अतिथी कट्टा

दिनांक : १६-११-२०१८

‌‌‌‌‌‌‌‌‘नाळ’च्या दिग्दर्शनात माझी थोडीही ढवळाढवळ नाही…
‘फॅंड्री’, ‘सैराट’ या दोन चित्रपटांच्या यशानंतर नागराज मंजुळे ‘नाळ’ हा नवाकोरा चित्रपट घेऊन प्रेक्षकांसमोर आले आहेत. या चित्रपटाचं लेखन, निर्मिती आणि सादरीकरण मंजुळे यांचं असून दिग्दर्शन सुधाकर रेड्डी यांचं आहे. या चित्रपटाच्या निर्मिती प्रक्रियेबद्दल श्री. मंजुळे यांचं हे मनोगत.

——

‘झी टॉकिज’मध्ये मी २०१० मध्ये ‘प्रोमो प्रोड्युसर’ म्हणून आठ महिने काम केलं. त्यानंतर ‘फॅंड्री’चं दिग्दर्शन केलं. त्यापाठोपाठ ‘सैराट’ आला नि आता माझा ‘झी’सोबत ‘नाळ’ आलाय. सुधाकर रेड्डी हा ‘नाळ’चा कर्ताधर्ता. ‘सैराट’चं शूटिंग आम्ही नुकतंच संपवलं होतं. एका सायंकाळी सुधानं मला ‘नाळ’ची गोष्ट ऐकवली. मला ती खूपच आवडली. आपल्याकडे आई-मुलाच्या नात्यावर बरेच चित्रपट आले आहेत. परंतु, बहुतेकांमध्ये मेलोड्रामाच अधिक पाहायला मिळाला आहे. त्यामुळे असे चित्रपट पाहण्याचा मला कंटाळाच येतो. परंतु, आई-मुलामधील नातं अत्यंत तरलपणे सादर करण्यात सुधाकर ‘नाळ’द्वारे यशस्वी ठरला आहे. खरं तर हा चित्रपट म्हणजे माझीच गोष्ट आहे. ती मला सुचायला हवी होती नि मी ती दिग्दर्शित करायला हवी होती. परंतु, तसं घडलं नाही. ही गोष्ट सुधाला सुचली. यावरून मला एक लक्षात आलं की सगळ्याच चांगल्या गोष्टी आपल्याला सुचणार नाहीत किंवा करताही येणार नाहीत. ही गोष्ट सुधाच्या मनात खूप वर्षांपासून होती. वास्तविक सुधा खूप कमी बोलतो. परंतु, ही गोष्ट मोठ्या पडद्यावर कशी दिसेल हे त्यानं मला खूप छान पद्धतीनं सांगितली. ‘एक आकाश’ नावाची एक शॉर्टफिल्म सुधानं यापूर्वी केलेली आहे. त्यासाठी त्याला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे. चित्रांच्या भाषेद्वारे बोलण्यात सुधा माहिर आहे, असं मला वाटतं. मुळात तो एक खूप छान नि गोड माणूस आहे. तो आपल्या सोबत असला की अवतीभवती आनंदी वातावरण असतं. त्यामुळे सुधाच्या गोष्टीत आपण अजिबात ढवळाढवळ करायला नको असं मला वाटलं. ही फिल्म मी करू शकलो नसतो. त्याउलट आपण त्याच्या प्रयत्नाला पाठबळ द्यायला हवं असं मला मनोमन वाटलं. त्यासाठी माझ्यासोबत काही निर्माते मंडळी आली नि हा चित्रपट बनवण्याचं ठरलं.

सुधा मूळ तेलुगुभाषिक. या चित्रपटाचे संवाद मी लिहिले आहेत. ज्या सायंकाळी सुधानं ही गोष्ट मला ऐकवली त्याच वेळी चित्रपटामधील बापाचा रोल मीच करायला हवा, असा बॉम्ब त्यानं टाकला. त्यावेळी ‘सैराट’ चित्रपट अगदी प्रदर्शनाच्या उंबरठ्यावर होता. सुधाला ‘नाळ’ चित्रपट मे महिन्यात चित्रीत करायचा होता. ‘सैराट’ २९ एप्रिलला प्रदर्शित होणार होता. त्यानंतर फक्त पाच दिवसांनी सुधाला ‘नाळ’चं चित्रीकरण सुरू करायचं होतं. मला स्वत:ला ‘सैराट’ व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी ठरेल, असा अंदाज असल्यामुळे लगेचच आठवड्याभरात आपण दुसऱ्या चित्रपटात काम करणं कठीण आहे असं वाटलं. ‘सैराट’चा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर सुधालादेखील हा चित्रपट काहीतरी वेगळ्याच पातळीवर जातोय याची एव्हाना कल्पना आली होती. म्हणून त्यानं मग ‘नाळ’चं चित्रीकरण सहा महिन्यांसाठी पुढं ढकललं. त्यानंतर अशा घटना घडल्या की, ‘झुंड’ या माझ्या पहिल्या हिंदी चित्रपटाचं काम सुरू झालं. त्यामुळे ‘नाळ’मधील व्यक्तिरेखेसाठी आपण हवा तितका वेळ देऊ शकणार नाही, असं मला वाटलं. त्यामुळे मी सुधाला या चित्रपटामध्ये बापाच्या व्यक्तिरेखेसाठी दुसऱ्या कोणत्या कलाकाराची निवड करण्यास सांगितलं. परंतु, सुधानं त्याचा आग्रह सोडला नाही नि मी हा चित्रपट स्वीकारला. सुधानं पटकथा लिहिली होती. त्याच्या पटकथेतला ‘इसेन्स’ मी संवादामध्ये आणला. मी त्याला स्वत:च सांगितलं होतं की या चित्रपटाचे संवाद मीच लिहिणार. पटकथेवर आमची खूप चर्चा झाली. संवादाच्या माध्यमातून मी इतर सर्व व्यक्तिरेखांमध्ये आणखी चांगले रंग भरण्याचं काम केलंय. मी मला लिहिता येते त्या मराठीतच संवाद लिहिले. त्यानंतर मग ‘संवाद को-ऑर्डिनेटर’कडून वैदर्भीय स्थानिक भाषेमध्ये त्याचं रुपांतर केलं. या चित्रपटाची गोष्टच चित्रभाषेत खूप बोलकी असल्यामुळे मी खूप मोजकेच संवाद लिहिले आहेत.

हा चित्रपट बनायला जवळपास दीड वर्षं लागलं. देविका दफ्तरदार, दीप्ती या दोघींनी खूप छान काम केलं आहे. ‘सैराट’ प्रदर्शित होण्याआधी जवळपास एक वर्ष मी म्हटलं होतं, की हा चित्रपट प्रेक्षकांना आवडेल किंवा नाही आवडेलही. परंतु, या चित्रपटाच्या संगीताच्या प्रेमात प्रेक्षक नक्कीच पडतील. तशीच काहीशी गोष्ट ‌‘नाळ’ची आहे. हा चित्रपट प्रेक्षकांच्या किती पसंतीस उतरेल मला माहीत नाही. परंतु, त्यामधील श्रीनिवास पोकळे नक्कीच तुम्हाला आवडेल. तो तुम्हाला संमोहित करतो. वयानं खूप लहान असूनही त्यानं अभिनय न करता परफॉर्मन्स दिला आहे. शेवटी शेवटी तर तो या चित्रपटात एवढा घुसला होता की, रोलसाउंड, सायलेन्स, कॅमेरा असंदेखील तो सेटवर म्हणायला लागला होता. मला वाटतं की, या वर्षींचे अनेक पुरस्कार श्रीला मिळतील तसेच समीक्षकांचंही त्याला खूप प्रेम लाभेल.

– नागराज मंजुळे

ठेवणीतले लेख

  आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा  [recaptcha]

  काही निवडक प्रतिक्रिया:

  शांताराम कांबळे

  मला वाटतं होते, मराठी मुलगी फक्त माधुरी दीक्षित ने हिंदी चित्रपट सृष्टीत खूप खूप कामे केली, पण, संध्या, रत्नमाला, नंदा, अशा कितीतरी, मराठी अभिनेत्री होत्या, होऊन गेल्या, याचा मला खूप🎉🎊 खूप अभिमान वाटतो, मी चित्रपट रसिक आहे.

  संदर्भ:- फेसबुक प्रतिक्रिया