अतिथी कट्टा

दिनांक : १९-०४-२०१८

‌‘व्ही. शांताराम यांचे चित्रपट म्हणजे आमच्यासाठी ग्रंथ’…

राज्य शासनातर्फे देण्यात येणाऱ्या व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कारासाठी यंदा प्रसिद्ध अभिनेत्री-दिग्दर्शिका मृणाल कुलकर्णी यांनी निवड झाली. त्याबद्दल त्यांचं हे मनोगत.
——–

व्ही. शांताराम यांच्या नावाचा पुरस्कार मिळणं ही माझ्यासाठी खूप खूप मोठी गोष्ट आहे. आपण प्रत्येक जणच चित्रपटाचे अभ्यासक आहोत. चित्रपटावर प्रेम करणारी माणसं आहोत. व्ही. शांतारामांनी जे चित्रपट बनवले, त्यातून आजही शिकण्यासारखं खूप काही आहे. शांतारामबापूंची पॅशन, त्यांनी निवडलेले विषय, त्याची हाताळणी, संगीत… सर्वच काही उत्कृष्ट होतं. थोडक्यात, व्ही. शांताराम यांचे चित्रपट म्हणजे चित्रपट क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांसाठी पाठ्यपुस्तक, ग्रंथच आहे. त्यामुळे अशा व्यक्तीच्या नावे दिल्या जाणाऱ्या पुरस्कारासाठी आपली निवड होणे ही खूप आनंदाची गोष्ट आहे. या पुरस्काराचे नाव ‘व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार’ असं आहे. मला वाटतं की या पुरस्कारासाठी माझी निवड करण्यामागे पुरस्कार निवड समितीची काही अपेक्षा असावी. इथून पुढच्या कारकिर्दीत मला आणखी योगदान द्यायला हवं, याची जाणीव करून देणारा हा पुरस्कार आहे. मी आजपर्यंत ज्या पद्धतीचं काम निवडलं, केलं ते प्रेक्षकांना खूपच आवडलं. गेल्या २५ वर्षांमधील माझ्या कामाला रसिकांनी अगदी भरभरून दाद दिली. त्यामुळे मला या पुरस्कारामुळे आणखी चांगलं काम करण्याची प्रेरणा मिळाली आहे.

या पुरस्काराच्या निमित्तानं जेव्हा मी माझ्याच कारकिर्दीकडे मागे वळून पाहते तेव्हा बऱ्याच गोष्टी नजरेसमोर येतात. ‘स्वामी’ मालिका माझ्यासाठी नियतीनंच घडवून आणलेली गोष्ट होती. जगप्रसिद्ध झालेल्या कादंबरीवर बेतलेल्या या मालिकेसाठी अगदी लहान वयात निवड होणे हीच माझ्यासाठी मोठी संधी होती. त्यामुळे मला उत्तरोत्तरही निवडीचं स्वातंत्र्य मिळालं आणि मी त्याचा लाभही घेतला. लौकिकार्थानं मला ‘स्ट्रगल’ अजिबात करावा लागला नाही. त्याचं श्रेय अर्थातच ‘स्वामी’ मालिकेला. माझ्याकडे येत गेलेल्या भूमिका आणि मला ज्या पद्धतीच्या भूमिका निवडायच्या होत्या, त्या निवडण्याचं स्वातंत्र्य मला ‘स्वामी’नं मिळवून दिलं. ज्या घरातून मी आले,

त्याला साहित्य, कलेचा वारसा आहे. इतिहासाचं प्रेम आमच्या रक्तातच आहे. त्यामुळे अनेक ऐतिहासिक आणि सामाजिक भूमिका साकारण्याचं भाग्य मला लाभलं. केवळ मराठीच नव्हे तर विविध हिंदी दूरचित्रवाणीवर मला अनेक चांगल्या मालिकांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. इतिहासावर माझं मनापासून प्रेम आहे. वीर सावरकर, माईसाहेब आंबेडकर, मीरा, द्रौपदी, राजमाता जिजाऊ, अहिल्याबाई होळकर यांच्यावरील कलाकृतींमध्ये मला भूमिका करता आल्या. या भूमिकांमुळे माझं इतिहासाबरोबरचं नातं अधिक दृढ झालं. ‘अवंतिका’, ‘गुंतता हृदय हे’ या दोन मालिकांमधील माझ्या सामाजिक भूमिकाही मी खूप महत्त्वाच्या मानते. रडणाऱ्या स्त्रीची भूमिका करणं मला पसंत नाही. सध्या आपण ज्या युगामध्ये वावरतो, त्यामध्ये स्त्री सक्षम आहे, सशक्त आहे. त्यामुळे आपल्या भूमिकाही तशाच असाव्यात असा माझा आग्रह होता. त्यामुळे मी मार खाणारी किंवा दु:खी स्त्री कधी साकारली नाही. हे मी अगदी ठरवून केलं. आजच्या किंवा उद्याच्या काळातील स्त्री ही मला कायम आकर्षित करीत आली आहे.

गेल्या २५ वर्षांमध्ये मी ‘स्वामी’, ‘अवंतिका’, ‘गुंतता हृदय हे’ आणि ‘राजा शिवछत्रपती’ या केवळ चारच मालिका मराठीमध्ये केल्या आहेत. या चारही भूमिकांना खूप महत्त्व आहे. त्यामधून मला वेगवेगळी स्त्री रुपं दाखविता आली. माझ्या करिअरचा साहित्याशी खूप मोठा संबंध आहे. ‘स्वामी’ ही तर जगप्रसिद्ध कादंबरी होती. ‘श्रीकांत’ ही शरदचंद्र चॅटर्जींची कादंबरी आहे. ‘अवंतिका’ ही स्नेहलता दसनूरकरांची कादंबरी होती. ‘हसरते’ ही गाजलेली मालिका जयवंत दळवींच्या ‘अधांतरी’ कादंबरीवर आधारली होती. ‘द्रौपदी’ ही ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या प्रतिभा राय यांच्या ओडिया भाषेतील कादंबरीवर आधारीत होती. ‘मीरा’ ही मालिका मीराबाईंच्या भजन तसेच काव्यावर आधारलेली. साहित्यावर आधारीत कलाकृतींमध्ये काम करता येणं हे माझ्या करिअरचं वेगळेपण आहे. अभिनयाबरोबरच मी लेखनातूनही स्वत:ला व्यक्त करीत राहिले. बरीच मासिकं आणि नियतकालिकांमधून मी लिहीत राहिले. त्यातूनच मग मी दिग्दर्शन क्षेत्रात उतरण्याचा निर्णय घेतला. कॅमेऱ्याच्या मागे काय घडतं हे जाणून घेण्यात मला कायमच रस होता. प्रेम आणि लग्नावर भाष्य करणारा ‘प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं’ हा चित्रपट दिग्दर्शित केला. त्यानंतरचा दुसरा चित्रपट म्हणजे ‘रमा माधव’. या चित्रपटामुळे एक वर्तुळ पूर्ण झालं. ज्या भूमिकेद्वारे मी पहिल्यांदा प्रेक्षकांसमोर आले त्याच भूमिकेला मध्यवर्ती ठेवून मला हा चित्रपट करता आला. तसेच या चित्रपटामधून मला ऐतिहासिक स्त्री-पुरुष व्यक्तिरेखांमधील परस्परसंबंधांचं दर्शन घडविता आलं. या दोन्हीही चित्रपटांना प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. त्यामुळे यापुढेही मी काहीतरी वेगळं करण्याचा निश्चितच प्रयत्न करीन.
——-
– मृणाल कुलकर्णी

ठेवणीतले लेख

आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा[recaptcha]

काही निवडक प्रतिक्रिया:

रत्नाकर दामोदर चिखले

अतिशय सुंदर उपक्रम सुरू केला आहे शुभेच्छा 🙏 अभिनंदन करतो
संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया