अतिथी कट्टा

दिनांक : २२-२-२०१८

‌रहस्य, फॅंटसी, थ्रीलरपट म्हणजे ‘राक्षस’…


इंट्रो…
विवेक कजारिया, निलेश नवलखा निर्मित आणि समित कक्कड यांच्या ‘समित कक्कड फिल्म्स’ प्रस्तुत ज्ञानेश झोटिंग दिग्दर्शित ‘राक्षस’ असे हटके नाव असलेला मराठी चित्रपट येत्या २३ तारखेला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. प्रसिद्ध अभिनेत्री सई ताम्हणकर आणि शरद केळकर अशी नवीन, फ्रेश जोडी प्रेक्षकांना या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. त्यानिमित्त या चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक ज्ञानेश झोटिंग यांचे हे मनोगत.
———-

‘राक्षस’ असा शब्द उच्चारला तरी अंगावर शहारे आल्याशिवाय राहात नाहीत. राक्षसाची विविध रूपेआजपर्यंत आपण गोष्टींमध्ये ऐकलेली आहेत. तन्मयी देव आणि मी अशी आम्ही दोघांनी मिळून या चित्रपटाची कथा लिहिली आहे. या चित्रपटाचा मूळ धागा माझ्या बालपणाशी निगडीत आहे. आपल्या आजूबाजूचे बहुतेक सगळे चित्रपट वास्तवदर्शी किंवा लिनियर पद्धतीनं घडतात. मात्र मला काहीतरी नव्या पद्धतीचा खेळ करून बघायचं होतं. माझे आई-वडील शिक्षक-शिक्षिका. माझ्या जन्माच्या वेळी ते आदिवासी शाळांमध्ये शिकवायचे. इगतपुरी, औरंगाबादजवळचा काही आदिवासी भाग इथं माझं बालपण गेलं. ते वातावरण, जग माझ्या मनावर बिंबलं होतं. तिथली होळी मला आठवते. इगतपुरीजवळ एक खूप मोठं जंगल होतं. माझी शाळा गावापासून लांब होती. या शाळेत वाघ येऊन बसायचा. तेव्हा शाळेला सुट्टी द्यावी लागायची. पाच-सहा वर्षांचा असताना माझ्या वडिलांचं निधन झालं आणि माझी औरंगाबादला निघून गेलो. तेव्हापासून माझी या भागाबरोबरची नाळ तुटली. मात्र या जागेची कायम मला ओढ राहिली.

मोठा झाल्यावर मी पूर्वीच्या ओढीपायी या भागाला भेट दिली. तेव्हा सगळं काही बदललं होतं. जंगलाचा कुठं मागमूही नव्हता. भंडारदरा परिसरात सगळीकडे नवनवीन रिसॉर्ट उभारली गेली होती. तेव्हा मला प्रश्‍न पडला की मला आईकडून जे काही ऐकायला मिळालं ते खोटं होतं की माझ्या मनावर जी इम्प्रेशन्स आहेत ते स्वप्न आहे. तिथून मग खर्‍या अर्थानं लिखाण सुरू झालं. तन्मयीच्या लहानपणीचे अनुभवही असेच काहीसे होते. त्यामुळे आम्ही एकत्रपणे लिहायला सुरुवात केली. याची गोष्ट लिहिणं खूप कठीण होती. रिऍलिटी, फॅण्टसी, स्वप्न असे भाव या लिखाणात आलेत. हा सगळा भाग गूढच म्हणायला हवा. सिनेमाला शंभर वर्ष झाल्याच्या निमित्तानं २०१२ मध्ये ‘एनएफडीसी’नं ‘मराठी व्हॉयसेस’ नावाची एक ‘स्क्रीप्ट लॅब’ घेतली होती. त्याच्यात आमच्या कथेची निवड झाली. तिथं ऊर्वी जुवेकर, मार्टेन रॉबर्टस् भेटले. त्यांनी या कथानकाला आकार दिला.

‘‘ही निव्वळ रंजक चिल्ड्रेन स्टोरी नाही. एक मुलगी आपल्या आईसोबत वडिलांच्या शोधासाठी जंगलात शिरतात, या लाइनवर मग आम्ही चित्रपट पुढे नेला. आई आपल्या अनुभवाच्या आधारे या जगाचा शोध घेते तर मुलगी आपल्या कल्पनेच्या आधारावर हे जग पाहते. त्याच्यातून ती एक कोडं सोडवण्याचा प्रयत्न करते. पुढे ‘सनडान्स’ फिल्म स्क्रीप्ट लॅबपर्यंत ही स्क्रीप्ट पोचली. यापूर्वी ‘लंच बॉक्स’ हा चित्रपट इथं निवडला गेला होता. स्क्रीप्ट लिहिण्यासाठी महाश्‍वेतादेवी, गिरीश कर्नाड तसेच आपल्या अनेक दंतकथांची आम्हाला मदत झाली. ‘सनडान्स’मुळे आम्हाला विवेक कजारिया आणि निलेश नवलाखा भेटले. तत्पूर्वी ही गोष्ट निर्मात्यांना केवळ वाचून दाखवणं कठीण होतं. त्यांना काहीतरी दाखवायला हवं होतं. त्यामुळे मी अडीच मिनिटांचा ट्रेलर तयार केला. तो या दोघांनाही आवडला आणि त्यांनी पटकन लगेच माझ्यावर विश्‍वास दाखवला. ‘सनडान्स’ची ही पहिली स्क्रीप्ट असल्याचाही मला फायदा झाला. त्यानंतर ही गोष्ट मी सई ताम्हणकरला ऐकवली. ती खूप सर्पोटिव्ह वाटली. सुरुवातीला वाटलं की ती माझी गोष्ट नाकारेल. मात्र तिनं शांतपणे ऐकून हा चित्रपट स्वीकारला. अगदी तसेच शरद केळकरबाबतही घडलं. सईच्या आतापर्यंतच्या पॉप्युलर सिनेमाच्या अगदी विरूद्ध हा चित्रपट आहे. विठ्ठल काळे या नवोदित कलाकारानं खूप छान काम केलं आहे. जे कागदावर आम्ही जग लिहिलं होतं, ते प्रत्यक्ष स्क्रीनवर उतरवण्यासाठी आम्हाला जीवाचा अगदी आटापीटा करावा लागला. गुजरातमधील सापुतार्‍याजवळील आदिवासी पाड्यात आम्ही काही दिवस चित्रीकरण केलं. त्यानंतर कर्जत, माथेरान, कास पठाराजवळ चित्रीकरण केलं. एकंदरीत वेगवेगळ्या टप्प्यात आम्ही ४० दिवस शूटिंग केलं. संपूर्ण चित्रपट खर्‍या लोकेशन्सवर चित्रीत झालाय. या चित्रपटात एक गुहा पाहायला मिळते. ती मानवनिर्मित नसून निसर्गनिर्मित गुहा आहे. इथं शूटिंग करताना खूप आव्हानांना सामोरं जावं लागलं. समित कक्कड या चित्रपटाचे ‘प्रेझेंटर’ असल्यामुळे हा चित्रपट चांगल्या पद्धतीनं प्रेक्षकांपर्यंत पोचेल याची मला खात्री आहे.

– ज्ञानेश झोटिंग

ठेवणीतले लेख

आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा[recaptcha]

काही निवडक प्रतिक्रिया:

रिशिकांत राऊत

पडद्या मागच्या कलावंतांची देखील चांगली माहिती देता याबद्दल अभिनंदन!
संदर्भ:- फेसबुक प्रतिक्रिया