच्या ‘सौजन्याची ऐशी तैशी’मधील नाना बेरके या बनेल पुरुषाची भूमिका सर्वात गाजली.

नाटकांव्यतिरिक्त अधूनमधून राजा गोसावी चित्रपटातही दिसत असत. या काळात राजा गोसावी-शरद तळवलकर या जोडीचे काही चित्रपट गाजले. ‘अवघाची संसार’, ‘अतिशहाणा त्याचा’, ‘वाट चुकलेले नवरे’, ‘येथे शहाणे राहतात’, ‘लग्नाला जातो मी’, ‘कामापुरता मामा’ व ‘शेरास सव्वाशेर’ अशा अनेक चित्रपटांत या जोडीने प्रेक्षकांना मनमुराद हसवले. ‘दामूअण्णा मालवणकर- विष्णुपंत जोग’ यांच्याप्रमाणेच ही दुक्कल गाजली. वसंतराव जोगळेकर यांच्या ‘हा खेळ सावल्यांचा’मधील खलप्रवृत्तीच्या मामाची भूमिका व ‘असला नवरा नको ग बाई’ आणि ‘चंगूमंगू’मधील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. अखेरच्या काळात त्यांनी वि. वा. शिरवाडकरांचे ‘नटसम्राट’ नाटक सादर करून त्याचे खेड्यापाड्यात प्रयोग केले. बारामती येथे झालेल्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनाचे अध्यक्षस्थानही त्यांनी भूषवले. ‘नटसम्राट’पेक्षा ‘विनोद सम्राट’ म्हणून ते लोकांच्या अधिक स्मरणात आहेत.

- सतीश जकातदार



चित्र-चरित्र