अतिथी कट्टा

दिनांक : २९-१२-२०१८

‌‌‌‌‌‌‌‌पुलंसारख्या व्यक्तिमत्त्वाला सव्वा दोन तासांमध्ये दाखवणं अशक्य…




महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व अशी ओळख असणाऱ्या पु. ल. देशपांडे यांच्या आयुष्यावर आधारलेला ‌‘भाई : व्यक्ती की वल्ली’ हा चित्रपट येत्या ४ जानेवारीला प्रदर्शित होत आहे. चतुरस्त्र दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी पहिल्यांदाच एखाद्या चरित्रपटाचं शिवधनुष्य हाती घेतलं आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाबद्दल त्यांचं हे मनोगत.

——

‌‘भाई…’सारखा एक खूप वेगळ्या धाटणीचा सिनेमा मला करता आल्यामुळे खूप काळानं मला समाधान मिळालं आहे. खरं तर मराठी साहित्य हा काही माझा आवडीचा विषय नव्हता. तसेच शाळेतही मराठी विषय नव्हता. त्यामुळे माझं मराठी भाषेवर प्रभुत्व नव्हतं. परंतु, नाटकात काम करण्याच्या दृष्टीनं मी मराठी शिकलो. आधी वाटलं की पुलंच्या व्यक्तिरेखांवर सिनेमा बनवूया का… व्यक्तिरेखा तयार करणाऱ्या माणसावर आपण चित्रपट बनवूया. कारण अशाप्रकारच्या व्यक्तिरेखा निर्माण करणारा माणूस हा अष्टपैलू असणार. अशा विचारातून भाईंची माझी ओळख झाली. २००० साली भाई गेले. म्हणजे त्यांना जाऊनही आता १८ वर्षं होऊन गेली. परंतु, इतक्या वर्षांमध्ये कोणालाच त्यांच्यावर चित्रपट करावासा का वाटू नये, याचा मला थोडा रागही आला. पण असंही वाटलं की कोणाला नाही सुचलं ते एका परीनं बरंच झालं. त्यामुळे मला आता हा चित्रपट करायला मिळतो आहे. एवढा मोठा माणूस कायम जमिनीवर राहिला. तो ‘कॉमन मॅन’च राहिला. म्हणूनच मला त्यांच्या व्यक्तिमत्त्वामधील विविध कंगोरे बाहेर आणण्याची इच्छा झाली.

मला तीन व्यक्तींचे आभार मानायचेत. गणेश मतकरी, रत्नाकर मतकरी आणि अमोल परचुरे या तिघांनी हा चित्रपट घडण्यात खूप मोलाचा वाटा उचलला आहे. रीसर्चसाठी या तिघांनी बरीच मेहनत घेतली. एवढं चांगलं लेखन हातात आल्यावर योग्य ‌‌‘कास्टिंग’ करणं गरजेचं होतं. सुदैवानं मला या चित्रपटातील ७० व्यक्तिरेखांसाठी व्हर्सटाइल कलाकार मिळाले. विशेष म्हणजे या चित्रपटामधील ज्या व्यक्तिरेखेसाठी जो कलाकार मी मनात हेरून ठेवला होता, तोच मला प्रत्यक्षात मिळाला. एकाही कलाकारानं मला हा चित्रपट करण्यासाठी नकार दिला नाही किंवा होकारासाठी फार वेळ घेतला नाही. अर्थात हा मान माझा नसून पु. ल. देशपांडे यांचा आहे, याची मला कल्पना आहे. बाळासाहेबांच्या व्यक्तिरेखेसाठीचा कलाकार मला खूप पटकन सापडला. पुलंच्या व्यक्तिरेखेसाठी मला फार काही त्रास झाला नाही.

दोन कलाकार माझ्या मनात होते आणि ते मला मिळाले. मला विजयाबाईंच्या भूमिकेसाठी नीना कुलकर्णी हवी होती. तिनंही लगेचच होकार दिला. थोडक्यात या चित्रपटामधील सर्व व्यक्तिरेखा मला मिळत गेल्या. सत्तर हा आकडा खूप मोठा असला तरी प्रत्यक्षात कलाकारांची निवड लगेच झाल्यामुळे मला त्यांच्या शोधासाठी फार कष्ट करावे लागले नाहीत. सारंग साठे मला एका पार्टीत भेटला. त्यानं दाढी वाढवली होती. त्याला भेटताक्षणीच मी म्हटलं की तू या चित्रपटात बाळासाहेब ठाकरेंची व्यक्तिरेखा साकारायची आहेस. क्षणभर त्यालाही मी काय म्हणतोय यावर विश्वास बसेना. विक्रम गायकवाडची जादू मग इथं कामी आली. या सर्व कलाकारांनी मला खूप पाठबळ दिलं. त्यामुळेच मी हा चित्रपट करू शकलो.

मी अभिनेता म्हणूनदेखील एखाद्या कलाकृतीमध्ये फारसा गुंतत नाही. शूटिंग संपून चित्रपट प्रदर्शित झाला की मी त्या व्यक्तिरेखेमधून बाहेर पडतो. परंतु, शूटिंग संपल्यानंतर कलाकाराला एक रिकामेपणा निश्चितच जाणवतो. कारण त्या व्यक्तिरेखेबरोबर आपण इतकी वर्षं राहिलेलो असतो. त्यामुळ‌े या चित्रपटाचं शूटिंग संपल्यानंतर तो रिकामेपणा जाणवणं साहजिकच होतं. या चित्रपटाचे आम्ही दोन भाग केले आहेत. मात्र हा निर्णय शूटिंग संपल्यानंतर घेण्यात आला. आम्ही या चित्रपटाचे दोन भाग करायचे आहेत असं सुरुवातीला ठरवलेलं नव्हतं. मुळात पु. ल. देशपांडे हे एक अष्टपैलू, बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते. ते लेखक, दिग्दर्शक, संगीतकार, अभिनेते, प्राध्यापक, गायक, वक्ते, दूरदर्शन आणि आकाशवाणीचे संचालक अशा विविध भूमिकांमध्ये वावरले होते. एवढ्या प्रतिभावान व्यक्तीला अवघ्या सव्वा दोन तासांमध्ये दाखवणं हे जवळपास अशक्य काम होतं. ते करायचंच झालं असतं तर अनेक महत्त्वाच्या व्यक्तींना किंवा प्रसंगांना आम्हाला कात्री लावावी लागली असती. तसं झालं असतं तर तो भाईंच्या व्यक्तिमत्त्वावरही अन्याय केल्यासारखं झालं असतं. म्हणून आम्ही हा चित्रपट दोन भागांमध्ये करण्याचा निर्णय घेतला.

मी बायोपिक पहिल्यांदाच दिग्दर्शित केला, आणि तोसुद्धा महाराष्ट्राच्या लाडक्या व्यक्तिमत्वावर आधारीत असलेला. पु.ल.देशपांडे यांची ओळख विनोदी लेखक म्हणून जरी असली तरी त्यांनी कलेचे बहुतेक सर्व प्रांत गाजवलेले आहेत. पुलंनी निर्माण केलेल्या वल्ली आपल्याला अगदी तोंडपाठ आहेत, पण त्यापलीकडे जाऊन पुलं हे प्रत्यक्ष आयुष्यात कसे होते त्याचं चित्रण मी या सिनेमात करायचा प्रयत्न केला आहे. सुनीताबाईंचं पुलंच्या आयुष्यात असलेलं महत्त्व, मित्रांच्या संगतीत रमणारे पुलं, त्यांचं दातृत्व असे अनेक पैलू सिनेमात पाहता येतील. पुलंचं संगीतावर विशेष प्रेम होतं, त्यामुळे सिनेमातही गाण्यांना विशेष स्थान आहे, आणि त्याचं चित्रणही रसिकांना नॉस्टेल्जिक करेल अशी मला खात्री आहे.
माझ्यासाठी ही एक नवीन सुरुवात आहे. प्रेक्षक या कलाकृतीचं स्वागत करतील अशी अपेक्षा आहे.

– महेश मांजरेकर

ठेवणीतले लेख

    आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा



    [recaptcha]

    काही निवडक प्रतिक्रिया:

    नरेंद्र चौधरी


    आपल्या संकेतस्थाळाच्या माध्यमातून असे लक्षात आले कि आपन खूप छान माहिती पुरवत आहात.
    संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया