अतिथी कट्टा

दिनांक : २२-०८-२०१८

‌‌‌‌‌‌‌‌सांगत्ये ऐका…

दिवंगत अभिनेत्री हंसा वाडकर यांचा आज स्मृतिदिन. वाडकर यांनी लिहिलेले ‘सांगत्ये ऐका’ हे आत्मचरित्र खूप गाजले. या आत्मचरित्रामध्ये त्यांनी आपल्या बालपणातील सुखद आठवणींपासून ते नंतरच्या काळातील संघर्षापर्यंतची सर्व कहाणी मनमोकळेपणानं मांडली. त्यामुळेच वाचकांनी या आत्मचरित्राला उचलून धरलं. या आत्मचरित्रामधील वाडकर यांच्या बालपणाचा काही भाग आम्ही संपादित स्वरूपात प्रकाशित करीत आहोत. त्यामध्ये हंसा वाडकर यांनी आपल्या ‘हंसा वाडकर’ या नामकरणाबद्दलही लिहिलं आहे.

——

आमचं घरं कलावंतिणीचं. माझी पणजी बायाबाई साळगावकर कलावंतीण होती. तिला आम्ही जीजी म्हणायचो. ती मुंबईचीच. आमचे आजोबा रघुनाथ यांच्यासह बायाबाई ग्रॅन्ट रोडवरील रघुनाथ मॅन्शनमध्ये राहत असत. कलावंतिणीच्या घराण्यातील स्त्रीनं किंवा पुरुषानं लग्न करणं, हे त्या वेळच्या परंपरेच्या विरुद्ध होतं. पण आजोबांनी लग्न केलं आणि ही परंपरा मोडली. त्या वेळी त्यांच्या लग्नाचं हे प्रकरण खूपच गाजलं.

पुढे पुढे आमच्या आजोबांना फेफरं येत असे. ते काहीच काम करीत नसत. नेहमी घरी पडलेले असत.
आमचे वडील भालचंद्र यांना तीन बहिणी. केशरबाई म्हणजे माई, इंदिराबाई म्हणजे बायजी आणि सुशिलाबाई म्हणजे ताई. वडिलांनी एका भाविणीच्या मुलीशी लग्न केलं. आमच्या आईचं नाव सरस्वती. आमच्या तीन आत्यांपैकी फक्त सुशिलाबाईंनीच लग्न केलं मास्टर विनायकरावांशी.

आमच्या वडलांना एकूण चार मुलं झाली. त्या पैकी सर्वात थोरली बहीण आणि धाकटा भाऊ गेले. आम्ही दोघे मधली भावंडं, थोरला भाऊ मोहन आणि मी, वाचलो.
जीजीनं- बायाबाईनं खूप कमावलं होतं ; पण आमचं कुटुंबही मोठं होत. भांडणं होऊ नयेत म्हणून जीजीनं आपल्या इस्टेटीची वाटणी केली. आमच्या वाट्याला सावंतवाडीचे घर आलं. हे घर कुणी बांधलं होतं, कुणास ठाऊक. पण होतं मात्र जिजीचंच. आम्ही म्हणजे मी, भाऊ, आई आणि वडील असे चौघेजण सावंतवाडीला राहायला आलो तेव्हा मी सहा वर्षांची होते.
माझा जन्म मात्र मुंबईचाच. २४ जानेवारी १९३२ रोजी मी मुंबईतच भालेरावांच्या हॉस्पिटलमध्ये जन्मले. माझा जन्म पायाळू. आईला बाळंतपणात अतिशय त्रास झाला. मूल वाचवावे की आई, असा प्रश्न पडला होता. वडलांनी अर्थातच आईला वाचवावे म्हणून सांगितलं. शेवटी कशीबशी मीही वाचले.

मला वाढवलं मात्र, आईच्या आईनं. कारण माझ्या जन्मानंतर लगेच भावाला देवी झाल्या होत्या आणि त्या वेळच्या प्रथेनुसार त्याला एका वेगळ्या खोलीत ठेवलं होतं. त्याच्या खोलीत जाताना हातपाय स्वच्छ धुऊन, कपडे बदलून जावं लागे. बाळंतपणातून उठल्यावर आई त्याच्याजवळच बसून राही. त्यामुळं तिला मला घेता येत नसे. मला दूधदेखील आईच नव्हतं.
माझं मराठी चौथीपर्यंतचं शिक्षण सावंतवाडीतच झालं. तिथला परिसर निसर्गरम्य. तांबडी माती आणि हिरवे माड यांच्या सान्निध्यात तो काळ कसा सुखाचा गेला. अजूनही सावंतवाडीतील त्या दिवसांच्या गोड आठवणींनी मन हरखून जातं.
भाऊ आईचा लाडका आणि मी वडलांची लाडकी होते. पुढे आमच्या दोघांची भांडणं होत. त्यात आई भावाचीच बाजू घेई. म्हणून मी म्हणे, “आमच्या आईचं भावावर साखरेचं प्रेम आहे आणि माझ्यावर गुळाचं.” आमच्या दोघांच्या भांडणात आई मग धावू लागली की आम्ही पळत असू. मी लठ्ठ असल्यानं व धावता न आल्यानं मीच आईच्या हाती सापडे आणि मार खाई. आईनं मारलं की, मी वडिलांजवळ धावत असे.

सावंतवाडीला आमच्या घरासमोरच बंदरकरांचं एक मोठं श्रीमंत कुटुंब राहत होत. ते आमच्यापेक्षा खालच्या जातीचे होते. पण त्यांचा आमचा विशेष घरोबा होता. येणं जाणं होतं. बंदरकरांची मुलं आमच्याकडे येत आणि आम्ही त्यांच्याकडे जात असू. बंदरकरांचा एक मुलगा जगन्नाथ हा माझ्यापेक्षा दहा वर्षांनी मोठा होता. तोही आमच्या घरी येत असे. मुंबईला जाणं हे त्यांचं स्वप्न होत ; पण त्यानं मुंबई अजून पहिली मात्र नव्हती.

आम्हाला गाणं शिकवायला वडलांनी भगवंतबुवा म्हणून उस्तादजी ठेवले होते. मला आपला गाण्याचा कंटाळा, कशीबशी मी मेहनत करी. तरी थोडंफार मी गाण शिकले. मग जगन्नाथ बंदरकर मला गायचा आग्रह करीत. मी टाळायची.
एकदा त्यांनी आईला सांगितलं, “वहिनी, सांगा ना हो बेबीला गाण म्हणायला.” माझं खरं नाव रतन. पण सारे मला बेबीच म्हणत.
“मला नाही येत गाणं !” मी तोऱ्यात म्हटलं. आई म्हणाली, “मी सांगते म्हणून गाणं म्हण.” मी गप्पच बसून राहिले. गाणं म्हटलंच नाही. शेवटी आईनं चिडून धुणं धुवायच्या काठीनं मला बडवायला सुरुवात केली. शेवटी बंदरकर मध्ये पडले म्हणून थांबली. मार खाल्ला पण मी काही गायले नाही.

रात्री वडील नाटकातून आले तोवर मी माझा राग साचवून ठेवला होता. वडील आल्यावर मी सूर काढला. इतका वेळ आई “गाणं म्हण, गाण म्हण ” म्हणून मला सांगत होती. पण माझा सूरच लागत नव्हता. वडील आल्याबरोबर मी चांगलाच सूर धरला. आईनं मला मारल्याचं समजताच त्यांनी आईला मारलं. माझं समाधान झालं. पण नंतर मात्र वडिलांजवळ झोप येईना. उठले आणि आईच्या कुशीत निजले. तेव्हाच झोप आली.

जेवायला बोलावण्यासाठी वगैरे कामांसाठी आई मला बंदरकरांकडे नेहमी पाठवी. मी लहान होते. गेले म्हणजे जगन्नाथ बंदरकर माझे खूप लाड करीत. कधी कधी मला ते एकटीलाच गाठीत आणि लहान मुलीसारखं मला धरून ते विचारीत, “सांग, माझ्याशी लगान करशील ?”
मला काहीच कळत नव्हतं. लग्न वगैरे काय असतं हे मला त्यावेळी काहीच ठाऊक नसायचं. त्यांनी असं विचारलं म्हणजे मी नुसतीच हसे. काहीच बोलत नसे. नेहमी हे असच चालायचं. पुन्हा पुन्हा ते मला विचारीत, “सांग, माझ्याशी लग्न करशील ?”
मला तेव्हा प्रेम वगैरे काहीच कळत नव्हतं. मी म्हटलं. ही कसली कटकट लागली आहे आपल्यामागं ? म्हणून या कटकटीतून एकदाची सुटका करून घेण्यासाठी सांगून टाकलं, “करीन लग्न झालं ना ?”
“नुसतं हो नको सांगूस, शपथ घेऊन तस सांग.” बंदरकर म्हणाले. नको ही सारखी भुणभुण म्हणून मी म्हणाले, “शप्पथ, तुमच्याशी लग्न करीन. आता झालं ?”
बंदरकरांशी मी बोलले तर माझ्या भावांना, मावस भावांना ते आवडत नसे. पण आईच सांगे, “जा, त्यांना जेवायला बोलाव.”
म्हणून मी जाई. मला काहीच समजत नव्हतं. मग भाऊ बोलणं टाकीत.

सावंतवाडीलाच आमचं मावस घर होतं. इतर अनेक नात्या गोत्यातली माणसं होती. आम्हाला गंजीफा खेळण्याचा फार शौक होता. मी मातीच्या चुलीदेखील हौसेनं तयार करायची. गावात मामा नावाचे आमच्या नातेवाईकांपैकी एकजण होते. त्यांना आम्ही नुसतंच मामा म्हणत असू. ते कोंबड्यांसाठी फार सुंदर खुराडी तयार करायचे. त्यामध्ये आम्ही कोंबड्या पाळीत असू. मी कोंबड्यांच्या मागं मागं असे.

पण आमच्या बायजा आत्याकडे उस्ताद विलायतखॉंसारखे संगीतकार पाहुणे आले, की या कोंबड्यांवर धाड येई. आणि मी खूप रडे. पण आई सांगे, “घरची कोंबडी नका मारू बाई? बेबी रडते.” कटिंदर नावाचा एक प्राणी असतो. कोंबड्यांचा तो वैरी. एखाद्या कटिंदरानं रात्रीच कोंबडी पळवून नेली तरी मी रडून रडून धिंगाणा घाली. त्यामुळं माझं कोंबड्या पालन, हा एक घरात तापच झाला होता.
दुपारी आम्ही मुलं मुलं शेजारच्या टेकाडांवर आणि झाडांवर खेळत असू. एकदा मी आणि भाऊ शेजारच्या पारिजातकाच्या झाडावर खेळत असताना मी उंचावरून धपकन खाली पडले. इतका सपाटून मुका मार बसला होता, की काही वेळ मला बोलताच येईना. भाऊ म्हणाला, “घरी आईला सांगू नकोस पडलीस म्हणून.” “सांगेन जा ” मी म्हणाले. तो अजीजी करू लागला. “हवं तर तुला खाऊला पैसे देतो पण घरी सांगू नकोस.” मी घरी सांगितलं नाहीच. आठवणीतली ही पहिली कमाई. दुःख सोसलं पण पैसे मिळाले. हे इथपासूनच जणू ठरलं.

सावंतवाडीच्या शाळेत आमच्याच वर्गात तिलोत्तमा राजे होत्या. शाळेत त्यांच्यासाठी वेगळी व्यवस्था नव्हती. कधी कधी आमचा सारा वर्गच त्यांच्या पॅलेसवर त्यांच्याशी खेळण्यासाठी नेत. मीही जाई. मजा येई.
तिलोत्तमा राजे शाळेत कुणी फार मोठ्या आहेत, असं मुळीच वाटत नसे. आमच्यासारख्याच त्या बाकड्यांवर बसत. शाळा सुटली की, ओळीनं आम्ही त्यांच्या पॅलेसवर जात असू. तिथं हुतूतू, चेंडू असे खेळ खेळले जात. देखरेख ठेवायला फक्त त्यांची एक युरोपियन नर्स असायची. ती फक्त दुरून खेळ बघायची. तिलोत्तमा राजे पडल्या किंवा त्यांना काही लागलं बीगलं तरी “कशी पडली, कुणी मारलं ” वगैरे ती मुळीच विचारीत नसे ! औषधोपट्टी होऊन खेळ पुढं चालू राही. फारच लागलं असेल तर त्या दिवसापुरता खेळ बंद होई. कधी कधी धाकटे राजे खेळ बघायला येत आणि विचारीत, “आम्ही येऊ का तुमच्यात खेळायला ?” मग तिलोत्तमा राजे म्हणत, “तुम्ही कशाला आम्हा मुलींमध्ये !”त्यावरून त्या दोघांत भांडणं होत.

मी नऊ वर्षांची असताना आम्ही परत मुंबईल आलो. मोहनचं आणि माझं शिक्षण पुढं मुंबईत करावयाचं होतं. ‘आर्यन एज्युकेशन सोसायटीच्या’ शाळेत माझं पुढचं शिक्षण सुरु झालं. मला शिक्षणाची खूप हौस. खूप शिकून छान संसार करावा असं सारखं वाटे. वडील माझ्याकडून रोज ‘टाइम्स’ वाचून घेत.

पण माझ्या इंग्रजी शाळेतल्या दोन इयत्ता झाल्या, आणि जीवनाला वेगळंच वळण लागलं. शिक्षण पार बाजूला राहील. पुढं शिक्षणाला उत्तेजन मिळालं नाही.


आमची सर्वात थोरली आत्या केशरबाई. तिच्याखाली इंदिराबाई. आणि मग सुशिलाबाई हे सांगितलंच आहे. सुशिलाबाई म्हणजे ताई माझ्या अगदी मैत्रिणीसारखी. इंदिराबाई विनायकरावांच्या ‘हंस’ मध्ये होत्या. त्या वेळी सिनेमात जाणं ही दिव्य गोष्ट होती. स्त्रियांनी सिनेमात काम करायला तर समाजाचा विरोधच होता. अशा या काळात इंदिराबाई ‘हंस’ पिक्चर्समध्ये काम करीत, याची आम्हाला लाज वाटे. आमच्या घराण्याचं नाव खराब होऊ नये म्हणून त्या स्वतःच नाव ‘इंदिरा वाडकर’ असं लावीत. साळगावकर लावीत नसत. तरीही सगळ्यांना हे माहित होतंच. त्यावरून शाळेत मला चिडवीतदेखील.

आमच्या जिजींना जीवनातील सर्वच गोष्टींबद्दल ओढ होता. जिव्हाळा होता. सर्व गोष्टींचा त्यांना रस होता. गाणं बजावणंही आवडे. विलायतहुसेनखॉंचे भाचे अजीमला हुसेन खॉंसाहेब यांना मला गाण शिकविण्यासाठी गुरु म्हणून ठेवलं. माझे वडीलही उत्तमपैकी तबला वाजवीत. खॉसाहेब तिरखवांचे ते गुरुबंधू.

मुलींना गाणंबजावणं यावं, नाचता यावं, पोहता यावं, सर्व कला याव्यात असं जिजीला वाटे. तिनं कितीतरी मोठमोठ्या कलावंतांची शिक्षणं केली. मारून मुटकून मलाही तिनंच शिकण्याची सक्ती केली गाण्याच्या मला कंटाळाच फार. आवाज नव्हता असं नाही. पण इतर ‘नखरे’च मी फार करी. उगीचच घसा खाकरून, शिंकणं वगैरे. गाण्यांशिवाय इतरच प्रकार मी अधिक करायची. पाऊण पाऊण तास असा जायचा. मग अखेरची पंधरावीस मिनिटे “आ SSSSऊ SSS” व्हायचं. गाण्याचं हे असं चालत असे.
अभिनयाचे पहिले धडे मात्र मला जिजीनंच दिले. ती माझी या क्षेत्रातली पहिली गुरु. माझं वय तेव्हा नऊ साडेनऊचं आणि ती असेल पासष्टच्या वरची. दुपारची वेळ असायची. जिजी थोडीशी झोपण्यासाठी पडलेली असायची. उकाडा मनस्वी असायचा. ती मला मग म्हणायची. “बेबी वर घाल.” मग वर घालता घालता गप्पा सुरु व्हायच्या. जिजी नाना प्रकारच्या गोष्टी सांगे. या गप्पात ती मनापासून रंगून जायची. मला काही तरी यावं, मला काही शिकवावं, यासाठी ही तिची जिद्द आणि तळमळ. पडल्या पडल्याच मग ती “न मानूंगी न मानूंगी’ हे गाण अभिनयासह म्हणून दाखवायची. एकाच ओळीत हे गाण किती विविध छटांनी म्हणता येत याच ती प्रात्यक्षिक दाखवायची. आणि माझ्याकडून करवून घ्यायची. मला कंटाळा यायचा. मी म्हणत असे, “पुरे ग जीजी, कंटाळले !” “अगं, कर कर, माणसाला सगळं काही आलं पाहिजे,” ती म्हणे.
जिजीचा रुबाब और होता. ती बाहेर जायची ती नेहमी बंद घोड्याच्या गाडीतून. अंगावर नेहमी भारी भारी शालू आणि दागिने असायचे.
पण घरात माझ्या वडिलांना दारूचं अतिशय व्यसन होतं. काम धंदा त्यांना असा काहीच नव्हता. होता तो तबल्याचा शौक. एरवी दारू. दारूच्या व्यसनापायी अमाप पैसे घालवीत. पैशांचा प्रश्न कठीण होऊ लागला. ‘खायचं कायं’ इथपर्यंत पाळी येते की, काय असा प्रसंग निर्माण झाला. कुणीतरी नोकरी करणं आवश्यक होतं. वडलांचा पिंड नोकरीचा नव्हता. मी आणि भाऊ त्यांच्यापैकीच कुणी तरी नोकरी करायला हवी होती. मी दहा वर्षांची होते आणि भाऊ मॅट्रिकमध्ये होता. मी इंग्रजी दुसऱ्या इयत्तेत होते.
माझी थोरली आत्या माई त्यावेळेस मो. ग. रांगणेकरांच्या सिनेमात काम करीत होती. तिनंच सुचवलं, “बेबीला सिनेमात का नाही घालत ?”
आईनं मला विचारलं. मी म्हटलं, “आई, मी तर अवघी दहा वर्षांची आहे. आणि मला कोण काम देणार? शिवाय माझं शिक्षण ?”
आई म्हणाली, “तुझ्यापेक्षा मोहनचं शिक्षण महत्वाचं आहे. तू काम कर म्हणजे मोहन तरी शिकेल !”
“ठीक आहे. मोहन शिकत असेल तर मी काम करीन.” असं म्हणून मी तयार झाले.

भावावर माझं फार प्रेम. शिक्षण घ्यावं, संसार करावा असं माझं लहानपणापासून स्वप्न होतं. पण मोहनचं शिक्षण व्हायचं होतं. कितीही भांडले तरी माझा त्यावर जीव होता. शिक्षण सोडून देऊन, मी नोकरी करायला तयार झाले.
पुण्याप्रमाणंच त्या वेळी कोल्हापूरलाही मोठ्या प्रमाणात चित्रनिर्मितीला आरंभ झाला होता. मुंबईला येण्यापूर्वीही सिनेमात प्रवेश करण्याचा मला योग्य आला होता. आम्ही सावंतवाडीलाच होतो. तेव्हा मी सात आठ वर्षांची असे. कोल्हापूरच्या शालिनी स्टुडिओच बोलावणं आलं होतं.


आम्हाला नेण्यासाठी एक भगवी गाडी मुद्दाम कोल्हापूरहून पाठवली होती. त्यात बसून मी व वडील कोल्हापूरला गेलो होतो. गोविंदराव टेंबे आणि तिरखवांसाहेब यांच्यापुढे माझी गाण्याची ट्रायल व्हायची होती. या दोन संगीत तज्ञांपुढे ट्रायल देणं म्हणजे एक दिव्यच होत.
गोविंदरावांच्या पुढं मी कशीबशी उभी राहिले. त्यांनी विचारलं,
“गाणं येतं ?” मी म्हणाले, “हो. येतं की.”
“मग म्हण बघू,” असं त्यांनी म्हणत आणि मी एकदम गायला सुरुवात केली. गोविंदराव पेटीवर सूर धरताहेत तोवर माझं गाण पटकन संपलंही. “निरभरन कैसे जाऊं” ही चीज मी अगदी आगगाडीच्या वेगानं दम लागल्यासारखं म्हणून दाखवली आणि ट्रायलमधून पास झाले ! आणि त्याच वेगानं आम्ही सावंतवाडीला परतलो, त्याच गाडीतून.
ट्रायल झाली. पण चित्रपटाचं पुढं काय झालं हे मला काहीच कळलं नाही. माझ्या लक्षातही राहीलं नाही. ही झाली जुनी आठवण. चित्रपटातला माझा खरा प्रवेश झाला तो ‘विजयाची लग्ने’ मधूनच. त्याच वेळी बापूसाहेब पेंढारकरांनी ललितकला कंपनीची स्थापना केली होती. पेंढारकरांनी सिनेमाचं काढायचं ठरवलं. मामा वरेरकरांच्या कथेवर चित्रपट निघणार होता. मामा दिग्दर्शन करणार होते. चित्रपट होता ‘विजयाची लग्ने’.
मामा वरेरकरांची आमच्या घरी चांगली ओळख होती. त्यांचं नेहमी घरी जाणं येणं असे. मी तेव्हा दहा वर्षाची होते. तरी चांगलीच उंच नि धिप्पाड होते. वयापेक्षा मोठीच दिसत होते. मामानी आणि पेंढारकरांनी माझी त्यांच्या चित्रपटासाठी हिरोईन म्हणून निवड केली.
म्हणाला, “तू , आपलं साळगावकर हे नाव लावू नकोस. मला काय वाटेल?”
मी म्हणाले, “ठिक आहे. मी आपल्या बायजी आत्यासारखं वाडकर हे नाव लावीन, मग तर झालं. ?”
माझं ‘बेबी’ किंवा ‘रतन’ हे नाव मामा वरेरकरांना बिलकुल आवडत नव्हतं. मी नेहमी हसतमुख असे. कुणी काहीही बोललं की मी खुद्कन हसायची आणि सारखी हसत राहायची, म्हणून मामांनी माझं नाव ठेवलं हसरी हंसा !
– हंसा वाडकर

(सौजन्य : राजहंस प्रकाशन)

पुस्तकाचे नाव : सांगत्ये ऐका

लेखिका : हंसा वाडकर

प्रकाशक : राजहंस प्रकाशन

ठेवणीतले लेख

    आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा



    [recaptcha]

    काही निवडक प्रतिक्रिया:

    नरेंद्र चौधरी


    आपल्या संकेतस्थाळाच्या माध्यमातून असे लक्षात आले कि आपन खूप छान माहिती पुरवत आहात.
    संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया