अतिथी कट्टा

दिनांक : २२-०२-२०१९

‌‌‌‌‌‌‌‌तो परत आलाय…
मराठी चित्रपटांचा आशयविषय, शैली बदलून टाकणार्‍या दशकभरापूर्वीच्या काही महत्त्वाच्या चित्रपटांमधील एक म्हणजे ‘डोंबिवली फास्ट’. या चित्रपटामुळे संदीप कुलकर्णीला लोकप्रियतेच्या शिखरावर नेऊन ठेवलं. याच शीर्षकाशी साधर्म्य असलेला ‘डोंबिवली रीटर्न’ हा चित्रपट घेऊन संदीप आता प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. त्याबद्दल त्याच्याशी साधलेला हा संवाद.

——

‘डोंबिवली रीटर्न’ तुला का करावासा वाटला?

– ‘डोंबिवली फास्ट’च्या प्रदर्शनानंतर जवळपास दोन-तीन वर्षं त्याची बरीच चर्चा झाली. साधारण त्या व्यक्तिरेखेसारखेच रोल्स मला त्या काळात ऑफ झाले होते. त्यामुळे त्या काळात या ‘इमेज’मधून बाहेर पडण्याचा मी प्रयत्न करीत होतो. ‘गैर’ हा चित्रपट त्यासाठीच मी केला. ‘कॉमनमॅन’चा लढा किंवा ‘हार्डहिटिंग’च्या जॉनरमधून मला बाहेर पडायचं होतं. संदीप केवलानी या निर्मात्यानं मला एकदा ‘डोंबिवली फास्ट’चा सीक्वेल बनविण्याबद्दल सुचविलं होतं. तेव्हा मी त्यांना सांगितलं होतं की, ‘डोंबिवली फास्ट’मधील माधव आपटेची व्यक्तिरेखा चित्रपटाच्या शेवटी संपली आहे. त्यामुळे त्याचा सीक्वेल बनणं शक्य नव्हतं. तसेच तो चित्रपट आम्ही ज्या उंचीवर नेऊन ठेवला होता, त्याची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न करणंही चुकीचं ठरलं असतं. त्यामुळे सीक्वेलच्या कल्पनेकडे मी खूप गांभीर्यानं पाहिलं नव्हतं. चारुदत्त भागवत तसेच माझ्या काही लेखक मित्रांसह मी नेहमीच नव्या गोष्टींवर ‘ब्रेनस्टॉर्मिंग’ करीत असतो. त्याच वेळी महेंद्र तेरेदेसाई मला भेटला. त्यानं माझ्या ‘प्रेमसूत्र’ चित्रपटाचे संवाद लिहिले होते. तेव्हा त्यानं मला त्याच्याकडे एका ‘कॉमनमॅन’ची गोष्ट असल्याचं सांगितलं. तो मंत्रालयाच्या प्रसिद्धी विभागात छायाचित्रकार म्हणून काम करीत असतो आणि राहायला उपनगरात असतो. त्याची ती गोष्ट असते. मग ती गोष्ट मी त्याच्याकडून ऐकली. ती मला इंट्रेस्टिंग वाटली. त्यावेळी चर्चा करता करता ही व्यक्तिरेखा कुठं राहत असेल, याचा आम्ही विचार केला. तेव्हा ती डोंबिवलीतच राहत असेल तर… अशापद्धतीनं मग आम्ही त्या गोष्टीचे धागे विणत गेलो.

‘ड़ोंबिवली रीटर्न’ हा ‘डोंबिवली फास्ट’चा सीक्वेल आहे का?

– हा ‘डोंबिवली फास्ट’चा सीक्वेल नाही. ही गोष्ट पूर्णपणे वेगळी आहे. हा आत्ताचा माणूस आहे. त्याला भ्रष्टाचार माहित आहे. ‘डोंबिवली फास्ट’मधील ‘माधव आपटे’ची छोट्या छोट्या गोष्टींसाठी चिडचिड व्हायची. याचं असं नाही. म्हणून आम्ही त्याचं नाव ‘अनंत वेलणकर’ असं ठेवलं. ‘सीक्वेल’ नाही मग शीर्षकामध्ये ‘रीटर्न’ हा शब्द का? असाही प्रश्‍न काहींना पडणं साहजिक आहे. ‘रीटर्न’ हा शब्द लोकल रेल्वे प्रवासाशी, तिकीटाशी निगडीत आहे. त्यापलीकडे मी शीर्षकाबाबत खुलासा करणार नाही. कारण जर तो मी करायला गेलो तर चित्रपटाचा महत्त्वाचा तपशील ‘लीक’ होऊ शकतो. परंतु, चित्रपट पाहिल्यानंतर ‘डोंबिवली रिटर्न्स’ हे शीर्षक किती योग्य आहे, याची कल्पना येईल.

या चित्रपटाचं नेमकं सूत्र काय आहे?

– या चित्रपटामधील मुख्य व्यक्तिरेखेला लॉटरी काढायची सवय आहे. ती मध्यमवर्गीय घरातील अनेकांमध्ये दिसते. वर्षानुवर्षं लॉटरी लागली नसली तरी अनेक जण तिकीट काढायचं थांबवत नसतात. एकदा हे तिकीट त्याच्या शर्टाच्या खिशात तसंच राहतं नि ते धुतलं जातं. तेव्हा त्याची बायको वैतागते. त्यावर हा म्हणतो, नशिबानं पैसे मिळाले तर त्यात काय वाईट आहे? तेव्हा त्याचा सीए असणारा भाऊ त्याला म्हणतो, असे पैसे असे नशिबानं नाहीत मिळत. मिळालेल्या संधीचं लोकं सोनं करतात. ही गोष्ट त्याच्या डोक्यात अगदी फिट बसते. तेव्हा मग या अनंत वेलणकरला अशी काही संधी मिळते का आणि तो त्याचं काय करतो, हे सगळं तुम्हाला चित्रपटात पाहायला मिळेल.

अभिनयाबरोबरच या चित्रपटाची निर्मितीही आपण करावी असं तुला का वाटलं?

– या चित्रपटाचा पहिला निर्माता मी होतो. त्यानंतर मग इतर काही भागीदार या चित्रपटाशी जोडले गेले. ‘डोंबिवली फास्ट’साठी आम्हाला निर्माता मिळायला दीड वर्ष लागलं होतं. त्या काळात तशी फिल्म बनवणं हे खूप रिस्की होतं. त्याकाळी ९०-९५ लाखांचं बजेट खूप मोठं व्हायचं होतं. त्यामुळे नवीन कलाकृतीसाठी निर्माता शोधण्यासाठी फिरत बसण्यापेक्षा आपणच निर्मिती करावी असं मला वाटलं.

या चित्रपटांमधील कलाकारांची निवड कशी केलीत?

– हा चित्रपट एकाचवेळी हिंदी-मराठीत करायचं ठरल्याप्रमाणे आम्ही त्या दृष्टीनंच कलाकारांची निवड केली. हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषा बोलणार्‍यांना आम्ही प्राधान्य दिलं. राजेश्‍वरी सचदेव, अमोल पराशर, हृषिकेश जोशी, सुनील जोशी या सर्व कलाकारांनी आपापल्या व्यक्तिरेखांना न्याय दिला आहे. सिया पाटीलनं या चित्रपटात छोटीशी असली तरी खूप अवघड भूमिका साकारली आहे. माझा अपवाद वगळला तर ‘डोंबिवली फास्ट’मधील एकही कलाकार यात नाही. त्यामागचं कारण म्हणजे ही गोष्ट पूर्णपणे वेगळी आहे. खुद्द माझ्याबाबत बोलायचं झालं तर मीदेखील या चित्रपटात प्रेक्षकांना खूप वेगळा दिसणार आहे. ‘अनंत वेलणकर’ या नावाची आम्ही जाणीवपूर्वक निवड केली. त्याद्वारे आम्हाला विजय तेंडुलकरांना मानवंदना द्यायची होती. तेंडुलकर हे माझे तसेच महेंद्रचे अत्यंत आवडते लेखक. तसेच मी तेंडुलकरांचा एक लाडका नट होतो. त्यांच्या बर्‍याच नाटकांमध्ये मी काम केलं होतं. तसेच माझे सगळे सिनेमे ते पाहायचे. त्यामुळे त्यांच्यावरील प्रेमापोटी या व्यक्तिरेखेचे नाव आम्ही ‘अनंत वेलणकर’ असं होतो.

या चित्रपटाचा दिग्दर्शक म्हणून महेंद्र तेरेदेसाईची तू निवड कशी केलीस?

– महेंद्रनं गोष्ट ऐकवली तेव्हा ती दिग्दर्शित कोणी करायची याबद्दल काही निश्‍चित असं ठरलं नव्हतं. लेखनाच्या पातळीवर मी महेंद्रला माझे ‘इनपुट्स’ही बरेच दिले होते. पण महेंद्रनं जेव्हा मला या चित्रपटाचा पहिला ड्राफ्ट मला वाचून दाखवला तेव्हा त्यानंच मला हा चित्रपट दिग्दर्शित करायला आवडेल असं सांगितलं. महेंद्रनं यापूर्वी डॉ. जब्बार पटेल यांचा सहाय्यक म्हणून काम केलं होतं. त्याला सिनेमा कळतो. त्यानेच हा चित्रपट लिहिला असल्यामुळे त्याला हा चित्रपट शूट करण्यापूर्वीच चांगला दिसत होता. म्हणून मग नवीन दिग्दर्शक आणण्याऐवजी महेंद्रची निवड केली. त्याची ही पहिलीच फिल्म. तसेच पहिली फिल्म दिग्दर्शित करणार्‍याकडे इतरांपेक्षा खूप जास्त एनर्जी असते असा माझा आजवरचा अनुभव आहे. म्हणून हा चित्रपट त्याच्याकडेच सोपवला.

‘डोंबिवली रीटर्न’ची इतर काय वैशिष्ट्ये आहेत?

– ‘डोंबिवली रीटर्न’मध्ये एकूण चार सिच्युएशनल गाणी आहेत. या चित्रपटाचा कॅनव्हास जास्त मोठा आहे. चित्रपटाची ‘स्टारकास्ट’ मोठी आहे. ही गोष्ट केवळ मराठी माणसाची न वाटता मुंबईत काम करणार्‍या कोणत्याही मध्यमवर्गीयाला आपलीशी वाटणारी होती. म्हणूनच हा चित्रपट आम्ही एकाच वेळी मराठी आणि हिंदीमध्ये करण्याचं ठरवलं. मग तसं त्याचं नियोजन केलं. जेवढी इनडोअर दृश्यं होती, तेवढी आम्ही दोन्ही भाषांमध्ये चित्रीत केली. मात्र आऊटडोअर शूटिंगच्या वेळी दोन भाषांमधील दृश्यं वेगवेगळी साकारण्यासाठी फारसा वेळ नसल्यामुळे त्याचं आम्ही हिंदीमध्ये डबिंग केलं. मात्र या चित्रपटाची मराठी आवृत्ती आम्ही पहिल्यांदा प्रदर्शित करू. हिंदी आवृत्ती त्यानंतर किंवा आम्ही ती डिजीटल प्लॅटफॉर्मवरही प्रदर्शित करू शकतो. डोंबिवली, कल्याणची खाडी, लोकल गाड्या, चर्चगेट, मंत्रालय भागात आम्ही हा चित्रपट चित्रीत केला. हा चित्रपट आम्ही ३२ दिवसांत पूर्ण केला. उदय मोहितेनं तो शूट केलाय. त्याचं काम खूप अप्रतिम आहे. शैलेंद्र बर्वेचं संगीत आणि पार्श्‍वसंगीत चांगलं झालंय. हा चित्रपट ८० टक्के लोकेशन्सवर चित्रीत केला गेलाय. पहाटे पाच वाजता आम्ही अंबरनाथहून सीएसटीची लोकल पकडून त्यात शूटिंग केलं होतं. या लोकलमध्ये मी तीन वेळा माझी वेशभूषा बदलली. लोकल स्टेशनवर थांबली की मला लोकं बघत असल्यामुळे कपडे बदलता यायचे नाहीत. मात्र लोकलनं स्टेशन सोडलं की मग माझं काम वेगानं सुरू होई. कारण पुन्हा रेल्वेकडून चित्रीकरणाासाठी परवानगी मिळवणं कठीण होतं. त्यामुळे हे सगळं माझ्यासाठी ‘ऍडव्हेंचर शूट’ होतं. चांगल्या सिनेमामध्ये जे गुण आवश्यक असतात, ते सगळे यात आहेत. मुंबईचं जगणं, संस्कृती यात जगते. तसेच या चित्रपटामधून एक ‘मेसेज’ही देण्यात आला आहे. तो द्यायचा म्हणून आम्ही दिलेला नाही, तर चित्रपट संपल्यानंतर तो आपोआप प्रेक्षकांपर्यंत पोचतो.

अलीकडे तुझं चित्रपट, मालिकांमधील दर्शन खूप कमी झालं आहे. त्यामागचं काही कारण…

– गेल्या दोन वर्षांमध्ये माझा कोणताही सिनेमा आला नाही. या चित्रपटाच्या निर्मितीपासून ते प्रदर्शनापर्यंत मी सगळ्याच विभागांमध्ये असल्यामुळे मला माझ्यावरची जबाबदारी नीट पद्धतीनं पार पाडायची होती. मागच्या वर्षी ‘प्रीझनर्स ऑफ वॉर’ नावाची एक मोठ्या कॅनव्हासची मालिका केली होती. तसेच महात्मा जोतिबा फुले यांच्यावर मी एक ‘बायोपीक’ करतो आहे. त्याचं ७० टक्के चित्रीकरण पूर्ण झालं आहे. ही फिल्म लवकरच पूर्ण होईल. नुकताच मी ‘मिस्ड कॉल’ नावाचा सिनेमा केला. अकोल्यामध्ये हा ‘सटायर’ आम्ही चित्रीत केला. याच वर्षी तो प्रदर्शित आला. १९९७च्या सुमारासची मोबाईल आपल्याकडे पहिल्यांदाच आल्यानंतर जे काही घडतं, ते या चित्रपटातून दाखवलं आहे. संजय शर्मानं तो दिग्दर्शित केला आहे. कुंदन शहांचा तो सहाय्यक होता. नागेश कुकुनूरची एक ‘वेब सीरिज’ मी नुकतीच केली. त्याचे दहा भाग तयार आहेत. हे सगळं काम या वर्षी प्रेक्षकांना पाहायला मिळेल.

– संदीप कुलकर्णीला

ठेवणीतले लेख

  आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा  [recaptcha]

  काही निवडक प्रतिक्रिया:

  सचिन पारेकर


  शाहू मोडक हे मराठी चित्रपटातील असामान्य कलाकार होते. 'माणूस' मधील त्यांची भूमिका अविस्मरणीय होती.विनम्र अभिवादन!💐💐

  संजय रत्नपारखी
  संदर्भ:- फेसबुक प्रतिक्रिया