अतिथी कट्टा

दिनांक : ३०-०६-२०१८

‌‘फॅंटम’चा विश्वास सार्थ ठरवायचाय – मकरंद माने

राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक मकरंद माने हे नेहमीच वैविध्यपूर्ण कथा आणि त्यांच्या आगळ्या हाताळणीच्या माध्यमातून चित्रपटनिर्मिती करण्यासाठी ओळखले जातात. ‘यंग्राड’ हा त्यांचा आणखी एक तसाच ‘हट के’ चित्रपट घेऊन ते येत आहेत. या चित्रपटाबद्दल त्यांचे हे मनोगत
——

‘यंग्राड’ ही चार मित्रांची गोष्ट आहे. हा चित्रपट आम्ही नाशिकमध्ये बसून लिहिला. म्हणून चित्रपटाच्या कथानकाला तिथलीच पार्श्वभूमी आम्ही दिली आहे. चित्रपटाची पटकथा शशांक शेंडे आणि अझीझ मदारी यांच्यासह लिहिली आहे. ‘यंग्राड’ हे शीर्षक आम्ही जाणीवपूर्वक दिलं आहे. साधारणपणे वाईट गोष्टींसाठी हा शब्द वापरला जातो. मात्र आम्ही त्याचा सकारात्मकतेनं चित्रपटात उपयोग करायचं ठरवलं आहे. ‘यंग्राड’ला समानार्थी जाणारा शब्द म्हणजे ‘टुकार’. मला स्वत:ला असं वाटतं या शब्दाला नकारात्मक ढब असली तरी पौगंडावस्थेतील मुलांनी थोडा तरी टुकारपणा केला पाहिजे. मात्र त्यावर स्वत:च्या निश्चितच मर्यादा असल्या पाहिजेत. मजा, मस्त, गंमत करताना आजच्या तरुण पिढीला कुठं थांबायला हवं हे कळायला पाहिजे. कुठल्या पातळीपर्यंत आपल्याला मजा करायचीय हे मुलांनाही ठरवता आलं पाहिजे.

ही झाली नाण्याची एक बाजू. या नाण्याच्या दुसऱ्या बाजूवर आहेत पालकवर्ग. त्यांचीही आपल्या पाल्यांबाबत काही निश्चित भूमिका असायला हवी. आपल्या मुलांना खेळायला, मजा-मस्ती करायला त्यांनी मोकळं वातावरण द्यायलाच पाहिजे. मात्र एका ठराविक पॉइंटनंतर आपली मुलं घराबाहेर पडल्यानंतर नेमकं काय करतात, याकडेही त्यांनी लक्ष्य द्यायला हवं. मात्र ‘यंग्राड’ चित्रपटात मुलांकडून मर्यादा ओलांडल्यानंतर एक घटना घडते आणि नंतर त्याचे घडणारे परिणाम पाहायला मिळतात. ‘यंग्राड’ हा बोलीभाषेतील प्रचलित शब्द असून तो भारताची दक्षिण काशी (दक्षिण बनारस) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकमध्ये उनाड मुलांसाठी वापरला जातो.

एखाद्याबरोबर भांडण उकरून काढणे किंवा मित्राला त्याच्या स्वप्नपरीबरोबर सूत जुळवायला मदत करणे यासाठी हे चारही मित्र नेहमीच एकमेकांच्या मदतीला धावून येत असतात.पण या संस्कारक्षम वयात चुकीचे आयडॉल समोर असल्याने हे चार युवक नेहमीच अडचणीत सापडतात. त्याचा परिणाम त्यांच्या आयुष्यावर होतो आणि आपल्याला आयुष्याची सर्व माहिती आहे, अशा आविर्भावात वावरणारे हे चौघे एका क्षणी अशा निष्कर्षाला येतात की त्यांचे आयुष्यच विस्मरणात गेल्यासारखे होते. त्यानंतर मग ते स्वत्वःचा शोध घेऊ लागतात आणि आयुष्याच्या नवीन प्रवासाला लागतात.

‘रिंगण’नंतर या चित्रपटातही मुलं हेच माझं भावविश्व आहे. काही जण मला विचारतात की तुम्ही फक्त लहान मुलांवरचेच चित्रपट करणार आहात का? या प्रश्नाचं उत्तम निश्चितच नाही असं आहे. कारण, माझ्या दृष्टीनं त्या त्या वेळी सुचलेलं कथानक आणि त्या कथानकामुळे निर्मात्याचं नुकसान होऊ नये, एवढंच माझ्यासाठी महत्त्वाचं असतं. त्यामुळे भविष्यात वेगळं काही सुचलं तर ते मी पडद्यावर आणेन. युवा संगीत दिग्दर्शक हृदय गट्टानी आणि गंगाधर यांनी संगीत दिले आहे. चित्रपटातील गाणी क्षितीज पटवर्धन, दत्ता पाटील आणि माघलुब पूनावाला यांनी लिहिली आहेत. यातील चार गाणी शंकर महादेवन, दिव्य कुमार, शाश तिरुपती आणि हृदय गट्टानी यांनी गायली आहेत. शरद केळकर, सविता प्रभुणे, शशांक शेंडे यांच्यासह या चित्रपटात चैतन्य देवरे, सौरभ पडवी, शिव वाघ, जीवन कराळकर आणि शिरीन पाटील यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाचं कथानक नाशिकमध्ये घडत असल्यामुळे मला तिथलीच मुलं हवी होती. तिथल्या वातावरणाला सरावलेली मुलं असली की त्यांना त्यांची व्यक्तिरेखा समजण्यास फारसा वेळ लागत नाही. नाशिकचा घाट आणि तिथल्या भाजीपाल्याच्या बाजारपेठेत आम्ही चित्रण केलंय. हे चित्रण वास्तवदर्शी व्हावं आणि मुलंही कॅमेऱ्यामुळे बावरू नयेत यासाठी आम्ही ‘गोरिला’ तंत्राचा उपयोग केला आहे. या चित्रपटाच्या निर्मितीसाठी ‘फॅंटम’ संस्था आमच्यामागे भक्कमपणे उभी राहिली. या संस्थेचा हा पहिलाच मराठी चित्रपट आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत या संस्थेचा मोठा दबदबा आहे. आजवर अनेक चांगल्या नि वेगळ्या कलाकृती त्यांनी दिल्या आहेत. त्यामुळे त्यांनी आमच्यावर दाखवलेला विश्वास मला मोलाच वाटतो. तो सार्थ ठरविण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे.

– मकरंद माने

ठेवणीतले लेख

आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा[recaptcha]

काही निवडक प्रतिक्रिया:

रावसाहेब मगदूम रुई,कोल्हापूर

नाटक आणि सिनेमा क्षेत्रात कोल्हापूर मध्ये राहूनच कोल्हापूर मधील अनेक दिग्गज कलावंत घडविणेचे कार्य ज्यांनी केले असे थोर कलावंत जयशंकर दानवेसाहेब यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन

संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया