अतिथी कट्टा

दिनांक : ३१-१-२०१८

‌‘यंटम’मधील सनईवादक माझ्या सर्वोत्तम भूमिकांपैकी एक…


नावापासूनच आपलं वेगळेपण जपलेल्या ‘यंटम’ या चित्रपटाची निर्मिती अमोल ज्ञानेश्वर काळे यांनी केली असून दिग्दर्शन समीर आशा पाटील यांचं आहे. चित्रपटाला संगीत चिनार-महेश यांनी दिलं आहे. अभिनेते सयाजी शिंदे, वैभव कदम, अपूर्वा शेळगावकर, ऐश्वर्या पाटील, अक्षय थोरात आणि ऋषिकेश झगडे यांचा अभिनय आपल्याला पाहायला मिळणार आहे. या चित्रपटामध्ये सयाजी शिंदे यांनी सनईवादकाची भूमिका साकारली आहे. त्याबद्दल त्यांचं हे मनोगत.
———-

‌‘यंटम’ची गोष्ट खूप आवडल्यामुळे मी हा चित्रपट स्वीकारला. गोष्टीकडे पाहण्याचा लेखक-दिग्दर्शकाचा अॅप्रोच मला खूप आवडला. या चित्रपटामधील कलाकार मला खूप वेगळे वाटले. चित्रीकरणास सुरुवात करण्यापूर्वी दिग्दर्शकानं एक कार्यशाळा घेतली. दिग्दर्शकाचा अभ्यासही चांगला होता. मी आजवर बरंच काम केलं आहे. परंतु, कार्यशाळेसारख्या काही गोष्टी राहून गेल्या होत्या. त्यामुळे मलाही वाटलं की आपण आता नव्यानं सुरुवात करायला पाहिजे. त्यामुळे मी स्वत:ची पाटी कोरी केली आणि चित्रपटामधील इतर नवीन कलाकारांप्रमाणे या कार्यशाळेत सहभागी झालो आणि वेगळ्या दृष्टिकोनातून या चित्रपटाकडे बघितलं.

या चित्रपटात मी साकारलेल्या सनईवादकाचं आयुष्य विख्यात सनईवादक मधुकर धुमाळ यांच्याशी खूप साम्य दाखवणारं आहे. तेव्हा सुरुवातीला मला वाटलं होतं की सनईवादकाची भूमिका खुद्द धुमाळ यांनीच साकारली तर ती जास्त चांगली होईल. परंतु, धुमाळ यांच्यावरील भाग आणि चित्रपटामधील इतर भाग यात थोडी तफावत आहे. त्यामुळे मी ही भूमिका माझ्याकडे आली. अर्थात धुमाळ यांच्यासारखं भासावं यासाठी मी खूप प्रयत्न केले.



विशेष म्हणजे धुमाळ यांच्याकडून मला सनईवादनाचे छोटे छोटे धडे गिरवता आले. सनईवादनाचं माझं हे शिक्षण माझं घर, गच्ची किंवा धुमाळ यांच्या घरीही चालायचं. श्री. धुमाळ यांनी मला सनई शिकवण्यासाठी खूप वेळ दिला. हे काम एवढं कठीण होतं की मी अनेकदा खूप थकून जायचो. मात्र दिग्दर्शक समीर आशा पाटील हे आपल्यातील दिग्दर्शकाचं समाधान होत नाही तोपर्यंत कलाकारांकडून काम करून घेतात. ही कामाची खूप चांगली पद्धत आहे. भूमिकेच्या लांबीच्या दृष्टीनं मी खूप चित्रपट केलेत. परंतु, उंचीवर जाईल असा हा चित्रपट आहे. हाताच्या बोटावर मोजता येतील अशा चांगल्या भूमिका माझ्याकडे आजवर आलात. त्यापैकी ‌‘यंटम’मधील सनईवादकाच्या भूमिकेचं मी नाव घेईन.

‌‘यंटम’चा जीव त्याच्या संगीतामध्ये आहे. खरं तर माझ्यावर गीताचं चित्रीकरण झालं नसल्यामुळे मी त्याचा ‘पार्ट’ नव्हतो. परंतु, चित्रीकरणानंतर काही काळानं मी त्याची गाणी ऐकली नि मी त्याच्या प्रेमात पडलो. महेश-चिनार यांनी संगीतबद्ध केलेली ही गाणी महाराष्ट्रातील संगीतरसिक डोक्यावर घेतील अशी मला खात्री आहे. त्यांच्या संगीतामुळे चित्रपटाला एक चांगली उंची प्राप्त झाली आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक रवी जाधव हे या चित्रपटाचे ‌‘प्रेझेंटर’ आहेत. त्याचा मला विशेष आनंद झाला. मराठी चित्रपट न चालण्यामागचं एक प्रमुख कारण म्हणजे प्रेक्षकांपर्यंत त्याची प्रसिद्धीच पोचत नाही. परंतु, चित्रपटाच्या प्रसिद्धीचा भाग रवी जाधव या व्यक्तीला खूप चांगला कळला आहे. या विषयावर त्याची खूप चांगली पकड आहे. एकंदरीत एक चांगली भट्टी जमलेला हा चित्रपट आहे.

– सयाजी शिंदे

ठेवणीतले लेख

    आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा



    [recaptcha]

    काही निवडक प्रतिक्रिया:

    नरेंद्र चौधरी


    आपल्या संकेतस्थाळाच्या माध्यमातून असे लक्षात आले कि आपन खूप छान माहिती पुरवत आहात.
    संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया