अतिथी कट्टा

दिनांक : १२-०६-२०१८

‌पुलंमधला माणूस ‘भाई…’मध्ये दिसेल…

महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व म्हणून गौरविल्या गेलेल्या पु. ल. देशपांडे यांचा आज १८वा स्मृतिदिन. पुलंच्या लेखणीतून साकारलेल्या विविध व्यक्तिरेखा आजवर प्रेक्षकांना वेगवेगळ्या चित्रपट आणि मालिकांमधून पाहायला मिळाल्या. परंतु, त्यांचा जीवनपटच पुढील वर्षीच्या जानेवारी महिन्यात ‘भाई : व्यक्ती की वल्ली?’ या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांसमोर येतोय. महेश मांजेरकर या चित्रपटाचं दिग्दर्शन करीत असून पटकथा लेखन गणेश मतकरी आणि संवाद रत्नाकर मतकरी यांनी लिहिले आहेत. पुलंची व्यक्तिरेखा सागर देशमुख साकारणार असून सुनीताबाईंच्या व्यक्तिरेखेत इरावती हर्षे पाहायला मिळतील. या चित्रपटाच्या निमित्तानं महेश मांजरेकर यांचं हे मनोगत.
——

‘व्यक्ती आणि वल्ली’ नावाचं एक नाटक मी केलं होतं. रत्नाकर मतकरी यांनीच ते लिहिलं होतं. पुलंची विविध रुपं उभ्या महाराष्ट्राला ठाऊक आहेत. ते संगीतकार होते, फिल्ममेकर होते, प्रख्यात साहित्यिक होते, शिक्षक होते. त्यांचं सामाजिक कार्यही खूप मोठं होतं. अशा विविध भूमिकांच्या मुखवट्यांमागचे पुलं फारसे कोणाला ठाऊक नव्हते. थेट राजकारणात नसूनही त्यांची राजकारणाबाबतची ठोस अशी भूमिका होती. आणीबाणीच्या काळात ती सर्वांनाच अनुभवायला मिळाली. पुलंनी स्वत:चं आत्मचरित्र लिहिलेलं नव्हतं. त्यामुळे त्यांच्या आयुष्यामधील बऱ्याचशा गोष्टी या सर्वज्ञात नव्हत्या. मग या माणसाचा शोध सुरू झाला. मला व्यक्तिश: पुलंच्या आयुष्यामधील बऱ्याचशा गोष्टी माहीत नव्हत्या. एका लेखकापेक्षा मला त्यांच्यातला माणूस अधिक भावला आणि मग चित्रपटाची निर्मितीप्रक्रिया सुरू झाली.

पटकथा लेखनासाठी गणेश मतकरी माझ्या सोबत आला. या चित्रपटाचे संवाद रत्नाकर मतकरी यांनी लिहिले आहेत. या दोघांचीही पुलंबद्दलचा ‌‘रीसर्च’ खूप मोठा आहे. पुलंवरचं खूप लिखाण त्यांनी वाचलं आहे. गणेश मतकरींचा ‘स्क्रीन प्ले’ लिहून झाल्यानंतर माझ्या लक्षात आलं की हा सिनेमा खूपच इंट्रेस्टिंग होऊ शकतो.

काहींचा असा गैरसमज होऊ शकतो की, पुलंच्या साहित्यावर हा चित्रपट आधारला आहे की काय. पुलंनी लिहिलेल्या सगळ्याच व्यक्तिरेखा या चित्रपटात नाहीत. मात्र एखाददुसरी व्यक्तिरेखा नाव बदलून या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायलासुद्धा मिळेल. ‘भाई : व्यक्ती की वल्ली’ या चित्रपटाच्या शीर्षकाबद्दलही खूप विचार केला. यापूर्वी हिंदीत मी काही गुन्हेगारीपट केले आहेत. त्यामुळे ‘भाई’ या नावामुळे प्रेक्षकांचा संभ्रम होऊ नये यासाठी ‘भाई : व्यक्ती की वल्ली’ असे शीर्षक निश्चित करण्यात आले. या चित्रपटाचं मोठं वैशिष्ट्य म्हणजे पुलंखेरीज आणखी खूप मोठमोठी व्यक्तिमत्त्वं त्यात पाहायला मिळतील. त्यामुळे पं. जवाहरलाल नेहरू, बाळासाहेब ठाकरे, बाबा आमटे, भीमसेन जोशी, वसंतराव देशपांडे, कुमार गंधर्व यांचा समावेश आहे.

प्रत्येक व्यक्तिरेखेसाठी आम्ही खूप बारकाईनं विचार केला आहे. पं. कुमार गंधर्व यांच्या व्यक्तिरेखेसाठी स्वानंद किरकिरे यांची निवड केली आहे. या चित्रपटामध्ये संगीताचा खूप मोठा वाटा असून अजित परब यानं ही धुरा स्वीकारली आहे. प्रेक्षकांना त्या काळात नेण्यासाठी रंगभूषा हा खूप महत्त्वाचा घटक आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे रंगभूषाकार विक्रम गायकवाड या चित्रपटाचे रंगभूषाकार आहेत. पुलंची व्यक्तिरेखा कोण साकारणार याबद्दल प्रत्येकालाच उत्सुकता असणं साहजिक आहे. खूप विचाराअंती आम्ही ही व्यक्तिरेखा सागर देशमुखकडे सोपवली आहे. तो आणि इरावती हर्षे आपापल्या व्यक्तिरेखांना न्याय देतील याची आम्हाला खात्री आहे. माझा आवडता कलाकार सचिन खेडेकरही या चित्रपटात एका महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखेत पाहायला मिळेल. प्रत्येक चित्रपटागणिक वेगवेगळं आव्हान स्वीकारायला मला आवडतं. हा चित्रपट त्या आव्हानाचाच एक भाग आहे असं मला वाटतं.

– महेश मांजरेकर

ठेवणीतले लेख

    आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा



    [recaptcha]

    काही निवडक प्रतिक्रिया:

    नरेंद्र चौधरी


    आपल्या संकेतस्थाळाच्या माध्यमातून असे लक्षात आले कि आपन खूप छान माहिती पुरवत आहात.
    संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया