अतिथी कट्टा

दिनांक : ०६-१२-२०१८

‌‌‌‌‌‌‌‌‘मुंबई-पुणे-मुंबई ३’ हा आमच्यासाठी स्पेशल चित्रपट….
‘मुंबई-पुणे-मुंबई’ या चित्रपटाची तिसरी आवृत्ती येत्या ७ तारखेपासून प्रदर्शित होत आहे. सतीश राजवाडे यांचं दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटात स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे यांच्याच प्रमुख भूमिका आहेत. एखाद्या मराठी चित्रपटाचा तिसरा भाग बनणं ही पहिलीच वेळ आहे. त्यानिमित्तानं या तिघांचं हे मनोगत.

——

सतीश राजवाडे : २०१० मध्ये या चित्रपटाचा मी प्रवास सुरू केला होता. तेव्हा जी मंडळी आमच्यासोबत होती तीच मंडळी तिसऱ्या आवृत्तीमध्येही आहेत त्याचा मला खूप आनंद वाटतो. जुन्या चेहऱ्यांबरोबर काही नवीन चेहरेही तिसऱ्या आवृत्तीमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळतील. प्रत्येक वेळी चित्रपट करताना माझा प्रामाणिक प्रयत्न असतो. ही प्रेमकथादेखील मी अगदी मनापासून बनवली आहे. मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात एखाद्या चित्रपटाचा तिसरा भाग बनण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्याचा मला खूप आनंद आणि अभिमानही आहे. पहिली गोष्ट जिथं संपली तिथून दुसरी गोष्ट सुरू झाली आणि जिथं दुसरी गोष्ट संपली तिथं तिसऱ्या आवृत्तीची गोष्ट सुरू झाली आहे. या चित्रपटाचा ‘टिझर’ जेव्हा प्रदर्शित झाला तेव्हा त्याला अवघ्या २४ तासांमध्ये १० लाखांपेक्षा जास्त ‘व्ह्यूज’ मिळाले. यावरून प्रेक्षकांना तिसऱ्या भागाची केवढी उत्सुकता आहे याची कल्पना येते. या चित्रपटाचं वैशिष्ट्य म्हणजे ‘ग साजणी…’ हे गाजलेलं गाणं या चित्रपटात पुन्हा पाहायला मिळतंय. प्रेमात पडलेलं एक शहर दुसऱ्या शहराला साद घालतंय, ही कल्पना घेऊन आम्ही ते गाणं चित्रीत केलंय.

हे गाणं परंपरागत चालत आलंय. या चित्रपटाचा चौथा भागही येईल. फक्त तिसऱ्या भागाचं प्रेक्षक कशा पद्धतीनं स्वागत करतात ते आता पाहायचं.

स्वप्नील जोशी : माझ्यासाठी हा चित्रपट खूप ‘स्पेशल’ आहे. कारण मी, सतीश आणि मुक्ता असे तिघेही खूप वेगवेगळ‌ं काम करीत असतो. परंतु, माहेरी आल्यानंतर जसा आनंद व्हावा तसा आनंद आम्हाला हा चित्रपट करताना आला. दोन-तीन वर्षानंतर आम्ही या चित्रपटाला पुन्हा एकदा भेट देतो. त्याच्या ‘मेकिंग’चा आनंद लुटतो. मला असं वाटतं की खूप कमी अभिनेते आणि अभिनेत्रींना एखाद्या चित्रपटाच्या तिसऱ्या भागाला पुन्हा भेट देण्याची संधी मिळते. तसेच हा ‘रीमेक’ नाही. त्यामुळे तिसऱ्या भागामधील दृश्यं वेगळी आहेत. पात्रांमधून व्यक्त होणाऱ्या भावना वेगळ्या आहेत. मूळ गोष्ट तीन भागांमध्ये आता खूप पुढं गेली आहे. त्यामुळे ‘रिपीटेशन’चा धोका नाही. एखाद्या मराठी चित्रपटाचा तिसरा भाग होण्याची ही पहिलीच वेळ आहे आणि आपण तिन्ही भागांचा नायक असावं यासारखी आनंदाची दुसरी गोष्ट नाही.

मुक्ता बर्वे : या चित्रपटाच्या तिसऱ्या आवृत्तीच्या निमित्तानं जेव्हा आम्ही शूटिंगसाठी भेटलो तेव्हा आम्हा सगळ्यांच्याच लक्षात आलं की यातील मूळ व्यक्तिरेखा त्यांच्या त्यांच्या आयुष्यात खरोखरीच खूपच पुढे चालल्या आहेत. ही पात्रं त्यांची त्यांची आयुष्य जगत असतात आणि मध्येच आम्ही त्यांना भेटून ‘हाय-हॅलो’ करीत असतो. त्यातून आमचा एक सिनेमा तयार होतो आणि तो प्रदर्शित झाल्यानंतर आम्ही पुन्हा आणि ते त्यांचं आयुष्य जगायला लागतात. इतक्या छान पद्धतीनं सतीश राजवाडेंनी ही गोष्ट पुढं नेली आहे. खरंच मी, स्वप्नील आणि सगळेच अॅक्टर नशीबवान आहोत, की ज्यांना या चित्रपटाच्या तिन्ही भागांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. कलाकारांच्या दृष्टीनं आम्ही एखाद्या चित्रपट किंवा नाटकाच्या निमित्तानं पात्राच्या प्रेमात पडतो. परंतु, शूटिंग संपलं की त्यांना आम्हाला निरोप द्यावा लागतो. परंतु, ही पात्रं आम्हाला थोड्या थोड्या अवधीनं पुन्हा पुन्हा भेटताहेत. प्रेक्षकांच्या प्रेमामुळे तिसरा भाग येतोय हे अधिक महत्त्वाचं.

– सतीश राजवाडे, स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे

ठेवणीतले लेख

  आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा  [recaptcha]

  काही निवडक प्रतिक्रिया:

  सचिन पारेकर


  शाहू मोडक हे मराठी चित्रपटातील असामान्य कलाकार होते. 'माणूस' मधील त्यांची भूमिका अविस्मरणीय होती.विनम्र अभिवादन!💐💐

  संजय रत्नपारखी
  संदर्भ:- फेसबुक प्रतिक्रिया