अतिथी कट्टा

दिनांक : ११-०१-२०१८

‌नवकोट नारायण


गेली पंधरा ते वीस वर्षे ज्यांच्याशी बोलल्याशिवाय एक आठवडाही गेला नाही, अशा नारायणराव फडके यांच्यावर असा काही स्मृती लेख लिहायची वेळ येईल असं कधी स्वप्नातही वाटलं नाही. कारण ते नेहमी ‘मी शंभर वर्षे जगणारच’ असे म्हणत. ते दुर्दम्य आशावादी होते. ते उदास, निराश, खिन्न कधी दिसलेच नाहीत. ते अखंड उर्जेचा स्त्रोत होते. त्यांची समाजाकडे बघण्याची सकारात्मक वृती, कायम इतरांच्या मदतीला धावून जाण्याचा स्वभाव आणि इतरांतील चांगले गुण हेरण्याची सवय असल्याने त्यांनी असंख्य मित्र परिवार उभा केला. भारतीय सिनेमाचा चालता बोलता इतिहास असं त्याचं व्यक्तिमत्त्व होतं. सिनेमाशी निगडीत असलेल्या प्रत्येक गोष्टीचं त्यांनी मोठ्या आत्मीयतेनं जतन केलं. हा संग्रह जमा करताना खिशाला किती चाट बसली, किती चपला झिजवाव्या लागल्या या गोष्टी त्यांच्यासाठी गौण होत्या. आपल्या या संग्रहाचे एक कायमस्वरूपी संग्रहालय व्हावं असं त्याना कायम वाटायचं. त्या करीता त्यांनी खूप प्रयत्न केले. सर्वाधिक चित्रपटाच्या बुकलेट्सचा संग्राहक म्हणून त्यांचे नाव ‘लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये आले. आज उभ्या महाराष्ट्रातील चित्रपटप्रेमी नारायणरावांना ओळखतात त्यांच्या संग्राहक वृत्तीमुळे आणि गेली पन्नास वर्षे मुंगीच्या चिकाटीने त्यानी जमा केलेल्या अफाट संग्रहाने. ‘शंभर वर्षे जगणार’ असे म्हणणारे नारायणराव फडके मागच्या आठवड्यात ३ जानेवारीला सूर्यास्ताच्या वेळी वयाच्या ८१ व्या वर्षी निजधामास निघून गेले. कसे होते नारायणराव ? काय होता त्यांचा संग्रह ? काय संघर्ष केला त्यांनी तो जमा करताना? पाहूया या नवकोट नारायणाची कहाणी….

सामान्य व्यक्तीचं असामान्य असे कर्तृव करून दाखवीत असतात! भारतीय चित्रपटसृष्टीने शताब्दी काही वर्षांपूर्वी साजरी केली. सिनेमा हे आमच्या राष्ट्रीय संस्कृतीचे प्रतिबिंब घडविणारे माध्यम आहे. १९१३ साली दादासाहेब फाळकेंनी लावलेल्या या कलेचा वेलू केव्हाच गगनाच्या वर पोचला आहे. आज सिनेमा या व्यवसायाला उद्योगाचा दर्जा मिळाला आहे. पडद्यावरच्या आणि पडद्यामागच्या लाखो कलाकारांची रोजी रोटी या उद्योगावर अवलंबून आहे. करोडो रसिकांच्या जीवनात या कलेने आनंदाची फुलबाग फुलवली आहे. सिनेमाने सामाजिक स्थित्यंतरातदेखील मोलाची भर टाकली आहे. यांत्रिकीकरणाने आपल्या समाजातील स्पृश्य-अस्पृश्यता काही प्रमाणात कमी झाली तर सिनेमाने (ही देखील यांत्रिकीकरणाचीच देणगी) माणूस इथून तिथून एकच आहे हा एकात्मतेचा संदेश रुजविला. हिंदी सिनेमाने तर प्रादेशिकतेची दरी कमी करण्याचे मोलाचे काम केले आहे. हे सर्व जरी खरे असले तरी या कलेचे जतन व्हावे, हा सांस्कृतिक वारसा सन्मानाने जपला जावा असे कधीच कुणाला वाटले नाही. सरकारी पातळीवर आनंदीआनंद होता, आजही आहे. मग अशा वेळी सामान्य रसिकांनीच आपल्या कुवतीप्रमाणे आणि आपल्या क्षमतेप्रमाणे हा सांस्कृतिक ठेवा जपायला सुरुवात केली. कारण सिनेमाचा खरा आश्रयदाता हा सामान्य रसिकच होता; आहे.

मग कधी एकट्याने कधी समान विचारांच्या व्यक्तींनी एकत्र येवून या कलेला केवळ जपलं नाही तर तो ठेवा पुढच्या पिढीकडे कसा योग्य रीतीने कसा संस्कारित होईल हे देखील पाहिलं. या सर्वांच्या या तपश्चर्येला शासनाची अजिबात साथ लाभली नाही. समाजानेदेखील या छंदाची सुरुवातीला थोडी कुचेष्टाच केली. पण निष्कांचन वृत्तीने हे कार्य करणारे हे छांदिष्ट निघाले आणि या संस्कृतीचे जतन होत गेले. अशाच तपस्वींपैकी एक होते पुण्याचे श्री नारायणराव फडके! गेली साठ वर्षे सिनेमाची बुकलेट्स, पुस्तके, फोटो यांचा संग्रह त्यांनी जमविला.आज त्यांच्याकडील हा खजिना पाहून डोळे आनंदाने आणि आदराने भरून येतात. आज त्यांच्या संग्रहात तब्बल ८००० बुकलेट्स आहेत. मराठी सिनेमांचे जवळपास १००% बुकलेट्स आहेत. त्यांच्या या संग्राह्य वृत्तीला सलाम ठोकला अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने त्यांना ‘चित्रभूषण’ हा मानाचा पुरस्कार देवून! त्यांच्या या कार्याची दखल घेत ‘लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ने त्यांचा यथोचित सन्मान केला. नारायणराव फडके यांचा उत्साह उत्साह तरुणाला लाजविणारा होता .

नारायणराव फडके १००% पुणेरी!
जन्म – ९ ऑक्टोबर १९३७. घर सदाशिव पेठ, उंबर्‍या गणपतीसमोर. त्यांचा वडिलोपार्जित फडके वाडा होता. त्यांच्या आजीचा त्यांचावर मोठा प्रभाव होता. माणसं कशी जमवावी कशी टिकवावी, माणुसकी हेच जगातील सर्वात मोठे मूल्य आहे, हा संस्कार बालपणातच त्यांच्यावर झाला. घरात माणसांचा मोठा वावर. घरात गरिबी असली तरी घर खाऊन पिऊन सुखी होते. काव्य – शास्त्र – विनोद – साहित्य – कला या सांस्कृतिक गोष्टींच घरात कोडकौतुक हो्तं. छोट्या नारायणाला पहिला छंद जडला तो स्वाक्षरी गोळा करण्याचा. आणि पहिली सही त्यांना मिळाली ती स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांची. एवढ्या मोठ्या व्यक्तीची स्वाक्षरी सुरुवातीलाच मिळाल्याने त्यांचा उत्साह दुणावला. जुन्या काळातील विनोदी लेखक चिं. वि. जोशी यांची सही आणि संदेश मिळण्यासाठी मात्र त्यांना त्यांच्या घरी भरपूर खेट्या घालाव्या लागल्या. शेवटी महत्प्रयासाने त्यांनी ती सही मिळविली. पण लोकांना पोट धरून हसायला लावणारा हा लेखक प्रत्यक्षात मात्र खूप गंभीर प्रकृतीचा होता हादेखील अनुभव त्यांना मिळाला. पुढे नामवंताना भेटून त्यांच्या सह्या आणि संदेश गोळा करण्याचा नादच लागला. यात बालगंधर्व,आचार्य अत्रे, पु .भा. भावे, सुधीर फडके, पु. ल. देशपांडे, महामहोपाध्याय द. वा. पोतदार यांना भेटून त्यांच्या स्वाक्षऱ्या मिळवीत गेले. अगदी शेवटपर्यंत फडके यांना ऑटोग्राफ घेण्याचा छंद आहे. अलीकडे मात्र त्यांनी यात थोडासा बदल करून ‘ऑटोग्राफ विथ फोटोग्राफ’ असा लक्षणीय बदल केला होता. आज त्यांच्या संग्रहात तब्बल ३५०० स्वाक्षरींचा संग्रह आहे.

साहित्य, सिनेमा, नाटक या कला प्रांताबरोबरच राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा, विज्ञान आणि संशोधन या क्षेत्रातील नामवंतांचे विशेष कार्यासाठी अभिनंदन करण्यासाठी तसेच वाढदिवसाला आजही ते आठवणीने त्यांना अभिष्ट चिंतनाचे पत्र पाठवीत. उलट टपाली त्या नामवंतांचेदेखील त्यांना पत्र येत असे . आज फडके यांच्या संग्रहात तब्बल २५०० हून अधिक पत्रे आहेत. यात स्वतंत्र भारताचे सर्व पंतप्रधान ,राष्ट्रपती, मुख्यमंत्री, राज्यपाल यांची पत्रे आहेत. सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचे स्वहस्ताक्षरातील दोन पत्रे त्यांच्या संग्रहात आहेत. थोर समाजसेविका मदर टेरेसा यांची तीन पत्रे तर त्यांच्यातील ममत्वाचे दर्शन देणारी आहेत. फडके यांनी त्यांच्या उपक्रमाची माहिती मदर टेरेसा यांना दिली. त्यावर त्यांनी पत्रात कौतुक तर केलेच शिवाय टंकलिखित पत्राच्या खाली पुन्हा स्वहस्ताने लिहून ‘ज्या दिवशी मी तुम्हाला भेटेल तो दिवस माझ्यासाठी खूप आनंदाचा असेल ‘असा प्रेमळ शेरा दिला. ज्या स्त्रीने सर्व जगाला ममतेचा ,करुणेचा आणि प्रेमाचा संदेश दिला तिने फडकेंसारख्या आनंद पेरणार्‍या अनोळखी व्यक्तीबाबत प्रतिक्रिया द्यावी हा त्यांच्या द्रष्टेपणासोबतच

फडके यांच्या ‘गुडवर्क’ला दिलेली मोठी पावती म्हणावी लागेल .आज नारायणराव यांच्या संग्रहात सुनील गावस्कर, महंमद युनुस, महंमद रफी, शंतनुराव किर्लोस्कर, व्ही.शांताराम,जयंत नारळीकर, बाबा आमटे ,डॉ.वसंत गोवारीकर, अमिताभ बच्चन, पु ल देशपांडे , सचिन तेंडूलकर अशा विविध क्षेत्रातल्या नंबर वन लोकांची पत्रे आणि स्वाक्षर्‍या आहेत.सिनेमा या माध्यमाचे त्यांना पहिल्यापासून कौतुकमिश्रित आकर्षण होतेच. पन्नासच्या दशकात आलेल्या ‘लाखाची गोष्ट’ या सिनेमाच्या बुकलेट्सपासून त्यांना ती जमविण्याची आवड निर्माण झाली. ‘भानुविलास थिएटर’चे मालक श्री. वि. वि. बापट यांनी त्यांना सुरुवातीला सिनेमाची पुस्तिका आणि इतर साहित्य द्यायला सुरुवात केली. त्यामुळे फडके आजही आपल्या बुकलेट्स संग्रहाचे श्रेय बापट यांना देत असत. ‘लाखाची गोष्ट’ची एक दिलचस्प आठवण फडके सांगतात. या सिनेमाच्या वेळी राजाभाऊ परांजपे यांनी एक लाख रुपयाची बनावट नोट काढली होती आणि त्यावर लिहिले होते ‘हा चित्रपट पाहणार्‍या प्रेक्षकांना आम्ही एक लाख वेळा हसविण्याचे आश्वासन देतो.’ ही दुर्मिळ नोट आजही त्यानी जपून ठेवली आहे. या बुकलेट्समध्ये काय नव्हतं? सिनेमाची सारी माहिती, कलावंत, गीतकार, संगीतकार, दिग्दर्शक, कथानक, गाणी सब कुछ ! किंमत फक्त २५ पैसे. सिनेमाच्या तिकिटावर जसा करमणूक कर असे तसाच या बुकलेट्सवर असे. १९६० च्या आसपास तो रद्द झाला.

पुण्यातील त्या काळाचे ‘प्रभात’, ‌‘हिंद विजय’, ‘डेक्कन’, ‘मिनर्व्हा’, ‘ग्लोब’ या थिएटरवरील फडके यांच्या फेऱ्या वाढल्या. थिएटर मालक /निर्माते यांना भेटून ते बुकलेट्स जमवू लागले. याचदरम्यान त्यांची भेट सोहराब मोदी यांच्याशी झाली. त्या काळी त्यांची पुण्यात ४-५ थिएटर होती. मोदींनी त्यांच्या छंदाला प्रोत्साहन दिले. मराठीची बुकलेट्स मिळविणं त्यामानाने सोपं होतं. एक तर निर्माते, कलावंत यांना फडके यांच्या छंदाची जाणीव होती.

त्यामुळे दत्ता केशव, मधुकर पाठक, राम गबाले, कमलाकर तोरणे, भालजी पेंढारकर, माधव शिंदे, दादा कोंडके, राजदत्त .. या मागच्या पिढीतील नामांकित मंडळीनी त्यांच्या संग्रहात मोलाची भर टाकली. १९६५ नंतर ते अनंत दामले यांना भेटले. त्यानी आनंदाने त्यांच्याकडील फोटो आणि पुस्तिकांचा खजिना त्यांच्याकडे सुपूर्त केला. मराठी सिनेमाबाबत काही अडचण येत नव्हती. पण हिंदी सिनेमाच्या बुकलेट्सकरीता फडके यांना फार पायपीट करावी लागली. १९८०च्या दरम्यान त्यांच्या असे लक्षात आले की मराठीचा संग्रह आपला उत्तम आहे. पण हिंदी मात्र फारच कमी आहे. त्यानी पुण्यातूनच निर्माता/दिग्दर्शकांना पत्रं पाठवायला सुरुवात केली. यात प्रामुख्याने एल.व्ही.प्रसाद, ताराचंद बडजात्या, रामानंद सागर, होमी वाडिया यांच्याशी संपर्क साधला. प्रारंभी कुणी फारशी दखल घेत नाही असे दिसल्यावर त्यांनी मुंबईत स्वत: जावून स्टुडिओचे दरवाजे पालथे घालायला सुरुवात केली. ‘मेहबूब’ स्टुडिओचा अनुभव मोठा रंजक आहे. १९८०च्या सुमारास फडके जेव्हा या स्टुडिओत गेले त्या वेळी मेहबूब मियांचे चिरंजीव तिथे होते. फडके यांनी आपल्या येण्याचे प्रयोजन सांगितले. तेव्हा त्यांना उत्तर मिळाले ‘आज नाही नंतर या ! ’ फडकेंनी चिकाटी सोडली नाही त्यांनी पुन्हा विनंती केली आणि ‘मी पुण्याहून खास आशा ठेवून तुमच्या कडे आलो आहे ’ असे सांगितल्यावर ‘मैं वादा करता हूं .. तुम्हाला उद्याच सर्व सामग्री पाठवतो ’ असे आश्वासन मिळाले. फडके पुण्यात परतले आणि काय आश्चर्य… खरोखरच ‘मेहबूब’ स्टुडिओतून त्यांच्याकडे पार्सल आले. मेहबूब स्टुडिओविषयी फडके सांगतात, तिथे आत एक बोर्ड लावला होता. त्यावर लिहिले होते- ‘मराठी चित्रपटांचे चित्रण करणाऱ्या निर्मात्याला स्टुडिओच्या भाड्यात निम्मी सवलत दिली जाईल.

‘वाडिया स्टुडिओ’ची आठवण तर आणखी हृदयस्पर्शी आहे. स्टंटपटाची नायिका फियरलेस नादिया हिला भेटून काही बुकलेट्स मिळतात का हे पाहण्यासाठी फडके एकदा ‘वसंत स्टुडिओ’त गेले. तिथे बाहेर एक कृश व्यक्ती बसली होती.त्या व्यक्तीने फडकेंना आत प्रधान साहेबांना भेटा असे सांगितले. प्रधानसाहेब यांनी बुकलेट्सकरीता मॅडमना भेटावे लागेल असे सांगितले. फडके सायंकाळपर्यंत वाट पाहत बसले. मॅडम आल्या. रूपेरी पडद्यापासून दूर होवून ३०-३५ वर्षे झाली असली तरी त्यांचा तोरा कायम होता. छायाचित्र काढतानादेखील त्या वर जावून मेक अप करून आल्या. त्यांनी आनंदाने ४०च्या दशकातील त्यांच्या सिनेमांची बुकलेट्स व इतर सामग्री त्यांना दिली. फडके खूष झाले. पण खरी गंमत पुढेच आहे. फडके बाहेर आले तेव्हा तिथे ती कृश व्यक्ती तिथेच होती. त्यांना देखील फडकेंचे काम झाल्याचा खूप आनंद झाला. फडकेंनी त्यांना त्यांचा परिचय विचारला. तेव्हा ते सुरुवातीला टाळाटाळ करू लागले. पण नंतर कळाले ती व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नसून फियरलेस नादियाचा एकेकाळचा नायक जॉन कावस होता! आता थक्क व्हायची पाळी फडकेंची होती. फडकेंनी त्यांच्यासमवेत फोटो काढला. त्यांचा ऑटोग्राफ घेतला. ‘अहो आत्ता आम्हाला कोण विचारतो? असे ते म्हणाले. त्यावर फडके म्हणाले, ‘असं कसं म्हणता तुम्ही? तुम्ही आमच्या लहानपणीचे सुपरमॅन आहात.’ काळाची गंमत पहा. हातातल्या बुकलेट्सवर हॅंडसम तरणाबांड जॉन कावस होता आणि प्रत्यक्षात जणू काळाने सूड उगविलेला जॉन कावस होता!.

बुकलेट्सची अशा रीतीने भर पडत गेली. त्या बाबत फडके सांगायचे- ‘आजही माझाकडे येणाऱ्या लोकांना मी जेव्हा ‘पाकीझा’, ‘मुगल -ए-आजम’, ‘गंगा जमुना’, ‘मदर इंडिया’, ‘नवरंग’, ‘झनक झनक पायल बाजे’ या सिनेमांची बुकलेट्स दाखवितो तेव्हा त्यांचे डोळे पाणावतात. कमाल अमरोही यांच्या अफाट पैसा काढून बनविलेल्या (पण फ्लॉप ठरलेल्या) ‘रजिया सुलतान’ सिनेमाच्या बुकलेट्सचे निर्मिती मूल्य ५०० रुपयांच्या वर होते. त्या मानाने अफाट गाजलेल्या ‘शोले’ सिनेमाचे बुकलेट्स अगदीच सामान्य होते. मराठीत अलीकडे ‘अजिंठा’, नटरंग’, ‌‘बालगंधर्व’ या सिनेमांची बुकलेट्स अतिशय अप्रतिम झाली आहेत.आज माझ्या संग्रहात जवळपास ८०% हिंदी सिनेमाची आणि ९५% वर मराठी सिनेमाची बुकलेट्स आहेत. बुकलेट्सचे आर्टिस्ट श्रीकांत धोंगडे, स्व.भाई भगत, कुंदा भगत , किरण शांताराम यांनीदेखील माझा संग्रह वाढविण्यात मोलाची भर घातली.’ या सर्वांबाबत फडके कायम ॠणी असत.

नारायणराव फडके यांचा आणखी एक छंद होता तो म्हणजे पुस्तके जमविण्याचा! आज विविध विषयावरील असंख्य पुस्तके, वर्तमानपत्रांनी प्रकाशित केलेल्या विविध प्रासंगिक पुरवण्या, संग्राह्य दिवाळी अंक, सिनेमाची दुर्मिळ पोस्टर्स, टपाल खात्याने वेळोवेळी प्रकाशित केलेले स्टॅंप्स अशा अनेकानेक छंदानी त्यांचं जीवन फुलविलं आहे. १०० वर्षापूर्वी प्रकाशित झालेले ‘मनोरंजन’, ‘किर्लोस्कर’चे अंक या खजिन्यात आहेत. एकदा त्यांनी शंतनुराव किर्लोस्कर यांना त्यांच्या वाढदिवशी ‘किर्लोस्कर’चे जुने अंक देवून त्यांचा वाढदिवस संस्मरणीय बनविला होता.
खरं तर झपाटा हा शब्दच त्यांच्या करीता योग्य ठरेल. कारण हा छंद जपताना त्यांनी केलेल्या खटपटी, खिशाला पडलेली चाट, समाजात या छंदाला नसलेली प्रतिष्ठा याचा कधीच त्यांनी विचार केला नाही. मुळात सिनेमाशी दुरान्वयेदेखील संबंध नसताना त्यांनी ही कला जपली ही फार मोठी गोष्ट आहे. नारायणराव फडके हे नाव आज त्यांच्या संग्रहामुळे सर्व महाराष्ट्राला माहित झाले आहे. आज माहिती आणि तंत्र ज्ञानाच्या या युगात या संग्रहाला फार मोठे मूल्य प्राप्त झाले आहे. कोणत्याही वर्तमानपत्र /नियतकालिके/मासिके/ विविध वृत्त वाहिन्या यांना सिनेमाबाबताची कुठलीही शंका असेल, काही माहिती हवी असेल तर तात्काळ फडकेसाहेबांशी संवाद साधत असे. एकदा प. बंगालमधून एक संगीत प्रेमी फक्त नारायण फडके, पुणे एवढीच माहिती घेवून पुण्याला भल्या पहाटे त्यांच्याकडे धडकला होता. मन्नाडे यांच्यावर त्याचे संशोधन चालू होते. फडक्यांनी त्याला सर्वतोपरी सहाय्य केले. खुल्या दिलाने आपल्याकडील माहितीचा खजिना ते सहज समोरच्या पुढे रिता करीत.अनेक जण त्यांच्या पुस्तकात फडकेंचा उल्लेख करतात तर बरेच जण करीत देखील नाहीत. फडकेंना त्याची ना खेद ना खंत! पण य़ा सार्‍या कामाची दखल दूरदर्शनने घेतली. सिध्दार्थ काक यांच्या ‘सुरभि’ आणि ‘फेस इन द क्राऊड’ या दोन कार्यक्रमात फडकेंनी हजेरी लावली.

या अजब छंदापोटी सारं आयुष्य पणाला लावणारे नारायणराव फडके यांच्या आता भावना काय आहेत असा प्रश्न केल्यावर आम्ही त्यांना त्यांच्या सहस्त्र चंद्र दर्शन सोहळ्यात विचारला होता त्या वेळी ते म्हणाले होते- ‘हा एवढा मोठा संग्रह जमविला खरा पण आता पुढे त्याचे काय? खरं तर शासनाने मला जागा द्यायचे कबूल केले आहे. पण केंव्हा? लवकरात लवकर जागा देवून एका कायमस्वरूपी म्युझियम करीता मला मदत करावी ही माझी साधी अपेक्षा आहे. कारण शेवटी कागदालादेखील माणसाप्रमाणे एक ठराविक आयुष्य असतं. या सर्व नारायणराव शेवटपर्यंत जिथे कार्यरत होते ते लक्ष्मी रोड वरचे एम आर जोशी यांचे ऑफिस म्हणजे आमचा अड्डा होता. चित्रपटाशी, नाटकाशी, साहित्याशी निगडीत असलेल्या प्रत्येकाने इथे हजेरी लावली होती. दिवाळी अंकाच्या काळात तर हे कार्यालय गर्दीने फुलून निघायचे. कित्येक दिवाळी अंकाचे लेखांचे प्लानिंग इथूनच व्हायचे. नारायणरावांची स्मरणशक्ती ‘गुगल’ ला लाजविणारी होती.
छोट्याशा संदर्भावरून ते इत्यंभूत माहिती देत असत. १९५६ साली आलेल्या ‘कुंदन’ या चित्रपटातील एका गाण्याचा (शिकायत क्या करू..) विषय निघाला होता.लगेच त्यांनी त्याचे दिग्दर्शक सोहराब मोदी, त्यांचे सिनेमे, त्यांचे ऐतिहासिक सिनेमे, त्यांची पुण्यातली थिएटर यांची माहिती दिली. शांतारामबापूंचा त्यांचा विशेष स्नेह होता.बापूंच्या प्रत्येक वाढदिवसाला ते आवर्जून भेटत असत. बापूंच्या ‘पिंजरा’ चित्रपटाच्या हिन्दी आवृत्तीबाबत फार माहिती नाहीये. पण नारायणरावांनी त्या हिंदी सिनेमाची डीव्हीडी एकदा मिळवून मला दिली!

बुकलेट्सचे डीजिटायजेशन लवकर होणे गरजेचे आहे. राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय माझा हा खजिना घ्यायला एका पायावर तयार आहे. पण मला माझ्या संग्रहाला स्वत:ची आयडेन्टीटी हवी आहे. या संग्रहातील एकेक गोष्ट मिळविताना मी सोसलेली तळमळ, कष्ट, जिद्द मी विसरू शकत नाही. हा संग्रह उभारताना गेली ६० वर्षे मी भारतभर फिरलोय. परीश्रम, कष्ट या गोष्टी पैशात मोजता येत नाहीत. राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाकडे हा खजिना देणं हा माझा शेवटचा ‘ऑप्शन’ आहे. शासनदरबारी माझ्या विनंतीची दखल नक्की घेतली जाईल या बाबत मी आशावादी आहे.’
नारायणराव अखेरपर्यंत आशावादी होते. लोकांच्या आयुष्यात आनंद पेरणारं त्यांच कर्तृत्व आहे. सिनेमावर दरवर्षी करोडो रूपये खर्च होतात. हजारो लोकांना नारायणराव यांच्या संग्रहाची माहिती आहे. आता खरंच वेळ आली आहे कुणीतरी पुढे येऊन त्यांचा हा खजिना वाचविण्याची. नारायणराव यांच्या ६० वर्षांच्या मेहनतीला झपाटाच्या माध्यमातून न्याय मिळेल? १९८९ साली जागतिक मराठी परिषदेच्या ठिकाणी शरद पवार नारायणरावांना म्हणाले होते- ‘सिनेमाशी काहीही संबंध नसताना आपण हा खजिना जमविलात हे खरोखरच कौतुकास्पद आहे!’ आज नारायणराव आपल्यात नाहीत. पण त्यांच्या संग्रहातील खजिन्याच्या रूपाने कायम आपल्यातच रहाणार आहेत. काळ जस जसा पुढे जात राहील, तसा नारायणरावांच्या खजिन्याचे संग्राह्य मूल्य वाढत जाईल. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राने एक संग्राहक गमावला आणि आम्ही सदैव मदतीचा हात पुढे करणारा एक पितृतुल्य आनंदाचा झरा गमावला!

– धनंजय कुलकर्णी

ठेवणीतले लेख

आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा[recaptcha]

काही निवडक प्रतिक्रिया:

गंगाधर ग.

काल मी माझ्या कुटुंबासोबत चोरीचा मामला हा चित्रपट पाहिला बनवला आहे. मराठी चित्रपट नवीन नवीन गोष्टी स्वीकारत आहे.
संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया