‘वेडिंगचा शिनेमा’ म्हणजे निव्वळ मज्जा
——
आपल्या मनातलं चित्र प्रेक्षकांना दाखवावं, असा विचार अनेक वर्षांपासून माझ्या मनात होता. कारण कविता जेव्हा आपण वाचत असतो तेव्हा आपला आपण एक चित्रपट पाहत असतो. एखादं गाणं जेव्हा आपण तयार करतो तेव्हा आपल्या डोळ्यांसमोर एक चित्र असतं. जेव्हा मी दोन पुस्तकं लिहिली, ती वाचकांना आवडल, त्याच्यातूनही काहीतरी ‘व्हिज्युअलाइज’ होत होतं. परंतु, मला असं सारखं वाटत होतं की आपल्याला जर चित्रपट दिग्दर्शित करायचा असेल तर आपण पूर्ण तयारी करावी. पहिली तयारी मनाची असावी आणि दुसरी तांत्रिकदृष्ट्या आपण परिपूर्ण असावं. बहुधा माझ्या डॉक्टरी पेशाचा त्याच्याशी संबंध असावा. जाड पुस्तक वाचून तयारी करायची हे मी अनेक वर्षं करीत आलो आहे. त्यामुळे दिग्दर्शक बनण्याची माझी प्रक्रिया गेल्या चार-पाच वर्षांपासून सुरू होती. अगदी ‘स्टेप बाय स्टेप’ मी दिग्दर्शक बनलो.
साधारण दोन-अडीच वर्षांपूर्वी गोष्टीचा एक धागा सुचला होता. हा धागा असा होता की, एक फार संवेदनशील व्यक्ती आहे, त्या व्यक्तीला अगदी न आवडणारं काम करावं लागलं तर त्या व्यक्तीची काय घुसमट होईल? तिची चिडचिड होईल का? तिला वैताग वाटेल का? त्यातूनच ही व्यक्ती आपोआप आपल्या मनाची दारं उघडेल का? कारण ही व्यक्ती अगदी घट्ट आहे. तिनं स्वत:ला अडवून ठेवलं आहे. जसं की गणेशोत्सवातील मिरवणुकीत काही लोक नाचत नाहीत. तेव्हा मग त्या व्यक्तीची मित्रमंडळी त्याला किंवा तिला घरातून ओढून आणत नाचायला लावतात आणि नंतर ती व्यक्तीच मिरवणुकीत सर्वात जास्त चांगलं नाचते. स्वत:ला अडवून ठेवलेल्या व्यक्तीची ही गोष्ट आहे.या चित्रपटाची गोष्ट लिहिताना मला सोशल मीडियाची खूप मदत झाली. कारण सोशल मीडियावर प्री वेडिंग शूटचे प्रचंड व्हिडीओज उपलब्ध होते. ते मी बघितले आणि चित्रपटाची एक बांधीव गोष्ट समोर आली. ही एका दिग्दर्शिकेची गोष्ट आहे की जिच्या वाट्याला ‘प्री वेडिंग शूट’ येतं किंवा तिला ते करावं लागतं. ते करताना तिला काय काय मिळतं, तिला वेगळं आयुष्य दिसायला लागतं का? वेगळं आयुष्य मिळतं का? या प्रश्नांची उत्तरं या गोष्टीत नि या चित्रपटात आहेत. ही गोष्ट मी दोन-अडीच वर्षांचा वेळ घेऊन लिहिली आहे.
हा चित्रपट म्हणजे मज्जा आहे. चित्रपट पाहताना प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर पूर्ण वेळ स्मित हास्य राहील याची आम्ही काळजी घेतली आहे. तसेच डोकं घरी ठेवून हा चित्रपट बघायला चित्रपटगृहात या असं मी म्हणणार नाही. त्याउलट या चित्रपटामधून मी काहीतरी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. विनोद ही अशी गोष्ट आहे की, आपल्याला जे म्हणायचंय ते सांगण्याच्या मध्ये जर दुसरा माणूस आला तर त्या विनोदाचा पोत बदलतो. विनोदात पात्तळ होण्याची, घसरण्याचीही शक्यता असते. मला तसं काही करायचं नव्हतं. म्हणून मी स्वत:च दिग्दर्शक बनायचं ठरवलं. अलकाताईंसारख्या तीनशेहून अधिक चित्रपटांचा अनुभव असलेल्या अभिनेत्रीला चित्रपट करताना खूप मजा आली. प्रवीण तरडेसारखा चांगला लेखक-दिग्दर्शक या चित्रपटाचं शूटिंग करताना खूप हसला. त्यामुळे प्रेक्षकांनाही हा चित्रपट आवडेल अशी मला आशा आहे.
– सलील कुलकर्णी
काही निवडक प्रतिक्रिया:
प्राध्यापक डॉक्टर सुजय पाटील कोल्हापूर
लेखिका जयश्री दानवे यांनी बेबीनंदा यांच्याविषयीचा लेख अप्रतिम पद्धतीनं सादर केलेला आहे . विविध संदर्भांचा मुळे हा लेख वाचनीय झालेला आहे.
संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया