अतिथी कट्टा

दिनांक : २२-०३-२०१८

‌सूर तेच छेडीता


दिवंगत लेखक-गीतकार मधुसुदन कालेलकर यांचा आज जन्मदिन. त्यानिमित्ताने कालेलकर यांच्या कारकिर्दीवर आधारलेल्या ‘निंबोणीच्या झाडामागे’ या पुस्तकामधील अरुण पुराणिक यांचा लेख आम्ही संपादित स्वरूपात प्रकाशित करीत आहोत.
—-


जुन्या मुंबईत आजही अनेक ऐतिहासिक महत्त्वाचे नाके (चौरस्ते) आहेत. परंतु ज्याला खऱ्या अर्थाने साहित्यिक सांस्कृतिक नाका म्हणता येईल, असा फक्त एकच नाका पन्नास पाऊणशे वर्षांपूर्वी मुंबईत होता. तो म्हणजे गिरगाव नाका ! त्या काळी एक वेगळेच सांस्कृतिक वातावरण होते. निखळ मनोरंजनाला ही बौद्धिकतेची झालर होती. साहित्य, संगीत व्याख्याने, वृत्तपत्रे, मासिके, नाटकं, सिनेमे, चर्चासत्रे ही मराठी मनाची मर्मस्थाने होती. घरोघरी टीव्हीचे आक्रमण झाले नसल्याने लोक घरबसे झाले नव्हते. सांस्कृतिक कार्यक्रमांना श्रोत्यांची अथवा प्रेक्षकांची कमतरता कधी जाणवत नसे. मुंबईचा नाका आणि इराणी रेस्टॉरंट यांचे तर आद्य प्रेमिकांसारखे जन्मांतरीचे नाते ! नव्या नवरीने कपाळावर कौतुकाने रंगीबेरंगी बाशिंग बांधावे, तशा विविध जाहिराती व सिनेमांच्या पोस्टर्सनी नटलेली मध्यमवर्गीयांच्या खिशाला परवडणारी इराणी हॉटेल्स म्हणजे एकेकाळची मुंबईची शान होती. त्यामुळे हे एक नावाप्रमाणेच व्हॉईस ऑफ इंडिया रेस्टोरंट ! गिरगावातील तमाम ज्येष्ठ – श्रेष्ठ (आणि काही दुष्ट !) पत्रकार, साहित्यिक प्राध्यापकांची टाईमपास करण्याची हक्काची जागा ! मुंबई, लाखाणी, मॅजेस्टिक, रामकृष्ण बुक डेपो, बळवंत पुस्तक भांडार आदी दुकानांनी वेढलेला परिसर म्हणजे साक्षात पुस्तक पंढरी ! निद्रिस्त मुंबईला साखर झोपेतून उठविणारे नतद्रष्ट घटक म्हणजे म्युनिसिपालिटीचे पाणी, दूधवाले (पूर्वी वसईवाले व आरेच्या गाड्या असत) आणि घरोघरी वृत्तपत्रे टाकणारी मुले !

गिरगाव नाक्यावरची खटाववाडी म्हणजे अप्पा पेंडसेच्या भाषेत मुंबईचा फ्लीट स्ट्रीट ! ‘ या खटाववाडीने जितकी पत्रे, पत्रकार, नाटककार पहिले तितके कदाचित वांद्याच्या ‘साहित्य सहवास’ ने देखील पहिले नसतील ! दिवाळी अंकांची तर ही सर्वांत मोठी बाजारपेठ होती. याच ऐतिहासिक परिसरात पोर्तुगीज राज्यसत्तेची एकेकाळची साक्ष असणाऱ्या, वर्षानुवर्षे एखाद्या योग्यासारखे स्थितप्रज्ञ उभे असलेल्या लाल रंगाच्या, पोर्तुगीज चर्चच्या शेजारच्या रामचंद्र बिल्डिंगमध्ये स्वातंत्र्योत्तर काळात मधुसूदन कालेलकरांनी आपल्या कथा व नाट्य लेखनाचा श्रीगणेशा केला.
१५ ऑगस्ट १९४७. स्वतंत्र भारताचे स्वप्न साकार झाले होते. आबालवृद्धांत नवचैतन्य जागृत झाले होते. दुधात साखर म्हणजे याच वर्षी कालेलकरांच्या पहिल्या मुलाचा अनिलचा जन्म झाला.

कालेलकरांनी आपले पहिले नाटक ‘उद्याचे जग’ लिहिले व त्याचा पहिला प्रयोग रामचंद्र बिल्डिंगच्या (सध्याचे नाव श्याम भुवन ) सार्वजनिक गणेश उत्सवात सादर केला. या वास्तूत १९४७ ते १९५७ असे दहा वर्षे त्यांचे वास्तव्य होते. दरवर्षी येथील सार्वजनिक गणेशोत्सवात ते आपला नाट्यप्रयोग सादर करीत. इथेच त्यांच्यातील कथालेखक व गीतकार घडला. ही सर्व तेथील सार्वजनिक गणेशाचीच कृपा आहे, यावर कालेलकरांची अतूट श्रद्धा व अढळ विश्वास होता. दरवर्षी सार्वजनिक गणेशोत्सवात एक दिवस कालेलकर श्री गणेशाला फुलांची आरास करत. त्याची वाडी भरत. कालेलकरांचे निधन झाल्यावरही त्यांचा ज्येष्ठ पुत्र- अनिलने ती परंपरा आजही चालू ठेवली आहे.
रामचंद्र बिल्डिंगनी सिनेसृष्टीला दोन रत्ने दिली. पहिले मधुसूदन कालेलकर व दुसरे अभिनेता रवी कपूर उर्फ जितेंद्र ! त्यानेही फिल्मी क्षेत्रात उत्तुंग यश मिळवले. त्यालाही गिरगाव सोडून

अनेक वर्षे झाली तरीही गेली पन्नास वर्षे एखाद्या वारकऱ्याप्रमाणे दरवर्षी न चुकता श्री गणेशाच्या स्वागताला अनंत चतुर्थीला तो रामचंद्र बिल्डिंगमध्ये हजेरी लावतो. निर्माता, दिग्दर्शक, कथालेखक, गीतकार प्यारेलाल संतोषी म्हणजे फिल्मी दुनियेतील एक प्रभावशाली व्यक्तिमत्व ! हे प्यारेलाल संतोषी, मधुसूदन कालेलकरांचे पहिले गुरु. ‘फिल्मिस्ता’नमध्ये त्यांचे सहाय्य्क म्हणून कालेलकरांनी काम केले. नंतरच्या काळात दिग्दर्शक राजा नेने यांचे ते सहाय्यक होते. चित्रपटाच्या विविध अंगाचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला.

नाटककार मो. ग. रांगणेकर हे तर कालेलकरांचे मामा ! त्यांच्याकडूनही मार्गदर्शन घेतले.
स्वातंत्र्योत्तर काळातील मराठी चित्रपटातील दोन महत्त्वाचे लेखक म्हणजे ग. दि. माडगूळकर व मधुसूदन कालेलकर. ‘फिल्मीस्तान’च्या ‘अखेर जमलं’ (१९५२) या पहिल्या चित्रपटात मधुसुदन कालेलकर एकदम कथा – पटकथा – संवाद लेखक व गीतकार म्हणूनच आले. या चित्रपटात त्यांच्यावर असलेले पी. एल. संतोषी यांचा प्रभाव चांगलाच जाणवतो. ‘अखेर जमलं’
ही चाळीत राहणाऱ्या चार टारगट तरुणांची समोर राहणाऱ्या पोरीला पटविण्यासाठी केलेल्या धडपडीची मजेशीर कथा होती. विनोदी अभिनेते राजा गोसावी व शरद तळवळकर यांचाही हा प्रथम चित्रपट होता. या चित्रपटाचे संगीतकार शंकरराव कुलकर्णी होते. १९५०-१९५५ च्या काळात शंकरराव कुलकर्णी, कालेलकरांच्या बांद्रा स्टेशनसमोर नंदी टॉकीजजवळ असलेल्या घरीच राहात होते. त्यामुळे गीतकार व संगीतकार यामध्ये चांगलीच जवळीक होती. यातूनच सुंदर गीतरचना जन्माला आल्या. ‘जमले ढग काळे भंवती, काजळली ही रात’ (लता), ‘जगाला नाही रे मंजूर राया’ (लता व सुधीर फडके), ‘उफाळली रात राया हळू घाली साद’ (लता व सुधीर फडके) ही गाणी लोकप्रिय ठरली. त्या काळात गीतकार ग. दि. माडगूळकर (लाखाची गोष्ट, देवबाप्पा, गुळाचा गणपती), पी. सावळाराम (वादळ, छत्रपती शिवाजी, पाटलाचा पोर) वसंत बापट, कवी यशवंत (श्यामची आई), शांताराम आठवले (वहिनीच्या बांगड्या) यासारखे दिग्गज गीतकार असतानाही ‘अखेर जमलं’ मधील कालेलकरांची गाणी गाजली हे विशेष होत. मराठी चित्रपटात, ‘नको करू तू बंद खिडकी’ (गायक गुजर आणि पार्टी) ही पहिली कव्वाली देण्याचा मानही कालेलकरांना जातो.
गायक, संगीतकार हेमन्तकुमार मुखर्जीही त्याकाळात कालेलकरांबरोबर ‘फिल्मीस्तान’च्या ‘पे-रोल’वर होते. ते कालेलकरांच्या प्रेमापोटी त्यांच्या ‘पाहिलं प्रेम’ १९५७ या मराठी चित्रपटात ‘ तुझे असून तुज पाशी. तू जागा चुकलाशी’ हे मराठी गीत गायले. कालेलकर व शंकरराव कुलकर्णी या जोडीचा तिसरा चित्रपट होता- ‘आलीय भोगासी’ (१९५७). पार्श्वगायिका आशा भोसले. त्या काळात बाळंतपणाच्या सुट्टीवर होत्या. त्यामुळे वर्ष – सहा महिने त्यांचे पार्श्वगायन बंद होते. पुत्र रत्न प्राप्त झाल्याच्या आनंदात आशाने कालेलकरांचे गाणे गायले, ‘सुख आले माझ्या दारी’ (आलिया भोगासी). ‘राणी आली घरी, राजा राज्य तुझे संपले’ गायक – आशा भोसले व सुधीर फडके हे गीतही त्याकाळी लोकप्रिय झाले होते.
ग. दि. माडगूळकर – सुधीर फडके, पी. सावळाराम- वसंत प्रभू यासारखीच मधुसूदन कालेककर – शंकरराव कुलकर्णी ही जोडी सुद्धा प्रचंड गाजेल असे वाटले होते. पण दुर्दैवाने तसे घडले नाही. शंकरराव कुलकर्णी यांच्या पायाला दुखणे झाले होते. त्यानंतरही १९५९ ला कालेलकरांनी शंकररावांना घेऊन ‘याला जीवन ऐसे नाव’ चित्रपट निर्माण केला. त्यातील ‘अवघाचि संसार सुखाचा करीन’ हे हे गाणे लोकप्रिय झाले होते. त्यानंतर ‘एक होता राजा’ , ‘वनकेसरी’, ‘काही खरं नाही’ अशा काही चित्रपटांना शंकररावांनी संगीत दिले. परंतु १९६० च्या दरम्यान तब्येतीमुळे त्यांच्या सांगितिक कारकिर्दीची इतिश्री झाली. त्यांनी जेमतेम दहा एक चित्रपटांना संगीत दिले. पुढे ते मुंबई सोडून कोल्हापूरजवळ कडोलीला स्थाईक झाले. लहान मुलांच्या वारणानगर (कडोली) वाद्यवृंदामुळे पुन्हा एकदा त्यांचे नाव प्रकाशात आले.
संगीतकार दत्ता नाईक उर्फ एन. दत्ता हे पन्नास-साठच्या दशकात संगीतकार सचिन देव बर्मन यांचे प्रमुख सहाय्यक होते. राज खोसला यांच्या ‘मिलाप’ १९५५ पासून ते स्वतंत्रपणे संगीत देऊ लागले. बी. आर. चोप्रा आणि जी. पी. सिप्पी यांचे ते हुकमी संगीतकार होते. साठच्या दशकात यांनी हिंदी सिनेसंगीत गाजवले पण त्यानंतर नाईलाजाने त्यांना मराठी चित्रपट संगीताकडे वळावे लागले. सत्तरच्या दशकात त्यांची आणि कालेलकरांची छान जोडी जमली.
अंगाई गीत किंवा लोरी हा गानप्रकार आजकाल फार दुर्मिळ झाला आहे. नाईलाजाने अर्थार्जननाच्या मागे लागलेल्या व सायंकाळी लोकलचा प्रवास करून दमून भागून घरी आलेल्या मायभगिनींसाठीच लॉरी गाण्याची सध्या पाली आलेली आहे आणि ‘मिनी’ कुटुंबामुळे आजी फक्त फोटो नातवंडांना दिसते.
‘बाळा गाऊ कशी अंगाई’ १९७७ चित्रपटात कालेलकरांनी ग. दि. माडगूळकरांना तोडीस तोड असे अंगाई गीत लिहिले आहे आणि एन. दत्तांनी ते संगीतबद्ध केले आहे.
‘निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला गं बाई
आज माझ्या पाडसाला झोप का गं येत नाही
देवकी नसे मी बाळा भाग्य यशोदेचे भाळी
तुझे दुःख घेण्यासाठी केली पदराची झोळी
जगावेगळी ही ममता, जगावेगळी ही अंगाई’
अगदी साखरझोप लागलीच पाहिजे इतक्या हळूवारपणे वात्सल्याने ओतप्रोत भरलेली. त्या लहानग्यालाही समजेल अशा सध्या सोप्या शब्दात लिहिलेली कालेलकरांच ही लोरी किंवा अंगाई गीत सुमन कल्याणपूर यांच्या मधुर आवाजात ऐकताना आजही नकळत बालपण आठवते.

एन. दत्तांनी संगीतबद्ध केलेले साहिर लुधियानवीनी लिहिलेले, ‘मरीन ड्राईव्ह’ – १९५५ चित्रपटातील
‘रात जगाके सपने सजाके
कलियां चुनी है तेरे हार के लिये’
हे गाणे त्या काळात खूप लोकप्रिय झाले होते. संगीतकार एन. दत्ताने तीच चाल ‘बाळा गाऊ कशी अंगाई’ मध्ये परत तशीच वापरली आहे.
‘धुंदीत गाऊ मस्तीत राहू
छेडीत जाऊ आज प्रीत साजणा’
मराठी गाणी म्हणजे भावगीते ! असा एकेकाळी समज होता. परंतु कालेलकरांच्या गीतांनी तरुणाईलाही साद घातली. गीतकार प्यारेलाल संतोषींच्या सहवासात राहिल्याने रोमँटिकपणा त्यांच्या गीतात भिनला असावा. ग. दि. मा. व खेबुडकर यांच्या गीतांवर पश्चिम महाराष्ट्रातील ग्रामीण संस्कृतीचा ठसा होता. तर कालेकलरांच्या गीतांवर शहरी संस्कृतीचा ठसा होता. त्यामुळे शहरी नायकांसाठी ते वास्तववादी गीते लिहू शकले.
‘सूर तेचि छेडता गीत उमटले नवे’ फिल्म – अपराध (१९६९) गायक महेंद्र कपूर व सुमन कल्याणपूर.
नायक रमेश देव चक्क पियानोवर हे गाणे गातो. पडद्यावर हे गाणे पाहताना मला ‘अंदाज’ मधील दिलीपकुमार आठवला. बरं दुसऱ्या गाण्यात नायक लाडीकपणे विचारतो, ‘सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला’
कालेलकरांनी लिहिलेलं व एन. दत्तांनी स्वरबद्ध केलेलं माझे सर्वात आवडते गाणे आहे.
‘तुझी प्रीत आज मी कशी स्मरू
तुझे शब्द ना ते राहिले, नाते कधी ते संपले
उरली आता शोकांतिका, का शोक त्याचा मी करू.’
‘ना ते’ आणि ‘नाते’ तसेच शोकांतिका व ‘शोक’ या शब्दांचा असा अर्थपूर्ण वापर मी याआधी कधी पहिला नव्हता. शब्द, अर्थ, भाव, सूर आणि ताल याचा सुरेख संगम या गाण्यात पाहायला मिळतो. आशा भोसलेंनी या गाण्याचे शब्दशः चीज केले आहे. आशाने इतक्या समरसतेने, उत्कटपणे हळवेपणाने गायले आहे की
गाताना तिला बाह्य जगाचा विसर पडला होता. गाणे संपल्यावर त्याच विमनस्क मनःस्थितीत आशा रेकॉर्डिंग स्टुडिओबाहेर पडली. तिचे बिदागीचे पाकिट घेऊन निर्माते शरद पिळगावकर

तिच्यामागे खाली धावत गेले होते. अजरामर गीताचा जन्म असा होतो. कालेलकर व एन. दत्ता ही जोडी अजून दहा वर्षे एकत्र टिकली असती तर एक वेगळा इतिहास घडला असता. तब्येतीच्या कारणाने एन. दत्ता पण डाव अर्ध्यावर टाकून बाजूला झाले.
मधुचंद्र (१९६७) चित्रपटाची कथा, पटकथा व संवाद कालेलकरांनी लिहिली होती. तर गीतरचना गदिमांची होती. त्यातील ‘मधु इथे आणि चंद्र तिथे’ झंझुरतो अंधारात’ हे गीत कवियत्री शांता शेळके यांनी लिहिले होते.
शांताबाई त्यावेळी कॉलेजमध्ये लेक्चरर होत्या आणि सेन्सॉर बोर्डाच्या सदस्य होत्या. त्यांनी चित्रपट गीत लिहिले तर नैतिकदृष्ट्या योग्य दिसले नसते म्हणून त्या कालेलकर किंवा वसंत अवसरे ही टोपणनावे घेऊन गीत लेखन करीत. ‘हे चिंचेचे झाड मज दिसे चिनारवृक्षा परि’ हे गीत कालेलकरांनी लिहिले होते. परंतु श्रेयनामावलीत ते गदिमांच्या नावावर होते. यावर बोलताना कालेलकर म्हणाले होते ही दोन्ही गाणी गदिमांची आहेत, असे प्रेक्षकांना व श्रोत्यांना वाटणे हा माझा व शांताबाईंचा मोठा सन्मान आहे.
ना. सी. फडके यांच्या कादंबरीवरून कालेलकरांनी ‘कलंक शोभा’ चित्रपट लिहिला. कठे रंगत येण्यासाठी त्यात नवीन पात्र (शरद तळवलकर) टाकले. कथा, पटकथा, संवादाबरोबरच गीतरचनाही त्यांनीच केली.
‘तुला न कळले, मला न कळले
आज चांदणे उन्हात हसले तुझ्यामुळे’
गायक – सुधीर फडके व आशा भोसले सांगीत – सुधीर फडके या गीतात ‘तुझ्यामुळे’ या शब्दाचा त्यांनी कल्पकतेने वापर केला आहे. माझ्या कादंबरीला पडद्यावर न्याय देणारा चित्रपट म्हणून फडक्यांनी कालेलकरांच्या लेखणीला मुक्तकंठाने दाद दिली होती.
कालेलकरांनी स्वतःच्या कथेवरून चित्रपट लिहिलेच, परंतु इतरांच्या कथेवरूनही सुंदर चित्रपट लिहिले. ‘याला जीवन ऐसे नाव’ (वि. वि. बोकिल), ‘लग्नाआधी घटस्फोट’ (महेशचंद्र), ‘एक धागा सुखाचा’ व ‘मधुचंद्र’ (प्रभाकर ताम्हाणे), ‘पाहू रे किती वाट’ (गो. गं. पारखी), ‘लक्ष्मी आली घरा’ (चंदकांत काकोडकर), ‘शेरास सव्वाशेर’ (इंद्रायणी सावकार).
कालेलकरांनी प्यारेलाल संतोषी व राजा नेने यासारख्या कसलेल्या दिग्दर्शकांकडे प्रशिक्षण घेतलेले होते. त्यामुळे चित्रपटाच्या ओघवत्या कथेमध्ये खुबीने गाण्याची प्रेरणा करून तो प्रसंग खुलविण्याचे, त्याला उठाव देण्याचे कसब त्यांनी आत्मसात केले होते. चित्रपट गीत हे विशिष्ट व्यक्तिरेखेच्या, विशिष्ट प्रसंगातील भावना असतात व चित्रपट गीत हे कथेचा प्रवाह पुढे नेण्याचे काम करते, याचे त्यांनी नेहमी भान ठेवले होते. दोनचार पानांच्या संवादाचा परिणाम ते गाण्याच्या दोनचार ओळीतून साधत. व्यक्तिरेखा काय आहे ? व पडद्यावर कोणता कलाकार ती व्यक्तिरेखा साकार करणार आहे ? हे लक्षात घेऊनच ते गीत रचना करत. मराठी चित्रपटातून हास्यगीत हा प्रकारही त्यांनीच रूढ केला.
