चित्र-चरित्र

प्राजक्ता माळी
प्राजक्ता माळी
अभिनेत्री
८ ऑगस्ट १९८९

प्राजक्ताचा जन्म पंढरपूरचा. तिचं शालेय तसेच महाविद्यालयीत शिक्षण पुण्यात झाले. कला विषयाचे शिक्षण तिनं ललित कला केंद्रात घेतलं. लहानपणापासूनच तिला नृत्याची आवड. भरतनाट्यममध्ये तिनं संगीतविशारद ही पदवी घेतली. ‘सह्याद्री’ वाहिनीवरील ‘ढोलकीच्या तालावर’ या कार्यक्रमामध्ये ती सहावीमध्ये शिकत असताना पहिल्यांदा कॅमेऱ्याला सामोरी गेली. संजय सूरकर यांचं दिग्दर्शन असलेल्या ‘तांडला-एक मुखवटा’ या चित्रपटाद्वारे तिनं २००७ मध्ये मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. ‘संघर्ष’, ‘खोखो’, ‘हंपी’ हे तिचे काही उल्लेखनीय चित्रपट. ‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेनं तिला मोठी लोकप्रियता मिळवून दिली. ‘सुवासिनी’, ‘बंध रेशमाचे’ या तिच्या आणखी काही मालिका. ‘म्हैस’ या चित्रपटासाठी तिनं नृत्यदिग्दर्शक म्हणून काम केलं होतं. ‘मनकर्णिका- द क्वीन ऑफ झाशी’ या हिंदी चित्रपटामध्ये सध्या ती काम करीत आहे.

'डोक्याला शॉट' हा प्राजक्ताचा अलीकडील मराठी चित्रपट. तसेच प्राजक्ताचे लेखनाचे अंगही २०२१ मध्ये रसिकांना ठाऊक झाले. प्राजक्ताने लिहिलेल्या कवितांचा संग्रह असलेले 'प्राजक्तप्रभा' हे पुस्तक २०२१ मध्ये प्रकाशित झाले.

ती महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमात पाहायला मिळत आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना दिसत आहे. प्राजक्ता ने प्राजक्तराज हा तिचा नवा ज्वेलरी ब्रँड तिने लाँच केला आहे.

-मंदार जोशी



चित्र-चरित्र