अतिथी कट्टा

दिनांक : ०१-०६-२०१८

‌‘प्रभात’ नावाचे एक विशाल कुटुंब…

भारतीय चित्रपटसृष्टीच्या जडणघडणीत मोठा वाटा आहे तो पुण्यातील ‘प्रभात’ स्टुडिओचा. या स्टुडिओतर्फे स्वातंत्र्यपूर्व काळात अनेक सरस, आशयघन आणि यशस्वी चित्रपटांची निर्मिती केली गेली. या यशात ‘प्रभात’साठी झटणाऱ्या प्रत्येकाचा वाटा होता. ‘प्रभात’चे कामकाज नेमके कसे चालत असे याचे कुतूहल आजही अनेकांना आहे. १ जून हा ‘प्रभात’चा स्थापनादिन. त्यानिमित्त ‘प्रभात’चे गीतकार शांताराम आठवले यांनी लिहिलेल्या ‘प्रभातकाळ’ या पुस्तकामधील काही भाग आम्ही प्रकाशित करीत आहोत. ‘प्रभात’मध्ये श्री. आठवले यांची तीस रुपये पगारावर पद्यलेखक म्हणून त्यांची नेमणूक झाली. सुरुवातीला पद्यलेखनाबरोबरच चित्रीकरणास साहाय्यक म्हणून पडणारी सर्व कामे ते करत असत. शिवाय ‘प्रभात’च्या प्रसिद्धीचे व त्यानिमित्त करावे लागणारे सर्व लेखन करण्याची जबाबदारीही आठवले यांच्यावर होती. ‘अमृतमंथन’ या चित्रपटापासून शांताराम आठवले यांनी ‘प्रभात’च्या अनेक चित्रपटांचे गीतलेखन केले. त्यांनी लिहिलेली ‘अहा भारत विराजे’, ‘भारती सृष्टीचे सौंदर्य’, ‘उसळत तेज भरे’, ‘हासत वसंत ये वनी’, ‘राधिका चतुर बोले’, ‘लखलख चंदेरी’, ‘दोन घडीचा डाव’ ही सारी गीते प्रासादिक, नादमधुर व अर्थपूर्ण होती. आपल्या पद्यरचनेने शांताराम आठवले यांनी पद्यरचनेचा श्रेष्ठ आदर्श घालून दिला.

——

स्थूलमानाने ‘प्रभात’मध्ये असलेली मुख्य खाती, त्या खात्यांचे प्रमुख व ते खाते कोणत्या भागीदाराच्या अधिकाराखाली असे याची थोडक्यांत ओळख करून घेऊ. मुख्य खाती (१) दिग्दर्शन व लेखन विभाग. यांत दिग्दर्शक, त्याचे सहाय्यक, हिंदी व उर्दू संवाद लिहिणारे, गीतलेखक व हिंदी संवाद शूटिंगच्या वेळी नटांना समजावून सांगणारे इत्यादींचा समावेश असे. श्री. के. नारायण काळे, श्री. राजा नेने, श्री. कौशल, श्री. कश्यप, श्री. शांताराम आठवले, श्री. मुखराम शर्मा मंडळी कायमची होती. लेखकांमध्ये नोकर म्हणून किंवा कराराने वेळोवेळी आलेल्या मंडळींत पुढील प्रमुख नवे आढळत. श्री. नरोत्तम व्यास (हिंदी संवाद व गीते – धर्मात्मा, रजपूत रमणी, वहां, अमरज्योती), श्री. मुन्शी अजीज (हिंदी संवाद व गीते – दुनिया न माने, आदमी).

पं. अनुज (हिंदी संवाद व गीते – पडोसी)
पं. संतोषी (हिंदी संवाद व गीते – संत सखू, दस बजे – आम्ही प्रभात सोडल्यावर संतोषींनी लिहिलेल्या व दिग्दर्शित केलेल्या कृतींचा यांत समावेश नाही).
पं. सुदर्शन (हिंदी संवाद व गीते – पडोसी )
श्री. वली – (हिंदी संवाद व गीते – रामशास्त्री. गीते – नई कहानी ).
के. अब्बास (कथा – संवाद-नई कहानी). श्री. शिवराम वाशीकर – (मराठी कथा व संवाद – चंद्रसेना, तुकाराम, ज्ञानेश्वर, संत सखू, गोपाळकृष्ण, रामशास्त्री).
श्री. ना. ह. आपटे – (मराठी कथा व संवाद – अमृतमंथन, कुंकू, रजपूत रमणी).
श्री. ए. भास्करराव – (मराठी कथा – माणूस. काही काळ हे सहाय्य्क दिग्दर्शकही होते).
श्री. अनंत काणेकर – (संवाद – गीते – माणूस )
श्री. ग. खं. पवार – (पटकथा व संवाद – दहा वाजतां )
श्री. सुखटणकर – (आरंभी कथा व संवादाचा काही भाग – रामशास्त्री)
श्री. स. अ. शुक्ल – (पुरवणी गीतें – रामशास्त्री).
श्री. विश्राम बेडेकर – (कथा – संवाद – शेजारी).
या खात्याचे अधिकार शांताराम बापूंकडे असत.
२). संगीत विभाग – या खात्याचे प्रमुख श्री. केशवराव भोळे व अधिकारी भागीदार शांतारामबापू. बालगंधर्व – प्रभात युतीनंतर श्री. मास्टर कृष्णराव यांची संगीत दिग्दर्शक नियुक्ती झाली.

केशवराव भोळे – (अमृतमंथन, चंद्रसेना, तुकाराम, रजपूत रमणी, कुंकू, माझा मुलगा, संत सखू, ज्ञानेश्वर, दहा वाजता, रामशास्त्री).
मास्टर कृष्णराव – (धर्मात्मा, अमरज्योती, वहां, गोपालकृष्ण, माणूस, शेजरी, लाखाराणी).
श्री. श्यामसुंदर ( नई कहानी ).
संगीत विभागांत ‘प्रभात’चे कायमचे नोकर म्हणून पुढील प्रमुख वादक होते – राजारामबापू पुरोहित – ऑर्गन, गणपतराव दामले – ऑर्गन पियानो, वसंत देसाई – संगीत दिग्दर्शकाचे सहाय्यक – सर्व वाद्ये वाजविण्यांत प्रवीण. बाबालाल रुकडीकर-सारंगी, बळवंतराव रुकडीकर – तबला, राम भोरपकर – तबला, मंगलप्रसाद – सितार, शामराव काळे – दिलरुबा , गिटार आणि डबल बास. पी. एन, होंबळ – बांसरी, रॉक फर्नांडीस – व्हायोलिन, जनार्दन पंडित – व्हायोलिन, राम कदम – क्लॅरीऑनेट, सेक्सेफॉन- ट्रंपेट यासाठी ख्रिश्चन वादक होते. त्यांची नवे स्मरणात नाहीत, श्री. पोरे – काष्ठतरंग, श्री. भोसले – व्हायोलिन, इंदिराबाई लाटकर – ऑर्गन, मेंडोलिन.
३) कॅमेरा विभाग :- खातेप्रमुख – श्री. व्ही. अवधूत, भागीदार अधिकारी – के. धायबर; व ते गेल्यानंतर दामलेमामा. ई. महंमद, एस. एन. भागवत (हल्ली फिल्मस डिव्हिजन), मेहता, मनोहर कुलकर्णी, गणपत काळे, बाळकृष्ण इत्यादी. याच खात्यांत इलेक्ट्रिशियन्स व लाइट बॉइज यांचा समावेश होतो.
३) अ. स्थिर चित्रण खाते :- खातेप्रमुख – पंत धर्माधिकारी, भागीदार अधिकारी – एस. फत्तेलाल, सुरेशबाबू, तुकाराम व गोट्या.
४) ध्वनि विभाग :- खातेप्रमुख – शंकरराव दामले, भागीदार अधिकारी – विष्णुपंत दामले, सदाशिवराव कुलकर्णी , बाबू शेख (पुढे वारले), श्री. दामले (ज्युनि), मीरासाहेब मुजावर, सदाशिव वाघ. याच खात्यात प्रोजेक्शन विभागाचा समावेश होता. कार्टून विभाग व स्पेशल इफेक्ट्स विभाग याच खात्यात असे.
५) कला विभाग :- खातेप्रमुख व भागीदार अधिकारी – एस. फत्तेलाल, सेंटिंग – श्रीपतराव मिस्त्री, सीन पेंटिंग – वसंत पेंटर, वासू सडोलीकर दळवी, छोटबा महाडिक, शिल्प आणि मूर्तिकार – श्री. बाळासाहेब थत्ते व परदेशी, पोस्टर्स – जि. मि. दीक्षित,काळे इत्यादी टायटल्स, शो-कार्ड्स-कुलकर्णी आणि साळुंके.
६) रंगभूषा, वेशभूषा विभाग – खातेप्रमुख – दादा परांजपे, भागीदार अधिकारी – प्रारंभी के. धायबर, नंतर शांतारामबापू, गुप्ते, लक्ष्मीबाई, अनसूयाबाई, वेषभूशा – दौलती व इतर.
७) शिवण खाते :- श्री. बाबालाल (फत्तेलाल यांचे बंधू) व सहकारी वाकस.
८) अॅक्टर्स डिपार्टमेंट – खातेप्रमुख – माने पहिलवान, भागीदार अधिकारी – के. धायबर, नंतर शांतारामबापू, नटनटींमध्ये करारावर घेतले जाणारे पहिल्या प्रतीचे नट -नटी -नलिनी तर्खड, दुर्गा खोटे, शांता आपटे, लीला चिटणीस, शांता हुबळीकर, वासंती, सुमती गुप्ते, जयश्री कामुलकर, अनिस खातून – (हिंदी पडोसी), हंसा वाडकर, उर्मिला (हिंदी डास बजे), मिस रोज, सुरैय्या (हिंदी नई कहानी), रत्नमाला, रत्नप्रभा, बेबी शकुंतला.

गौरी, सरोज बोरकर, गुलाबबाई (रजनी), शांता मुजुमदार, करुणादेवी, अमीनाबाई, यशोमती, मंजू डवरी, बालनटी सुमित्रा, पोटे, इंदिरा चिटणीस, शांता देशमुख, शकुंतला, वत्सला, देऊबाई, सत्यभामाबाई, तुळसा डवरी, लक्ष्मीबाई आणि इतर अनेक.
के. दाते, चंद्रमोहन, सुरेशबाबू माने, श्री. नानासाहेब फाटक, नारायणराव राजहंस (बालगंधर्व), प्रल्हाद, उल्हास, शाहू मोडक, राम मराठे, अनंत मराठे, मा. परशराम, मा. यशवंत, मा. बालकराम, जागीरदार, चंद्रकांत, परेश बॅनर्जी, वसंत ठेंगडी, मजहरखान, बी. नांद्रेकर, विष्णुपंत पागनीस, बुवासाहेब, मामा भट, पी. जयराज, बलवंतसिंग, मा. छोटू, काका भागवत, मांजरेकर, बाळकोबा गोखले, करमरकर, परशराम सामंत. रा. वि. राणे, गणपतराव तांबट, शंकर कुलकर्णी, मानाजीराव, किसन अग्निहोत्री, ताम्हनकर, हांडा, भाऊ केळकर, हरिभाऊ अडावलकर, कागलकर, दत्तोबा लुगडे.
९) लॅबोरेटरी – डेव्हलपिंग – प्रिंटिंग :- खातेप्रमुख – श्री. राम वणकुद्रे (व्ही. शांताराम यांचे बंधू. पुढे हे अकाली निधन पावले), त्यानंतर श्री. खोटे, कारखानीस, भागीदार अधिकारी – सीतारामबापू कुलकर्णी, राम मुगलखोड ( शांतारामबापूंचे मेहुणे. हेही पुढे अकाली स्वर्गवासी झाले.) कुलकर्णी, बेंद्रे, कुलकर्णी (सध्या फिल्मस डिव्हिजनच्या रसायन खात्याचे मुख्य), साळुंके, आमाराम (सीतारामबापू कुलकर्णी यांचे बंधू – पुढे हे सोडून गेले.)
१०) एडिटिंग – खातेप्रमुख – श्री. ए. आर. शेख (फत्तेलाल यांचे जामात). भागीदार अधिकारी – शांतारामबापू, अनंत माने, बाबुराव लिमये, बाबुराव मखद, रुकडीकर, अनंत आपटे, चाऊस, पांडुरंग खोचीकर इत्यादी.
११) अकौंट्स ऑफिस :- खातेप्रमुख – वासूनाना देसाई, आरंभी अकाउंटंट श्री. नेरुरकर नंतर श्री. झारापकर, हजारे, बाबा कुलकर्णी. भागीदार अधिकारी – सीतारामबापू कुलकर्णी.
१२) मॅनेजमेंट :- खातेप्रमुख – पी. के. पाठक, व्यवस्थापक व टायपिस्ट – श्री. डहाळे, चंपाराम (पुढे सोडून गेले) नंतर श्री. कृष्णन.
पहारेकरी, गेटकिपर इत्यादी
भागीदार अधिकारी – विष्णुपंत दामले.
१३) स्टोअर्स :- खातेप्रमुख – बाबालाल, सहकारी – अत्रे, बामन पट्टण कुडीकर, अडके इत्यादी
१४) सेंट्रल फिल्म एक्स्चेंज :- हा खास विभाग नंतर चालू करण्यात आला. या विभागातर्फे ‘प्रभात’च्या प्रकाशित होणाऱ्या चित्रपटांचे व्यावसायिक नियंत्रण केले जाई. खातेप्रमुख – श्री. गायतोंडे. ( गायतोंडे गेल्यानंतर श्री. हजारे ) आणि सहाय्यक रघुनाथ पुजार. हे खाते प्रायव्हेट लिमिटेड करून ते ‘प्रभात’ संस्थेच्या नियंत्रणाखाली चाले. भागीदार प्रमुख बाबुराव पै. बांधकाम, दुरुस्ती, रोजंदारी इ. बांधकाम खात्याचा वीरसिंग नावाचा प्रमुख होता आणि कंपनीत सतत काही ना काही नवीन बांधकाम चालू असे. त्यामुळे वीरसिंगची गाढवे ‘प्रभात’ स्टुडजिओत कलावंतांपेक्षाही अधिक ऐटीने व मोकळेपणाने मिरवत असत. वीरसिंग या माणसाला मृदु व खालच्या स्वरात बोलणे कोणी शिकवलेले नव्हते. शांतारामबापू व इतर भागीदार यांचे ध्येयधोरणे काहीही असो- वीरसिंग मात्र ‘प्रभात’ स्टुडिओ हा आपल्या कामासाठी चालू आहे- अशा थाटात वावरत असे. या खात्यांखेरीज सुतारखाते, गवंडी खाते, यात कितीतरी माणसे असत. ‘प्रभात’ स्टुडिओतील पाणीपुरवठा व तशाच प्रकारची इतर कामे पाहण्यासाठी जाधव नावाचे इंजिनिअर होते. यंत्रविषयक सर्वप्रकारचा सल्ला देण्यास श्री. सोहोनी हे इंजिनिअर होते. रोजबंदीच्या कामगारांचे प्रमाण कामाप्रमाणे कमीअधिक होत असे. ‘अमृतमंथन’ ते ‘रामशास्त्री’ या चित्रांच्या कालावधीत ‘प्रभात’मधील एकूण नोकरवर्ग अडीचशे ते तीनशेपर्यंत- अधिकच पण कमी नाही- असे.

प्रथम श्रेणीचे नट-नटी, लेखक, दिग्दर्शक व खातेप्रमुख या सर्वांना स्टुडिओत आल्याबरोबर हजेरीबुकात सही करावी लागे. कंपनीच्या ठरलेल्या वेळेपेक्षा या मंडळींना दहा मिनिटे उशीरा आले तरी चालेल अशी सवड होती. सही करताना वेळेचा उल्लेख करावा लागे. बाकी सर्व नोकरवर्गाला कंपनीत येताना व जाताना आपले कार्ड पंच करावे लागे. पाच मिनिटांपेक्षा अधिक उशीर झाल्यास कार्डावर उशीरा आल्याची निशाणी आपोआप नमूद होत असे. असा उशीर झालेल्या कामगारांचा त्या दिवसाचा एक तासाचा पगार कापला जाई. त्यामुळे वेळ गाठण्यासाठी कामगार धावत येत असत. या सर्व कामावर देखरेख करण्यासाठी गेटकीपर नेमलेला असे. कोणाचेही पाहुणे मालकांच्या परवानगीशिवाय शूटिंग पाहण्यास येऊ शकत नसत. मालक मंडळीही याबाबत कडक होती. अगदी आवश्यक असल्याशिवाय बाहेरच्या किंवा स्वत:च्या घरच्या मंडळींनाही शूटिंग पाहण्यास येण्यासाठी उत्तेजन न देण्याकडे त्यांचा कल असे.
‘प्रभात’चा स्टुडिओ हे पुण्यातील एक प्रेक्षणीय स्थळ बनले होते. स्टुडिओ पाहू इच्छिणाऱ्या अशा असंख्य रसिकांसाठी बुधवार व रविवार या दोन दिवशी सकाळी तास-दीड तास (कंपनी चालू होण्यापूर्वी) स्टुडिओ दाखविण्याची खास व्यवस्था करण्यात आली होती. त्यासाठी काही खात्यांतील मंडळी गाइड म्हणून काम करीत. या त्यांच्या कामाबद्दल त्यांना स्वतंत्र वेतन मिळे.कंपनीतील पहाऱ्याची जागा होती, त्याच्याच मागच्या बाजूस उपाहारगृहाची सोय होती. चहा, फराळ, शाकाहारी व मांसाहारी भोजन परवडणाऱ्या दरांत मिळत असे. कामाच्या वेळांत उपाहारगृहात चकाट्या पितात बसण्याची मनाई असे. उपाहारगृहाचे नोकर खात्याखात्यांतून चहा – फराळ, जेवण पोचवीत. ‘प्रभात’ स्टुडिओत प्रत्येक खात्याला स्टुडिओ – अंतर्गत टेलिफोन असे. त्यामुळे फार मोठी सोय होत असे. कामाच्या वेळात आपले काम सोडून इतर खात्यांत जाऊन चकाट्या पिटणे शिस्तीस सोडून असे. ज्या खात्यांतील कामगारांचा शूटिंगशी संबंध नाही त्यांनाही कारणावाचून शूटिंगच्या जागी जाण्यास किंवा ते बघत बसण्यास परवानगी नव्हती. नट – नटींपैकी ज्यांचे काम चालू नसेल पण ज्यांना शूटिंग पाहण्याची इच्छा असेल त्यांना स्टुडिओत दुसऱ्या मजल्यावर दोन गॅलऱ्या असत. तेथे बसून शूटिंग पाहता येई. थिएटरमध्ये रश – प्रिंट पाहतांना किंवा पार्श्वसंगीत चालू असताना किंवा चित्रपटाची कॉपी पहिली जात असताना संबंधित तंत्रज्ञांखेरीज इतरांना प्रवेश नसे.

प्रत्येक खात्याला लागणारा माल किंवा साहित्य किंवा इतर वस्तू खाते प्रमुखाने मागणीपत्रक भरून स्टोअर्सकडून मागवायच्या असत. चित्रपटासाठी आवश्यक त्या साहित्याच्या पुरवठ्याबाबत कंजूषपणा किंवा गैरवाजवी काटकसर केली जात नसे. चित्रपटाची सेटिंग्ज करताना त्या वेळी ती तकलादू करण्याकडे कल नव्हता. नैसर्गिक दिसेल व भक्कम राहील अशी उभारणी केली जाई. हल्ली चित्रपट धंद्यांत सर्वत्र सेंटिंगसाठी सर्रास कापड, थर्ड, कागद यांचा वापर केला जातो. ‘रामशास्त्री’पर्यंत तरी ‘प्रभात’मध्ये ही पद्धत नव्हती. कित्येक लोकांचा विश्वास बसणार नाही पण ‘कुंकू’ तील काकासाहेबांच्या दाराच्या भिंती खऱ्याखुऱ्या विटांच्या होत्या. ‘शेजारी’ अधिक स्टुडिओंतील बाहेरच्या अंगांस उभारलेला धरणाचा भाग दगडांचा व चुना विटांचा बांधण्यांत आला होता. जंगलाच्या दृश्यासाठी दररोज लागणारी ताजी झाडे, फांद्या, पालवी, फुले आणण्याची खास व्यवस्था असे. पहाटे तीन – तीन वाजता बाबजी मिस्त्री गाडी घेऊन कोथरूड किंवा त्यासारख्याच आसपासच्या गावी जाऊन जंगलांतून आवश्यक ती झाडे तोडून आणीत असे. हल्ली मुंबईच्या स्टुडिओतून सेटिंगमध्ये असलेल्या झाडाला फांद्या व पाने लावण्याबद्दल वेगळे पैसे दर दिवशी आकारण्यात येतात. ‘शेजारी’ तील पारिजातकाची झाडे जिवंत वाटावीत यासाठी ते चित्र दीर्घकाळपर्यंत चालू होते तरीही बाबाजीने आटापिटा केला. अखेरीस मालकांच्या बंगल्यांतील पारिजातकदेखील भुंडा करावा लागला. अशा वेळी खऱ्या फांद्यांना, पानांना व फुलांना लाजवतील अशा कृत्रिम फांद्या, पाने, फुले तयार केली जात ती निराळीच !

कंपनीचे चालक, खातेप्रमुख व कामगार या सर्वांत सहकार्य, व सौहार्दाची अकृत्रिम भावना असल्यामुळे असंतोष, संघर्ष, मतभेद यांना वावच नव्हता. प्रत्येक कामगार आपले काम आत्मीयतेने करी. ‘प्रभात’च्या श्रेष्ठ कलाकृतींच्या निर्मितीतील मीही एक पूरक घटक आहे. हा अभिमान प्रेरक ठरत असे. एखादे विशाल कुटुंबच गुण्यागोविंदाने नांदते आहे. याचा प्रत्यय प्रभात चित्रमंदिरांतील प्रत्येक हालचालीतूंन प्रतीत होत असे.

— शांताराम आठवले
पुस्तकाचे नाव :- प्रभातकाल
लेखक :- शांताराम आठवले
(सौजन्य : व्हीनस प्रकाशन)

ठेवणीतले लेख

    आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा



    [recaptcha]

    काही निवडक प्रतिक्रिया:

    नरेंद्र चौधरी


    आपल्या संकेतस्थाळाच्या माध्यमातून असे लक्षात आले कि आपन खूप छान माहिती पुरवत आहात.
    संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया