अतिथी कट्टा

दिनांक : १२-११-२०१८

‌‌‌‌‌‌‌‌पालक-मुलांमधील सुसंवादावर भर…


अभिनेता आणि संकलक म्हणून चित्रपट, मालिका या दोन्ही माध्यमांमध्ये उत्तम कामगिरी केल्यानंतर लोकेश गुप्ते आता ‘एक सांगायचंय’ या चित्रपटाद्वारे आपल्या दिग्दर्शकीय पदार्पणासाठी सज्ज झाले आहेत. या चित्रपटाच्या दिग्दर्शनादरम्यान आलेल्या विविध अनुभवांबद्दल त्यांचं हे मनोगत.

——

चित्रपट, मालिकांमध्ये अभिनेता म्हणून काम करीत असतानाच तांत्रिक आघाडीवरही मी काम करीतच होतो. संकलन करायचो मी. सुरुवातीच्या काळात मी विनय आपटेसरांकडे ‘असिस्टंट’ म्हणून काम करायचो. त्यामुळे पहिल्यापासून दिग्दर्शनाकडे माझा ओढा होता. त्या दृष्टीनं माझं काम सुरूही झालं होतं. काही ‘स्क्रीप्ट्स’ही तयार होत्या. परंतु, म्हणावी तशी गोष्ट काही हाताला लागत नव्हती. ‘एक सांगायचंय’ या चित्रपटाची गोष्ट खरं तर खूप आधी माझ्या कानावर आली होती. माझा मित्र मिलिंद फाटकबरोबर तेव्हा मी काम करीत होतो. एका नाटकाच्या दौर्‍यावर असताना बसमधील प्रवासात तेव्हा त्यानं या चित्रपटाची संकल्पना माझ्या कानावर घातली होती. तेव्हा या संकल्पनेत तरुण मुलांवर अधिक फोकस होता. परंतु, त्याचा धागा तरुण मुलं आणि पालकांमधील संघर्ष हाच होता. ही संकल्पना बरीच वर्षं माझ्या मनात घोळत होती. त्याच्यावर मी विचार करीत होतो. काळ जसजसा पुढं गेला तसं मला वाटायला लागलं की या संकल्पनेचा मूळ विषय आता अगदी ऐरणीवर आला आहे. किंवा या विषयाचं गांभीर्य आता खूप प्रमाणात वाढत चाललं आहे. तेव्हा एके दिवशी मी मिलिंदला फोन करून त्या विषयावर मी काम करायला सुरुवात केल्याचं सांगितलं. माझी मुलगी आणि तिच्या आजूबाजूला असलेल्या पालक मित्रमंडळींशी चर्चा करीत असताना मला या विषयाचं गांभीर्य अधिक जास्त समजायला लागलं. एकदा एक मित्र मला म्हणाला, माझ्या मुलाशी कसं वागावं याबद्दल मी खूप ‘कन्फ्यूज्ड’ आहे. रोज माझ्यासमोर नवीन प्रश्न येतात आणि मुलांना काय उत्तर द्यायचं हे मला समजत नाहीय. या मित्रानं सांगितलेला हा मुद्दा मला पटला आणि एकंदरीतच आजच्या पिढीतील मुलं-मुलींवरील वेगवेगळ्या पद्धतीचं दडपण मला सतावू लागलं. हे दडपण मग शिक्षणाचं असेल, करियरचं असेल, नोकरी मिळण्याचं असेल, नोकरी मिळाली तर ती टिकवण्याचं असेल, स्वत:च्या पायावर उभं राहणं, नात्यांमधील गुंतागुंत हाताळता येणं असे एक ना अनेक प्रश्न. त्यातूनच मग या मुला-मुलींना नैराश्य येतं. या सगळ्यावर आपण चित्रपटामधून काहीतरी भाष्य करायला हवं असं मला वाटायला लागलं. हे भाष्य करण्याआधी मी या प्रश्नाच्या मुळाशी जाण्याचं ठरवलं. पालकांचा मुलांशी नसलेला संवाद, हे मला त्या प्रश्नाचं मूळ जाणवलं. रोज घरात आई-वडिलांनी मुलांना किंवा मुलांनी आई-वडिलांना ‘हाय’, ‘हॅलो’ करणं म्हणजे सुसंवाद नव्हे. आई-वडील आणि मुलांनी परस्परांशी काहीतरी विधायक चर्चा करीत एकमेकांना समजून घेणं म्हणजे सुसंवाद. या चित्रपटाची टॅगलाइनच आम्ही ‘अनसेड हार्मनी’ अशी ठेवली आहे. आवश्यक असलेला परंतु, न बोलला गेलेला संवाद म्हणजे ‘अनसेड हार्मनी’. या चित्रपटामधून मला कसल्याही प्रकारचा उपदेश करायचा नव्हता. मला पालक आणि पाल्य यापैकी एकच बाजू बरोबर आहे आणि दुसरी बाजू चुकीची आहे, असं एकांगी मत मांडायचं नव्हतं. गेल्या वर्षीच्या मार्चमध्ये मी लेखनापूर्वी कराव्या लागणार्‍या कामाला सुरुवात केली. कथेचे पॉईंटर्स काढले. व्यक्तिरेखांचा ‘ग्राफ’ समजून घेतला आणि प्रत्यक्षात मे-जूनमध्ये लेखनास सुरुवात केली. या चित्रपटामध्ये मला फारसे संवाद दिसतच नव्हते. म्हणूनच मी खूप कमी संवाद या चित्रपटासाठी लिहिले आहेत. गेल्या वर्षीच्या ऑगस्टमध्ये ‘स्क्रीप्ट’चा फायनल ड्राफ्ट तयार झाला.

त्यानंतरचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे निर्मात्याचा शोध. एक तर हा विषय थोडा गंभीर असल्यामुळे त्याच्यासाठी निर्माता मिळणं हे जरा कठीणच काम होतं. ‘स्क्रीप्ट’ लिहून झाल्यानंतर मी काही जणांना ती ऐकवण्यास सुरुवात केली. एका मित्राला माझी ही ‘स्क्रीप्ट’ खूप आवडली. त्याच्या संपर्कामधून ‘देवी सातेरी प्रॉडक्शन्स’चे प्रभाकर परब हे माझ्या पहिल्यावहिल्या चित्रपटाचे निर्माते झाले. साधारण दोन महिने आमचे निर्मितीप्रक्रियेमध्ये गेली. या चित्रपटासाठी ‘टीम’ निवडताना मी माझ्या ‘कम्फर्ट झोन’मधली मंडळी निवडली. मी जे काही करतोय, ते समजण्याच्या ‘सेन्सिबिलीटी’ची माणसं मी निवडली. शैलेंद्र बर्वे, जितेंद्र जोशी, पुष्पांक गावडे, नितीन कुलकर्णी ही अत्यंत सेन्सेटिव्ह माणसं तसेच माझ्या ‘कम्फर्ट झोन’मधलीही. पुष्पांक गावडे खूप चांगला ‘सिनेमॅटोग्राफर’ आहे, हे आता सगळ्यांनाच माहिती आहे. परंतु, त्यानं या चित्रपटासाठी जे काम केलंय, ते आधी त्यानं केलेलं नाही हे ठामपणे मी म्हणू शकतो. त्याच्या कामाचा ‘झोन’ हा ‘कमर्शियल’ सिनेमा होता. त्यामुळे त्याचा लायटिंग, टेकिंग पॅटर्न हा तशाच पद्धतीचा होता. त्यामुळे माझ्या मनातील सिनेमाशी ‘मोल्ड’ करणं त्याला सुरुवातीला थोडं अवघड गेलं. परंतु, कालांतरानं एकमेकांसोबत काम करताना मजा यायला लागली. नितीन कुलकर्णी तर माझा मावसभाऊच. मी त्याला या चित्रपटाचा फक्त विषय ऐकवला नि त्यानंतर लगेचच आमचं काम सुरू झालं. जागतिक पातळीवर ‘साउंड डिझायनिंग’मधील उत्कृष्ट टेक्निशियन अशी त्यांची ख्याती आहे, त्या रसुल पोक्कुट्टी यांचंही सहकार्य मिळवण्यात आम्ही यशस्वी ठरलो. या चित्रपटात संवादांवर मी खूप कमी भर दिला आहे. त्यामुळे चित्रपटामधील पार्श्वसंगीत खूप महत्त्वाचं ठरणार होतं. मला हवा असलेला ‘नॅचरल साउंड’ फक्त रसूलच देईल, असं मला वाटलं म्हणून मी त्याच्याकडे ऍप्रोच झालो. त्याला विषय आवडला नि त्यानं अतिशय सुंदर पार्श्वसंगीत या चित्रपटाला दिलं आहे. चित्रपटातील व्यक्तिरेखांच्या वेषभूषेची जबाबदारी मी चैत्रालीकडं दिली. त्यामागचं कारण म्हणजे ती ‘स्क्रीप्ट’च्या पहिल्या ओळीपासून या चित्रपटात सहभागी होती. त्यामुळे अनेक गोष्टी, प्रसंग, व्यक्तिरेखांचं वागणं-बोलणं यावर आमची सविस्तर चर्चा व्हायची. त्यामुळे तिला सर्व व्यक्तिरेखा पडद्यावर येण्याच्या आधीच दिसायला लागल्या होत्या. त्यामुळे नवीन वेषभूषाकाराची निवड करणं म्हणजे वेळेचा अपव्यय होता.

या चित्रपटातील कलाकारांची निवड ही फार महत्त्वाची प्रक्रिया होती. ‘मल्हार’ या मध्यवर्ती व्यक्तिरेखेसाठी मला अतिशय संवेदनशील अभिनेता हवा होता. या व्यक्तिरेखेमधल्या सगळ्या गोष्टी मला दिसल्या त्या फक्त के. के. मेननमध्ये. के.के.च्या पत्नीच्या भूमिकेसाठी राजेश्वरी सचदेवचं नाव आमच्यासमोर आलं. ती अभिनेत्री म्हणून तर चांगली आहेच. शिवाय तिनं आतापर्यंत खूप सिलेक्टेड काम केलं आहे. त्यामुळे के.के.ची पत्नी म्हणून ती प्रेक्षकांना पटकन ‘रीलेट’ होईल असं आम्हाला वाटलं. इतर कलावंतांमध्येही आम्ही नव्यांना संधी दिली. चित्रपटामधील चार मुलांमध्ये एक मुलगी पंजाबी आहे. ही मुलगी तसेच तिच्या आई-वडिलांसाठी मी अमराठी कलावंतांचीच निवड केली. या मुलांचं आम्ही ‘वर्कशॉप’ घेतलं. ‘एक पाहायचंय’मध्ये संगीत खूप महत्त्वाचा घटक आहे. शैलेंद्र बर्वे आणि जितेंद्र जोशी या दोघांसमवेत मी ‘स्क्रीप्टरीडिंग’ केलं. मी ‘स्क्रीप्ट’ वाचत असताना शैलू काही मुद्दे लिहून घेत होता. मला आधी असं वाटलं की ‘स्क्रीप्ट’बद्दलची त्याची ही निरीक्षणं असावीत. परंतु तसं नव्हतं. ‘स्क्रीप्ट’ वाचून झाल्यावर कळलं की, शैलूनं लिहिलेले मुद्दे हे संगीताला कुठं कुठं स्कोप आहे, कशापद्धतीचं संगीत हवंय याबद्दलचे त्याचे हे मुद्दे होते. या चित्रपटामधील गाणी ही कथानकाचा भाग आहेत. तसेच पार्श्वसंगीतामध्येही नैसर्गिकपणाच मला अधिक हवा होता. या चित्रपटाच्या गाण्यांच्या आधी चाली तयार झाल्या आणि त्यावर मग शब्द लिहिले गेले. जितू आणि शैलूचं ‘कॉम्बिनेशन’ खूप जबरदस्त आहे. त्यामुळे खूप सहजपणे या दोघांकडून गाणी आणि त्याचं संगीत आलं. प्रत्यक्ष शूटिंगचा अनुभव खूपच छान होता. आमचं प्री-प्रॉडक्शन १०० टक्के तयार होतं. बारीकसारीक गोष्टींचाही आम्ही विचार केला होता. शूटिंगच्या एक महिनाआधी आम्ही ऑफिसमध्ये प्रत्येक सीननुसार सर्व व्यक्तिरेखांचे कॉश्च्युम्स, त्याला लागणार्‍या ऍक्सेसरीज आणि टॅगसह तयार होते. त्यामुळे सेटवर खूप सुरळीत आणि शांतपणे काम झालं. याचं सर्व क्रेडिट मी प्रमोद सावंतला देईन. कार्यकारी निर्मात्याची भूमिका त्यानं अतिशय छान सांभाळली. आमच्या ‘प्रॉडक्शन टीम’चाही मी आवर्जून उल्लेख करीन. त्यांनी मला जे जे हवं होतं ते सर्व वेळेत उपलब्ध करून दिलं.

– लोकेश गुप्ते

ठेवणीतले लेख

    आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा



    [recaptcha]

    काही निवडक प्रतिक्रिया:

    नरेंद्र चौधरी


    आपल्या संकेतस्थाळाच्या माध्यमातून असे लक्षात आले कि आपन खूप छान माहिती पुरवत आहात.
    संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया