अतिथी कट्टा

दिनांक : २२-१२-२०१७

‌पेंटर पुरस्कार माझ्यासाठी खूप मोलाचा…‌प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांना नुकत्याच पार पडलेल्या कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आनंदराव पेंटर यांच्या नावाने देण्यात येणाऱ्या पुरस्काराद्वारे गौरविण्यात आले. त्याबद्दल श्री. देसाई यांनी व्यक्त केलेले हे मनोगत.
———-

आनंदराव पेंटर यांच्या नावानं देण्यात येणाऱ्या पुरस्कारासाठी माझी निवड झाल्याबद्दल खरं तर मी स्वत:ला खूपच भाग्यवान मानतो. यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे संपूर्ण पेंटर घराणं चित्रकलेशी निगडीत. मीदेखील मूळचा चित्रकारच. त्यामुळेच या कलेशी संबंधित असलेल्या घराण्यातील एका दिग्गज व्यक्तिमत्त्वाच्या नावानं असलेला पुरस्कार मिळणं ही खूप मोलाची गोष्ट आहे. संपूर्ण पेंटर कुटुंबच महान आहे. ‌‘बालगंधर्व’ चित्रपटाच्या निमित्तानं मला बाबुराव पेंटर यांच्या कारकीर्दीचा अभ्यास करता आला. या चित्रपटात त्यांच्या व्यक्तिरेखेचाही आम्ही समावेश केला होता. बाबुरावांनी साकारलेली विख्यात मयसभेची कलाकृती आम्ही पुन्हा उभारली. कोल्हापुरात हा पुरस्कार मिळणं हीदेखील खूप मोठी गोष्टी आहे. कारण कोल्हापूर हे कलेचं माहेरघर आहे. या शहरात तसेच त्याच्या आसपासच्या भागात मी आजवर खूप काम केलं आहे. दरवेळी मला हे काम करताना भरपूर आनंद मिळाला आहे. असे पुरस्कार, शाबासकी मिळाली जीवनाचं सार्थक वाटतं.

आपल्याकडे चित्रकलेची मोठी परंपरा आहे. लहान मुलं शाळेत जाण्याच्या आधीपासून चित्रं काढत असतात. कालांतरानं प्रत्येक मूल आपापल्या गुणवत्तेनुसार चित्रकलेच पुढं जातं. परंतु, त्यांना पुढं जाण्यासाठी काहीतरी चांगले मार्ग आपण निर्माण करायला हवेत. तसे घडले तरच पेंटर कुटुंबियांसारख्या दिग्गज मंडळींच्या चित्रकलेतील थोरवीला अर्थ प्राप्त होतो. म्हणूनच कर्जत येथील आमच्या स्टुडिओमध्ये मी ‌‌‘स्कील डेव्हलपमेंट’सारखा अभ्यासक्रम सुरू केला. ‌‘टॅलेण्ट तुम्हारा… प्लॅटफॉर्म हमारा’ अशीच या अभ्याक्रमाची टॅगलाइन ठेवली. दादासाहेब फाळकेंनी आपल्या चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ रोवली. त्यानंतर व्ही. शांताराम, भालजी पेंढारकर, पेंटर बंधूंनी खूप चांगलं काम केलं. परंतु, अजूनही अनेक तरुण मुलं-मुली या क्षेत्रात यायला धजावत नाहीत. त्यामुळे आपल्या मुलांना त्यांची जागा किंवा व्यासपीठ देण्यासाठी हा अभ्यासक्रम खूप उपयोगाचा ठरला. प्रत्येक मुलातील योग्य टॅलेण्ट ओळखून त्याला आम्ही योग्य जागेपर्यंत नेण्याचं काम करतो. आमच्याकडे येणाऱ्यांचं टॅलेण्ट ओळखण्यासाठी आम्ही त्यांची ‘ऑडिशन’ही घेतो. त्यानंतरच मग त्याला योग्य तो अभ्यासक्रम दिला जातो. ३८० मुला-मुलींची बॅच एक तयार झाली आहे. पेंटिंग, सुतारकाम, वेल्डिंग यांचे अभ्यासक्रम चांगले सुरू आहेत. विशेषत: मला असं वाटलं होतं की वेल्डिंग शिकण्यासाठी आपल्याकडच्या मुली तयार होतील का? मात्र या अभ्यासक्रमात मुली नुसत्याच सहभागी झाल्या नाहीत तर त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं प्रशिक्षण घेतलं आहे. त्यामधील अनेक मुली लवकरच चांगल्या कंपन्यांमध्ये आपलं कौशल्य दाखवतील.

‌‘मराठी पाऊल पडते पुढे’ या कार्यक्रमाद्वारे आपण चांगल्या कलाकारांना पुढे आणण्याचा प्रयत्न काही महिन्यांपूर्वी केला होता. तसाच प्रयत्न यापुढेही वेळोवेळी केला जाईल. मला वाटतं, आपल्या क्षेत्रामधील दिग्गजांचं स्मरण करण्यासाठी अशा प्रकारच्या कृती प्रत्येकानं करायला हव्यात. तसं झालं तरच या दिग्गजांचं काम आपण कामयस्वरूपी सर्वांच्या स्मरणात ठेवू शकतो.

ठेवणीतले लेख

आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा[recaptcha]

काही निवडक प्रतिक्रिया:

गंगाधर ग.

काल मी माझ्या कुटुंबासोबत चोरीचा मामला हा चित्रपट पाहिला बनवला आहे. मराठी चित्रपट नवीन नवीन गोष्टी स्वीकारत आहे.
संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया