अतिथी कट्टा

दिनांक : १८-०५-२०१८

‌‘रेडू’ म्हणजे गोड गोष्टीचा गोड सिनेमा…

वेगळ्या विषयाचा, वेगळ्या धाटणीचा ‘रेडू’ चित्रपट १८ तारखेपासून प्रदर्शित झाला आहे. त्या निमित्ताने या चित्रपटाचे संकलक-दिग्दर्शक सागर वंजारी यांचं हे मनोगत.
——

या चित्रपटाचे निर्माते नवलकिशोर सारडा यांनी मला या चित्रपटाची पूर्ण स्क्रीप्ट दिली आणि म्हणाले, मला पूर्ण फिल्म बनवून द्या. या चित्रपटाचं दिग्दर्शन मी करावं असं त्यांच्या किंवा माझ्याही तेव्हा डोक्यात नव्हतं. माझं स्वत:ची निर्मिती संस्था आहे. म्हणून मी एखादा दिग्दर्शक घेऊन तो चित्रपट बनवून द्यावा अशी त्यांची इच्छा होती. गेल्या दहा वर्षांपासून मी संकलक म्हणून काम करतोय. तसेच लवकरच मी स्वत:चा एक चित्रपटही दिग्दर्शित करणार होतो. परंतु, या चित्रपटाचा ‘क्लायमॅक्स’ वाचल्यानंतर मला तो खूप भावला. म्हणून मीच हा चित्रपट दिग्दर्शित करू का? असं श्री. सारडा यांना विचारलं. त्यांनी एका रात्रीचा वेळ घेऊन दुसऱ्या मला होकार कळवला. अशापद्धतीनं हा चित्रपट माझ्याकडे आला. चित्रपटाची मूळ कथा-पटकथा ही पश्चिम महाराष्ट्रात घडत होती. अलीकडच्या काळात ‘ख्वाडा’ तसेच इतर काही चित्रपटांना पश्चिम महाराष्ट्राची पार्श्वभूमी तसेच त्यांची बोली लाभली आहे. हा चित्रपट ‘पिरीऑडिक’ असल्यामुळे सत्तरीचा काळ पश्चिम महाराष्ट्रात दाखवणं तसं अवघड होतं. म्हणून मी या चित्रपटाला कोकणाची पार्श्वभूमी दिली. कोकणात शूट करायचं ठरल्यानंतर मग चित्रपटाची भाषाही तिथलीच घेणं अपरिहार्य होतं. आतापर्यंत काही कोकणी पार्श्वभूमीच्या फिल्म्स आपल्याकडे आल्या आहेत. परंतु मालवणी बोली कोणत्याच चित्रपटात नव्हती. या चित्रपटाची मूळ कथा-पटकथा-संवाद संजय नवगिरे यांनी लिहिले आहेत. त्याचं मालवणीकरण करण्याचं काम चिन्मय पाटणकर यानं केलं. नवगिरे यांच्या संवादांचं मालवणीत भाषांतर न करता ती आम्ही ‘अॅडॉप्ट’ केली. काही संदर्भ आम्हाला बदलावे लागले. त्यांच्या कथानकात पोतराज होता. तसेच १२ बैलगाड्यांचा उल्लेख होता. आमच्या कथानकात त्या जागी जत्रा आली. सुरुवातीला निर्मात्यांसह सगळ्यांना वाटलं की ही भाषा सगळ्यांना समजेल का… मला स्वत:लाही ती भीती वाटत होती. म्हणून आम्ही मग सोप्यात सोप्पे मालवणी शब्द वापरले. लातूर, नागपूरकडच्या माणसालाही ही भाषा आता समजेल एवढी सोपी केली.

लेखनावरचं काम पूर्ण झाल्यानंतर आम्ही मग चित्रीकरणासाठी तयारी सुरू केली. सुरुवातीला आम्ही तळकोकणात गेलो. मग कुडाळ पट्टा बघितला. परंतु, आम्हाला हवे तसे लोकेशन मिळत नव्हतं. भाषेमध्ये खूप फरक पडत होता. त्यामुळे जवळपास १५ दिवसांमध्ये आम्ही अख्खा कोकण पालथा घातला. कोकणातल्या कोकणातदेखील खूप फरक झाला आहे. दापोलीसारखे ठिकाण आता ‘टुरिस्ट प्लेस’ म्हणूनच विकसित झालं आहे

परंतु, मालवणसारख्या भागापर्यंत अजून कोणी पोचलेलं नाही. कणकणवी, देवबाग, वायंगणी हा भाग आम्ही चित्रीकरणासाठी निवडला. मालवण परिसरामधील आठ गावांमध्ये आम्ही या चित्रपटाचं शूटिंग केलं. सगळ्यात मोठं चॅलेंज होतं ते ‘कास्टिंग’चं. आतापर्यंत आपल्याकडील चित्रपटांमध्ये कोकणी माणसाकडे ‘विदूषक’ म्हणूनच पाहिलं गेलं आहे. परंतु, प्रत्यक्ष कोकणात आम्ही फिरलो तेव्हा आम्हाला तिथली माणसं खूप सरळ, साधी वाटली. हीच माणसं आम्हाला पडद्यावर दाखवायची होती. या चित्रपटामध्ये मुख्य पात्रांव्यतिरिक्त इतर ५०हून अधिक व्यक्तिरेखा आहेत. त्यासाठी स्थानिक कलाकारांची निवड करून आम्ही त्यांची कणकवली येथे एक कार्यशाळा घेतली. त्यांना कॅमेऱ्याला सामोरे जाण्यासाठी तयार केलं. छाया कदम या कोकणातल्याच आहे. बबनची भूमिका करणारा कोकणातलाच आहे. गौरीला फारसं मालवणी बोलावं लागणार नव्हतं. परंतु ती अभ्यासू अभिनेत्री असल्यामुळे तिच्याबाबत मला टेन्शन नव्हतं. शशांककाकांबद्दल मला जास्त उत्सुकता होती. कारण पहिल्या स्क्रीप्ट रीडिंगच्या वेळी त्यांना मालवणी बोलणं खूप कठीण गेलं होतं. मालवणी भाषा सोपी वाटली तरी बोलताना तिचा हेल पकडणं कठीण आहे. परंतु, शशांककाकांनी मालवणी भाषेचा खूप अभ्यास केला. मित्रांशी चर्चा केली. चित्रीकरणाआधी काही दिवस ते त्या भागात जाऊन राहिले. त्यामुळे त्या भाषेचा लहेजा पकडणं त्यांना सोपं गेलं. शशांककाकांचे डोळे मला खूप भावले. त्याचा या चित्रपटात खूप चांगला उपयोग आम्ही केला आहे. त्यांच्या शरीरावरही आम्ही काम केलं. शशांककाकांचे पाय थोडे ‘टॅम’ केले. पायांना तेल लावलं. त्यांना आम्ही उन्हात चप्पल न घालता फिरायला लावलं. अशा पद्धतीनं ते कोकणी व्यक्तिरेखेत शिरले. शूटिंगसाठी आम्ही २६ दिवस निश्चित केलं होतं. परंतु, आमचं ‘पेपरवर्क’ खूप चांगलं असल्यामुळे २३ दिवसांमध्येच आम्ही चित्रपट पूर्ण केला. ठरवल्याप्रमाणे मला हा चित्रपट करता आला. नदीतील चित्रीकरणावेळी आमचा कस लागला.

कोकणामध्ये पाच फूट जमिनीखाली गेलं की पाणी लागतं. मूळ कथानकात चित्रपटाचा नायक विहिर खणण्याचं काम करीत असतो. विहिर खणण्याबरोबरच आम्ही शशांककाकांना मग थोडं वेगळं कामही दिलं. एके दिवशी आम्हाला अर्धवट खणलेली विहिर सापडली. बरीच खोदूनही तिला पाणी लागलेलं नव्हतं. तेव्हा आमच्या लक्षात आलं की कोकणताही काही जमिनींना पाणी लागत नाही. मग या विहिरीचाच आम्ही शूटिंगसाठी उपयोग केला. या चित्रपटाचं संगीतही खूप महत्त्वाचं आहे. मला कोकणाचा फील देणारं संगीत हवं आहे. विजय गावंडे हा कोकणातलाच संगीतकार. म्हणून मग आम्ही त्याची निवड केली. त्यानं खूप छान काम केलं आहे. त्याच्या संगीतामुळे चित्रपटाला ‘मालगुडी डेज’सारखा फ्लेवर आला आहे. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळेल असं वाटत होतं. परंतु, तो न मिळाल्याची थोडीफार खंत आहे. परंतु, पुरस्कार डोळ्यांसमोर ठेवून हा चित्रपट आम्ही केला नव्हता. एक गोड गोष्टीचा आम्हाला चित्रपट करायचा होता आणि तो आम्ही केला. आता प्रेक्षक त्याचं कसं स्वागत करतात हे पाहायचं.

– सागर वंजारी

ठेवणीतले लेख

आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा[recaptcha]

काही निवडक प्रतिक्रिया:

सुहासिनी साळुंखे

अथक परिश्रमा नंतर घरच्या कामांतून ' प्रवास ' हा चित्रपट पाहण्यासाठी वेळ काढला होता. पण ह्या कोरोना विषाणू मुळे सर्व काही धुळीस मिळाले.
संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया