अतिथी कट्टा

दिनांक : ०६-०९-२०१८

‌‌‌‌‌‌‌‌सुहासताई माझी खूप जवळची मैत्रीण

नितीन केणी यांची प्रस्तुती असलेला ‘बोगदा’ हा सिनेमा येत्या ७ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आई आणि मुलीच्या नात्यातील कंगोरे मांडणाऱ्या या सिनेमाचं दिग्दर्शन केलंय ते निशीता केणी यांनी. या सिनेमात अभिनेत्री मृण्मयी देशपांडे आणि ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांची प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाबद्दल मृण्मयी देशपांडे यांचं हे मनोगत.

——

‘बोगदा’ या सिनेमाच्या शीर्षकामुळे प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. मायलेकीच्या नात्यामधील विविध पैलू मांडणाऱ्या या सिनेमाचे पटकथा आणि संवादलेखन दिग्दर्शिका निशिका केणी यांनीच केलं आहे. स्त्रीव्यक्तिरेखेवर आधारित आपल्याकडे खूप कमी चित्रपट बनले आहेत. या सिनेमाची दिग्दर्शिका स्वतः भारतातील ‘व्हिसलिंग वुड्स’ या अग्रेसर फिल्म इन्स्टिट्यूटची विद्यार्थिनी असून, छायाचित्रकार प्रदीप विग्नवेळू, संकलक पार्थ सौरभ, ध्वनी मुद्रणकार कार्तिक पंगारे, वेशभूषाकार यश्मिता बाने हे पडद्यामागील कलाकारदेखील व्हीस्लिंग वूडचेच असल्याकारणामुळे, ‘बोगदा’ हा सिनेमा दर्जेदार कलाकृतीचा नमुनाच ठरणार आहे. या सिनेमाचे निर्माते करण कोंडे हे देखील व्हीस्लिंग वूडचे माजी विद्यार्थी असून, सुरेश पान्मंद, नंदा पान्मंद आणि दिग्दर्शिका निशिता केणी या चौकडीने मिळून ‘बोगदा’ सिनेमाची निर्मिती केली आहे.

आमच्या चित्रपटाची ‘टीम’ ही तरुण आहे. परंतु, माझं सर्वाधिक काम हे आमच्या ‘टीम’मधील सर्वात तरुण कलाकार सुहासताईंसमवेत होतं. तिची एनर्जी जबरदस्त आहे. ‘अग्निहोत्र’ ही माझी पहिली टीव्ही मालिका. तेव्हापासून मला सुहासताईंबरोबर काम करण्याची संधी मिळाली आहे. ती वयानं माझ्यापेक्षा खूपच मोठी आहे. मात्र ती माझी खूप जवळची मैत्रिणदेखील आहे. त्यामुळे आमचं एकमेकांवरचं प्रत्यक्षामधील प्रेम, ‘केमिस्ट्री’ प्रेक्षकांना या चित्रपटाच्या रुपानं मोठ्या पडद्यावरही पाहायला मिळेल. सुहासताईची खासियत म्हणजे ती आपण पडद्यावर साकारणार असणारे कॅरेक्टर ती प्रत्यक्षात जगते. ती आपल्या डोळ्यांमधून त्या व्यक्तिरेखेला बोलू देते. त्यामुळे तिच्याबरोबर कॅमेऱ्याला सामोरी जाताना मला काही वेगळं करावं लागलं नाही. ती ज्या पद्धतीनं अभिनय करीत होती, त्यावर फक्त मला ‘रीअॅक्ट’ करायचं होतं. तो अभिनय अगदी खरा होता. माझ्याकडून त्या वेळी झालेल्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत, त्या म्हणजे तिला त्या वेळी मी दिलेल्या त्या ‘रीअॅक्शन्स’ होत्या. आमचं युनिट खूप तरुण असल्यामुळे सुहासताई मला नेहमी म्हणायची की, या मुलांकडून मी रोज काही नवीन शिकते आहे.

एक मुलगी आपल्या आईला इच्छामरणासाठी घेऊन चालली आहे, एका पॉइंटनंतर तुला तुझी आई आयुष्यात कधीही दिसणार नाही. हा विचार मनात आण एवढं एकच वाक्य निशितानं मला माझ्या व्यक्तिरेखेसंदर्भात सांगितलं होतं. हा विचारच खूप ‘पॉवरफुल’ होता. त्यानंतर या दोघींमधील उलगडत जाणारं नातं मला विलक्षण भावलं. आपली मराठी चित्रपटसृष्टीत खूप बदलतीय हे आता सगळ्यांनाच ठाऊक आहे. खूप वेगवेगळ्या पद्धतीनं विषय मांडायला लेखक-दिग्दर्शकांकडून सुरुवात झालीय. निशीताची या विषयाकडे बघण्याचा ‘अॅप्रोच’ मला अत्यंत वेगळा वाटला. शूटिंगच्या वेळीच मला तिची कामाची पद्धत छान वाटली. प्रत्येक सीनच्या आधी मला कुतूहल असायचं की, निशीता हा प्रसंग कशा पद्धतीनं घेईल. गेली दहा वर्षं मी सातत्यानं काम करतेय. त्यामुळे आपण न ठरविताही कधी कधी आपल्या कामाचा एक साचा बनतो. परंतु, निशीतानं आजवरच्या सिनेमांची चौकट पूर्णपणे तोडून टाकली. निशीताचं शॉट डिव्हीजन, टेकिंग स्टाईल मला खूप वेगळी वाटली. त्यामुळे निशीतानं केलेला प्रयोग प्रेक्षकांना कसा वाटतो, हे जाणून घेण्यास मीदेखील खूप उत्सुक आहे.

या चित्रपटासाठी आम्ही सुमारे २५-२६ दिवस शूटिंग केलं. प्रत्येक दिवसाचं शूटिंग हे आमच्यासाठी काहीतरी नवीन ‘चॅलेंज’ घेऊन येत होतं. ‘सिंक साउंड’ तंत्रज्ञान असलेला हा माझा पहिला चित्रपट. या तंत्राशी जुळवून घेताना मजा आली. हे तंत्र मला अधिक भावलं. कारण डबिंगच्या वेळी चित्रीकरणादरम्यानच्या ‘इमोशन्स’ जशाच्या तशा संवादात आणणं थोडं कठीण जातं. त्यावेळी कधी कधी थोडासा परिणाम हरविण्याची भीती असते. चित्रीकरणावेळी निर्मात्यांनी आमची खूप छान बडदास्त ठेवली होती. शूटिंग संपल्यानंतर आम्ही खूप मजा करायचो. थोडक्यात या चित्रपटाचा एक भाग बनल्याबद्दल मजा आली.

– मृण्मयी देशपांडे

ठेवणीतले लेख

    आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा



    [recaptcha]

    काही निवडक प्रतिक्रिया:

    नरेंद्र चौधरी


    आपल्या संकेतस्थाळाच्या माध्यमातून असे लक्षात आले कि आपन खूप छान माहिती पुरवत आहात.
    संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया