अतिथी कट्टा

दिनांक : ०१-०९-२०१८

‌‌‌‌‌‌‌‌‘सविता दामोदर परांजपे’चं चॅलेंज पेलणं कठीण…

मुलांनीही आपला वारसा चालवावा असं सामान्यातल्या सामान्य व्यक्तीलाही वाटत असतं. आपल्या आई-वडीलांचा वारसा चालवत जेव्हा मुलं त्यांचं नाव मोठं करतात, तेव्हा आई-वडीलांनाही त्यांचा सार्थ अभिमान वाटतो. दिवंगत अभिनेते मधुकर तोरडमल हे मराठी नाट्य-सिनेसृष्टीतील खूप मोठं नाव. त्यांची मुलगी तृप्ती तोरडमल आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनेत्री बनली आहे. ‘सविता दामोदर परांजपे’ या सिनेमाद्वारे तृ्प्ती अभिनेत्री म्हणून मोठ्या पडद्यावर पदार्पण करत आहे. त्यानिमित्तानं तिचं हे मनोगत.

——

अभिनयक्षेत्रात वडिलांचं खूप मोठं नाव आहे, पण मी अभिनेत्री बनायचं असं कधीच ठरवलं नव्हतं. प्रॉडक्शन करण्याची माझी इच्छा होती. त्या निमित्ताने मी आणि स्वप्नाताई लेखक शिरीष लाटकर यांना भेटण्यासाठी त्यांच्याकडे निघालो होतो. त्यावेळी स्वप्नाताईंनी गाडीमध्ये या नाटकावर सिनेमा बनवायचा विचार असल्याचं सांगितलं. ते मला खूप भावलं आणि गाडीतून उतरण्यापूर्वीच आमचा विचार बदलला. या चित्रपटाच्या विषयानं माझ्यावर प्रचंड भुरळ घातली. नव्हे मी त्यांच्या प्रेमातच पडले. शेखर ताम्हाणे यांच्याशी फोनवर बोलून नाटकाच्या हक्काबाबतही चर्चाही झाली. अशा प्रकारे अचानकपणे ‘सविता दामोदर परांजपे’ चा नाटक ते सिनेमा असा प्रवास सुरू झाला. शेखर ताम्हाणे यांच्या दिग्दर्शनाखाली १९८५ मध्ये मराठी रंगभूमीवर अवतरलेल्या ‘सविता दामोदर परांजपे’ या नाटकाने त्या काळातील प्रेक्षकांचा थरकाप उडवला होता. नाटकामध्ये राजन ताम्हाणे आणि रीमा लागू यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. सिनेमाचं लेखन शिरीष लाटकर यांनी केलं आहे. नाटकात रीमा लागूंनी साकारलेली भूमिका मी साकारली आहे. माझ्याबरोबर सुबोध भावे आणि राकेश बापट, पल्लवी पाटील, अंगद म्हसकर, आणि सविता प्रभुणे या कलाकारांच्या भूमिका आहेत. जे. ए. एन्टरटेन्मेंट आणि पॅनोरमा स्टुडिओजची प्रस्तुती असलेल्या या सिनेमाची निर्मिती जॅान अब्राहम करत आहे. जॉनला या चित्रपटाचा विषय आवडला आणि लगेचच त्यानंही या चित्रपटाला सपोर्ट करायचं ठरवलं. स्वप्ना वाघमारे जोशी यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. या सिनेमाद्वारे जॅानची पावलं मराठीकडे वळली आहेत. जॅानला मराठी सिनेमा करायचा होताच. जेव्हा ‘सविता दामोदर परांजपे’ या नाटकाबद्दल आणि त्यावर आधारित असलेल्या सिनेमाबद्दल सांगितलं, तेव्हा तो स्वत:हून या सिनेमाच्या निर्मितीत सहभागी व्हायला तयार झाला.

खरं तर ‘सविता दामोदर परांजपे’ हा माझा अभिनयातील पदार्पणाचा सिनेमा आहे, पण या सिनेमाबाबत मी खूप कॅान्फीडन्ट आहे. पप्पांचा आशिर्वाद माझ्या मागे आहे. त्यामुळेच हे घडून आलं आहे. आज त्यांना जाऊन वर्ष होत आहे, पण ते गेले असं वाटतच नाही. कदाचित मी अभिनय करावं असं त्यांना वाटत होतं, पण त्यांनी कधीच कोणतीही गोष्ट माझ्यावर लादली नाही. त्यामुळे ‘अभिनय कर’ असंही कधी म्हणाले नाहीत, पण त्यांच्या प्रेरणेमुळेच मी अभिनेत्री बनले आहे. या सर्व प्रवासात स्वप्नाताईंनी मला खूप सांभाळून घेतलं. अभिनयाच्या वर्कशॅापखेरीजही त्यांनी बऱ्याच गोष्टी समजावून सांगितल्या. त्या माझ्या पहिल्या समीक्षक आहेत. त्यामुळेच एखादा सीन झाला की, मी तो मॅानिटरवर पाहण्यापूर्वी स्वप्नाताईंकडे पाहायचे. त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव मला माझ्या कामाची पोचपावती तर द्यायचेच, पण पुढील सीन करण्यासाठी हुरूपही वाढवायचे.

या भूमिकेसाठी मी खूप मेहनत केली. ती मी केली नसती तर मग मला पहिल्याच सिनेमापूर्वी चित्रपटसृष्टीतून आपला गाशा गुंडाळावा लागला असता. आयुष्यात मी नेहमीच चॅलेंजिंग निर्णय घेतलेत. ‘सविता दामोदर परांजपे’ हा चित्रपटदेखील त्यापैकीच एक निर्णय होता. पप्पा नेहमी मला म्हणायचे की, दोन रस्त्यांपैकी एकाची निवड करायची असेल तर तृप्ती नेहमी सोपा मार्ग सोडून अवघड मार्गाची निवड करते. तशीच मी या अवघड भूमिकेची निवड केली. हे चॅलेंज निभावणं खूप कठीण होतं. तब्बल चार-पाच महिने मी या भूमिकेवर काम केलं. नाटक तर तोंडपाठच होतं. चित्रपटाच्या पटकथेची मी पारायणं केली. त्यामधील व्यक्तिरेखेप्रमाणे मी जगायला लागले. या चित्रपटामधील माझ्या आवाजासाठी मी ‘व्हॉईस मॉड्युलेशन’ही केलं. खरं तर यंत्राची मदत घेऊन मी आवाज बदलू शकले असते. परंतु, मला माझ्या गळ्यातूनच ‘तो’ आवाज काढायचा होता. कारण मला माझ्या व्यक्तिरेखेचा आवाज कृत्रिम वाटता नये असं वाटत होतं. हा आवाज काढण्यासाठी खूप त्रासही झाला. बऱ्याचदा आवाज बसला. परंतु, त्या सगळ्या कठोर परीक्षेला मी सामोरी गेले. मला आवडलेल्या आवाजापैकी दोन आवाज मी पप्पांना आणि शेखरजींना ऐकवले. या दोघांनीही मला आवडलेल्या आवाजालाच पसंती दिली. या विषयासंदर्भातील थोडी वेगळी माहिती देते. माझी आजी अहमदनगरची. जहागीरदार कुटुंबातील. ती अत्यंत देवभोळी होती. तिच्या अंगात यायचं. अंगात आलं की हिंदी, इंग्रजी आणि आणखी एका भाषेत फाड फाड बोलायची. विशेष म्हणजे ती ‘नॉर्मल’ असताना तिला इंग्रजी बोलता येत नसे. तेव्हा या तीन भाषा ती कुठून शिकली या गोष्टीला काही ‘लॉजिक’च नाही. अंगात आलं की ती वाड्यातील भिंतीवरून उड्या मारायची. एवढी ‘स्ट्रेंग्थ’ तिच्यात यायची. विशेष म्हणजे तिला अंगात यायच्या काळातच पप्पांचा जन्म झाला. मला कळलेली आणखी एक गमतीशीर गोष्ट म्हणजे आजीच्या अंगात आलं की तिच्या तोंडून जो आवाज निघायचा तसाच आवाज माझ्या व्यक्तिरेखेच्या तोंडून आपोआप निघाला आहे. ही माहिती मला पप्पांनीच दिली. या चित्रपटात आम्ही अंधश्रद्धेला कुठंही खतपाणी घातलेलं नाही. आता प्रतीक्षा आहे ते प्रेक्षकांच्या प्रतिसादाची.

–तृप्ती तोरडमल

ठेवणीतले लेख

    आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा



    [recaptcha]

    काही निवडक प्रतिक्रिया:

    नरेंद्र चौधरी


    आपल्या संकेतस्थाळाच्या माध्यमातून असे लक्षात आले कि आपन खूप छान माहिती पुरवत आहात.
    संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया