अतिथी कट्टा

दिनांक : ०२-०८-२०१८

‌‌‌‌‌‌‌‌‘पुष्पक विमान’द्वारे एक पवित्र, सुगंधी नातं पडद्यावर…

प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे ‘पुष्पक विमान’च्या निमित्तानं निर्मिती क्षेत्रात उतरला आहे. अरुण जोशी, मीनल श्रीपत इंदुलकर, सुनिल ङ्गडतरे आणि वर्षा पाटील यांच्यासोबत सुबोधने या चित्रपटाची निर्मिती केली असून ‘झी स्टुडिओज्’ची प्रस्तुती आहे. या चित्रपटाच्या लेखन आणि निर्मितीच्या प्रवासाबद्दल त्याचं हे मनोगत.

——

‘पुष्पक विमान’चं पहिलं पोस्टर आणि टिझर प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांच्या लक्षात आलं होतं की या चित्रपटाची गोष्ट एखाद्या नात्यावर भाष्य करू इच्छिते. हे नातं आपल्या अगदी जवळचं म्हणजे आजी आणि आजोबांचं आहे. हे दोघेजण आपल्यासाठी आयुष्यभर धडपडत असतात. आपल्या नातवंडांची स्वप्नं पुरी व्हावीत म्हणून आपलं आयुष्य ते खर्‍या अर्थानं पणाला लावत असतात. खर्ची घालत असतात. मात्र मला असा प्रश्न पडला की आपण नातवंडं आपल्या आजी-आजोबांची स्वप्नं साकार व्हावीत म्हणून काही करतो का? या चित्रपटाची गोष्ट सुचली ती मला माझ्या आजोबांवरून. ते मला खूप जवळचे. मी त्यांचा खूप जवळचा. त्यांनी माझ्यावर अतिशय प्रेम केलं. ‘लोकमान्य : एक युगपुरुष’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाआधी दोन दिवस त्यांचं निधन झालं. त्यावेळी त्यांचं वय होतं ९६. माझा चित्रपट न पाहताच ते निघून गेले. ती चुटपुट माझ्या मनाला कायमची लागून राहिली. आपल्यातील प्रत्येकाला आजी-आजोबांनी वेगवेगळ्या गोष्टी सांगून झोपवलंय. आपले भरपूर लाड केले आहेत. आजोबांची ती उणीव गेली तीन वर्षं मला सातत्यानं छळतेय. मी पुण्यात घरी गेलो की आजोबा ज्या खोलीत झोपायचे तिथं जातो. तिथं गेल्यानंतर मला खूप अस्वस्थ वाटतं. मी त्यांना अजूनही विसरू शकलेलो नाही. माझ्यासाठी ते जिवंतच आहेत. गेल्याच वर्षी एकदा मी त्यांच्या खोलीबाहेर रात्री झोपलो. मला खूप अस्वस्थ वाटायला लागलं. मला झोपच येत नव्हती. लहानपणापासून आजोबांसमवेत घालवलेले सर्व प्रसंग माझ्या डोळ्यासमोर झराझरा येऊ लागले. आजोबांनी माझ्या प्रत्येक स्वप्नामध्ये त्यांचं स्वत:चं स्वप्न असल्यासारखा पुढाकार घेतला होता. पण नातू म्हणून मी त्यांच्यासाठी काय केलं? हा प्रश्न मला सतत छळत होता. माझ्या आजी-आजोबांबद्दलचं माझं स्वप्न म्हणजे मला त्या दोघांनाही विमानातून घेऊन जायचं होतं. जेव्हा ते शरीरानं धडधडीत होते, तेव्हा त्यांना विमान प्रवास घडविण्याइतके माझ्याकडे पैसे नव्हते आणि जेव्हा माझ्याकडे पैसे आले तेव्हा ते दोघेही ङ्गिरण्याच्या अवस्थेत नव्हते. त्यामुळे आजी-आजोबांना विमान प्रवास घडविण्याचं माझं ते स्वप्न तसंच राहिलं. हा विषय त्या रात्री माझ्या डोक्यात घुसला. सकाळी उठलो आणि ्‘पुष्पक विमान’ या नावासकट ती अख्खी गोष्टच माझ्या डोळ्यासमोर उभी राहिली.

आजी-आजोबा आणि नातवंडांचं इतकं पवित्र, रेशमी, अत्तरासारखं नातं आहे की ज्याचा सुगंध सतत आपल्या अवतीभवती दरवळत असतो. ज्यांना आजी-आजोबांचा प्रेम, सहवास मिळाला त्यांना मी सुदैवी मानतो. काही दुर्दैवी लोक असेही आहेत की ज्यांना अशाप्रकारचा सहवास नाही मिळाला. हा सिनेमा पाहताना प्रत्येकाला आपले आजी-आजोबा इतके आठवतील की पटकन तुम्ही त्यांचं एखादं स्वप्न पूर्ण कराल. आपले आजी-आजोबा त्यांच्याच काळात असतात. अगदी अलीकडे अलीकडे मी आजोबांकडे जायचो तेव्हाही ते माझ्या हातावर दहा रुपयांची नोट ठेवायचे. कोणत्याही स्वार्थाला चिकटलेलं नसलेलं नातं म्हणजे आजी-आजोबा. त्यामुळे हे अत्यंत पवित्र, सुगंधी असं नातं आपण पडद्यावर मांडायला हवं असं मला वाटलं.

ही गोष्ट सर्वप्रथम मी माझा मित्र वैभव चिंचाळकरसमोर मांडली. चेतन सेंदाणेला मग त्यानं आमच्या टीममध्ये घेतलं. हे दोघं ‘स्क्रीप्ट’वर काम करायला लागले. त्याचे अनेक ड्राफ्ट्स आम्ही वाचले. खूप बदल केले. त्यानंतर सहा महिन्यांनी आम्हाला सर्वांना पटेल, आवडेल असा ‘स्क्रीप्ट’चा आराखडा तयार झाला. गेल्या ऑक्टोबर महिन्यापासून आम्ही मग तयारीला लागलो. वैभव आतापर्यंत नि:स्वार्थीपणे सर्वांच्या मदतीसाठी धावला आहे. तो दिग्दर्शक होण्याचा मला खूप अधिक आहे. ‘पुष्पक विमान’चं कथानक मी वैभवला ऐकवलं तेव्हा मी त्याला मला हा चित्रपट दिग्दर्शित करायचा आहे असं सांगितलं. तेव्हा त्यानं पटकन, ‘चल, मी लिहितो.’ असं सांगितलं. त्यावेळी त्यानं काही विचारला केला नाही. तो लगेच लिहायलाही लागला. तेव्हा मला वाटायला लागलं की मी कथानकावर ङ्गक्त विचार करून थांबलो होतो. वैभव तर थेट लिहायलाही लागला होता. त्यामुळे या चित्रपटाचा दिग्दर्शक म्हणून खरा हक्कदार वैभव आहे असं मला वाटलं आणि त्याच्यावर ती जबाबदारी मग सोपविण्यात आली. ‘कट्यार काळजात घुसली’च्या वेळी मी वैभवला वचन दिलं होतं की तू आयुष्यात जेव्हा पहिला चित्रपट दिग्दर्शित करशील, तेव्हा त्याचा निर्माता म्हणून मी काम करावं अशी माझी इच्छा आहे. सुदैवानं माझी ती इच्छा पूर्ण झाली आणि माझ्यासोबत इतर पाच निर्माते आणि झी स्टुडिओज उभे राहिले. परंतु, या चित्रपटाच्या निर्मितीशी मंजिरी सुबोध भावे हे नाव जोडलं गेलं याचा मला अतिशय आनंद आहे.

या चित्रपटासाठी आम्हाला खूप चांगली टीम मिळाली. त्यासाठी मी आणि वैभव स्वत:ला खूप लकी मानतो. चित्रपटातील संवाद आणि पटकथा चेतन सैंदाणे यांचे आहेत. चित्रपटाचं संकलन केलंय आशिष म्हात्रे आणि अपूर्वा मोतीवाले सहाय यांनी तसेच धावणार्‍या मुंबईला आपल्या छायाचित्रणात सुरेखपणे टिपलंय राष्ट्रीय पुरस्कार विजेते छायालेखक महेश आणे यांनी. संतोष ङ्गुटाणे यांचे कला दिग्दर्शन असून चित्रपटाला संतोष मुळेकर यांचे पार्श्वसंगीत आहे. या चित्रपटात एकूण सहा गाणी आहेत. नरेंद्र भिडे आणि संतोष मुळेकर यांची संगीतबद्ध केली असून शौनक अभिषेकी, आनंद भाटे, जयतीर्थ मेवुंडी, विनय मांडके आणि नकाश अझीझ यांनी स्वरबद्ध केली आहेत तर समीर सामंत आणि चेतन सैंदाणे यांनी शब्दबद्ध केली आहेत. कार्यकारी निर्मात्याची धुरा रत्नकांत जगताप यांनी सांभाळली आहे. चित्रपटात मोहन जोशी, सुबोध भावे, गौरी किरण आणि सुयश झुंझूरके हे कलाकार आहेत तसेच राहुल देशपांडे एका खास भूमिकेत दिसणार आहेत. मोहन जोशी यांनी या चित्रपटामधील मुख्य व्यक्तिरेखा साकारली आहे. ते माझ्या मते ङ्गक्त मराठीच नव्हे तर भारतीय चित्रपटसृष्टीतील सध्याचे सर्वोत्कृष्ट अभिनेते आहेत. त्यांनी आपल्या प्रत्येक भूमिकेमधून स्वत:ला सिद्ध केलेलं आहे. कुठल्याही प्रकारची भूमिका ते अतिशय लीलया पद्धतीनं हाताळण्यात आणि त्या भूमिकेशी एकरूप होण्यात त्यांचा हात धरणारा सध्या कोणी नाही असं मला वाटतं. त्यांच्याबरोबर माझा हा दहावा चित्रपट. त्यामुळे त्यांच्याबरोबर स्क्रीन शेअर करायला मिळणं ही खूप आनंदाची गोष्ट आहे. या चित्रपटाचं सलग तीस दिवस शूटिंग झालं. मोहनकाकानं आजपर्यंत कोणत्याही चित्रपटाचं असं सलग चित्रीकरण केलेलं नव्हतं. २९ दिवस त्याच माणसांबरोबर राहणं ही खरोखरीच त्यांच्यासाठी अवघड गोष्ट होती. तसेच सकाळच्या शिफ्टमध्ये काम करणं त्यांना ङ्गारसं आवडत नाही. परंतु, मी निर्माता असल्यामुळे मी सकाळी सहा वाजता त्यांच्या घरी जायचो. परंतु, शेर जब जंगलमें आता है तब वो शेरही होता है… मोहनकाका सेटवर आला की तो शेर असतो. सगळ्यांचा बाप असतो. आपण त्याच्यावर प्रेम करतोय. परंतु, या चित्रपटामधील त्याचं काम पाहून तुम्ही आणखी जास्त त्याच्या प्रेमात पडाल. गौरीचा हा पहिला चित्रपट असूनही तिनं खूप छान काम केलंय. तिनं कोकणातील ठसका छान दाखवलाय. राहुल देशपांडे माझा खूप जवळचा मित्र असूनही तो या चित्रपटात गायलेला नाही. परंतु, त्यानं एक गोड भूमिका या चित्रपटात साकारली आहे. आनंद भाटे, शौनक अभिषेकी, जयतीर्थ मेहुंडी यांनी या चित्रपटासाठी गायलं आहे.

– सुबोध भावे

ठेवणीतले लेख

  आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा  [recaptcha]

  काही निवडक प्रतिक्रिया:

  प्राध्यापक डॉक्टर सुजय पाटील कोल्हापूर

  लेखिका जयश्री दानवे यांनी आपले वडील नटश्रेष्ठ जयशंकर दानवे यांच्या सांगितलेल्या आठवणी या मराठी चित्रपटसृष्टीचा एक महत्त्वपूर्ण दस्तऐवज आहेत.

  संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया