अतिथी कट्टा

दिनांक : १०-१२-२०१७

‌‘पद्मावती’चा फटका मराठी चित्रपटसृष्टीला…



‌‘पद्मावती’चे प्रदर्शन पुढे ढकलले गेले आणि सेन्सॉर बोर्डाने प्रमाणपत्र मंजूर करण्यासाठी आपले जुनेच नियम अधिक कडक केले.
त्यामुळे डिसेंबर, जानेवारी महिन्यातील मराठी चित्रपटांच्या प्रदर्शनाचे गणितच बिघडले. त्याबद्दल भाष्य करताहेत प्रसिद्ध चित्रपट वितरक समीर दीक्षित.
———-

‘पद्मावती’चा वाद मराठी चित्रपटसृष्टीला चांगलाच महागात पडल्याचं सध्याचं चित्र आहे. या चित्रपटाचं प्रदर्शन पुढं ढकललं गेल्यानंतर सेन्सॉरनं आपले जुने नियम कडक केले. त्याचा भुर्दंड मात्र मराठी चित्रपटसृष्टीला बसत आहे. १ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणारा ‘देवा’ चित्रपट आता २२ डिसेंबरला प्रदर्शित होईल. तसेच ‘ख्वाडा’फेम दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांचा ‘बबन’ चित्रपट मूळ‌ नियोजनानुसार २९ डिसेंबरला प्रदर्शित होणार होता. त्याचंही प्रदर्शन आता पुढं ढकललं गेलं आहे. एवढंच नव्हे तर जानेवारी, फेब्रुवारीत प्रदर्शनाच्या तारखा निश्चित केलेल्या निर्मात्यांनाही आपल्या चित्रपटाचं नेमकं प्रदर्शन कधी होईल, याची आत्ता तरी माहिती नाही. खरं तर आमच्या संस्थेतर्फे वितरीत करण्यात येणार असलेल्या ‘चरणदास चोर’साठी २२ डिसेंबर ही तारीख आम्ही खूप आधीपासून निश्चित केली होती. हिंदीतील ‘टायगर जिंदा है’सारख्या बड्या चित्रपटाचा धोका पत्करूनही आम्ही याच तारखेवर ठाम होतो. मात्र ‘पद्मावती’च्या घडामोडीनंतर ‘देवा’ आणि ‘गच्ची’ या दोन चित्रपटांनी आपल्या प्रदर्शनासाठी २२ ही तारीख निवडली. त्यामुळे आपापसातील संघर्ष टाळून सर्वांचे नुकसान होऊ नये यासाठी आम्ही ‘चरणदास चोर’चं प्रदर्शन आता पुढं ढकललं आहे. मात्र, या सगळ्या गोंधळामुळे मराठी चित्रपटांच्या प्रदर्शनाचं शेड्युलच साफ कोलमडलं आहे. आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे ‘टायगर जिंदा है’ला देखील सेन्सॉर प्रमाणपत्र मिळालं आहे की नाही, याची अधिकृत माहिती कोणाकडेच नाही. त्यामुळे हा चित्रपटदेखील २२ डिसेंबरलाच प्रदर्शित होणार की नाही, याबद्दल चित्रपटसृष्टीत तरी संभ्रम आहे. या चित्रपटाचं प्रदर्शन पुढं ढकललं गेल्यास आणखी अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.

वास्तविक आतापर्यंत सेन्सॉर ही मराठी चित्रपटसृष्टीसाठी मोठी समस्या नव्हती. निर्माते मंडळी आपल्या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या काही दिवस आधी आपला चित्रपट सेन्सॉर करीत. फक्त विदेशी चित्रपट महोत्सवासाठी आपला चित्रपट पाठविण्यास इच्छुक असणारी मंडळीच प्रदर्शनाच्या तारखेआधी बराच काळ चित्रपट सेन्सॉर करून घेत.



परंतु, अशा चित्रपटांची संख्या खूप कमी आहे. त्यामुळेच ऐन वेळी आपला चित्रपट सेन्सॉर करण्याची सवय झालेल्या निर्मात्यांना बदललेल्या घडामोडींचा मोठा फटका बसला आहे. सर्वसाधारणपणे नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात भरपूर मराठी चित्रपट प्रदर्शित होतात. मात्र १ डिसेंबरला ‘पद्मावती’ चित्रपट प्रदर्शित होणार असल्यामुळे अनेकांना त्याच्या पुढे-मागे आपले चित्रपट आणले नव्हते. परंतु, ‘पद्मावती’चे रखडलेले प्रदर्शन आणि सेन्सॉरच्या विचित्र भूमिकेमुळे सगळा गोंधळ उडाळा. आमच्या ‘चरणदास चोर’चा ट्रेलर चित्रपटगृहातून प्रदर्शित करायचा होता. मात्र एकही मराठी चित्रपट नसल्यामुळे साधा ट्रेलरदेखील आम्ही प्रदर्शित करू शकलो नाही.

‘पद्मावती’मुळे निर्माण झालेल्या गोंधळापूर्वीच निर्मात्यांनी आपल्या चित्रपटाचा प्रसिद्धीचा खर्च निश्चित केला होता आणि त्यानुसार काही रक्कम खर्चही केली होती. परंतु, तारखांचाच गोंधळ झाल्यामुळे केलेला खर्च पाण्यात गेला आहे. नुकताच मी बऱ्याच ‘सिंगल स्क्रीन’ आणि ‘मल्टिप्लेक्स’चा दौरा केला. काही चालकांना तसेच मालकांना भेटलो. गेल्या दोन महिन्यांमध्ये एकही चित्रपट चालला नसल्यामुळे थिएटर्सची अवस्था बिकट आहे. एकानं तर आम्ही ‘भुकेले शेर’ झालो आहोत, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यामुळे कधी एकदा मोठा चित्रपट प्रदर्शित होतोय आणि त्याला आपल्या थिएटरमधले सगळे शोज देतोय, असं या थिएटरमंडळींना वाटतंय.

आपले चित्रपट सेन्सॉरसंमत करून घेण्यासाठी सध्या मराठी चित्रपटांचे निर्माते तसेच त्यांचे कर्मचारी सेन्सॉर बोर्डाच्या ऑफिसमध्ये तळ ठोकून बसल्याचं चित्र सध्या दिसत आहे. सेन्सॉरने चित्रपटांना लवकर संमती मिळावी यासाठी ऑनलाइन सेवा सुरू केली खरी. परंतु, त्याचा चित्रपटसृष्टीला लाभ होण्याऐवजी नुकसानच होत आहे. सध्याच्या यंत्रणेनुसार एखाद्या निर्मात्याने सेन्सॉरसाठी ऑनलाइन बुकिंग केलं की त्याला दोन दिवसांनी पासवर्ड मिळतो. मात्र तो न आल्यास काही निर्माते पुन्हा एकदा लॉग इन करून आपल्या चित्रपटाची नोंदणी करीत आहेत. त्यामुळे सध्या सेन्सॉरकडे वेगळाच गोंधळ उडाला आहे. एकाच चित्रपटाच्या निर्मात्याकडून सेन्सॉरच्या वेबसाईटवर पाच-सहा लॉग इन झाले आहेत. तेवढेच नवीन पासवर्डस् निर्माण झाले आहेत. याचा परिणाम सेन्सॉरची ऑनलाइन यंत्रणा कोलमडण्यात झाला आहे. ही समस्या दूर करण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत. मराठी चित्रपटसृष्टी आधीच मोठ्या संकटात आहे. त्यात या नवीन संकटानं निर्माते मंडळी धास्तावली आहेत.
– समीर दीक्षित
———

ठेवणीतले लेख

    आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा



    [recaptcha]

    काही निवडक प्रतिक्रिया:

    नरेंद्र चौधरी


    आपल्या संकेतस्थाळाच्या माध्यमातून असे लक्षात आले कि आपन खूप छान माहिती पुरवत आहात.
    संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया