अतिथी कट्टा

दिनांक : ०९-११-२०१८

‌‌‌‌‌‌‌‌पापांचे अखेरचे अखेरचे क्षण
बाबुराव पेंढारकर यांचा ९ नोव्हेंबर हा स्मृतिदिन. त्यानिमित्तानं बाबुरावांच्या आठवणी जागवणारे दोन लेख आम्ही प्रसिद्ध करीत आहोत. पहिला लेख बाबुरावांच्या भगिनी सरलाबाई कुळकर्णी यांनी लिहिला आहे, तर दुसरा लेख बाबुरावांचे पुतणे प्रभाकर पेंढारकर यांचा आहे. या दोन लेखांमधून बाबुरावांच्या व्यक्तिमत्त्वामधील अनेक विविध पैलू पाहायला मिळतात.

——
सौ. सरलाबाई कुळकर्णी या बाबुराव पेंढारकर यांच्या भगिनी होत्या. पेशाने नर्स (परिचारिका) होत्या. आपल्या भावाच्या अखेरच्या दिवसांची परिस्थिती त्यांनी ‘बाबुराव नावाचं झुंबर’ यापुस्तकामधील एका लेखामधून अत्यंत हृद्य शब्दांमध्ये मांडली आहे. त्याचा हा संपादित भाग.

हे सगळं लिहिण्याइतकी मी विदुषी नव्हे. मी स्वतः कोणीच नाही, ह्या जगातल्या कोपऱ्यातील एक कण, पण पूर्वजन्मीच्या पुण्याईवर, एकाच नव्हे, तर अनेक जन्मांची पुण्याई घेऊन, अनेक पुरुषोत्तम भावांचा मला लाभ झाला. जगाच्या इतिहासात निरपेक्ष प्रेम असेल तर ते कृष्णद्रौपदीचे! द्रौपदीला एकच कृष्ण होता, मला अनेक कृष्ण लाभले. सर्वात मोठे बाबुराव. त्यांना उपमाच द्यायची झाली तर इच्छामरणी भीष्माची ! त्यांनी जे मृत्यूचं स्वागत केलं त्याचं वर्णन करण्याइतके शब्द माझ्याजवळ नाहीत. सर्वसुखाचा आणि ऐश्वर्याचा उपभोग घेणारा हा आमच्या घरातला युवराज. सर्वसंग परीत्यागी ज्ञानेश्वराप्रमाणे हसत निघून गेला. जग सोडून स्वर्गात नव्हे, तर ह्या घरातून त्या घरात, इतक्या सहजतेनं !

कुठून तरी माझ्या बहिणीनं कळवलं की पपांना (बाबुरावांना) बरं नाही, कल्पना नव्हती किती बरं नाही, तरी मनानं ओढ घेतली. लगेच जायला पाहिजे, जाऊन पाहते तो भीष्माप्रमाणेच मला पपा दिसले. ते होते गादीवर. पण मला वाटत होतं की , त्या क्षणाची वाट पहात ते शरावर निजले आहेत. तो निर्विकार चेहरा, ते भावरहीत डोळे पाहून, मला वाटलं की हे आपल्यात नाहीत. इथं असून हे आपल्यापासून दूर आहेत, तितक्याच निर्विकार वृत्तीनं वहिनी माझी समजून घालीत होत्या. त्या म्हणत होत्या, ‘ते कुणालाही कळवू नका म्हणाले, म्हणूनच कळवलं नाही. त्यांना बिचाऱ्यांना कल्पना नव्हती की पपांची प्रकृती शेवटचे क्षण मोजते आहे. त्यांची समजूत झाली की मला कळवलं नाही म्हणून मी रडते आहे.

भालूदादा (भालजी ) बसले होते. मला होणारं दुःख, रडण्याचे येणारे हुंदके ह्या दोन खंबीर माणसांच्या पुढे व्यक्त करण्याची लाज वाटू लागली. मी बाहेर जाऊन खूप रडले. दुःख कमी झाल्यावर आत येऊन बसले. मी रडले हे माहित असताना काहीच झालं नाही असं ते दोघे वागले. मीही त्यांच्यात मिसळून गेले. थोड्याच वेळात त्यांची मुलगी चहा घेऊन आली, त्यांनी सांगितलं, ‘उठवून बसावं,’ त्यांनी आपल्या हातात कप घेऊन चमच्यानं चहा पिण्यास सुरुवात केली. चहा पिऊन झाला आणि ते म्हणाले, ‘संडासला जातो,’ भालूदादा म्हणाले, ‘बेडपॅन घ्या” ते म्हणाले, ‘नाही, मी बाथरूममध्ये जातो.’ बायकोच्या आणि मेल नर्सच्या खांद्यावर हात ठेवून ते बाथरूममध्ये गेले. माझा विश्वास माझ्या डोळ्यावर बसेना. तीस वर्षे मी नर्सचं काम करते आहे. असा निर्जीव मनुष्य ज्याच्या तोंडावर प्रेतकळा आहे तो उठून बसतो, चालतो आणि आपल्या हातांनी चहा पितो ही गोष्ट मनुष्याच्या बुद्धीला त्यातल्या त्यात माझ्यासारख्या जन्म-मृत्यू पहाणाऱ्या व्यक्तीला हा चमत्कार होता. किंवा धंद्यातील माझं ते अज्ञान होत. शेवटी मी अज्ञानी आहे असंच माझ्या मनाला सांगितलं ! मी त्यांचा बिछाना साफ केला. त्यांना शिरेतील इंजेक्शन देण्यास मदत केली. पाणी विचारलं, ‘अरे इंजेक्शन आज जास्त दुखत कसं नाही.” दोनच शब्दात त्यांनी माझं कौतुक केलं. संध्याकाळ झाली होती. भालूदादा म्हणाले, “अगं जा ना आता, तुझे पेशंट तिथे तुझी वाट पहात असतील.” मी पपांना विचारलं, “पप्पा जाऊ मी ?” ते म्हणाले, “जा , येत जा सवडीनं.”
‘मी उद्या येत नाही. परवा दिवशी जरूर येते.’ असं सांगून मी निपाणीला परत आले. ती तारीख होती १-११-१९६७ !

दिनांक ३/११/१९६७ रोजी पाडवा होता आणि भाऊबीज. आईच्या मृत्यूनंतर आम्ही भावंडं कधीच एकत्र आलो नव्हतो. दादा (मा. विनायक) वारल्यानंतर दिवाळी आणि भाऊबीज मी कधीच केली नाही. तिथं मी अगदी सकाळीच गेले. भालूदादाची मुलं आणि नातवंडं पपांच्या आणि त्यांच्या पाय पडण्यासाठी आली होती. भावाच्या सेवेसाठी पाडव्यासारख्या दिवशी पण आपल्या बायकांना भेटण्यासाठी भालूदादा गेले नव्हते. मुलं आणि नातवंडं भीत भीत अंदाज घेत विचारत होती, कधी येणार घरी ? ते सांगत होते, रात्रीपर्यंत एकदा येऊन जाईन. खूप दिवसांनी पाडव्याच्या मुहूर्तावर अशा धीराच्या आणि कर्तव्यतत्पर भावाचं दर्शन मला झालं. त्या दोघांच्या पाया पडताना जन्माचं सार्थक झालं असं वाटत होतं मला. भालूदादा पपांना विचारत होते, “शांतारामबापूंना कळवू का, तुमची प्रकृती बरी नाही म्हणून.” त्यांनी सांगितलं, “नको, तसं कळवू नका. ‘राजकमल’ संस्थेचा पंचविसावा वाढदिवस आहे. माझ्या आजाराचा जरा जरी त्याला संशय आला तर तो सारं तिथंच सोडून धावत येईल.”

ज्याप्रमाणे उंट पाणी साठवून ठेवतो, त्याप्रमाणे मी पपांची जमेल ती सेवा करीत होते. डोक्यावरून हात फिरवीत होते. तळव्यावरून हात घासून जे सांगता येत नव्हतं ते स्पर्शाने सांगण्याचा प्रयत्न करत होते. ते ओळखूनच पपा म्हणाले, “आक्के, तुझ्यासाठी मी काहीच केलं नाही.” मी म्हटलं, ” पपा आम्हाला तर वडील नव्हते. तुम्हालाच तर मी पपा म्हणू लागले. लहानाचे मोठे तुम्हीच केलेत. तुमच्याच जीवावर आम्ही चालू लागलो, बोलू लागलो. चालणाऱ्यानं स्वतःच्या पायानं चालायचं असतं, स्वतःच्या तोंडान बोलायचं असतं. पैशानं पोसणं म्हणजे माणसाला दुबळं करणं. आपल्या घराण्याचं वैशिष्ट्य आहे ते हे की, प्रत्येकजणानं स्वकष्टार्जित रहावयाचं!” अर्थात हे बोलण्याची शक्ती माझ्या वाचेत नव्हती. माझे अश्रू आणि माझा स्पर्श हे बोलण्याचं काम करीत होतं.

रविवार दिनांक ५/११/१९६७ची सकाळ उजाडली. बाहेरून माझे पती धावतच आले आणि म्हणाले, “चल आधी, पपा काल बेशुद्ध होते असं वर्तमानपत्रात लिहिले आहे.” मी म्हटलं, “अहो, असं कस होईल ? कालच तर आपण गेलो नव्हतो !” लगेच आम्ही कोल्हापूरला आलो. नेहमीप्रमाणं स्थितप्रज्ञ भावांची जोडी नेहमीच्या स्थितीत होती. एक होता शरपंजरी भीष्म आणि दुसरा होता हनुमानाची ठीक भक्कम बैठक घालून ! मी पपांना विचारलं, “पपा बरं आहे ना ?” ते म्हणाले, “अगं आज छान आहे. काल जुलाब झाले आणि अशक्तपणा आला. तू कुठं होतीस ? भाऊबीज होती आणि तू एकदम गेलीस. जाऊ नको म्हणायचे माझ्या ध्यानातच राहील नाही. परत ते ग्लानीत निजून राहिले. डॉ. भद्रे, डॉ. पाध्ये येत होते. ग्लुकोज सलायनचं प्रमाण वाढवलं होतं, त्याचा अर्थ असा की जीवनाचं एक एक बंधन तुटत होतं. जीवन जगण्यासाठी बाह्य उपचाराची जरूर होती. आम्ही सर्व शांतपणे बसलो होतो. कोणीच कुणाशी बोलत नव्हतो, इतकंच नव्हे तर एकमेकांकडे पाहिलं तर संयम सुटेल आणि दुःखाला एकदा सुरुवात झाली तर कुणालाच आवरण शक्य नव्हतं ! ज्याला आजार होता, ज्याला दुखत होतं ती व्यक्ती इतक्या शांतपणानं सोसत असताना त्याचं मन विचलित कसं करायचं आणि चुकून जर आमच्याकडून असं झालं असतं तर भालूदादानीं एक मिनिट तिथं बसू दिलं नसतं. या शांत वातावरणात गोंधळ ऐकू आला. आम्ही गच्चीवर जाऊन पाहिलं तर अण्णा (शांतारामबापू ) आणि संध्याबाई येत होत्या. ही दोन माणस इतकी दमली भागलेली होती की, पपांना होणाऱ्या वेदना त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होत्या. भालूदादांनी हाक मारून पपांना सांगितलं, ‘बाबुराव, पाहिलंत का, शांतारामबापू आलेत,’ त्यांच्याकडे पाहून इतक्या समाधानानं पपा हसले की, जणू काय अर्जुन त्यांना तृप्तीचं पाणी पाजण्यासाठी आला होता. ‘आलात फार बरं वाटलं’ म्हणून त्यांनी जे बोलायला सुरुवात केली, तो उत्साह थांबवता थांबवता पुरेवाट झाली. ते म्हणू लागले, “अरे तू माझ्यासाठी इतकं केलंस, मुलगा करणार नाही इतकं तू केलंस. ‘ ‌राजकमल’च्या जुबिली समारंभाला मी येऊ शकलो नाही पण मला इथून सारं दिसत होतं.
——————————————————–
——————————————————–

लेख दुसरा

माझे काका

रस्त्याच्या दोन्ही बाजूस हिरवीगार भातशेती.
त्यामध्ये वाऱ्याबरोबर डोलणाऱ्या नारळी.
सकाळची वेळ , प्रसन्न वातावरण.
मद्रास ते कांचीपुरम हा रस्ता.
धावणाऱ्या मोटारीतून मी बाहेरील सुखद निसर्ग पाहतो आहे.

कुठंतरी रेल्वे फाटकाशी मोटार थांबते.
फिल्म्स डिव्हिजनचे चीफ प्रोड्यूसर वाधवानी मला म्हणतात,
‘आय एम सॉरी, पेंढारकर.’
मला समजत नाही. प्रश्नार्थक मुद्रेनं मी त्यांच्याकडं पाहतो. ते मला विचारतात,
‘सकाळी वृत्तपत्र पाहिलं नाहीत ?’
‘नाही. ते येण्यापूर्वीच गाडी आली आणि तुम्हाला घ्यायला आम्ही निघालो.’
‘तरीच… ‘
हे तरीच म्हणजे काय ?
मी अद्याप समोरच्या निसर्गात हरवलेला.
‘आज पहिल्याच पानावर बातमी आहे… तुझे काका बाबुराव पेंढारकर इज नो मोअर देअर …. ‘

हे शांत वातावरण, धाडधाड आवाजाने विस्कटून टाकत समोरून मालगाडी धावते आहे.
लांबलचक डब्यांची रांग शेवटी कधीतरी संपते. फाटक उघडलं जात वाधवानी मला म्हणतात.
‘मला हे माहित नव्हतं की तू ही बातमी वाचलेली नाहीस. आपण परत जाऊ या का?’
मी नको म्हणतो. गाडी सुरु होते.
फिरून हिरव्यागार भातशेतीतून आणि डोलणाऱ्या नारळीतून आमचा प्रवास सुरु होतो.
निसर्ग तोच आहे. मी मात्र मघाचा राहिलो नाही.
येथून हजार एक मैल दूर असलेल्या कोल्हापूरला पोहोचलो आहे.

राजारामपुरी पाचव्या गल्लीत, राजस्थानी घुमटामुळं उठून दिसणाऱ्या वास्तूत पहिल्या मजल्यावरील हॉलच्या उंबरठ्याजवळ मी उभा आहे. माझ्या अगोदर घरची सगळी मंडळी तिथं पोहोचली आहेत. रंगभूमीवरील व चित्रपट व्यवसायातील अनेक कलाकार, तंत्रज्ञ, डॉक्टर, वकील आणि विविध क्षेत्रातील काकांची मित्रमंडळी. काकांचा लोकसंग्रह फार मोठा, स्वतःच्या व्यवसायाच्या चार भिंतीत न मावणारा.

आजच्या अनेक वृत्तपत्रात काकांचे फोटो असतील. अनेकांनी वाहिलेली श्रद्धांजली. अग्रलेख, अनेकांच्या आठवणींची झुंबरे !

ह्या झुंबराच्या लोलकांतून पाहावीत तशी काकांची रूपे विविध. त्यांच्या रंगछटाही वेगवेगळ्या.

जानवे वरखाली करत हसणारा खलनायक गंगनाथ, प्रसन्न सात्विक व्यक्तिमत्त्वाचे ज्योतिबा फुले, आडदांड, राकट विठू महार, मिस्कील हसत आपलं खोटंच नाव सांगणार प्राणनाथ, हातातल्या बेड्यांना न जुमानता आदिलशहाच्या दरबारात दिमाखाने प्रवेशणारे राजे शहाजी भोसले, आपल्या प्राणप्रिय पत्नीचा मत्सराने गळा दाबणारा खुनी झुंझारराव, डॉक्टरांच्या ऑपरेशन टेबलवरील कात्री उचलून हळूच आपल्या मिशा कापणारा चिनी सैन्यातील मिस्किल वरिष्ठ अधिकारी आणि कितीतरी विख्यात बॅरीमुर कुटुंबातील सर्वांनी मिळून जितक्या भूमिका केल्या आहेत, त्यापेक्षा जास्त वेगवेगळ्या भूमिका मी केल्या आहेत असं स्वतः बद्दल त्यांनी एका ठिकाणी लिहिलं आहे, त्यात एवढीही अतिशयोक्ती नाही.

‘लव्हेंडर हिल मॉब’ मधला बँकेतील साधाभोळा, प्रामाणिक कारकून, ‘ब्रिज ऑन रिव्हर क्वॉय’ मध्ये कणखर शरीराचा आणि खंबीर मनाचा ब्रिटिश कर्नल होतो, आणि पुढच्या चित्रात अरबी शहा होऊन ‘लॉरेन्स ऑफ अरेबिया ‘ मध्ये प्रेक्षकांसमोर उभा राहतो. ह्या विविध भूमिकांबद्दल आलेख गिनीस यांना ‘सर’ हा सन्मान इंग्लंडची राणी देते. तितक्या विविध भूमिका त्याच कौशल्याने काकांनी केल्या आहेत.
जेव्हा ही संपन्नता नटाच्या अभिनयात नसते तेव्हा दोन-चार यशस्वी भूमिकांचा त्या नटाला लेबल लागतं. रोमँटिक नायक प्रत्येक चित्रात कुणाच्या तरी प्रेमात पडतच राहतो आणि खलनायक हा नेहमीच कुणाचा तरी सुड घेत असतो. फॅन्सी ड्रेस स्पर्धेसारखे फक्त कपडे बदलत असतात, अभिनय तोच राहतो. काकांनी हे स्वतःबद्दल कधीच होऊ दिलं नाही. खलनायकापासून सत्प्रवृत्त साधुसंतापर्यंत वेगवेगळ्या भूमिका करायला स्वतःबद्दल आणि प्रेक्षकांबद्दल कमालीचा विश्वास नटाच्या मनात असावा लागतो.

काकांच्या मनात तो इतका जबरदस्त होता की, शेक्सपिअरच्या जन्मगावी, दरवर्षी, त्याच्या स्मृतिदिनाच्या सोहळ्यात जगभरच्या नाटककंपन्या त्यानं लिहिलेली नाटक सादर करतात. त्या स्पर्धेत “झुंझाररावाला पारितोषिक मिळालं नाही तर आपण भारतात परतणार नाही.” असं त्यांनी शांतारामबापूना सांगितलं होत.

ह्या अशा विस्मित करणाऱ्या जीवनाची सुरवात विष्णूच्या भूमिकेपासून ती भूमिका करणारा नट आला नाही म्हणून बाबुराव पेंटरांनी प्रॉडक्शनच काम पाहणाऱ्या बाबुराव पेंढारकर ह्या तरुणास मेकअप करून येण्यास सांगितलं. संवाद नाहीतच, प्रकट व्हायचं आणि ध्रुवाला आशीर्वाद द्यायचा. बस्स, एवढाच काम !

पडद्यावर विष्णू प्रकटला तसा प्रेक्षागारात टाळ्यांचा कडकडाट झाला. स्वतःच्याच भूमिकेवर खुश झालेल्या बाबुरावांनी हे बाबुराव पेंटरांना सांगितलं, तसे ते म्हणाले, ‘ह्या टाळ्या तुम्हाला नाहीत, त्या विष्णूला आहेत. हे काम कुणीही केलं असत तरी या पडल्याच असत्या.’ पहिल्याच भूमिकेच्या यशानं हवेत तरंगणारे बाबुराव क्षणात जमिनीवर आले. “मी फिरून भूमिका करीन ती अशी असेल की तिला मिळणाऱ्या टाळ्या माझ्याचसाठी असतील.” हा मनाशी निश्चय ठरला. त्याकरिता अविश्रान्त श्रम, बारीक सारीक गोष्टींचं निरीक्षण, एकेका लकबीचा शोध, संवादाच्या वैशिष्टयांचा अभ्यास, पोशाख, मेकअप, हसण्याची, पाहण्याची पद्धत ह्या सर्वांतून ती व्यक्ती जिवंत उभी करण्याचा ध्यास… ‘राजा हरिश्चंद्र’ मधील गंगनाथ पडद्यावर आला तेंव्हा लोकांनी टाळ्या नाहीत दिल्या. बायकांनी बोटं मोडली. मेल्याचं तळपत होऊ देत म्हणून शिव्या दिल्या. पहिल्या खेळाला आपल्या मुलाचं काम कौतुकं पाहण्यास आलेल्या आईला, आजूबाजूच्या प्रेक्षकांतून मिळणाऱ्या शिव्या ऐकून, कमालीचा राग आला आणि तीन थिएटरमध्येच त्यांची कानउघाडणी केली. तसे बाबुराव म्हणाले, ‘आई, माझी भूमिका यशस्वी झाल्याचं मला मिळालेलं हे मोठंच प्रशस्तिपत्र !’

ही किमया पडद्यावर अथवा रंगमंचावर प्रेक्षकांना दिसे. त्यामागची, साधना मी पहिली आहे. ‘सीमेवरून परत जा’ नंतर ‘शिवसंभव’ ह्या नाटकाच्या तालमी सुरु झाल्या. दिग्दर्शक होते केशवराव दाते. जिजाबाईंच्या वडिलांची- जाधवरावांची भूमिका बाबुराव करत होते. पूर्वीचं नाटक, संवाद लांबलचक. कुठंतरी विस्मरण झालं की बाबुराव अडत. राजकमलचे मॅनेजर वासुनाना देसाई त्या दिवशी तालमी पाहायला आले होते. ते म्हणाले, ‘बाबुराव, साठी उलटली. आता पाठांतराची शक्ती कमी होतेच. तुम्ही कशाला हा त्रास घेताहात ?’

मी त्या वेळी काकांच्या बरोबर ‘नाझ’ सिनेमाजवळच्या इमारतीत राहत होतो. केंव्हातरी पहाटे जाग आली. पाहतो तो काका टेबललॅम्पच्या प्रकाशात त्यांचे संवाद पाठ करत बसलेले. पुढे हा क्रम रोजचाच. पहाटे चारला काकांचे पाठांतर सुरु होई. रात्री कुठं ते पार्टीला गेले तर परतायला मध्यरात्र उलटून जाई, पण ह्या पहाटेच्या पाठांतरात कधी खंड पडला नाही. ‘शिवसंभव’च्या पहिल्या प्रयोगाला मला मिळालेली खुर्ची नेमकी वासूनानांच्या मागची, जाधवरावांचे रुबाबदार व्यक्तिमत्व, पल्लेदार संवादांची सहज फेक आणि भूमिकेतला जिवंतपणा, पत्रकारांइतके वासूनानाही भरून गेले. पहिला अंक पडला. तेव्हा टाळ्यांचा कडकडाट झाला. तो संपत आला तरी वासुनाना टाळ्या वाजवतच होते. मला आठवण झाली. ‘जी भूमिका मी करीन, तिला मिळणाऱ्या टाळ्या ह्या माझ्याच असतील’. ‘फुल खिले गुलशन गुलशन’ ह्या कार्यक्रमात तब्बसुमनं काकांची कोणती भूमिका पडद्यावर दाखवली असती, मला माहित नाही. पण मुलाखत मी घेतली असती तर जे दोन प्रसंग मी निवडले असते ते माझ्या स्मृतीत कोरले गेले आहेत.

त्यापैकी एक, ‘मी दारू सोडिली’मधला. जहागीरदारांनी रागाच्या भरात आपल्या मित्राच्या मुलाशी घरातल्या कोणी संबंध ठेवायचा नाही म्हणून सर्वांना बजावलं. त्यांची मुलगी बेबी शकुंतला ते न ऐकता त्या मुलाला भेटते. जहागीरदारांना हे समजलं तसं ते कधी नाही ते आपल्या लाडक्या मुलीवर रागावतात. इतके की दारूच्या नशेत काठी घेऊन मारायला येतात. त्या चित्रीकरणाच्या दिवशी बेबी शकुंतलाचा मूड एकदम चेष्टेचा ! तिनं विचारलं, ‘तुम्ही काठी घेऊन मारायला आल्यावर मी घाबरले पाहिजे ?’
‘होय. ‘
‘पण मला तुमची भीतीच वाटत नाही. मी घाबरले नाही तर तुम्ही मला माराल ?’
‘मारेनही! पण तशी पाळीच यायची नाही. तू घाबरशील.!’
‘पाहू, मी नाहीच घाबरायची!’

हे सारं खेळीमेळीचं बोलणं झालं आणि लायटिंगला सुरवात झाली. आतल्या खोलीचं दार बंद करून काका एकटेच बसून राहिले. बाहेरच्या हॉलमध्ये बेबी शकुंतलानं आपल्या संवादांची व हालचालींची तालीम केली. कॅमेरा, लायटिंग, सगळ्यांची तयारी झाली. असिस्टंटने दार वाजवून काकांना एक वेळ रिहर्सल पाहू या म्हणून सांगितलं. काकांनी दार उघडलं नाही. आतूनच ते म्हणाले, ‘शॉटच घेऊ या. तुम्ही दार वाजवलं की मी उघडून बाहेर येईन. ‘
कॅमेरा सुरु झाला. बेबी शकुंतला बाहेरून आली. गड्यानं सांगितलं, “आबासाहेब खूप रागावल्यात तुमावर. कवधरनं दार बंद करून बसल्यात.”
“मी आता राग काढते त्यांचा ‘ म्हणत बेबी दाराजवळ आली आणि तिनं ‘आबा, आबा ‘ म्हणून हाक मारली. दरवाजा वाजवला. दरवाजा उघडला गेला. दारूची जबरदस्त नशा, स्वतःचा तोल सावरतानाही. डोळे तांबरलेले, झोकांड्या खात जहागीरदार पुढं आले. मुलीला त्यांनी विचारलं.
“कुठं होता तुम्ही ?”

तुझी कीर्ती, नाव लौकिकाच्या दुंदुभी वाजत असताना मी बोलायचं नाही तर कधी बोलायचं ते सांगा तरी !’

मग तेथल्या समारंभाची पुस्तक, फोटो, आणि बॅचेस संध्याबाई त्यांना दाखवत होत्या. अण्णांनी सांगितलं, “बाबुराव, हे सारं तुमच्यासाठी आणलं आहे.” पपा हसत होते. आनंद त्यांच्या तोंडावर खेळत होता. अण्णांनी हळूच विचारलं, ‘बाबुराव, मी आऊटडोअरला गेलो आणि तिथं ट्रीटमेंट चालू होती. ती सोडून तुम्ही कोल्हापूरला का आलात ?’ पपा म्हणाले, “त्याची कारणं मग सांगेन. पण तुमची कीर्ती ऐकून मी आज आनंदात आहे!” संध्याबाई म्हणत होत्या, “दादासाहेब, तुम्ही तर आजारी दिसत नाही. उद्या दाढी केलीत की तुम्हाला अगदी ताजतवानं वाटेल.” पपा म्हणाले, “खरंच, बाई मी अगदी ठीक आहे !” हास्यविनोद आणि एकमेकांच्या प्रेमानं घर ओसंडून चाललं होतं. आजार नावाची गोष्ट जणू काय घरातच नव्हे तर जगातही नव्हती. पण भालूदादा मात्र तडफडत होते. विश्रांती पाहिजे, हे फार होतंय, शेवटी न राहवून ते बोलले, “बाबुराव, झोपा आता. फार दमलात !” त्या शांत माणसानं परत आपल्या मनाला संयमानं आवरलं आणि सांगितलं अण्णांना, ‘तुम्ही दमला असणार दिवसभर. विश्रांती घ्या जा’ आणि आपण शांत झोपून राहिले. ती ग्लानी होती अतिश्रमाची !

दुसऱ्या दिवशी आम्ही सर्वानी डॉक्टरांच्या सल्ल्याने ठरविलं की , घरच्यापेक्षा हॉस्पिटलमध्ये शुश्रूषा चांगली होईल. आम्हा सर्वांनाच माहिती होतं की, ही शेवटची वेळ आहे. कॅन्सरच्या रोग्याला होणाऱ्या यातना आणि ती सोसत असताना रोग्याच्या अंगाची आणि नातलगांची जीवाची होणारी घालमेल या कल्पनेनेच आमचे सर्वांचे जीव बेजार झाले होते. मला तर वाटत होतं, आमच्या आईचा हा सर्वात लाडका मुलगा. हा नव्याण्णव ताप असताना घर डोक्यावर घ्यायचा. ‘ज्वाला’ नावाचं पिक्चर पडलं म्हणून त्यांना ताप भरला आणि सारखं बडबडत होते. ती सारी रात्र आई आणि मी त्यांना धरून बसलो होतो. आणि आता आपला स्वतःचा देह पडत असताना, सारी दुःखं सोसून सारे मोह सोडून तोंडाने फक्त म्हणत होतो, “आई साईबाबा !” ह्या अपार श्रद्धेमुळे त्यांनी दुःखावर विजय मिळवला होता.

त्यांना दवाखान्यात घेऊन जायचं ठरलं, पण भालूदादा म्हणाले, “त्यांना जायचं नाही दवाखान्यात. त्यांची परवानगी काढायचं काम त्यांनी अण्णांवर सोपवलं. अण्णांनी सांगितलं पपांना, “बाबुराव सोयीच्या दृष्टीनं दवाखान्यात तुम्हाला ठेवायचं मी ठरवलं आहे. तुमचं काय म्हणणं आहे ?” त्यांनी फक्त ‘बरं’ म्हणून सांगितले. जणू त्यांनी ठरवलं होतं की , कसलाच विरोध करायचा नाही. शेवटपर्यंत शांतपणानं सर्व संपवायचं. अॅम्ब्युलन्स आली आणि स्ट्रेचरवर त्यांना घेतलं. आम्हाला माहित होतं, परत हे घरात येणार नाहीत. सगळेच रडत होतो. आम्ही मोठी माणसं गुपचूप रडत होतो, पण त्यांच्या मुलांचे रडण्याचे आवाज तर मोठ्याने येत होते. पण त्या निग्रही माणसानं का रडता, रडू नका किंवा कोण रडतं आहे, हे विचारलं नाही, की स्वतःच्या डोळ्यात पाण्याचा एक थेंब आणू दिला नाही, आणि कुणाचाही निरोप न घेता उंबरठा निर्विकार मनानं ओलांडला !

आम्ही सर्व मिशन हॉस्पिटलमध्ये आलो. सर्व शिस्तवार उपचार सुरु झाले. पायाची शिर तोडून सलाईन सुरु केलं. त्यांनी ‘हाय’ सुद्धा म्हटलं नाही. जे जे उपचार होत होते ते-ते करून घेत होते. पण घर सोडल्यानंतर पाण्याचा एक थेंबही त्यांनी तोंडात घेतला नाही. फक्त ते वाट पहात होते येणाऱ्या वेळेची, मरणाच्या घटकेची. अण्णा म्हणत होते, “बाबुराव पाणी घ्या ना थोडं.”

ही प्रथमच वेळ होती की अण्णांच्या शब्दास त्यांनी नको सांगितले. संध्याबाई म्हणत होत्या, ‘आग्रह करा तुम्ही म्हणजे ते घेतील.” पण अण्णानं आग्रह केला नाही. त्यानंही ओळखलं होतं सारं

.७/११/१९६७ उजाडली, सतत रात्रंदिवस मुलं आणि आम्ही सर्व बाबा, संध्याबाई, अण्णा बसून होतो. कोणी आत, कोणी झाडाखाली ! पपांचा रक्तदाब कमी झाला होता. पण शुद्ध होती. त्यातून ते प्रत्येकाला विशेषतः अण्णांना, कोणी नाहीसे बघून फक्त बाबांना सांगायचे, ‘जा तुम्ही. विश्रांती घ्या. मी अगदी ठीक आहे. ‘तोंडाने फक्त बोलायचे, “आई साईबाबा.” त्यांनी सांगितलं, “मी बोललेलं कुणाला सांगू नका हे वाईट शब्द राहतात, विनाकारण, भावना दुखावतात.” भालूदादांनी त्यांना शब्द दिला, “मी कधीच सांगणार नाही” ह्या नऊ दिवसांच्या सहवासात एकच गुप्त खाजगी आणि शेवटची गोष्ट ते फक्त भालूदादांशी बोलले. दिनांक ८/११/१९६७ पासून मधून मधून त्यांची शुद्ध जात होती. हॉस्पिटलच्या लोकांनी आपली सेवेची पराकाष्ठा चालवली होती. डॉ. भद्रे आणि डॉ. पाध्ये माझ्या भावांच्याबरोबर झाडाखाली बसून होते. आज थुंकण्याची पण ताकद पपांना नव्हती. पिणे आणि थुंकणे ह्या क्रिया करण्यासाठी नाकात नळ्या घातल्या आणि डॉक्टरांच्या सांगण्याप्रमाणे पपा त्यांना सहकार्य देत होते, आनंदानं. हसतमुखानं ! हॉस्पिटल स्टाफ पण स्तिमीत झाला होता, इतका गुणी पेशंट पाहून ! मी आणि भालूदादा म्हणावयाचे, “नका त्यांना त्रास देऊ,’ पण पपाच म्हणावयाचे, ‘करू दे त्यांना, मला त्रास होत नाही !” डॉक्टरनी एक औषध सांगितलं. कुठंच मिळत नव्हतं. अण्णानं आपल्या पत्नीला (विमलवहिनी) फोन केला. त्या औषधाची वाट पहात बसलो होतो सर्वजण ! कुठल्या क्षणी पपांची जीवनज्योत मालवली जाईल ते कळत नव्हतं म्हणून प्रत्येकजण दक्ष होता, ते शेवटचं दर्शन घेण्यासाठी. डॉक्टरसुद्धा बसून होते हा शेवटचा क्षण चुकू नये म्हणून आणि एकदम नाडी चालू लागली. रक्तदाब सुधारला आणि ते बोलू लागले, “अरे अजून तुम्ही गेला नाहीत. मी अगदी साफ बरा आहे. एकदम मला फ्रेश वाटतं आहे. तुम्ही जा आता सकाळी या.” त्यांनी सगळ्यांना जायला भाग पाडले. त्यांची मुले, पत्नी आणि आम्ही मात्र बसून होतो. रात्री बारा वाजता परगावाहून त्यांचा जावई आला. त्यांचीही त्यांनी चौकशी केली. “प्रवासामुळं दमलात, जा विश्रांती घ्या “, म्हणून सांगितलं. पहाटे पाच वाजले आणि मुंबईहून इंजेक्शन घेऊन विमलावहिनी आल्या. त्यांना पपांनी विचारलं, ‘तू आता आलीस का औषध घेऊन, शांताराम तुझी वाट पहात होता रात्री. तू आता लौकर जा ! ” म्हणजे काल आम्ही समजत होतो पपा शुद्धीवर नाहीत. ते खोटं होतं. त्यांना सर्व कळत होतं.

९/११/१९६७ची सकाळ! डॉक्टरनी येऊन पपांना विचारलं, “कसं आहे बाबुराव ?” पपांनी सांगितलं, “ठीक आहे पण पोटात थोडं ट्विस्ट होत आहे.” “इंजेक्शन देऊ या आता. ” ‘द्या की ‘ पण तोंडात मात्र सारखा जप जोरात सुरु होता, “आई – साईबाबा ” मी विचारलं, “पपा दुखतं का काही” “छे काही नाही होत.” असंच ते सारखं सांगत होते. “मग तुम्ही का सारखे आवाज करता…” “कोण मी? मी तर मनात म्हणतोय.” म्हणजे त्यांची स्मृति अर्धवट जात होती, कधी कधी त्यांच्या लक्षात येत होत की, आपल्या तोंडातून आवाज येतो आहे आणि ते म्हणत होते, ‘अरे आलाच परत आवाज. मी मनात नाव घेतो आहे. ‘

दुपारपासून त्यांनी सर्वांचे संबंध तोडले, कुणाकडं त्यांनी बघितलं नाही, साईबाबांची अंगठी असलेला हात फक्त ते डोळ्याकडे नेत होते. ऑक्सिजन सुरु झाला. त्यांच्या मुलांना पण कल्पना आली की, शेवटचा क्षण जवळ आला आहे. सगळीच मुलं रडू लागली. मी त्यांना सांगितलं, ‘कॅन्सरसारख्या खडतर रोगाशी सामना देऊन शांतपणं जो हे सर्व सोडून निघाला आहे, त्यांची मुलं तुम्ही. धीरानंच सहन करायला हवं तुम्हाला !” मधूनच वहिनी जोरात ओरडल्या, लगेच पपानी डोळे उघडले. मी म्हटलं वहिनी रडण्यासाठी सारी हयात आहे. ह्या जात्या जीवाला ओढू नका. आमच्या मनाला त्रास होईल म्हणून त्यांनी आपलं दुखणं सांगितलं नाही. निरोप घ्यायला गेल्यास कुणालाही संशय रहाणार नाही म्हणून ते तसेच निघाले आहे. दुःख आणि शोक करण्यासाठी खूप वेळ आहे. त्यांच्या धीराला साजेल असंच आपण वागू या.” आणि त्यानंतर आम्ही सर्व त्यांच्या भोवती बसलो होतो. अगदी शांतपणं. ऑक्सिजन सुरु होता. पपांच्या तोंडातूनही शब्द येत नव्हता. एकदाच ते म्हणाले, ‘पाणी.’ आम्ही सर्वांनी त्यांना गंगोदक पाजलं, आणि ते प्यायले. आज चार दिवसांनी त्यांनी ते पाणी घेतलं. इतक्या शांतपणं ते सहवास घेत होते की त्यांचा श्वासोच्छ्वास चाललेला दिसतही नव्हता. त्या खोलीत आम्ही होतो पण आमचेही श्वास होत नव्हते. फक्त ऑक्सिजनमुळे त्यांच्या श्वासाने पाण्यावर येणारे बुडबुडे आम्हाला दिसत होते. त्यांच्या प्राणांचा अदृश्य ज्योतीचा अंदाज आम्हाला त्या पाण्यावरून येत होता. मध्येच ते बुडबुडे थांबत होते. आणि सुरु होत होते. अशा तर्हेने आचका नाही, घरघर नाही, डोळे उघडे नाहीत, तोंड वाकडं नाही ! अगदी शांतपणं आमचे पपा देवाघरी गेले. इतकं सुंदर मरण मी कधी पाहिलं नाही. इतका निग्रही स्वभाव परत दिसणार नाही. त्या धीरगंभीर, समाधानानं जाणाऱ्या आत्म्याला मी मनोमन प्रार्थना करीत होते, “तुमच्यावरच्या प्रेमामुळं, तुमच्यावरच्या निष्ठेमुळे आज इतके दिवस भालूदादा, अण्णा बसले आहेत सारं सोडून. ते प्रत्येकाचं कर्तव्य असतं. पण आज कोणी तसं समजत नाही. तुम्ही फार सुदैवी आहात. तुमच्या वाट्याला प्रथमपासून शेवटपर्यंत प्रत्येकाचे प्रेमच मिळत गेले. आई, भाऊ, बायको, मुलं ह्यांनी प्रेम केले तर त्यात नवल नाही. पण भावांच्या बायका, त्यांची मुलं आणि नातवंडं, त्यांच्या स्वतःच्या वडलांच्या जागी तुम्हाला समजत होती. तुम्ही सर्वांचे पितामह होता. सर्वांना जाता जाता आशीर्वाद द्या की हे सगळे प्रेमानं राहू देत. देव ह्यांना सुखी ठेवू दे. ह्या सर्वांचं प्रेम अखंड राहू दे !”

– सौ. सरलाबाई कुळकर्णी
(सौजन्य :- बाबुराव नावाचे झुंबर, मोरया प्रकाशन)
——————————————————–
——————————————————–

बेबी घाबरली, मग सरकली.
‘बोला कुठं गेला होता ?’
बेबीला संवाद आठवेनात, ती माो सरकू लागली. तसे पुढे होत जहागीरदार गर्जले, ‘सांगता का मारू आता ?’ आणि हातातली काठी त्यांनी उगारली तशी बेबी एकदम किंचाळली आणि एकदम मागे धावली. फिल्डबाहेर ठेवलेल्या लाईटच्याही पलीकडं गेली, स्टुडिओत सर्व चकित होऊन पाहत राहिले.
‘कट कट… ‘भालजी म्हणाले. शॉट संपला. पण घाबरलेली बेबी शकुंतला थरथर कापत होती. तेथल्या खुर्चीत बसून ती हमसाहमशी रडू लागली.
काकांनी विचारलं, ‘काय झालं ?’

‘मला वाटलं तुम्ही खरंच प्यायलात आणि आता काठीनं मला बडवणार. ‘
काकांचा चेहरा पूर्ण बदललेला. निर्व्याज हसत ते म्हणाले, ‘तू शॉटमध्ये आपल्या वडिलांना घाबरली आहेस असं दाखवायचं होत. पण त्याकरिता मी तुला मारलं असतं तर मी नट राहिलो नसतो, फक्त दारुड्या झालो असतो. ‘
दुसरा प्रसंग ‘मौसी’ या चित्रातला. नुकताच ‘दो ऑंखे बारह हात’ संपला होता. त्या चित्रात काकांची जेलरची भूमिका, दिग्दर्शक व्ही. शांताराम. ‘मौसी’चे दिग्दर्शक त्यांचे चिरंजीव, प्रभातकुमार.

प्रसंग असा : दादा बाहेरून घाईनं येतात. त्यांच्या हातात नुकताच अंगावरून काढलेला कोट. त्यांची वाट पाहात त्यांच्या पत्नी, सुमतीबाई गुप्ते बसलेल्या आहेत. त्या विचारतात, ‘मिल गाई बीटीया?’
‘नही, उस्का कहीं पताही नही .’ काका पुढं येत सांगतात.
इतका सरळ, साधा शॉट. नटाचा कस दाखवणारा अभिनय असं ह्यात काही नाही. प्रभातकुमार म्हणाले, ‘येता येता तुम्ही हातातला कोट तेथल्या खुर्चीवर ठेवा’.

‘मी दाराजवळच्या खुंटीवर तो ठेवला तर?’ काकांनी विचारलं. त्यागराज कॅमेरामन ते म्हणाले, ‘तस करू नका . कारण खुंटी फ्रेमच्या बाहेर आहे.’
‘पण कॅमेरा पॅन करता येईल… ‘
‘तसं केलं तर पुढं सुमतीबाई कट होतील. ‘ त्यागराज म्हणाले.
काका काही बोलले नाहीत. दोन-तीन वेळा रिहर्सल झाली. टेक करायचा ठरला. काकांना काहीतरी खटकत होतं. शेवटी टेकची वेळ आली तसे ते म्हणाले,
‘तुम्हाला हवा तसा मी कोट खुर्चीवर ठेवू शकतो. पण एक वाटतं, अशी वृद्ध माणसं कोट असा खुर्चीवर टाकणार नाहीत. कितीही घाईत असली तरी ती ठरलेल्या जागेलाच ठेवतील. सुमतीबाई थोड्या उजव्या बाजूला बसतील तर ती खुंटी अनायासे ब्लॉकमध्ये येऊ शकेल. मी एकदा करून दाखवतो. तुम्हाला बर वाटलं तर घेऊ.’

प्रभातकुमारांचं हे दुसरंच चित्र ! त्यांचा जन्मही झाला नसेल तेंव्हापासून काका चित्रपटात काम करत होते. पण दिग्दर्शकाशी वागायची हीच पद्दत जी ‘दो आँखे … ‘ च्या जागतिक कीर्तीच्या दिग्दर्शकाशी, तीच त्यांच्या मुलाशी. नुकतंच, पहिलं चित्र सुरु करणाऱ्या दिग्दर्शकाशीही !

एकदा स्वतःच्या यशाचं रहस्य सांगताना काका म्हणाले, ‘मी फार शिकलो नाही. फार वाचलं नाही. पण आयुष्यात एक गोष्ट मी फार कसोशीनं पहिली. माझे सगळे मित्र माझ्यापेक्षा बुद्धिमान, आपापल्या क्षेत्रात कर्तृत्ववान चमकणारे असेच मी शोधले. ‘

त्यांचे मित्र म्हणत, ‘ही बाबुरावांची नम्रता, हे सौजन्य . हे अंगी नसले की आधुनिक अभिनेते नऊची चित्रीकरणाची वेळ असेल तर तीन, चार वाजता सेटवर उगवतात. त्यांच्याकरिता किती लोक ताटकळत राहतात ह्यावर त्यांच्या मोठेपणाची उंची ठरते. त्यांना आवडेल तो कॅमेऱ्याचा अँगल त्यांच्या मर्जीनुसार संवादात बदल, त्यांनाच महत्व मिळेल अशी कथानकाची चिरफाड… अशा जमान्यातही काका सेटवर चित्रकरणापूर्वी निदान दहा मिनिटे. मेकअप करून कपडे चढवून हजर असत. नटाच्या अभिनयाइतकीच ही शिस्त, सभ्यता आणि हाती घेतलेल्या कामाबद्दलची निष्ठा त्यांच्या लेखी महत्वाची !’

इतर कलांप्रमाणे अभिनय ही काही माणसांना लाभणारी दैवी कला असावी. एखादं साधंच वाक्य; दिनकर कामण्णा ते असं म्हणत की प्रेक्षकांतून हास्याचे धबधबे कोसळत. अशी दैवी कला काकांना उपजत लाभली होती काय ? बहुतेक नसावीच. तरी काका ‘नटश्रेष्ठ’ ह्या पदास केवळ स्वतःच्या परिश्रमानं पोहोचले. ते म्हणत, लेखकानं लिहिलेले संवाद तोंडपाठ म्हणता आले म्हणजे माणूस नट होतो असं नाही. या शब्दामध्ये त्याला जिवंतपणा आणता आला पाहिजे. आपली सुखदुःखे केवळ नुसती खरी वाटून उपयोगी नाही. तर ती प्रेक्षकांच्या हृदयाला भिडली पाहिजेत. हे घडलं म्हणजे पडद्यावरचा आभास हे प्रेक्षकांकरिता खरं खुरं, जिवंत वैष्णव बनतं. अशा विश्वाची निर्मिती प्रतिभावंत नटच करू शकतो. एकदा हे लक्षात आलं की नटाचा जीवनाकडं पाहण्याचा दृष्टिकोनच बदलतो. जेवढी अनुभूतीची संपन्नता अधिक, तितकी विविध भूमिका करण्याची त्याची क्षमता अधिक ! ह्याकरिता जीवनाचं केवळ दुरून अवलोकन पुरेसं नसावं. रूढ संकेत बाजूस सारून, त्याकरिता जीवनाच्या प्रवाहात स्वतःला झोकून देण्याची वृत्ती हवी, त्याबरोबर वाहत जाण्याचं धाडस हवं आणि त्यातून फिरून बाजूला होऊन घेतल्या अनुभवाचं अलिप्तपणे निरीक्षण करण्याचं सामर्थ्यही हवं.

ह्याच वृत्तीने काकांनी जीवनाचे विविध अनुभव रसिकतेने घेतले. तसेच जीवनाने जे काही दिले त्याचे ऋण मान्य करून जे मिळाले त्यापेक्षा कितीतरी पटींनी अधिक त्यांनी दिले. त्यांचे ‘चित्र आणि चरित्र’ हे केवळ आत्मवृत्त नाही. मराठी चित्रपटसृष्टीचा तो पन्नास- एक वर्षांचा इतिहास आहे. ह्या इतिहासाचे ते केवळ साक्षीदारच नाहीत, तर ह्या चित्रसृष्टीला अनेक दिग्दर्शक, तंत्रज्ञ, लेखक, कलाकार देऊन चित्रनिर्मितीचे नवनवीन प्रयोग करणारे व इतिहास घडवणारे ते एक फार महत्वाचे आधारस्तंभ आहेत.

सिनेमाच्या पडद्यावरच्या बदलणाऱ्या प्रतिमांइतकं जीवनात क्षणभंगुर दुसरं काय असेल ? प्रत्येक सेकंदाला चोवीस प्रतिमा बदलत असतात. ही गती, हा नित्य बदल, रोज नव्याचे आकर्षण हा तर चित्रपटसृष्टीचा स्थायीभाव. कितीतरी नायक, नायिका, लेखक, संगीत दिग्दर्शक, गायक पाहता पाहता कीर्तीच्या शिखरावर पोहोचतात आणि त्यांच्या लक्षात येण्यापूर्वीच पडद्याआड जातात. काही अपवाद मात्र ह्या धावत्या फिल्मवरील स्थिरचित्रासारख्या (Frozen Frames) विविध रूपात प्रेक्षकांच्या मनात कायमच्या स्थिरावतात आणि वर्षानुवर्षे त्यांचे ताजेपणा कमी होतच नाही.

टाटांच्या कॅन्सर हॉस्पिटलच्या पाचव्या मजल्यावरील स्पेशल खोलीत ऑपरेशननंतर काकांना स्ट्रेचरवरून आणलं तेंव्हा आम्हा सर्वांनां वाटलं, काका ह्या संकटातून तरले आणि खरोखरच काका थोड्या दिवसात, ‘इये मराठाचीये नगरी ‘ ह्या चित्रपटात काम करू लागले. पण ते त्यांचं शेवटचाच चित्र होतं ह्याची आम्हाला कल्पना नव्हती.

कोल्हापूरला मी जेव्हा जाई तेव्हा संध्याकाळी, मावळत्या संधीप्रकाशात, मागील गच्चीत, आरामखुर्चीवर विसावलेल्या काकांना मी भेटायला जाई. त्यांची शरीरयष्टी दिवसेंदिवस कृश होत चालली होती. आम्हा मुलांत मीच काकांच्या बरोबर अधिक दिवस राहिलो होतो. त्यांनीच मला ‘झनक झनक … ‘ नंतर ‘राजकमल’मध्ये कामासाठी नेलं. ‘फिल्म्स डिव्हिजन’च्या माझ्या कामाचीही सुरवात त्यांच्यामुळंच झाली आणि माझ्या लिखाणाचं कौतुक करून त्यांनीच मला लिहिण्यासाठी प्रोत्साहन दिलं होतं. आता शरीर थकलं होत , पण मन उत्साहीच होतं. मी नवीन काय करतो हे ते विचारत. आम्हा सर्व मुलांची चौकशी करीत. एक भल्या मोठ्या वटवृक्षाच्या सावलीत आपण सुखावलो आहेत असं मला त्यांच्या प्रत्येक भेटीच्या वेळी वाटे. पानगळ ऋतू सुरु झाला होता, तरीही हा वृक्ष निष्पर्ण होईल असं कधी वाटतच नव्हतं.

दिवाळी संपताच, मद्रासला जाण्यापूर्वी मी उभ्या उभ्या कोल्हापूरला गेलो तेव्हा त्यांच्या थकलेल्या चेहऱ्यावर क्षीणसं हास्य होतं.
‘राजकमलचा पंचविसावा वर्धापनदिन मोठा जोरात झाला ना?’
‘होय. मी गेलो होतो. फार छान झाला. ‘
‘फार फार बरं झालं !’
मला मोठी काळजीच होती. ‘
‘कसली काका ?’
‘अरे परप्रांतीयांनी आता सर्वस्वी काबीज केलेल्या मुंबईच्या चित्रपटसृष्टीत मराठी माणसानं स्थापन केलेल्या आणि पंचवीस वर्षे दिमाखानं उभ्या असलेल्या संस्थेचा वर्धापन दिन म्हणजे फार मोठा सोहळा आहे.’

माझ्यामुळं त्या समारंभात काही घोटाळा होऊ नये ही मनापासून इच्छा होती. ती सफल झाली. !’
तरीही माझ्या लक्षात आलं नाही. पण काका अधिक काही बोलले नाहीत. स्वतःच्या विचारात हरवून गेले. ते मावळत चाललेलं मंद स्मित तेवढ माझ्या लक्षात राहील.

गाडी कांचिपुरमला पोहोचली होती. देवळासमोर उभी होती एवढ्या प्रवासात मी काहीच बोललो नव्हतो. वाधवानी आणि कॅमेरामन मात्र एकढा वेळ गप्पच होते. आम्ही गाडीतून उतरलो तस वाधवानींनी मला विचारलं.

‘तुला वाटलं तर आज आपण काम थांबवू या. ‘

समोरच कांचीपूरमच्या देवालयाचं उंच गोपुर होतं. त्याखाली स्वागत करणारं प्रशस्त प्रवेशद्वार. दुरून मंदिरातल्या घाटांचे आवाज ऐकू येत होते. एका अत्यंत समृद्ध, संपन्न आणि मनस्वी जीवनानं कृतकृत्य व्हावं अशी ही अखेर होती.
मी देवळाच्या पायऱ्या चढू लागलो.

– प्रभाकर पेंढारकर

ठेवणीतले लेख

  आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा  [recaptcha]

  काही निवडक प्रतिक्रिया:

  शांताराम कांबळे

  मला वाटतं होते, मराठी मुलगी फक्त माधुरी दीक्षित ने हिंदी चित्रपट सृष्टीत खूप खूप कामे केली, पण, संध्या, रत्नमाला, नंदा, अशा कितीतरी, मराठी अभिनेत्री होत्या, होऊन गेल्या, याचा मला खूप🎉🎊 खूप अभिमान वाटतो, मी चित्रपट रसिक आहे.

  संदर्भ:- फेसबुक प्रतिक्रिया