अतिथी कट्टा

दिनांक : २३-१२-२०१८

‌‌‌‌‌‌‌‌स्पॉट बॉय बनला चित्रपट निर्माता-दिग्दर्शक…




मराठी चित्रपटसृष्टीत धार्मिक, पौराणिक चित्रपटांची परंपरा आहे. ‘बोला अलख निरंजन’ हा त्या परंपरेपैकीच एक नवीन चित्रपट आहे. या चित्रपटात भक्तिमहिम्याशी आजच्या काळाचाही संबंध जोडण्यात आला आहे. आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘स्पॉट बॉय’ म्हणून करणार्‍या फलटणच्या घनःश्याम येडे यांनी या चित्रपटाचं लेखन, निर्मिती आणि दिग्दर्शन केलं आहे. प्रसिद्ध अभिनेते अमोल कोल्हे या चित्रपटात मच्छिंद्रनाथांची व्यक्तिरेखा साकारीत आहेत. येत्या २८ तारखेला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाच्या निर्मिती-दिग्दर्शनाबद्दल श्री. येडे यांचं हे मनोगत.

——

माझ्या लहानपणी श्रावण महिन्यात आमच्या गावात नवनाथ पारायण आयोजित केलं जायचं. आईबरोबर मी दररोज ते ऐकायला जायचो. यावेळी मच्छिंद्रनाथांच्या जन्मापासून ते कार्यापर्यंतचा सर्व घटनाक्रम मला खूप आवडायचा. कीर्तनकार किंवा प्रवचनकर सुरुवातीला संस्कृत भाषेतून सांगत. मग तीच गोष्ट मराठीतून उलगडून दाखवत. ही गोष्ट कानावर पडत असताना मी स्वत:च ती ‘व्हिज्युअलाईज’ करायचो. त्यातून मला खूप आनंद मिळायचा. तेव्हा मला असं वाटलं की आपल्याला जर एवढा आनंद मिळत असेल तर हीच गोष्ट आपण चित्रपटरुपी मोठ्या पडद्यावर सांगितली तर इतर भाविकांनाही ती खूपच आवडेल. तेव्हापासून हा विषय माझ्या डोक्यात घोळत होता. हा विषय मला सुचला असल्यामुळे आपणच तो स्वत: लिहावा असं वाटलं. त्यातूनच मग मी मला जमेल तसं या चित्रपटाचं लेखन करू लागलो. हा चित्रपट केवळ पौराणिक नाही. त्याची आजच्या काळाशी आम्ही सांगड घातली आहे. लेखन पूर्ण झालं नि मग सर्वात महत्त्वाचा विषय होता तो निर्माता मिळवणं. मला सुरुवातीला वाटलं की देवाधर्माचा विषय असल्यामुळे आपल्याला लगेचच एखादा निर्माता मिळेल. परंतु, असं झालं नाही. उलट देवावरचा विषय असल्यामुळे निर्माते त्यावर पैसे लावण्यास तयार नसत. या निर्मात्यांना एखादा वेगळा किंवा पूर्णत: मनोरंजन करणारा विषय हवा होता. परंतु, माझ्या डोक्यात आपला पहिला चित्रपट म्हणून मच्छिंद्रनाथांचं चरित्रच अगदी पक्कं डोक्यात होतं. त्यामुळे निर्माते आपल्याला मिळत नाहीत, हे लक्षात आल्यानंतरही मी खचलो नाही. आपणच आता निर्माता बनायला हवं, असा मी निर्णय घेतला नि त्यादृष्टीनं माझी तयारी सुरू झाली. जे काही थोडंङ्गार माझ्या शेतीव्यवसायातून मला मिळत होतं, त्यामधूनच मी चित्रपटाच्या निर्मितीसाठी वेगळे काढून ठेवत होतो.

ङ्गलटणजवळचं मुंजवडी हे माझं मूळ गाव. शेतकरी कुटुंबात माझा जन्म झाला. शेती आणि त्यावर चालणारा दूधविक्री हा आमचा व्यवसाय. या चित्रपट निर्मितीसाठी मला सुरुवातीच्या काळात केलेला ‘स्पॉटबॉय’ म्हणून स्ट्रगल खूप उपयोगी पडला. साधारण वीस वर्षांपूर्वी मी वेगवेगळ्या चित्रपटांच्या सेटवर पडेल ते काम केलं. ‘अगं बाई अरेच्चा’, ‘जत्रा’, ‘मंगल पांडे-द रायजिंग’, ‘तांबव्याचा विष्णुबाळा’, ‘बापू बिरू वाटेगांवकर’ असे बरेच चित्रपट मी ‘स्पॉट बॉय’ म्हणून केले. ‘गजर’ आणि ‘एलिझाबेथ एकादशी’ या चित्रपटांचा मी ‘प्रॉडक्शन मॅनेजर’ होतो. विख्यात दिग्दर्शक परेश मोकाशीसरांसाठी सहाय्यक म्हणून काम केलं. त्यांना मी या क्षेत्रातला गुरू मानतो. ‘अलख निरंजन’मध्ये ‘चैतन्य’ ही मध्यवर्ती भूमिका कोणी करायची, असा जेव्हा प्रश्न निर्माण झाला तेव्हा परेशसरांनीच मला मी ही भूमिका करावी असं सांगितलं. ते म्हणाले, तू कॅमेर्‍यासमोर अगदी बिनधास्त वावर. अभिनय करू नकोस. जसा वास्तवात आहेस, तसाच उभा राहा. आपोआप चैतन्यची भूमिका तुझ्याकडून साकारली जाईल. मी त्यांचं म्हणणं ऐकलं नि ही भूमिका माझ्याकडून घडली गेली. खरं तर ही व्यक्तिरेखा मला एखाद्या नावाजलेल्या कलाकाराला द्यायची इच्छा होती. परंतु, माझ्या आर्थिक बजेटची गाडी अजून स्थिरस्थावर नसल्यामुळे कोणी माझ्यासाठी थांबायला तयार नव्हतं.

हा चित्रपट जवळपास सहा वर्षांपासून निर्मितीवस्थेत आहे. नवनाथांचा ग्रंथ हातात घेतल्यापासून मी गेल्या पाच वर्षांमध्ये पायात चप्पल घातलेली नाही. तहान-भूक विसरून मी आजही बिगरचपलेचा सगळीकडे ङ्गिरतो. हा चित्रपट ज्या दिवशी चित्रपटगृहात प्रदर्शित होईल, त्याच दिवशी मी पायात चप्पल घालणार आहे. नवनाथांवरील चित्रपट हे माझं ‘मिशन’ आहे. ही जाणीव आपल्याला सतत राहावी, पावलोपावली जाणीव राहावी या हेतूनं मी चप्पल न घालण्याचा निर्णय घेतला. या चित्रपटाचं पटकथा लेखन तसेच गीतलेखन मीच केलं आहे. संगीत विशाल बोरूळकर यांचं आहे. या चित्रपटातील मच्छिंद्रनाथांच्या व्यक्तिरेखेसाठी कोण घ्यावं याचा खूप विचार केला गेला. एकदा गाणगापूरला गेलो होतो. तिथून निघाल्यानंतर बसमध्ये मला गाढ झोप लागली. स्वप्नामध्ये मला अमोल कोल्हेंच्या रुपातून मच्छिंद्रनाथांनी दर्शन दिलं. तेव्हाच मी कोल्हेंना या भूमिकेसाठी घ्यायचं ठरवलं. श्री. कोल्हे हे खूप व्यग्र कलाकार आहेत. परंतु, त्यांच्या योग्य त्या शूटिंगडेट्स मिळण्यासाठी मी थांबलो. कारण या व्यक्तिरेखेसाठी मला तेच हवे होते. ‘संभाजी’ या मालिकेसाठी ते रात्री कराडला शूटिंग करायचे नि दिवसा माझ्या चित्रपटाच्या शूटिंगसाठी ते ङ्गलटणला यायचे. त्यांनीही मला या चित्रपटासाठी भरपूर सहकार्य केलं. गिरनार पर्वतापासून ते गाणगापूरपर्यंत आपण या चित्रपटाचं शूटिंग केलं. नवनाथांची सगळी देवस्थानं या चित्रपटात पाहायला मिळतील. द्रोण, ड्रॅगन कॅमेर्‍याद्वारे आम्ही हे सगळं शूटिंग केलंय. तांत्रिक आघाडीवर आम्ही कुठंही तडजोड केलेली नाही. ‘बिजांकुर ग्रुप ऑफ कंपनीज’चे सतू कृष्णा केणी हे माझे सहनिर्माते आहेत. ते माझ्या पाठीशी उभे राहिले. सर्वसाधारण मराठी चित्रपटाचं शूटिंग २५ ते ३० दिवस चालतं. परंतु, तब्बल ४९ दिवस आम्ही या चित्रपटाचं शूटिंग केलं. माझ्या चित्रपटाचा कॅमेरामन सर्ङ्गराज खानचं काम अतिशय उत्कृष्ट आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर समाजोपयोगी विषय मला चित्रपट माध्यमातून मांडायचे आहेत.

– घनःश्याम येडे

ठेवणीतले लेख

    आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा



    [recaptcha]

    काही निवडक प्रतिक्रिया:

    नरेंद्र चौधरी


    आपल्या संकेतस्थाळाच्या माध्यमातून असे लक्षात आले कि आपन खूप छान माहिती पुरवत आहात.
    संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया