अतिथी कट्टा

दिनांक : ०४-०२-२०१७

‌स्टंट चित्रपटामधील भगवानदादा…


प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक भगवानदादा यांचा ४ फेब्रुवारी हा स्मृतिदिन. त्यानिमित्तानं भगवानदादांचा विशेष स्नेह लाभलेले दिवंगत पत्रकार, लेखक इसाक मुजावर यांच्या भगवानदादांवरील ‘एक अलबेला’ या पुस्तकामधील काही भाग संपादित स्वरूपात प्रकाशित करीत आहोत.
———-

कोल्हापूरच्या ‘व्हीनस’मध्ये गेलो की ‘व्हीनस’ टॉकीजच्या बाजूला जाणं होतंच, पण आता त्या बाजूला जायचं म्हणजे गर्दीतून वाट काढतच जावं लागतं. गर्दी जाणवावी असा कोल्हापुरातील हा भाग आता गजबजून गेलाय. नवनव्या घरांनी, दुकानांनी, माणसांच्या गर्दीने. पूर्वी या रस्त्यावर दिसणारे टांगे, सायकली व अधूनमधून कधीतरी दिसल्या तर दिसणाऱ्या एक-दोन मोटारी यात आता असंख्य मोटारी व जोडीला रिक्षा, स्कूटर या वाहनांची भर पडली आहे. ‘व्हीनस’च्या एका बाजूला ‘अप्सरा’, दुसऱ्या बाजूला ‘उषा’ व थोड्याच अंतरावर ‘वसंत’ आणि बाहेर अशी आणखी चार चित्रपटगृहे आता उभी राहिली आहेत. यामुळे त्या भागातील पाच चित्रपटगृहांच्या पुंजक्यातील ‘व्हीनस’ एक चित्रपटगृह बनलं आहे. आमच्या लहानपणी काही ‘व्हीनस’ हे असं पाच चित्रपटांच्या पुंजक्यातील एक चित्रपटगृह नव्हतं. कोल्हापूरच्या शाहुपुरी भागातील एकुलतं एक चित्रपटगृह होत.

कोल्हापूर शहर आज वाढत वाढत थेट शिरोलीच्या पल्याड पोहोचलं आहे आणि त्या पल्याडची खेडीही हळूहळू शहराला येऊन भिडू लागली आहेत, पण त्या काळात कावळ्याचा नाक हीच कोल्हापूर शहराची शेवटची हद्द होती. यामुळे ‘व्हीनस’ची गणना तेव्हा गावाबाहेरील एका चित्रपटगृहातच होत होती. या चित्रपटगृहाच्या बाजूला तेव्हा तमाशाचे एक थिएटर होते आणि त्याला लागूनच वेश्यांची एक वस्तीही. तमाशाला तेव्हा काही आजच्याप्रमाणे लोककलेची प्रतिष्ठा प्राप्त झालेली नव्हती. हलक्या दर्जाची एक करमणूक म्हणून या कलेची तेव्हा अवहेलना होत होती. तमाशा व वेश्या यांचे वारे नको म्हणून अनेक लोक या ‘व्हीनस’च्या बाजूला फिरकणेदेखील त्या काळात अभद्र मानत असत. मग तेथे जाऊन चित्रपट पाहायचा म्हणजे शांत पापम ! पण आम्हाला त्यांचं काय हो ? प्रतिष्ठा म्हणजे काय, अप्रतिष्ठा म्हणजे काय ही गोस्ट आमच्या गावीदेखील नव्हती. यामुळे ‘व्हीनस’च्या बाजूला कोणी फिरको न फिरको, आम्ही मात्र बिनदिक्कतपणे तिकडे फिरकायचो, मा. भगवान यांचे चित्रपट पाहण्यासाठी. ‘व्हीनस’ जरी गावाबाहेर असले, तरी वाट वाकडी करून आणि वेश्यांची वस्ती चुकवून. ही वस्ती चुकवून ‘व्हीनस’ गाठायचं म्हणजे आम्हाला कोण त्रास व्हायचा ! आमच्या शीलाचं आम्हाला अक्षरशः रक्षण की हो करावं लागायचं !

‘पतंगा ‘ या चित्रपटातील सी. रामचंद्र यांनी संगीतबद्ध केलेले व लता मंगेशकर यांनी गायिलेले ‘ठुकरा के मुझे, ओ जानेवाले एक ठोकर और लागत जा ‘ हे गाणे तुमच्या कानावरून गेले असेलच. चित्रपटात नायिकेच्या (पूर्णिमा) तोंडी असलेले हे गाणे म्हणजे एक विरहगीत आहे, पण ‘पतंगा ‘ सर्वत्र जेंव्हा गाजत होता ना, तेव्हा व्हीनसच्या बाजूलाच असलेल्या वेश्यांच्या वस्तीतील वेश्या या गाण्याचा चक्क दुरुपयोग करायच्या. हो, रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या गिऱ्हाइकांना हटकण्यासाठी आणि ‘एक ठोकर और लागत जा ‘ ची साद घालत त्या रस्त्यावरील एखाद्या झाडाला अशा काही मिठ्या मारायच्या की, या गाण्याला चक्क आजच्या दादा कोंडके यांच्या चित्रपटातील गाण्याला डबल मीनिंगचा अर्थ प्राप्त व्हावा ! हे गाणे लिहिताना राजेंद्रकृष्ण यांच्या मनातही जे नसेल ते त्या वेश्या आमच्या ध्यानात आणून द्यायच्या आणि मी मग काही विचारू नका ! त्या वस्तीतून मार्ग काढीत ‘व्हीनस’ गाठायचं म्हणजे आमची पाळता भुई थोडी व्हायची.

तरीही पळता पळता हा होईना, शेवटी आम्ही ‘व्हीनस’ गाठायचोच. मा. भगवान यांच्या चित्रपटाचं आकर्षणच आम्हाला तसं होत. आज अमिताभचा कोणताही चित्रपट पडद्यावर आला, तर त्या चित्रपटाविषयी तुम्हाला जे आकर्षण वाटतं ना, अगदी तस्संच !
मा. भगवान यांच्या चित्रपटांची एकदम अमिताभ बच्चनच्या चित्रपटाशी तुलना म्हणजे तुम्हाला कदाचित टू मच वाटेल. आश्चर्याने तुम्ही विचारलदेखील, “अमिताभच्या चित्रपटाशी बरोबरी व्हावी, असं मा. भगवान यांच्या चित्रपटात काय होतं हो ?”

तसं म्हटलं तर खास असं काहीच नव्हतं. नेहमीच बदला. लहानपणी झालेली दोन भावांची वा पिता-पुत्रांची ताटातूट, खलनायकाने नायकाच्या आईवर, पत्नीवर व प्रेयसीवर केलेला बलात्कार आणि पुढे नायकाने घेतलेला बदला .’जंजीर ‘ पासून अमिताभच्या प्रत्येक चित्रपटात अगदी हेच चालू आहे.
मा. भगवान यांच्या चित्रपटातदेखील आजच्या अमिताभच्या चित्रपटांच्याप्रमाणेच सारं काही अगदी ठरलेलं तेच ते असायचं. खेड्यातील दोन उनाड तरुण. ते देखील अगदी ठरलेले, बाबूराव पैलवान व. मा. भगवान, उनाडकीशिवाय हे दोघेही आयुष्यात काही करू शकणार नाहीत, अशी खेड्यातील मंडळींची त्यांच्याविषयी झालेली धारणा; यामुळे त्या दोघा तरुणांची जिद्द पेटून उठते. मग आपल्या खेड्यातील मंडळींना काहीतरी करून दाखवायचे आणि मगच त्यांना तोंड दाखवायचे, असे ठरवून ते गाव सोडतात. गाव सोडल्यावर ते येतात कोठे? तर ………

गावाकडचा माणूस आजही काही करून दाखवायचे व नशीब काढायचे मांडले की, हटकून मुंबईलाच येतो. तसे ते दोन तरुणही मुंबईलाच यायचे. येथे ते नोकरीच्या शोधात असताना बदमाशांच्या ताब्दीत सापडलेला एक शेठजी त्यांना भेटायचा. खेड्यातील दोन उनाड तरुण म्हणजे बाबूराव पहिलवान व मा. भगवान ही जोडी. मा. भगवान यांच्या प्रत्येक चित्रपटात ज्या प्रमाणे अगदी ठरलेली असायची ना, त्याच प्रमाणे त्यांच्या चित्रपटातील बदमाशांच्या तावडीत सापडलेला हा शेठजी व बदमाशांच्या टोळीचा म्होरक्यादेखील ठरलेला असायचा. शेठजी म्हणजे नंतरच्या काळात ‘गंगा-जमना’, ‘शोले’ या चित्रपांमुळे गाजलेले फाईट मास्टर अझीमभाई आणि बदमाशांच्या टोळीचा म्होरक्या म्हणजे वसंतरावं पहिलवान शेठजीला म्हणजे अझीमभाईला वसंतराव पहिलवान यांच्या बदमाशांच्या टोळीपासून संरक्षण हवं असायचं. यासाठी खेड्यातून आपले नशीब काढण्यासाठी मुंबईला आलेल्या बाबुराव पैलवान व मा. भगवान यांना तो आपल्याकडे नोकरीला ठेवायचा. शेठजीला एकुलती एक मुलगी असायची व तिच्या तैनातील घरी एक मोलकरीण. या भूमिकादेखील शांता पटेल, चंचल, लीला गुप्ते, उषा शुक्ला, विठा लोकरे या ठरलेल्या चित्रतारकाच मा. भगवान यांच्या चित्रपटात आलटून पालटून करायच्या. बदमाशांच्या टोळीपासून शेटजींचे रक्षण करता करता बाबुराव पहिलवान शेठजींच्या मुलीवर प्रेम करायचा ; तर मा. भगवान त्या मुलीच्या मोलकरणीवर.चित्रपटाचं नाव कधी ‘बदला’ असायचे, तर कधी ‘जलन’, कधी ‘लालच’, कधी ‘भेदी बंगला’, कधी ‘मददगार’ , तर कधी असेच काही, पण नाव जरी वेगवेगळे असेल, तरी अमिताभच्या कोणत्याही चित्रपटाची गोष्ट आज ज्याप्रमाणे बदलत नाही, त्याच प्रमाणे त्या काळात मा. भगवान यांच्या चित्रपटाची गोष्टदेखील कधी बदलायची नाही. नाव जरी नवे असले तरी अमिताभच्या प्रत्येक चित्रपटात नव्या नावाखाली जुनीच ‘स्टोरी’ आज ज्याप्रमाणे पडद्यावर येते. तशीच त्या काळात मा. भगवान यांच्या चित्रपटातही नव्या नावाखाली जुनी ठरलेली गोष्टच पडद्यावर यायची आणि गोष्ट जरी ठरलेली असली तरी अमिताभचे चित्रपट पाहताना आज जो आनंद तुम्हाला मिळतो, अगदी तोच आनंद त्या काळात ठरलेल्या गोष्टीवरील मा. भगवान यांच्या चित्रपटात आम्हाला मिळायचा. म्हणूनच तर मा. भगवान यांचे ते चित्रपट आज इतिहासजमा झाले असले, तरी त्याची तुलना आजच्या अमिताभच्या चित्रपटांची करण्याचा मोह मला होत आहे.

सर्वांचे दादा
काही दिवसांपूर्वी संगीतकार नौशाद यांच्यामुळे या आठवणी उफाळून वर आल्या. तुम्हाला एक गंमत सांगतो – नौशादमियाँ मला म्हणाले आणि त्यांनी सांगायला सुरुवात केली. “मी स्वतः स्टंट चित्रपटांना कधी संगीत दिलं नाही. पण आजच्या मुलांना अमिताभ बच्चनचे चित्रपट ज्याप्रमाणे आवडतात ना, त्या प्रमाणे माझ्या मुलांना त्या काळात मा. भगवान यांचे स्टंट चित्रपट आवडायचे. यामुळे त्यांच्या ‘भेदी बंगला ‘ व ‘लालच’ या दोन चित्रत्रपटांच्या सोळा मिलिमीटरच्या प्रिंट्स माझ्या घरात कायमच्या आणून ठेवल्या होत्या. घरातल्या मी प्रोजेक्टरवर त्या घरातल्या घरातच पाहायच्या हा माझ्या मुलांचा अनेक वर्षांचा नित्यक्रम होता. पुढे त्या प्रिंट्स वापरून वापरून खराब होत गेल्या. तुकडे पडत पडत त्या चित्रपटांचे काही रिळं गायब झाली, तरीही माझ्या मुलांनी या चित्रपटांचा नाद काही सोडला नाही. रिल्स कमी झाल्यावर त्या दोन्ही चित्रपटांची जी अनेक रिल्स उरली होती, ती एकत्र करून ते चित्रपट पाहण्याचा सपाटा अनेक वर्षे त्यांनी चालू ठेवला.”
हे ऐकून माझी मलाच गंमत वाटली आणि आजच्या अमिताभच्या चित्रपटांची पुन्हा एकदा मला आठवण झाली. वाटू लागलं, मा. भगवान यांचे दोन चित्रपट एकत्र करून पाहताना नौशादमियाँच्या मुलांना ते दोन चित्रपट म्हणजे एकच चित्रपट वाटला, त्याच प्रमाणे आजही मुले अमिताभचे दोन वा तीन चित्रपट एकत्र करून पाहतील, तर त्यांना तो एकच चित्रपट वाटल्याशिवाय राहणार नाही. कारण कालच्या मा. भगवान यांच्या चित्रपटाप्रमाणे आजच्या अमिताभचा चित्रपटदेखील महिला चित्रपवरून पुढे चालू छापाचा आहे.

मा. भगवान यांचा चित्रपट आज तसा विस्मृतीप्राय झाला असला, तरी विस्मृतीप्राय झालेल्या या चित्रपटाचं आजच्या अमिताभच्या चित्रपटाशी हे असं आणखी एक जवळचं नातं आहे.

अमिताभच्या आजच्या चित्रपटात प्रत्येक चित्रपटाची गोष्ट जरी एकच असली, तरी कोणाला आज ती खटकत नाही. मा. भगवान यांच्या चित्रपटातही त्या प्रत्येक चित्रपटाची गोष्ट एकच असली तरी ती आम्हाला कधी खटकायची नाही. अमिताभचे चित्रपट आजचे प्रेक्षक ज्या प्रमाणे केवळ अमिताभसाठी पाहतात, त्याच प्रमाणे आम्ही मा. भगवान यांचे चित्रपट मा. भगवान यांच्या साठी पाहायचो आणि ते पाहताना त्यात पुरते दंग होऊन जायचो.
अमिताभचा चित्रपट पाहणाऱ्या आजच्या प्रेक्षकांना वाटतं, या अमिताभला आपण प्रत्यक्ष पाहिलं पाहिजे, त्याला भेटलं पाहिजे, त्याच्याशी दोन शब्द तरी बोललं पाहिजे. मा. भगवान यांच्याविषयी आमच्या पिढीलादेखील हेच, अगदी हेच वाटायचं, ज्या मा. भगवानला आजवर आपण केवळ पडद्यावर पाहत आलो. आहोत, त्या मा. भगवानला आपण प्रत्येक्षात पाहिलं पाहिजे, त्याला भेटलं पाहिजे, त्याच्याशी बोललं पाहिजे.
मला आठवतं , माझा एक मा. भवनवेडा मित्र (कै .) अमृत गोरे व मी यासाठी एकदा मुंबईला पळून आलो होतो आणि दादरला ‘चित्रा’ सिनेमाजवळ असलेला मा. भगवान यांच्या लल्लूभाई मॅन्शनचा पत्ता शोधून काढून, मुंबईत तेव्हा धो धो पाऊस कोसळत होता, तरी त्या पावसात भिजत मा. भगवान यांच्या दर्शनासाठी लल्लूभाई मॅन्शनसमोर थांबलो होतो.

आमच्यासारखेच मा. भगवान यांचे काही चाहते त्या पावसात भिजत मा. भगवान यांच्या दर्शनासाठी लल्लूभाई मॅन्शनसमोर थांबले होते आणि लल्लूभाई मॅन्शनमधून बाहेर पडून आपल्या गाडीत जाऊन बसणाऱ्या मा. भगवान यांना प्रत्यक्षात पाहून तेव्हा आम्ही केवढे म्हणजे केवढे धन्य झालो होतो ! आज अमिताभचे चाहते त्याला प्रत्यक्षात पाजून जेवढे धन्य होत असतील तेवढेच !!

एक नट व त्याचे चाहते यांच्या दरम्यान जे अंतर असते तेच अंतर तेव्हा मा. भगवान यांच्यात व आमच्यात होते. हे अंतर तोडून आम्ही लल्लूभाई मॅन्शनमध्ये पोहोचून सरळ मा. भगवान यांच्याशीच गप्पा मारीत बसू, असे आम्हाला स्वप्नातदेखील वाटले नव्हते, पण काय योग असतात पाहा ! अमृत गोरे कालांतराने एक चित्रपटकथा – लेखक, निर्माता व वितरक म्हणून चित्रपट व्यवसायात आला आणि मी एक फिल्मी पत्रकार म्हणून. याबरोबर मा. भगवान यांच्यात व आमच्यात एक नट व त्यांचे चाहते असे जे अंतर असते, ते केव्हाच संपुष्टात आले आणि आम्ही थेट लल्लूभाई मॅन्शनमध्ये पोहोचून त्यांच्याशी गप्पा मारीत केव्हा जाऊन बसलो, हे आमचे आम्हालाच कळले नाही !

१९५९ किंवा १९६० साल असावे. संगीतकार सी. रामचंद्र यांच्याशी माझा तेंव्हा नुकताच परिचय झाला होता. या परिचयामुळेच पुढे मा. भगवान यांच्याशी माझा परिचय झाला, पण तो मा. भगवान म्हणून नव्हे, तर भगवानदादा म्हणून. कारण वयपरत्वे तेव्हा ते हळूहळू भगवानदादा बनू लागले होते. आता तर ते साऱ्या चित्रपटव्यवसायाचे दादाच बनले आहेत.




दादा बनलेले आजचे भगवानदादा आजच्या पिढीला माहीत आहेत ते १९७५ नंतर ‘अलबेला’ या त्यांच्या जुन्या चित्रपटाला नव्याने मिळालेल्या लोकप्रियतेमुळे. केवळ त्या चित्रपटातील त्यांच्या नृत्यासाठीच आणि ‘अलबेला’च्या त्या लोकप्रियतेनंतर अनेक चित्रपटांत या अशा नृत्यासाठीच त्यांना राबवले जात आहे म्हणून ! पण यात भगवानदादा येथे दादा बनण्यापूर्वी मा. भगवान म्हणून त्यांची व त्यांच्या चित्रपटांची येथे जी वेगळी ओळख होती ती मात्र एकदम पुसट होऊन गेली आहे.
– इसाक मुजावर

(पुस्तक – एक अलबेला, सौजन्य : प्रतिक प्रकाशन)

ठेवणीतले लेख

    आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा



    [recaptcha]

    काही निवडक प्रतिक्रिया:

    नरेंद्र चौधरी


    आपल्या संकेतस्थाळाच्या माध्यमातून असे लक्षात आले कि आपन खूप छान माहिती पुरवत आहात.
    संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया