अतिथी कट्टा

दिनांक : १६-०२-२०१८

‌‘राजा हरिश्चंद्र’च्या प्रदर्शनामागील खटपटी…


भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांची आज पुण्यतिथी. त्यानिमित्तानं ज्योती निसळ यांनी लिहिलेल्या आणि ‘डिंपल पब्लिकेशन्स’ने प्रकाशित केलेल्या ‘ध्येयस्थ श्वास दादासाहेब फाळके’ या पुस्तकामधील काही संपादित भाग.
———-

दादासाहेब फाळकेंच्या अथक प्रयत्नांची परिणिती ‘राजा हरिश्चंद्र’मध्ये झाली आणि त्यांच्या टीकाकारांची तोंडे आपोआपच बंद झाली. सगळ्यांनीच त्यांच्या चित्रपटाची तारीफ केली. वाऱ्याबरोबर त्यांची कीर्ती आणि प्रशंसा कर्णोपकर्णी पसरू लागली. त्यांच्या या कौशल्याची प्रशंसा ‘कॉरोनेशन थिएटर’चे चालक नानासाहेब चित्रे यांच्या कानावर गेली व त्यांनी दादासाहेबांजवळ ‘राजा हरिशचंद्र’ प्रदर्शित करण्याची आपली मनीषा बोलून दाखवली. दादासाहेबांचा चित्रपट प्रदर्शित करण्याचा प्रयत्न चुटकीसरशी सुटला. पण चित्रपट चालेल की नाही ही शंका मात्र त्यांच्या मनाला खात होती. काकीने तर दत्ताला पाच रुपयांचे पेढे वाटीन म्हणून नवसही केला. दादासाहेब शिवभक्त तर होतेच. पण दत्ताचेही निस्सीम उपासक होते. त्यांच्या ऑफिसमध्येही दत्ताची तसबीर होती. ऑफिसमध्ये कुठलेही काम करण्याच्या आधी ते दत्ताच्या तसबिरीची पूजा करीत. शूटिंगसुद्धा दत्ताची पूजा झाल्यानंतरच सुरू होई. एवढेच कशाला त्यांची सकाळसुद्धा दत्ताच्या तसबिरीला हात जोडल्याशिवाय पुढे सरकत नव्हती.

मुख्य चित्रपट सुरू होण्याआधी एखादा लघुपट व कसरतीचे खेळ वा जादूचे प्रयोग दाखविले जात. हे लक्षात घेऊन दादासाहेबांनी ‘आगगाड्यांची मौज’ हा विनोदी चित्रपटसुद्धा तयार केला आणि ते सज्ज झाले आपला पहिला चित्रपट सादर करायला, प्रदर्शित करायला.

३ मे १९१३ रोजी भारतातला पहिला चित्रपट अर्थात मूकपट दादासाहेबांनी ‘कॉरोनेशन थिएटर’मध्ये सादर केला. मुख्य चित्रपट सुरू होण्याआधी ‘आगगाड्यांची मौज ‘ हा विनोदी लघुपट व दोन आंग्ल युवतींचे नृत्य दाखविण्यात आले. त्यावेळी नाट्यसंस्थांना जत्रा, यात्रा, तमाशा यांच्याशी खूप स्पर्धा करावी लागली. (चित्रपटाला त्यावेळी नाटक व स्टुडिओला कारखाना म्हणत. ) प्रथम चित्रपटासाठी एक आणा तिकीट ठेवले होते. पण पहिल्या दिवशी फक्त चोवीसच लोक आले. मग त्यांनी तिकीट दोन पैसे केले. तरीही कोणी विशेष फिरकले नाही. स्त्री डोअरकीपर ठेवून बघितल्या. पण स्त्रिया व उच्चभ्रू लोकांनी कुठलाच प्रतिसाद दिला नाही. मग तिकिटावर ‘लकी नंबर्स ‘ही योजना अमलात आणली व घड्याळ, रुमाल, सायकल अशा वस्तू बक्षीस म्हणून ठेवल्या. पण कशाचाच काही उपयोग झाला नाही. मग मात्र दादासाहेबांनी निरनिरळ्या क्लुप्त्या वापरायला सुरुवात केली.
‘राजा हरिश्चंद्र’ तयार झाला तेव्हा पुण्यात एकही थिएटर नव्हते. श्री. गंगाधरपंत पाठक यांनी पुण्यात नुकतीच पिठाची गिरणी सुरू केली होती. या गिरणीच्या ‘पॉवर’वर बाजूलाच चित्रपटगृह सुरू करावे असे पाठक ह्यांनी दादासाहेबांना सुचवले. शेवटी दोघांच्या चर्चेतून त्यांनी असा निर्णय घेतला की, पिठाच्या गिरणीत इतके दळण दळले तर या वर्गाचे तिकीट, इतके दळण दळले तर या वर्गाचे तिकीट. असे जाहीर करूया आणि खरंच त्यांनी याप्रमाणे केलेल्या वर्गवारीची जाहिरातही केली व या जाहिराती भिंतीवरही लावल्या. या जाहिरातीचा परिणाम असा झाला की, पाठकांची पिठाची गिरणी व दादासाहेबांचा ‘राजा हरिश्चंद्र’ दोघांचीही घोडदौड चालू होती. त्यांची ही युक्ती फळली.सुरतला ‘राजा हरिश्चंद्र’ हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हाची एक गोष्ट अशीच गमतीशीर आहे. सुरतला हा चित्रपट दादासाहेबांनी एका बोहरी इसमाच्या भागीदारीत प्रोजेक्टरच्या साहाय्याने एका नाटकाच्या थिएटरमध्ये प्रदर्शित केला. चित्रपट हा प्रकारच लोकांसाठी नवीन होता. त्यामुळे आपला चित्रपट पाहण्यासाठी लोकांची रीघ लागेल असे दादासाहेबांना मनोमनी वाटले. पण थिएटरमध्ये बोटावर मोजण्याइतकेच लोक चित्रपट पाहावयास आले. दादासाहेब उदास झाले. पण कधीच हार न मानणारे दादासाहेब आता तरी कसे हार मानणार ? त्याचवेळी त्या थिएटरच्या मालकानेही त्यांना सांगितले की, बिकानेर नाटक मंडळी दोन आण्यांत सहा-तास नाटकांचा खेळ दाखवितात आणि तुम्ही मात्र दोन आण्यांत दीड तासाचा हा सिनेमाचा खेळ दाखविता.ह्या मालकाच्या बोलण्यात दादासाहेबांना तथ्य वाटले. अन् काय करावे ह्या विचारात ते गुरफटले आणि ह्या विचारांचा गुंता सोडविता सोडविता त्यांना एक युक्ती सुचली. दुसऱ्या दिवशी त्यांनी पेपरमध्ये जाहिरात दिली. (फक्त बे आनामा पौना इंच चौंडु अने बे माईल लांबू ५७००० फोटोग्राफ जोइये फोटोग्राफ्स ) आणि अहो आश्चर्य, त्या जाहिरातीचा परिणाम असा झाला की, दुसऱ्या दिवशी थिएटर प्रेक्षकांनी दुथडी भरून वाहू लागले. ‘हाऊसफुल्ल’ चा बोर्ड थिएटरवर मानाने झळाळू लागला व जवळजवळ महिनाभर हा चित्रपट त्या थिएटरमध्ये तुडुंब गर्दीत चालू होता. ही होती दादासाहेबांच्या बुद्धीची करामत.

पहिल्यांदा प्रेक्षकांमध्ये बोहरी, पारशी लोकच जास्ती होते. मराठी माणसे फार कमी होती. नंतर ‘केसरी ‘, ‘टाइम्स ऑफ इंडीया’सारख्या मोठ्या पेपरनेही दादासाहेबांचे व त्यांच्या चित्रपटाचे तोंडभरून कौतुक केले व मराठी लोकही हळूहळू चित्रपट बघायला येऊ लागले. स्त्रिया व मुलांसाठी त्यांनी अर्ध्या दरात खेळ आयोजित केले होते आणि पाहता पाहता थिएटर पूर्ण भरू लागले. तोबा गर्दी पाहून दादासाहेबांनी अजून एक आठवडा नाटकाचा खेळ वाढवला आणि तब्बल २३ दिवस ‘राजा हरिश्चंद्र’ला लोकांनी उदंड प्रतिसाद दिला. चित्रपट भारतभर प्रदर्शित करावयाचा तर त्यावेळी वितरण संस्थाच नव्हत्या. त्यामुळे दादासाहेबांना स्वतःचा प्रोजेक्टर, ऑपरेटर व काही मदतनीस माणसे घेऊन गावोगाव फिरावे लागे व चित्रपट दाखवावा लागे. ही सर्व कामे ते आनंदाने करीत. भारतामध्ये हा चित्रपट तर खूप चाललाच पण कोलंबो, रंगून येथेही खूप चालला. आणि त्यावेळी दादासाहेबांनी चित्रपटाला हिंदी, इंग्लिश सबटायटल्स पण टाकल्या होत्या. ‘राजा हरिश्चंद्र’ला मिळालेल्या यशाने दादासाहेब आणि काकी दोघांचाही जीव भांड्यात पडला.

– ज्योती निसळ
(सौजन्य : ध्येयस्थ श्वास दादासाहेब फाळके, डिंपल पब्लिकेशन)

ठेवणीतले लेख

आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा[recaptcha]

काही निवडक प्रतिक्रिया:

रिशिकांत राऊत

पडद्या मागच्या कलावंतांची देखील चांगली माहिती देता याबद्दल अभिनंदन!
संदर्भ:- फेसबुक प्रतिक्रिया