अतिथी कट्टा

दिनांक : ०४-१०-२०१८

‌‌‌‌‌‌‌‌‘हृदयात समथिंग’मधील कॉमेडी साधी, सरळ


विख्यात अभिनेते अशोक सराफ यांनी नुकतेच आपल्या कारकिर्दीच्या पन्नासाव्या वर्षात पदार्पण केलं आहे. येत्या ५ तारखेला त्यांची महत्त्वाची भूमिका असलेला ‘हृदयात समथिंग समथिंग’ नावाचा चित्रपट प्रदर्शित होत आहे. त्यानिमित्तानं त्यांचं हे मनोगत.

——

‘हृदयात समथिंग समथिंग’ या चित्रपटाच्या शीर्षकावरूनच प्रेक्षकांना त्यामध्ये काय काय असणार आहे, याचा अंदाज येतो. त्याप्रमाणेच दिग्दर्शक प्रवीण राजा कारळे यांनी सर्व घटनाक्रम दाखविला आहे. खरं तर प्रत्येक तरुण-तरुणीच्या मनात काही ना काही तरी फिलींग असतंच. परंतु, आजकालच्या तरुण पिढीतील फिलींग जास्तच वाढलंय याची मला कल्पना आहे. या चित्रपटात मी एका कंपनीच्या बॉसची भूमिका केली आहे. माझ्या हाताखाली काम करणारा एक तरुण मुलगा अगदी उटपटांग प्रवृत्तीचा असतो. कायम तो मुलींच्या लफड्यांमध्ये अडकलेला असतो. त्यामुळे मी कायम त्याच्यावर डाफरत असतो. मात्र त्याचाही उपयोग फारसा होत नाही. तेव्हा मी साकारलेली व्यक्तिरेखा त्याला त्याच्या प्रेम प्रकरणांमध्ये सल्ले देऊ लागते. अशा प्रकारे मी त्याचा ‘लव्ह गुरू’ बनतो. कदाचित हे सल्ले म्हणजे मी साकारलेल्या व्यक्तिरेखेचा भूतकाळ असू शकतो. परंतु, या सल्ल्यांचा त्याला खूपच उपयोग होतो. या चित्रपटात माझ्यासोबत अनिकेत विश्वासराव, प्रियंका यादव, स्नेहा चव्हाण, भूषण कडू यांनी काम केलं आहे. आयुष्यात एकदा तरी प्रेमात पडावं या फिलींगची आठवण करून देणारा हा चित्रपट आहे असं मला वाटतं.

आपल्या मराठी चित्रपटसृष्टीत आजवर विनोदाचे अनेक प्रकार हाताळले आहे. मी स्वत: वेगवेगळ्या जातकुळीच्या विनोदी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. या चित्रपटामधील विनोद हा फार्सिकल नाही की तो स्लॅपस्टीक कॉमेडीदेखील नाही. सरळ, साधा असा हा विनोद आहे. त्यामुळे तो पटकन प्रेक्षकांच्या हृदयापर्यंत पोचेल असं मला वाटतं. माझ्या हाताखाली काम करणाऱ्या तरुणाची भूमिका अनिकेत विश्वासरावनं साकारली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये चांगलं काम करणाऱ्यांमध्ये अनिकेतचा समावेश होतो. त्याला विनोदाची चांगली समज आहे. त्यामुळेच त्याच्याबरोबर काम करताना खूप मजा आली. या चित्रपटाचं सगळं शूटिंग पुण्यात झालंय. चित्रपटाप्रमाणेच शूटिंग करतानाही आम्ही खूप धमाल केली.

या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या निमित्तानं मलाही ‘मीडिया’कडून मलाही माझ्या प्रेमकहाणीबद्दल विचारण्यात आलं. परंतु, तेव्हाचा काळ खूपच वेगळा होता. मी माझ्या पालकांना घाबरायचो. माझा स्वभाव रीझर्व्ह असल्यामुळे निवेदिताबरोबर मी पहिल्या दोन चित्रपटांच्या शूटिंगवेळी फारसा बोललादेखील नव्हतो. ती माझ्या मित्राची मुलगी. ती देखील माझ्याशी फारशी बोलली नव्हती. मात्र कालांतरानं ती माझ्या प्रेमात पडली नि मलाही नंतर तिच्याबद्दल ‘समथिंग’, ‘समथिंग’ वाटू लागलं. थोडक्यात आजच्या काळातला हा चित्रपट असून त्याला संगीतही तशाच पद्धतीचं आहे. अशाप्रकारची भूमिका मी पहिल्यांदाच केलीय असं मी म्हणणार नाही. परंतु, त्यात नक्कीच काहीतरी वेगळेपण देण्याचा प्रयत्न केला आहे.

– अशोक सराफ

ठेवणीतले लेख

    आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा



    [recaptcha]

    काही निवडक प्रतिक्रिया:

    नरेंद्र चौधरी


    आपल्या संकेतस्थाळाच्या माध्यमातून असे लक्षात आले कि आपन खूप छान माहिती पुरवत आहात.
    संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया