अतिथी कट्टा

दिनांक : १२-०२-२०१९

‌‌‌‌‌‌‌‌रमेशच्या मैत्रीला सलाम…
प्रसिद्ध अभिनेते रमेश भाटकर यांचे नुकतेच निधन झाले. मराठी चित्रपटसृष्टी तसेच रंगभूमी गाजविणाऱ्या या कलावंताच्या मोठेपणाबद्दल तसेच त्यांच्याबरोबर काम करतानाच्या अनुभवाबद्दलच्या आठवणींना उजाळा देताहेत प्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगांवकर.

——

आपल्या चित्रपटसृष्टीत काही काही कलावंतांची ‘एक्झिट’ ही चटका लावून जाणारी आहे. काही वर्षांपूर्वी लक्ष्मीकांत बेर्डे असेच आपल्याला सोडून गेले, रीमाचेही निधन धक्कादायक होते आणि आता रमेश भाटकर यांचा मृत्यू आपल्याला असाच चटका लावून गेला. त्यामुळे रमेशचं या जगातून निघून जाणं यावर आपण कोणीच मान्य करू शकत नाही. रमेशबरोबर मी मोजकंच काम केलं, परंतु ते करताना मला खूप मजा आली. रमेशबरोबरच त्याच्या कुटुंबियांबरोबरही माझा छान परिचय झाला. पुढे त्याचं रुपांतर मैत्रीमध्येही झालं. हा स्नेह, हे नातं कसं आणि केव्हा वृद्धिंगत झालं, हे माझं मलाही कधी कळलं नाही. हे सगळं आपसूकच घडलं. रमेशचं व्यक्तिमत्त्व अतिशय दिलखुलास होतं. तो मोठ्या मनाचा होता. कुणाबद्दलही कौतुक करताना तो कधीही शब्द राखायचा नाही. जे काही बोलायचा ते अगदी मनापासून. माझंही त्यानं असंच अनेकवेळा कौतुक केलं आहे. रसिक मनाचा तो कलावंत होता. दिवंगत संगीत दिग्दर्शक स्नेहल भाटकर यांचा मुलगा असल्यामुळे त्याला संगीताचं असं चांगलं ज्ञान होतं. त्यामुळे कोणत्याही वाहिनीवर माझा एखादा चित्रपट किंवा त्यामधील एखादं गाणं त्याच्या पाहण्यात आलं की तो मला आवर्जून फोन करायचा. मनापासून त्यावर आपली दाद द्यायचा. मी थोडंसं गाते. त्यामुळे कोणत्या कार्यक्रमात मी अक्षरश: चार ओळी गुणगुणल्या असल्या आणि त्या त्याच्या ऐकण्यात आल्या तरी तो माझ्याशी संपर्क साधायचा. मला नेहमी म्हणायचा की, वर्षा तू तुझं गाणं पुढं नेलं पाहिजेस. काही वर्षांपूर्वी मी आणि तो गोव्याला आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये भेटलो होतो. त्यावेळी त्यानं माझ्याबरोबर नाटक करण्याची इच्छा व्यक्त केली होती. खरं तर रमेशसारखा ज्येष्ठ कलावंत मला नाटक करण्यासंबंधात विचारतो, हेच माझ्यासाठी खूप मोठं होतं.

या एका गोष्टीमधून रमेशमध्ये कसलाही ‘इगो’ नव्हता हे लक्षात येतं. कोणत्या तरी कारणामुळे मी ते नाटक करू शकले नाही, याची मला खंत आहे. परंतु, तेव्हा मी तेव्हा त्याला म्हटलं होतं, ‌‌‘रमेश हे नाटक मी तुझ्यासोबत करू शकले नाही. परंतु, दुसरं एखादं नाटक मला तुझ्याबरोबर करायला आवडेल.’ परंतु, तसं नाटक काही आम्हाला मिळालं नाही.

खरं तर रमेशच्या कारकिर्दीचं मूल्यमापन करण्याइतकी चांगली समीक्षक मी नाहीय. त्याच्या चित्रपट, मालिका आणि रंगभूमीवरील कारकीर्दीचा आलेख खूप मोठा आहे. त्यानं अनेक, नाटकं सिनेमे केलेत. त्यांची बहुतांशी नावं रसिकांना ठाऊकच आहेत. त्याचं व्यक्तिमत्त्व बेदरकार, हॅंडसम आणि ‘रफ अॅंड टफ’ होतं. रमेश ज्या काळात नायक म्हणून मराठी चित्रपटसृष्टीत आला त्यावेळी तशाप्रकारच्या नायकांची गरज आपल्या चित्रपटसृष्टीला नव्हती. आजच्या काळात रमेश नायक म्हणून आला असता तर त्याचं करियर काहीतरी वेगळंच घडलं असतं. अर्थात त्याचं करियर हे मोठं आहेच. परंतु, त्याची एक फॅन, सहकलाकार, हितचिंतक या नात्यानं मला त्याच्याकडून आणखी काहीतरी वेगळं घडलं असतं असं वाटतं. मी त्याच्याबरोबर ‘सवत माझी लाडकी’, ‘पैसा पैसा पैसा’ असे काही तीन-चार चित्रपट केले. विशेषत: मला त्याची ‘पैसा पैसा पैसा’मधील भूमिका आणि काम अधिक आवडलं होतं. त्यामधील खलनायक हाच चित्रपटाचा नायक असतो. कुमार सोहोनी यांचं दिग्दर्शन असलेला हा चित्रपट साहित्यिक ह. मो. मराठे यांच्या ‘मार्केट’ या कादंबरीवर आधारला होता. रमेशनं या चित्रपटामधील व्यक्तिरेखा अतिशय उत्कृष्टपणे सादर केली होती. हा चित्रपट प्रेक्षकांपर्यंत नीटपद्धतीनं पोचला नाही. त्याचं प्रदर्शन योग्य प्रकारे झालं नाही. त्यामुळे या चित्रपटाला हवं तसं व्यावसायिक यश मिळालं नाही आणि

रमेशचं चांगलं कामही दुर्लक्षित राहिलं. त्या वर्षी या चित्रपटासाठी त्याला अभिनयाचं पारितोषिक मिळालं होतं. दुर्दैवानं तसं काही घडलं नाही. माणसं जन्माला येतात. यशस्वी होतात. पैसे कमावतात. रमेशनं यश तर कमावलंच, पण त्यानं माणसंही भरपूर जोडली. हीच त्याची मोठी पुंजी. त्याची मैत्री मला अतिशय भावली. मी त्याची ‘कॉम्प्लिमेंट्स’ मिस करते. त्याला सलाम…

– वर्षा उसगांवकर

ठेवणीतले लेख

  आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा  [recaptcha]

  काही निवडक प्रतिक्रिया:

  सचिन पारेकर


  शाहू मोडक हे मराठी चित्रपटातील असामान्य कलाकार होते. 'माणूस' मधील त्यांची भूमिका अविस्मरणीय होती.विनम्र अभिवादन!💐💐

  संजय रत्नपारखी
  संदर्भ:- फेसबुक प्रतिक्रिया