‘अखेर जमलं’ या धम्माल विनोदी चित्रपटाच्या नायिकेवर – बेबी शकुंतलावर चार टारगट तरुण जीव टाकत असतात. तिच्या तोंडी एक गाणे होते.
‘अलबेला मी हो नार, राणी जीवाची होईन सखी त्याची कोण असा सरदार?’
थोडक्यात मी शिक्षकाला वरले तर काय होईल ? तो सुतार असेल तर काय होईल ? अशा गंमतीजमती त्या गाण्यात आहेत. १९५२ साचा हा कन्सेप्ट नंतर अणे गीतातून आला. अमिताभ बच्चनच्या ‘लावारिस’ मधील ‘मेरे अंगने में तेरा क्या काम है’ मध्येही हाच कन्सेप्ट आला आहे.
‘अवघाचि संसार सुखाचा करीन’
आनंदे भरीन तिन्ही लोक’
संत ज्ञानेश्वरांचा हा पारंपरिक अभंग हा सर्वप्रथम संत कान्होपात्रा (१९३१) या नाटकात आला. संगीत मास्टर कृष्णराव यांचे होते. बालगंधर्वांनी आपल्या मधुर आवाजाने तो महाराष्ट्रातील घराघरांत नेला. ग. दि. माडगूळकरांची गीतरचना व दादा चांदेकरांचे संगीत असलेल्या संत कान्होपात्रा (१९५०) चित्रपटात हा अभंग रत्नप्रभाणे गायिला आहे. ‘याला जीवन ऐसे नाव’ या चित्रपटाचा नायक होता विनोदी नट राजा गोसावी. कालेलकरांनी या मूळ अभंगांचा सुरुवातीचा मुखडा घेऊन त्याचे विडंबन करून हास्यगीत करून राजा गोसावीला दिला आहे. हे गीत स्नेहल भाटकर बुवांनी गायिले आहे. ‘
‘अवधाची संसार सुखाचा करीन
देहकष्टविन जीवेभावे
एक दोन ती स्टोव्हमध्ये पिन
चार पाच सहा, उकळला चहा
भिजे अंग अंग…… ‘
हे पॅरोडी गीतही सिनेप्रेक्षकांना खूप धावले.
‘आलीय भोगासी’ ( १९५७ ) मधील ‘राणी आली घरी राजा राज्य तुझे संपले’ हे सुद्धा एक हास्यगीत होते. ‘एक धागा सुखाचा’ (१९६१) मध्ये त्यांनी आगळेवेगळे बालगीत लिहिले आहे आणि विशेष म्हणजे ते मन्ना डे यांनी गायले आहे. अत्यंत सोप्या शब्दांत त्यांनी बाराखडी शिकवली आहे. ‘अ आ आई, म म मका, मी तुझा मामा दे मला मुका’
अनेक मान्यवर गायकांनी कालेलकरांची कालेलकरांची चित्रपटगीते गायली आहेत.
‘एकदा येऊन जा, तू एकदा भेटून जा’
चित्रपट :- सप्तपदी – १९६२ गायक – मुकेश
‘संपले जीवन संपली गाथा’ व ‘गाऊ कोणते गीत रसिक गाऊ कोणते गीत’
चित्रपट :- पतिव्रता – १९५९ गायक – भीमसेन जोशी
‘तू सुखकर्ता तू दुःखहर्ता’
चित्रपट- अष्टविनायक – १९७९ गायक – वसंतराव देशपांडे
‘पहिले न मी तुला, तू मला न पाहिले’
चित्रपट :- गुपचूप गुपचूप गायक – सुरेश वाडकर

१९५२ ते १९८२ या तीस वर्षांच्या काळात मराठी – हिंदी असे ११६ चित्रपट, २९ मराठी नाटके कालेलकरांनी लिहिली. अनेक निर्माते – दिग्दर्शक, देव आनंद, शम्मी कपूरसह अनेक नायकांना आपल्या कथा एकविल्या. महाराष्ट्रभर नाटकांचे दौरे केले. एका लेखकाला हे कसे काय सध्या झाले असेल ? आयुष्यभर त्यांनी स्वतःला फक्त लेखनालाच वाहून घेतले होते.
कथा लेखनातील त्यांचे हे अफाट कर्तृत्व पाहताना मला तर त्यांच्यातील दडलेल्या आधुनिक व्यास ऋषींचा भास झाला. या निमित्ताने त्यांच्या पवित्र स्मृतीस साष्टांग दंडवत ! तसेच कलेलकरांनी शंभराहून अधिक गाणी लिहिलेली आहेत. त्यांनी बऱ्याच चित्रपटांचे कथा – पटकथा आणि संवाद लिहिलेले आहेत. त्यातील काही चित्रपटांची नावे खालीलप्रमाणे.

कथा – पटकथा – संवाद लेखन
चित्रपट
१) अखेर जमलं
२) शुभमंगल
३) काही खार नाही
४) आलीय भोगासी
५) पाहिलं प्रेम
६) दोन घडीचा डाव
७) लग्नाआधी घटस्फोट
८) सौभाग्यवती भव:
९) याला जीवन ऐसे नाव
१०) राजमान्य राजश्री
११) पतिव्रता
१२) लग्नाला जातो मी
१३) पैशांचा पाऊस
१४) कलंक शोभा
१५) पुत्र व्हावा ऐसा
१६) एक धागा सुखाचा
१७) सप्तपदी
१८) बायको माहेरी जाते
१९) अपराध
२०) असेल माझा हरी
२१) नाव मोठं लक्षण खोट
२२) बाळा गाऊ कशी अंगाई
२३) पारध
२४) आयत्या बिळावर नागोबा
२५) अष्टविनायक
२६) चांदणे शिंपीत जा
२७) देवता
२८) गुपचूप गुपचूप
२९) अवघाची संसार
३०) वनकेसरी
३१) झाकली मूठ
३२) सोनियाची पाऊले
३३) प्रीती विवाह
३४) क्षण आला भाग्याचा
३५) हा माझा मार्ग एकला
३६) पाहू रे किती वाट
३७) एक दोन तीन
३८) वाट चुकलेले नवरे
३९) लक्ष्मी अली घरा
४०) शेवटचा मालुसरा
४१) शेरास सव्वाशेर
४२) अति शहाणा त्याचा….
४३) मधुचंद्र
४४) श्रीमंत मेहुणा पाहिजे
४५) आम्ही जातो आमुच्या गावा
४६) अन्नपूर्णा
४७) अशीच एक रात्र होती
४८) अजब तुझे सरकार
४९) अनोळखी
५०) जावई विकत घेणे आहे
५१) बायांनो नवरे सांभाळा
५२) हा खेळ सावल्यांचा
५३) आराम हराम आहे
५४) मामा भाचे
५५) जानकी
५६) जिद्द
५७) कडक लक्ष्मी
५८) थोरली जाऊ
५९) कशाला उद्याची बात
६०) सगे सोयरे
६१) सव्वाशेर
६२) माहेरची माणस
६३) माफीचा साक्षीदार
६४) तू सौभाग्यवती हो
६५) आनंदी आनंद
६६) मधुचंद्राची रात्र
६७) घाबरायचं नाही
६८) ठण ठण गोपाळ
६९) भन्नाट भानू
– अरुण पुराणिक
(सौजन्य : अनघा प्रकाशन, ठाणे)

ठेवणीतले लेख

    आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा



    [recaptcha]

    काही निवडक प्रतिक्रिया:

    नरेंद्र चौधरी


    आपल्या संकेतस्थाळाच्या माध्यमातून असे लक्षात आले कि आपन खूप छान माहिती पुरवत आहात.
    संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया