अतिथी कट्टा

दिनांक : ३-३-२०१८

‌रोमॅण्टिक लव्हस्टोरी


प्रार्थना बेहरे आणि वैभव तत्त्ववादी ही लोकप्रिय जोडी ‘व्हॉट्सअप लग्न’ या १६ मार्चला प्रदर्शित मराठी चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकत्र दिसणार आहे. या चित्रपटाची निर्मिती व दिग्दर्शन विश्वास जोशी यांनी केले आहे. जाई जोशी व व्हिडीओ पॅलेस हे चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत. या चित्रपटाबद्दल प्रमुख कलावंतांशी साधलेला हा संवाद.
———-

बरेच रोमँटिक चित्रपट गाजविणारा वैभव तत्त्ववादी म्हणतो, ‘‘या चित्रपटाचं कथानक आजच्या पिढीला ‘रीलेट’ करणारं आहे. तसेच पस्तीशीपुढील प्रेक्षकवर्गालाही हा चित्रपट पाहताना अरे आपण या ‘फेज’मधून गेलो होतो असं वाटेल. आपल्या जगण्याचा वेग आणि भावनांचा आवेग यात जी गुंतागुंत होते, त्याला सांभाळणं म्हणजे हा चित्रपट आहे. रोमॅण्टिक लव्हस्टोरी आहे. दोन भिन्न स्वभावाच्या व्यक्ती जेव्हा एकत्र येतात, भेटतात त्यानंतर काय घडतं त्याचं चित्रीकरण या चित्रपटात करण्यात आलं आहे. निर्माते विश्‍वास जोशी आता या चित्रपटाद्वारे दिग्दर्शक म्हणून चित्रपटसृष्टीत पदार्पण करीत आहेत. या चित्रपटाच्या कथानकावर गेल्या दोन-तीन वर्षांपासून ते खूप काम करीत आहेत. त्यामुळे ते पडद्यावर कसं साकारायचं याबाबत त्यांची ‘क्लॅरिटी’ खूप चांगली होती. त्यामुळे ते ‘फर्स्टटायमर’ दिग्दर्शक आहेत, असं आम्हाला अजिबात वाटलं नाही. चांगल्या तंत्रज्ञांचीही त्यांना साथ मिळाल्यामुळे आम्ही एक टीम म्हणून चांगला चित्रपट देऊ शकलो आहे.

‘‘मी आतापर्यंत बरेच रोमँटिक चित्रपट केले आहेत. त्यामुळे एकाच पद्धतीचे रोल का साकारले जातात, असा प्रश्‍न विचारला जाऊ शकतो. प्रख्यात रंगकर्मी डॉ. विजया मेहता म्हणाल्या होत्या, तू आत्ता २७ वर्षांचा आहेस. तेव्हा तुला आत्ता या वयोगटाचेच रोल्स मिळतील. ४० वर्षांच्या व्यक्तिरेखेला रोल तुला ऑफर होणार नाही. पण जे २७ वर्षांचे रोल तुला मिळताहेत, त्यातले बारकावे शोध. मग तुला त्यात तुझं कॅरेक्टर सापडेल. या चित्रपटात मी साकारलेला ‘आकाश’ यापूर्वी मी पडद्यावर साकारलेल्या तरुणांपेक्षा खूप वेगळा आहे. तो त्याच्या आयुष्यात बर्‍यापैकी यशस्वी आहे. माझ्याकडे पहिला दिग्दर्शक आला की ज्यानं सांगितलं की हा हीरो मनमिळाऊ, गोडबोल्या नाही. तो स्वभावानं खडूस आहे. तो बारावीत असताना त्याच्या वडिलांचं निधन झालेलं असतं. त्यामुळे तो वास्तव आयुष्यात खूप लवकर ‘मच्युअर’ झालेला असतो. त्यामुळे इतर माझ्या व्यक्तिरेखांपेक्षा ही व्यक्तिरेखा कशी वेगळी राहील याची मी भरपूर काळजी घेतली आहे.

या चित्रपटाचे शीर्षक हे ‘व्हॉट्सऍप’ लग्न असं नाही. आजकालची आपली ‘लाइफस्टाइल’ खूप वेगळी झालीय. त्यामुळे सहज बोलतानाही ‘व्हाट्सअप’ काय चाललंय, असं विचारतो. आमच्या वयोगटामधील तरुण-तरुणींना व्हाट्सअप लग्न कधी करणार? हाच प्रश्‍न सर्वांकडून विचारला जातो. त्यामुळे आजच्या पिढीला साजेल असं हे पूरक असं शीर्षक आहे.’’

प्रार्थना बेहरेचा हा लग्नानंतर प्रदर्शित होणारा पहिलाच चित्रपट आहे. ती या चित्रपटामधील आपल्या अनुभवाबद्दल म्हणाली, ‘‘विश्‍वास सर आणि नानूभाईंनी मला जेव्हा ही स्क्रीप्ट ऐकवली तेव्हा मी त्यांना म्हणाले की ही व्यक्तिरेखा साकारायला आपल्या चित्रपटसृष्टीतल्या प्रत्येकीला आवडेल. इतकं ते स्ट्रॉंग आणि छान कॅरेक्टर आहे. ते नेमकं माझ्या नशिबात होतं. फिल्म आपण ज्या पद्धतीनं बघतो आणि तशी ती घडली तर आणखी मजा येते. या चित्रपटाचे दिग्दर्शक विश्‍वाससर यांची ‘क्लॅरिटी’ एवढी होती की कोणते शॉट्स हवेत आणि नकोत हे त्यांना अगदी पक्कं ठाऊक होतं. आम्ही कलाकारांनी आमच्याकडून खूप काही देण्याचा प्रयत्न केलाय. परंतु, विश्‍वाससरांनी त्यांना हवं तेच निवडलं आहे. दिग्दर्शकाला त्याच्या ‘स्क्रीप्ट’वर विश्‍वास असणं खूप गरजेचं असतं. तो असेल तरच ऍक्टर्समंडळी त्याला खूप सपोर्ट करतात. हा चित्रपट पाहिल्यानंतर आम्हाला कळलं की विश्‍वाससर त्यांच्या ऍप्रोचबद्दल अगदी बरोबर होते. नाशिक, लोणावळा, पुणे, मुंबई इथं हा चित्रपट चित्रीत करण्यात आला आहे.’’

या चित्रपटाच्या कथानकाला साजेशी अशी गाणी देण्यात गीतकार-संगीतकारांना यश आलं आहे. संगीतकार निलेश मोहरीर आणि गीतकार अश्विनी शेंडे यांचं ‘कॉम्बिनेशन’ या चित्रपटासाठी एकत्र आलं आहे. ‘तू जराशी ये उराशी’ या गाण्यातून या जोडीने प्रेमामागाची उत्कटता व त्यातील भावनेची खोली यांचा सुरेख मेळ साधला आहे. प्रत्येक गाण्याची स्व:ताची अशी एक खासियत असते. ‘तू जराशी ये उराशी’ या गाण्याची खासियत म्हणजे आधी चाल बांधून नंतर ते शब्दबद्ध करण्यात आलं. हनिमून हे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक हळवं वळण असतं. एकमेकांच्या सहवासातून ङ्गुलणारं प्रेम व्यक्त करणारं हे गाणं प्रत्येकाच्या मनाचा ठाव घेईल असा विश्वास गीतकार अश्विनी शेंडे व संगीतकार निलेश मोहरीर यांनी व्यक्त केला आहे.

शब्दांचं सामर्थ्य आणि स्वरांची भावोत्कटता यांचा संगम झाला, की त्यातून सुरेल गीत जन्माला येतं. गाणं साकार करणं हा सगळा अनुभव अत्यंत रोमांचकारी असतो. ‘तू जराशी ये उराशी’ या गाण्याच्या बाबतीत निर्माते व दिग्दर्शक विश्वास जोशी यांनी केलेलं सहकार्य व गाणं कसं असावं याबाबतीतलं त्याचं स्पष्ट व्हिजन यामुळे हे गाणं जमून आल्याचं मत या दोघांनी व्यक्त केलं. शिवाय वैभव तत्ववादी आणि प्रार्थना बेहरे यांच्या ‘केमिस्ट्री’मुळे तसेच गायक हृषीकेश रानडे आणि गायिका निहिरा जोशी यांच्या मधुर स्वरांनी या गाण्याची रंगत आणखीनच वाढवली आहे. चित्रपटाचं कर्णमधुर संगीत संगीतप्रेमींपर्यंत योग्य प्रकारे पोहोचावं या हेतूने प्रदर्शनाच्या ४ महिने आधीच हे गाणं प्रदर्शित करण्याचा व त्याच्या प्रसिद्धीतही वेगळेपणा जपण्याचा प्रयत्न निर्मात्यांनी आवर्जून केला.

ठेवणीतले लेख

    आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा



    [recaptcha]

    काही निवडक प्रतिक्रिया:

    नरेंद्र चौधरी


    आपल्या संकेतस्थाळाच्या माध्यमातून असे लक्षात आले कि आपन खूप छान माहिती पुरवत आहात.
    संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया