अतिथी कट्टा

दिनांक : ०८-०१-२०१९

‌‌‌‌‌‌‌‌पु.लं.साकारणं हे मोठं चॅलेंज….




‘भाई : व्यक्ती की वल्ली’ या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटामधील पु. ल. देशपांडे यांची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या सागर देशमुख या अभिनेत्याच्या अभिनयाचे प्रेक्षकांनी कौतुक केले आहे. या चित्रपटातील पुलंची व्यक्तिरेखा मिळण्यापासून ते साकारण्यापर्यंत सागरने व्यक्त केलेले हे मनोगत.

——

प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा जेव्हा मला ‘भाई…’ चित्रपटामध्ये तुला पु.ल. देशपांडे यांची व्यक्तिरेखा साकारायचीय हे सांगण्यासाठी जेव्हा मला फोन आला तेव्हा मी प्रचंड उत्सुक झालो होतो. कधी कधी अशा अवघड व्यक्तिरेखा वाट्याला आल्या की मनावर दडपण येतं. परंतु, पु.लं.ची व्यक्तिरेखा साकारण्याचं दडपण माझ्यावर नव्हतं. उलट एवढं मोठं व्यक्तिमत्त्व आता आपल्याला जबादारीनं साकारायचं आहे, ही भावना माझ्या मनात प्रबळ झाली होती. पु. ल. देशपांडे हे महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरात ते पोचलंय. समाजाच्या सर्व वयोगटामध्ये पुलंचे चाहते आहेत. त्यामुळे मला ही व्यक्तिरेखा साकारताना खूप मेहनत घ्यावी लागणार होती. कारण थोडी जरी चूक माझ्याकडून झाली असती तर संपूर्ण व्यक्तिरेखाच फसण्याची भीती होती.

या चित्रपटासाठी व्यक्तिरेखेचा अभ्यास म्हणायचा तर पुलंना मी लहानपणापासून टीव्हीवर पाहत आलो होतो. ‘वाऱ्यावरची वरात’, ‘बटाट्याची चाळ’ हे मी माझ्या वडिलांसोबत टीव्हीवर पाहिले आहे. पुलंचं बरंच साहित्य यु ट्यूबवर उपलब्ध असल्यामुळे तेही पाहता आलं. पुलंचा विनोद मार्मिक आहे. तो पोट धरून हसायला लावणारा आह. जसजसं पुलंचं साहित्य वाचत गेलो तसतसे ते अधिक कळायला लागले. या चित्रपटाचं शीर्षक ‘भाई व्यक्ती की वल्ली’ असं आहे. मला ते चांगले व्यक्तीही वाटले आणि वल्लीदेखील. त्यामुळे ही व्यक्तिरेखा पडद्यावर साकारणं हे खरोखरीच मोठं चॅलेंज होतं. केवळ आजच नव्हे तर अनेक दशकांपासून समाजात गंभीर घटना घडत आहे. पुलंचा विनोद हा ‘रिलीफ फॅक्टर’ होता. त्यांचं साहित्य वाचलं की अगदी ताजंतवानं वाटतं. तसेच एवढं मोठं व्यक्तिमत्त्व असूनही कधी त्यांच्यामध्ये अहंकाराची भावना डोकावली नाही. त्यांच्याकडे अनेक किश्श्यांची पोतडी होती. या सगळ्या गोष्टी एकत्र करून आम्ही त्या चित्रपटामधून सादर केल्या आहेत. चित्रपट करायला घेतल्यानंतर मी आधी वाचलेलं पुलंचं साहित्य नव्यानं वाचलं. सुनीताबाईंचं ‘आहे मनोहर तरी’ पुन:पुन्हा वाचलं. पुलं आणि सुनीताबाई यांचं विलक्षण नातं या चित्रपटामधून पाहायला मिळतं. पुलंची अनेक पुस्तकं तसेच हे पुस्तकदेखील अनेकांच्या घरी संग्राह्य आहे.

या चित्रपटासाठी मेकअप करून जेव्हा मी पहिल्यांदा आरशात पाहिलं तेव्हा मी स्वत:लाच ओळखू शकलो नव्हतो. तो माझ्यासाठी निव्वळ ‘मॅजिकल’ प्रसंग होता. प्रेक्षकांकडून आता त्याला पावती मिळतीय ही खूप आनंदाची गोष्ट आहे.

– सागर देशमुख

ठेवणीतले लेख

    आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा



    [recaptcha]

    काही निवडक प्रतिक्रिया:

    नरेंद्र चौधरी


    आपल्या संकेतस्थाळाच्या माध्यमातून असे लक्षात आले कि आपन खूप छान माहिती पुरवत आहात.
    संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया