अतिथी कट्टा

दिनांक : २१-०१-२०१९

‌‌‌‌‌‌‌‌‘ठाकरे’चे तीन भागांमध्ये प्रदर्शन…
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या व्यक्तिमत्त्वावर आधारलेला ‘ठाकरे’ चित्रपट येत्या २५ जानेवारीला प्रदर्शित होत आहे. एकाचवेळी तो हिंदी आणि मराठी भाषेत निर्मिला गेला आहे. ‘सामना’ वृत्तपत्राचे संपादक संजय राऊत यांनी त्याची निर्मिती केली आहे. त्यानिमित्तानं त्यांच्याशी केलेली ही चर्चा.

——

बाळासाहेब ठाकरे या व्यक्तिमत्त्वावर चित्रपट निर्मिती तुम्हाला का करावीशी वाटली?

– बाळासाहेब ठाकरे हे एक असामान्य व्यक्तिमत्त्व होतं. जगात असा नेता यापूर्वी झाला नाही. आपल्या माणसांसाठी पडेल ती किंमत देऊन संघर्ष करणं, त्यांना स्वाभिमानानं उभं करणं असं करणार्‍या जगातील मोजक्या नेत्यांमध्ये बाळासाहेबांचं नाव घ्यावंच लागतं. आज महाराष्ट्रात आपण जे काही स्वाभिमानानं जगतो आहोत किंवा उभे आहोत, बाळासाहेब नसते तर ती कल्पनाच करता येत नाही. मी सतत त्यांना लोकमान्य टिळकांच्या जागी पाहिलं. स्वातंत्र्यापूर्वी भारतीय असंतोषाचे जनक हे लोकमान्य टिळक हे होते, स्वातंत्र्यानंतर असंतोषाचे जनक असल्याचा मान बाळासाहेबांना मिळतो. लोकमान्य टिळक आणि बाळासाहेबांचे जीवन आणि कार्य यांच्यात मला खूप साम्य आढळते. लोकप्रियता, कामाची पद्धत, कुटुंबप्रमुख म्हणून तसेच पार पाडलेल्या राजकीय जबाबदार्‍या यांच्यात मला खूप साम्य वाटलं. ‘गांधी’ चित्रपट पाहून मी भारावलो होतो. वास्तविक बाळासाहेब हयात असतानाच मला त्यांच्यावर चित्रपट बनवायचा होता. किंबहुना ते माझं स्वप्न होतं. मुळात त्यांच्याबरोबर सातत्यानं काम करीत राहणं हेसुद्धा माझं स्वप्नच होतं. बाळासाहेब शरीराने आपल्यातून गेले असले तरी त्यांच्याबाबतचं स्वप्न कायम राहावं म्हणून या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली. बाळासाहेब हयात असताना मी त्यांच्याशी त्यांच्यावरील चित्रपट निर्मितीबद्दल बोललोसुद्धा होतो. परंतु, तेव्हा ते जमलं नाही. ते गेल्यानंतर मला असं वाटलं की पुढल्या पिढीसाठी तरी आपण बाळासाहेबांचा विचार पोचवायला हवा. एक सामान्य माणूस एक असामान्य नेता कसा झाला, हे प्रेक्षकांपर्यंत पोचायला हवं असं मला वाटलं.

बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वामधील आणखी कोणते पैलू तुम्हाला विशेष भावले?

– बाळासाहेब हे नेते होते, ते ‘सुप्रीमो’ होते. परंतु, त्यांनी एक खूप छान टीम घडवली होती. बाळासाहेबांनी सतत माणसांना घडवलं. प्रत्येकात आत्मविश्‍वास निर्माण करण्याची ताकद बाळासाहेबांमध्ये होती. बाळासाहेब आपल्या आसपास आजही आहेत नि ते आपल्याला पाहताहेत असं मला वाटतं. बाळासाहेबांबरोबरच्या माझ्या प्रवासाचं मला शब्दांमध्ये कधीच वर्णन करता येणार नाही. ‘सामना’चा जेव्हा मी संपादक झालो, तेव्हा मी तिशीच्या आत होतो. बाळासाहेबांनी मला कसलाही अनुभव नसताना एका वृत्तपत्राचा संपादक केलं. ‘सामना’ची सूत्रं हाती घेईपर्यंत मी वृत्तपत्रामधील अग्रलेख लिहिला नव्हता. परंतु, तोच ‘सामना’ आज देशामध्ये अग्रलेखासाठी जास्त प्रसिद्ध आहे. ही बाळासाहेबांची ताकद होती. माणूस त्यांना खूप चांगला कळायचा. अशी माझ्यासारखी लाखो माणसं त्यांनी घडवली. त्यांनी माणसाच्या आयुष्याचं कधी डबकं होऊ दिलं नाही. त्यांच्या सहवासात जो आला तो सतत प्रवाहित राहिला.


चित्रपट निर्मितीचा निर्णय घेतल्यानंतर तुम्ही कशा पद्धतीनं पुढं गेलात?

चित्रपटाच्या निर्मितीसाठी एक चांगली टीम निवडली. नवाजुद्दिन सिद्दीकीसारखा एक कसदार अभिनेता आम्ही बाळासाहेबांच्या भूमिकेसाठी निवडू शकलो. नवाजुद्दिनपूर्वी काही मोठ्या प्रथितयश कलाकारांची नावं माझ्या डोक्यात होती. त्यांच्याबरोबर माझ्या बैठकादेखील झाल्या होत्या. परंतु, बाळासाहेबांच्या जवळ जाईल असा अभिनेता मला सापडत नव्हता. परंतु अचानक नवाजुद्दिनचा एक चित्रपट पाहताना मला असं वाटलं की हा कलाकार कदाचित बाळासाहेबांना न्याय देऊ शकेल. त्याप्रमाणे मग नवाजुद्दिनला भेटीसाठी बोलावलं. त्याच्यातला उत्साह पाहिला. आजच्या काळातला तो सर्वोत्कृष्ट अभिनेता आहे. मा. उद्धव ठाकरेसाहेबांची या चित्रपटासाठी खूप मदत झाली. त्यांची मदत मिळाली नसती तर आम्हाला एक पाऊलही पुढं जाता आलं नसतं. बाळासाहेबांना मी तीस वर्षं खूप जवळून पाहिलं. यापूर्वी बाळासाहेबांवर जे चित्रपट निघाले, त्यामध्ये मला बाळासाहेब काही दिसले नाहीत. ‘बायोपीक’ म्हणजे जसं आहे तसं तुम्ही दाखवायला पाहिजे. त्यात भेसळ असता कामा नये. यासंदर्भात मी सतत माझ्या टीमशी बोलायचो. सिनेमा बनवताना काही गोष्टींचं स्वातंत्र्य घेतलं जातं हे मलाही ठाऊक आहे. परंतु, बाळासाहेब ठाकरेंसारख्या व्यक्तिमत्त्वांवर जेव्हा तुम्ही चित्रपट करता तेव्हा अशाप्रकारचं स्वातंत्र्य खूप कमी मिळतं.

बाळासाहेबांच्या आयुष्यातील घटनाप्रसंगांना तुम्ही एका चित्रपटात कसं काय दाखवू शकणार आहात?

बाळासाहेबांचं कार्य काही दोन तासांपुरत्या चित्रपटात मावण्यासारखं नाही. त्यांचं व्यक्तिमत्त्व हिमालयाएवढं मोठं होतं. तुम्ही एकवेळ माउंट एव्हरेस्ट शिखर सर करू शकाल. पण बाळासाहेबांवरील एखाद्या कलाकृतीची तेवढी उंची गाठणं कोणालाही शक्य नाही. त्यामुळे आम्हाला काही भूमिका घ्याव्या लागल्या. या चित्रपटाचे आम्ही तीन भाग करणार आहोत आणि त्याप्रमाणे प्रत्येक भागामध्ये वेगवेगळा कालखंड सादर करणार आहोत. त्यामुळे पहिला भाग हा त्या कालखंडापुरताच मर्यादित राहील. त्यानंतरच्या दोन भागांवर सध्या काम सुरू आहे. आपल्याकडे साधारणपणे एखाद्या कलाकृतीचे दोन भाग सादर झाले आहेत. परंतु, एकाच चित्रपटाचे तीन भाग निर्मिण्याची ही पहिलीच वेळ असावी. या चित्रपटाचं कथानक मी लिहिलं असून त्यामध्ये सत्यतेला सर्वाधिक प्राधान्य देण्यात आलं आहे.

स्वतः निर्माता का बनला ?

– कारण बाळासाहेबांवरील चित्रपट माझ्या मनात जसा होता, तसा दुसरा कोणी बनवू शकेल की नाही याबद्दल खात्री नसल्यामुळे मी स्वतःच निर्माता होण्याचं ठरवलं. पहिल्यापासूनच मला चित्रपट क्षेत्राची आवड आहे. सातत्यानं मी चित्रपट पाहात असतो. अनेक निर्माते-कलाकारांबरोबर माझ्या वरचेवर भेटी होत असतात. त्यांच्याशी माझा सततचा संवाद होत असतो.

दिग्दर्शक म्हणून अभिजीत पानसे यांची निवड तुम्ही कोणत्या आधारावर केली?

– ही निवड मी स्वतः केली. तो माझा चॉईस आहे. त्यांनी आतापर्यंत ‘रेगे’ नावाचा एकच चित्रपट केलेला आहे. हा चित्रपट मला आवडला. तसेच मला या कलाकृतीसाठी भरपूर वेळ देऊ शकेल असा दिग्दर्शक हवा होता. तो मग नवीन दिग्दर्शक असला तरी चालेल अशी माझी भावना होती. नवीन मुलं खूप उत्तम काम करतात असा आजवरचा माझा अनुभव आहे. मराठी आणि हिंदी या दोन भाषांमध्ये तो बनलाय. ८० दिवसांचं आमचं शूटिंग शेड्यूल होतं. जसं आम्हाला हवं होतं तसं बनवायचा आम्ही प्रयत्न केला आहे.

ठेवणीतले लेख

  आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा  [recaptcha]

  काही निवडक प्रतिक्रिया:

  सचिन पारेकर


  शाहू मोडक हे मराठी चित्रपटातील असामान्य कलाकार होते. 'माणूस' मधील त्यांची भूमिका अविस्मरणीय होती.विनम्र अभिवादन!💐💐

  संजय रत्नपारखी
  संदर्भ:- फेसबुक प्रतिक्रिया