अतिथी कट्टा

दिनांक : ०७-०६-२०१८

‌प्रत्येक ‘जॉनर’चा सिनेमा मला करायचाय…

‘अजब लग्नाची गजब गोष्ट’, ‘कॅनव्हास’ या दोन चित्रपटांनंतर शिवदर्शन साबळे आपला ‘लगी तो छगी’ हा चित्रपट घेऊन येत्या ८ जूनला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. त्यानिमित्ताने त्यांच्याशी साधलेला हा संवाद.

——

‘लगी तो छगी’मध्ये तुम्ही कोणता विषय हाताळला आहेत?

– या चित्रपटामध्ये दोन इनोसण्ट व्यक्तिरेखा आहेत. एक पुण्याचा असला तरी आता तो बर्‍यापैकी मुंबईकर झाला आहे. त्याला इथं येऊन आपलं स्वप्न पूर्ण करायचं आहे. त्यासाठी त्याची बरीच धडपड सुरू असते. दुसरा ‘लेट बॅक ऍटिट्यूड’चा-हताश व्यक्तिरेखेचा आहे. तो सरदार असतो. तुझं माझं जमेना नि तुझ्यावाचून करमेना असं या दोघांचं झालंय. हे दोघे एका ट्रॅपमध्ये अडकतात की ज्याच्याशी त्यांचा काडीमात्रही संबंध नसतो. पुढे काय घडतं, त्याची कहाणी म्हणजे हा चित्रपट आहे. हॉलिवुड तसेच काही हिंदी चित्रपटामध्ये अशाप्रकारचा विषय थोड्या फार प्रमाणात पाहायला मिळाला आहे. परंतु, मराठीत पहिल्यांदाच हा ‘जॉनर’ प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. फिल्मच्या टेकिंग आणि ‘स्क्रीन प्ले’चा पॅटर्न खूप वेगळा आहे. या चित्रपटामध्ये एकाचवेळी कथानकाचे सहा-सात ट्रॅक्स सुरू असलेले प्रेक्षकांना पाहायला मिळतील. प्रेक्षकांना आम्ही थोडा त्रास देणार आहे. कथानकात काय घडतंय यावर सतत त्यांना लक्ष ठेवावं लागणार आहे.

या चित्रपटाच्या निर्मितीप्रक्रियेबद्दल काय सांगाल ?

– या चित्रपटाचं कथानक लिहायला मी २००९ मध्ये सुरुवात केली. त्यावेळी माझा दुसरा एक चित्रपट सुरू होता. त्यामुळे थोडा काळ थांबलो. पुन्हा २०१० मध्ये लिहायला सुरुवात केली. त्यानंतरही पुन्हा थांबलो. २०११ पासून खर्‍या अर्थानं हा चित्रपट लिहायला सुरुवात केली. ‘लगी तो छगी’चं कथानक मी बर्‍याच निर्मात्यांना ऐकवलं होतं. परंतु, ती कुणाला पसंत पडत नव्हती. मात्र माझा चित्रपट कसा आहे ते मला चांगलंच ठाऊक होतं. त्यामुळेच त्याच्या पाठीशी निर्माता म्हणून उभं राहण्याचा मी निर्णय घेतला. या चित्रपटाचं लेखन हे हिंदी चित्रपट म्हणून झालं होतं. साधारणतः दोनशेहून अधिक निर्मात्यांना मी ‘स्क्रीप्ट’चं ‘नरेशन’ केलं होतं. परंतु, या प्रकाराची मला सवय आहे. कारण माझ्या पहिल्या चित्रपटाचंही मी २६५ जणांना ‘नरेशन’ केलं होतं. त्यानंतर २६६व्या निर्मात्याला माझी गोष्ट आवडली होती. एवढ्या सगळ्या ‘नरेशन’मधून मला खूप काही शिकायला मिळालं. कोणत्या प्रसंगावेळी समोरच्याकडून कशी ‘रिऍक्शन’ येते हे कळलं. त्यावरून मी पुढील ‘नरेशन’मध्ये बदल करायचो. ‘लगी तो छगी’चेही मी जवळपास १५० ‘ड्राफ्ट्स’ लिहिलेत. या चित्रपटाच्या कथानकाला खूप वेग आहे. त्यासाठी आम्ही खूप तयारी केली. मुळात ही गोष्ट बराच काळ माझ्या डोक्यात होती. त्यामुळे, हा चित्रपट कसा करायचा आहे हे मला पक्कं ठाऊक होतं. आता तयारी फक्त कलावंत आणि तंत्रज्ञांची करावी लागणार होती. या चित्रपटाची पूर्वतयारी म्हणून मी एक शॉर्टफिल्मही केली. त्याचा निश्‍चितच आम्हाला उपयोग झाला. मूळ चित्रीकरणाचे दिवस ४६ होते. ते मी ३२ वर आणले. परंतु, एवढे दिवस वाचवताना खूप मेहनत करावी लागली.

‘लगी तो छगी’ या चित्रपटाच्या निर्मात्यांपैकी एक होताना आणखीही काही कारणं होती का?

– माझे आधीचे दोन चित्रपट योग्यरीत्या प्रदर्शित झाले नाहीत. त्यामुळे त्याच्या ‘बॉक्स ऑफिस’वरील व्यवसायाबद्दल मला नेमकं भाष्य नाही करता येणार. या दोन्ही चित्रपटांच्या निर्मात्यांनी त्यांच्याकडून सर्वतोपरी प्रयत्न केलेही असतील. परंतु, मला अपेक्षित असलेला परिणाम आला नाही. चित्रपटाच्या व्यवसायाबद्दल एक उत्तम उदाहरण म्हणून मी आमिर खानचं नाव घेईन. तो कधी गजनी करतो, कधी तलाश तर कधी तारे जमीं पर. त्याला आपल्या चित्रपटांचा प्रेक्षकवर्ग नेमका ठाऊक असतो. त्याप्रमाणे तो आपल्या चित्रपटांची प्रसिद्धी आणि ‘मार्केटिंग’ करतो. आपला चित्रपट कोणत्या प्रेक्षकासाठी आहे आणि तो कशा पद्धतीनं ‘ऍक्सेप्ट’ करील याचे त्याचे आडाखे अचूक असतात. असं काम आपल्या चित्रपटांबाबत घडत नाही. माझ्या यापूर्वीच्या वेगळ्या प्रकारच्या फिल्म्स संबंधित निर्मात्यांनी एकाच पद्धतीनं विकण्याचा प्रकार केला. म्हणूनच ‘लगी तो छगी’च्या निर्मात्यांपैकी एक निर्माता होण्याचा निर्णय मी घेतला. निर्माता हा संबंधित फिल्मचं डोकं तर दिग्दर्शक हा हृदय असतो. दिग्दर्शकाला नेहमी वाटत असतं की मला अजून थोडं चांगलं करायला मिळालं तर बरं होईल. परंतु, डोकंरूपी निर्माता नेहमी आपल्याला खर्च आवरता येण्यासाठी सुचवत असतो.

या चित्रपटामधील कलाकारांच्या निवडीबद्दल काय सांगाल?

– अभिजित साटमचं डेडिकेशन मला ठाऊक होतं. त्यामुळे तो या चित्रपटासाठी आवश्यकच होता. इतर १२ पात्रंही तेवढीच महत्त्वाची होती. जवळपास पाच-सहा ऑडिशन्स सत्रांमध्ये सुमारे चारशे-पाचशे कलावंतांना आम्ही भेटलो. महत्त्वाच्या ‘कास्टिंग’मध्ये माझ्या पत्नीचाही मोठा सहभाग होता. एवढं करूनही शूटिंग सुरू होईपर्यंत आमचं सगळं ‘कास्टिंग’ तयार नव्हतं. शूटिंगला सुरुवात झाल्यानंतर ‘पठाण’च्या व्यक्तिरेखेसाठी आम्ही हिंदीतील प्रसिद्ध अभिनेते सुरेंद्र पाल यांची निवड केली. या चित्रपटाच्या निमित्तानं मी पहिल्यांदाच आपल्या राज्याबाहेर शूटिंगसाठी गेलो. या चित्रपटाचा काही भाग गोव्यात चित्रीत करण्यात आला आहे. तिथं काही अडचणी आल्या. मुळात चित्रपटाची लोकेशन्स शोधण्यासाठी मी सात ‘रेकीज’ केल्या आहेत. तब्बल ५२ लोकेशन्सवर ही फिल्म चित्रीत झालीय. कागदावर जी फिल्म मी लिहिली होती, त्यापैकी ८० टक्के दृश्यक्रम पडद्यावर उतरविण्यात मी यशस्वी झालोय, असं मला वाटतं.

तुझ्या आधीच्या चित्रपटाच्या व्यावसायिक कामगिरीबद्दल तसेच शाहिर साबळे यांचा नातू असल्यामुळे तुझ्याकडून असलेल्या अपेक्षांबद्दल तू काय सांगशील ?

– ‘अजब लग्नाची गजब गोष्ट’च्या व्यवसायाचा आकडा मला ठाऊक नाही. परंतु, या चित्रपटानं मला खूप नाव मिळवून दिलं. परंतु, हा चित्रपट जेव्हा टीव्हीवर प्रेक्षकांना पाहायला मिळाला, तेव्हा त्याचं खूप कौतुक झालं. शाहीर साबळेंबद्दल आपण खूप काही ऐकलंय. परंतु, हे ऐकणं ‘एस्टॅब्लिश’ शाहीर साबळेंबद्दलचं अधिक आहे. आपण त्यांचा भूतकाळ पाहायला तर असं लक्षात येतं की त्यांनीही आपल्या वयाच्या ४०-४५पर्यंत ‘स्ट्रगल’च केलेला होता. त्यामुळे माझा संघर्ष मला अपेक्षितच होता. तसेच झटपट यश मला मिळालं नाही हे एका परीनं बरंच झालं. नाहीतर ते पुढच्या प्रवासाच्या दृष्टीनं त्रासदायक झालं असतं. मी कधीच पुरस्कारांसाठी चित्रपट बनवला नाही. आपण प्रेक्षकांचं मनोरंजन करायला आलोय, असं माझं प्रामाणिक मत आहे. मनोरंजनाच्या प्रत्येकाच्या व्याख्या कदाचित वेगवेगळ्या असू शकतील. म्हणूनच भविष्यात प्रत्येक ‘जॉनर’ला स्पर्श करण्याचा माझा विचार आहे. असा स्पर्श यापूर्वी केलेले दिग्दर्शक आपल्याकडे खूप कमी आहेत.

तुझ्या सिनेमाच्या आवडीनिवडींबद्दल काय सांगशील?

– मी आंतरराष्ट्रीय चित्रपटांचा चाहता आहे. हल्ली बहुतेक चांगल्या फिल्म्स या ‘सबटायटल्स’सह असतात. त्यामुळे त्या कळायला सोप्या जातात. परंतु, काही फिल्म मी अशाही पाहिल्यात की ‘सबटायटल्स’ नसतानाही त्या मला खूप भावल्या. अशी ताकद असलेली एखादी फिल्म मलाही बनवायला आवडेल. हिंदी चित्रपट मी खूप कमी पाहतो. अशा चित्रपटांमधून काही शिकायला मिळणार असेल तरच मी त्या चित्रपटगृहांमध्ये जाऊन पाहतो. माझे खूप कमी मित्र आहे. वर्तमानपत्रांमधील ‘निगेटिव्ह’ बातम्या वाचून ‘डिप्रेशन’ येतं, असा माझा स्वानुभव आहे. म्हणून मी दररोज वर्तमानपत्र वाचत नाही. त्यामुळे चित्रपटाच्या व्यवसायाबद्दलही मी थोडासा अनभिज्ञ असतो. ‘बाहुबली’चा पहिला भाग मला खूप आवडला होता. हा चित्रपट पाहून मलाही वाटू लागलं की अशाप्रकारची भव्य दिव्य फिल्म आपणही बनवू शकतो. व्ही. शांताराम, राजकुमार संतोषी हे माझे आवडते दिग्दर्शक आहे. राजकुमार हिरानीचं लिखाण मला खूप आवडतं.

ठेवणीतले लेख

    आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा



    [recaptcha]

    काही निवडक प्रतिक्रिया:

    नरेंद्र चौधरी


    आपल्या संकेतस्थाळाच्या माध्यमातून असे लक्षात आले कि आपन खूप छान माहिती पुरवत आहात.
    संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया