शांतारामबापूंची उमेदवारी
——
ज्या शहरात चित्रपट लावायचा, त्या शहरात बहुसंख्य लोक कोण आहेत, तेथे कोणता सण अधिक उत्साहाने साजरा केला जातो, ह्याची माहिती मी मिळवीत असे. हिंदू धर्मातील सर्व सण सर्व शहरांत सारख्याच उत्साहाने साजरे केले जातात असे नाही. नवरात्र दसरा हा सण कलकत्ता व म्हैसूर ह्या शहरी ज्या उत्साहाने साजरा केला जातो, तेवढ्या उत्साहाने राजस्थान, अहमदाबाद, सूरत, वगैरे भागांत केला जात नाही. होळी, रंगपंचमी, रामनवमी हे सण महाराष्ट्रातल्यापेक्षा उत्तर हिंदुस्थानात विशेष उत्साहाने साजरे केले जातात. ऐतिहासिक, पौराणिक, सामाजिक, अद्भूतरम्य ह्यापैकी कोणत्या प्रकारच्या चित्रपटांची आवड लोकांना जास्त आहे, ही माहितीही धंद्याच्या दृष्टीने आवश्यक असते, पौराणिक चित्रपट सर्वच ठिकाणी सारखे लोकप्रिय होतात असे नाही. महाराष्ट्रात तर ऐतिहासिक चित्रपटाला जितका फायदा मिळतो, तितका सामाजिक व पौराणिक चित्रपटांना हमखास मिळतोच असे नाही.
ह्याशिवाय, आपल्या कंपनीखेरीज आणखी कोणकोणत्या कंपन्यांचे कोणते चित्रपट त्या गावी लोकांना आवडले ?… सर्वांत जास्त उत्पन्न कोणत्या चित्रपटाला झाले ? …
शहरांत सर्वात लोकप्रिय नट नटी कोण ? … हाही अंदाज मी घेत असे. आपला चित्रपटातला कोणता प्रसंग प्रेक्षकांना विशेष आवडला, कुणाचे काम अधिक पसंत पडले, ह्या सर्व गोष्टी सविस्तरपणे पत्र लिहून मी बाबुराव पेंटरांना कळवीत असे.
असाच एकदा मी चित्रपट प्रतिनिधी म्हणून हुबळीस गेलो होतो. तेथे माझी मावशी (नूनू) राहत होती. माझे मावसबंधू शांतारामबापू (व्ही. शांताराम) रेल्वे वर्कशॉपमध्ये टेक्निकल काम शिकत होते. मी तेंव्हा साहजिकच चित्रपट पाहण्यासाठी मावशीच्या घरच्या सर्व मंडळींना बोलाविले.
दुसऱ्या दिवशी मी त्यांच्या घरी गेलो असता बोलण्याच्या ओघात शांतारामबापूंना सहज विचारले, “येणार का सिनेमा कंपनीत ?” त्यांनी शाळेत संमेलनप्रसंगीच्या नाटकात व एका प्रसिद्ध नाटक कंपनीत काम केल्याचे मला माहित होते. त्यांची प्रकृती सुदृढ, नाकडोळे तरतरीत, मुद्रा देखणी अन वृत्तीही कामसू, कष्टाळू, चित्रसृष्टीत त्यांचा उत्कृष्ट उपयोग होईल, अशी माझी खात्री होती. त्यांनी माझ्या प्रश्नाला तत्काळ होकार दिला.
आपल्या आई-वडिलांच्या अनुमतीने पुढे काही दिवसांनी शांतारामबापू कोल्हापुरात आले. त्या वेळी उमेदवार म्हणून काही मुले कंपनीत ठेविली जात. त्यांना पेंटरांच्या हाताखाली काम करावे लागे. तेंव्हा नवीन उमेदवाराची माहिती असणे आवश्यक असे, म्हणूनच मी शांतारामबापूंविषयी पेंटरांना विचारले. नेहमीप्रमाणे ते म्हणाले, “पडतील ती कामे करावी लागतील. सहा महिने पगार मिळणार नाही. हा उमेदवारीचा नियम तुम्हाला ठाऊक आहेच, त्याप्रमाणे त्याची राहायची तयारी असेल तर ठेवा त्याला.” पेंटरांचे असे उत्तर मिळणार हे मला माहीतच होते. पण शांतारामबापूंनी मला “पगार काय ठरला !” असे विचारले तेंव्हा “पेंटर नंतर पगार सांगणार आहेत. पण त्यांनी तुम्हाला उमेदवार म्हणून ठेवण्यास संमती दिली आहे. ” असे त्यांना सांगून वेळ मारून नेली.
शांतारामबापूंनी समजायला लागल्यापासून स्वतःच्या चरितार्थाचा भर आपल्या आई-वडिलांवर पडू दिला नव्हता. लहानपणी एका प्रसिद्ध नाटक मंडळीत लहान सहन भूमिका व नाचात काम करून मिळणारे दहा-बारा रुपये ते घरी पाठवीत. त्यानंतर हुबळीत रेल्वे वर्कशॉपमध्ये काम करून ते स्वतःचा खर्च भागवीत. त्यांचे स्वावलंबनाचे प्रखर व्रत मला ठाऊक असल्यामुळेच, पगार ठरला नाही किंवा सहा महिने बिनपगारी उमेदवारी करावी लागे, वगैरे गोष्टी मी त्यांना सांगितल्या नाहीत. त्या वेळी मी आणि बाबुराव पेंटरांचे स्नेही, चित्रकार दत्तोपंत गजबर (दिग्दर्शक बाळ गजबर ह्यांचे वडील) कंपनीमध्येच क्लबसारखी स्वतंत्र व्यवस्था करून जेवत असू. शांतारामबापूंच्याही जेवणाची व्यवस्था मी तेथेच केली आणि ‘तुमच्या पगारातून जेवणाचे बिल भागवले जाईल असे त्यांना सांगितले.
महाराष्ट्र फिल्म कंपनीत शांतारामबापू आले, त्यावेळी त्यांचे वय वीस वर्षांचे असेल. त्यांच्याबद्दल त्या बाईला काय वाटत होते, कोण जाणे ! कदाचित त्यांना पाहताच तिला आपल्या दिवंगत मुलाची आठवण होत असावी. पण ती त्यांचे नेहमी तोंड भरून कौतुक करायची आणि त्यांना आग्रह करून वाढायची.
त्या प्रेमळ माऊलीच्या शांतारामबापूंवरच्या मायेचे दर्शन घडविणारा एक हृदयस्पर्शी प्रसंग मला आठवतो. तो गणेशचतुर्थीचा दिवस होता. तिने गणपतीच्या नैवेद्यासाठी एकवीस मोदक बनविले होते. जेवताना शांतारामबापूंनी फक्त तीन-चारच मोदक खाल्लेले पाहून ती म्हणाली.
“अरे, देवासारखा मुलगा तू. तुझ्यासाठी मी मुद्दाम एकवीस मोदक केले अन त्यातले तू फक्त तीन चारच खातोस !.”
‘मग काय मावशीबाई, मी एकवीसच्या एकवीस मोदक खाऊन टाकू ?’ शांतारामबापूंनी असे म्हणताच, ‘खा रे माझ्या लेका !’ असे म्हणत तिने मोदकाचे ताट मोठ्या प्रेमाने शांतारामबापूंपुढे ठेवले आणि शांतारामबापूंनीही ते सर्व मोदक खाऊन टाकले ! त्या माऊलीच्या नेत्रांतून आसवांच्या धारा वाहू लागल्या. ती भावनावश होऊन म्हणाली, ” आज माझा मुलगाच तुझ्या रुपानं येऊन जेवला, असं वाटलं. तुझ्याच वयाचा होऊन गेला की रे तो !”
‘रिप्रेझेंटेटिव्ह’च्या कामासाठी माझे बरेच दिवस गावोगावच्या प्रवासात आणि धावपळीत जात असत. एकदा मी असाच पुष्कळ दिवस बाहेरगावी दौऱ्यावर होतो. परत येऊन पाहतो तो काय ! बाबुराव पेंटरांचे पान शांतारामबापूंवाचून अगदी हलत नाही, असे मला आढळून आले. पेंटरांच्या सवयी, आवडीनिवडी, गरजा वगैरे सर्व गोष्टींचा शांतारामबापूंनी बारकाईने अभ्यास केला होता. पेंटरांचे स्नान होण्याच्या आत, सकाळी नऊ वाजता त्यांच्या पेंटिंगसाठी रंगाचे पेले धुऊन साफ करणे, बोर्ड, खुर्ची नीटपणे मांडून ठेवणे, ब्रश स्वच्छ धुऊन आणणे, त्यांच्या बैठकीची साफसफाई करणे… मोटार दुरुस्तीच्या वेळी फाटकी पॅन्ट व मळकट शर्ट घालून सर्वांआधी हजर राहणे… रात्री झोपते वेळी पेंटरांना दुधाचा पेला आणून देणे… अशी सर्व कामे शांतारामबापू नियमितपणे बिनबोभाट करीत. इतर वेळी दामले, फत्तेलाल ह्यांच्यात मिसळून ते टेक्निकल व लॅबोरेटरीमधील काम शिकत. कंपनीचे कोणतेही काम असो, शांतारामबापूंनी ते पुढे होऊन केले नाही, असे कधीच झाले नाही. कोणी काहीही काम सांगो, ते करण्याची त्यांची एका पायावर तयारी. आळस कसा तो त्यांना ठाऊकच नव्हता. केव्हाही पाहिले तरी ते काही ना काही उद्योगात गढलेले असायचे.
सहा महिन्यांनंतर शांतारामबापूंना पंधरा रुपये पगार मिळू लागला. त्यांच्या ठिकाणी आदर्श विद्यार्थ्यांचे सर्व गुण होते. पेंटरांच्या स्वभावातले आम्हाला दिसणारे दोष त्यांना दिसत नव्हते, असे नाही. पण त्याबद्दल ते कधीही तोंडातून चुकूनही ब्र काढीत नसत. उलट, कंपनीत पेंटरांच्या स्वभावदोषाबद्दल कुठे काही बोलणे निघाले की ते चटकन उठून दूर जात. पुढे पुढे तर असे होऊन लागले की, पेंटरांच्याबद्दल विषय चालू असला आणि शांतारामबापू तेथे येताहेतसे दिसले की, मंडळी म्हणत, “अरे, गप्प राहा. शेठचे पट्टशिष्य समर्थांचे कल्याणस्वामी येताहेत !” पण अशा चेष्टेकडेही ते दुर्लक्ष करीत असत. आपले काम भले की आपण भले, अशा वृत्तीने ते वागत.
अगदी अल्पावधीत रसायन व संकलन ह्या कामांत शांतारामबापू निष्णात झाले. त्यामुळे काही मंडळींच्या मनात त्यांच्याविषयी असूया निर्माण होणे साहजिकच होते. त्यांचा कामाचा उरक दांडगा होता. स्वतःची सारी कामे उरकून कित्येकदा गैरहजेरीत माझे पत्रव्यवहाराचे कामही ते पाहत असत.
संदर्भ :- चित्र आणि चरित्र
लेखक :- बाबुराव पेंढारकर
प्रकाशक – व्ही. शांताराम फाऊंडेशन, मुंबई
काही निवडक प्रतिक्रिया:
निशांत भोसले
आपल्या संकेतस्थाळाच्या माध्यमातून असे लक्षात आले कि आपन खूप छान माहिती पुरवत आहात.
पण जर त्या सोबतच आपण एक youtube channel चालू करून त्यावर तो चित्रपट टाकावा आणि त्याची लिंक तुम्ही पुरवत असलेल्या चित्रपटाच्या माहिती खाली टाकावी जेणे करून ते उपयुक्त होईल.
संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया