’रंपाट ’ म्हणजे पंचपक्वान्नाची थाळी…
——
’बालक पालक’ चित्रपटानंतर तरुण कलाकार मंडळी आपल्या चित्रपटांमध्ये हीरो आणि हीरोइन म्हणून यायला लागली. त्यानंतर ’टाइमपास ’ आणि ’टाइमपास २’, ’सैराट ’ झाला. त्यामुळे महाराष्ट्राच्या मुलांना एक नवं स्वप्न पाहायची संधी मिळाली. हे स्वप्न होतं सिनेमात काम करण्याचं. परंतु सिनेमात काम करण्यासाठी नक्की काय करावं लागतं, मुंबईला आल्यानंतर कोणाला भेटायचं, या क्षेत्रात पुढं जाण्यासाठी कोणता मार्ग आहे असे प्रश्न अनेकांच्या मनात असतात. त्या सर्व प्रश्नांची उत्तरं म्हणजे रंपाट चित्रपट आहे. त्यामुळे ही कल्पना डोक्यात आल्यानंतर अंबर हडप आणि गणेश पंडित या माझ्या लेखकद्वयीला सोबत घेऊन चित्रपटाच्या लेखनावर काम सुरू केलं.
’झी स्टुडिओ’ने आजवर अनेकांना चित्रपट क्षेत्रात पदार्पणाची संधी दिली आहे आणि आता ते या चित्रपटाद्वारेच तरुण पिढीला मनोरंजन क्षेत्रामध्ये कसं यायचं याचा मार्ग दाखवत आहेत. हा चित्रपट म्हणजे एक धमाल जॉयराइड आहे. या मुलांच्या सुख-दुःखात आपण सहभागी होतो. त्यामुळे हा चित्रपट करताना खूप मजा आली. सिनेमा निर्मिती प्रक्रिया ही खूप गंभीर असली तरी आम्ही खूप हसतखेळत हा चित्रपट पूर्ण केला. या प्रक्रियेचा आम्ही आनंद घेतला आणि त्यामुळेच हा आनंद प्रेक्षकांपर्यंत पोचेल मला अशी अपेक्षा आहे.
मी कलाकारांच्या कधी ऑडिशन्स घेत नाही. एखादी गोष्ट डोळ्यांसमोर आली की मी पात्रं शोधण्याचा प्रयत्न करतो. फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात मी अभिनय बेर्डेला भेटलो तेव्हाच मला चित्रपटातला ’मिथुन ’ त्याच्यात सापडला. त्याच्या प्रत्येक हालचालीत, बोलण्यात, नृत्यात मला मिथुन दिसला. कश्मिराला जेव्हा मी पहिल्यांदा भेटलो तेव्हा मी तिला पटकन एक १५ मिनिटांचा व्हिडिओ करून पाठवण्यास सांगितलं. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मला लगेचच जाणवलं की आपल्याला हवी असलेली ’मुन्नी ’ हिच्यात दडलेली आहे. अभिनय आणि कश्मिरा हे दोघेही मिथुन आणि मुन्नीच्या खूप जवळ जाणारे वाटल्यानं मी त्यांची निवड केली. सिनेमा पाहाल तेव्हा कश्मिराचा हा पहिला चित्रपट आहे असं कोणालाही वाटणार नाही. अभिनयनंही या चित्रपटामध्ये खूप अप्रतिम काम केलं आहे.
– रवी जाधव
काही निवडक प्रतिक्रिया:
निशांत भोसले
आपल्या संकेतस्थाळाच्या माध्यमातून असे लक्षात आले कि आपन खूप छान माहिती पुरवत आहात.
पण जर त्या सोबतच आपण एक youtube channel चालू करून त्यावर तो चित्रपट टाकावा आणि त्याची लिंक तुम्ही पुरवत असलेल्या चित्रपटाच्या माहिती खाली टाकावी जेणे करून ते उपयुक्त होईल.
संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया