अतिथी कट्टा

दिनांक : ०१-०३-२०१९

‌‌‌‌‌‌‌‌मिस्टर आगलावे : रुपेरी पडद्यावरील खलनायक




विडी ओढणारा विडी पेटविताना आधी आगकाडी पेटवितो. अनेकदा तो दुसऱ्यांच्या जीवनात आग लावून त्यांचे जीवन उद्ध्वस्त करीत असतो. आपल्या चित्रपटांतल्या खलनायकाच्या खलनायकीचं हे देखील एक रूप आहे. या रूपामुळेच हा खलनायक मिस्टर आगलावे म्हणून ओळखला जात असतो. मराठी चित्रपटात असाच एक आगलाव्या खलनायक होऊन गेला आहे तो म्हणजे जयशंकर दानवे. १ मार्च हा दानवेंचा जन्मदिन. त्यानिमित्तानं दिवंगत पत्रकार-समीक्षक इसाक मुजावर यांनी काही काळापूर्वी लिहिलेला लेख आम्ही पुर्नप्रकाशित करीत आहोत.

——

जयशंकर दानवे मराठीचे म्हणून ओळखले जात असले तरी मूळचे ते हिंदीतलेच होते. सोहराब मोदींनी हिंदी रंगभूमीवर आपल्या उर्दू नाटकांचे जे वैभव निर्माण केले होते, त्या काळात जयशंकर दानवे उर्दू रंगभूमीवरच वावरत होते आणि काही हिंदी चित्रपटांतदेखील त्यांनी तेव्हा भूमिका केल्या होत्या. तेथून त्यांना मराठीत आणले ते भालजी पेंढारकरांनी. जयशंकर दानवे काही केवळ नट म्हणून मराठीत आले नाहीत. उर्दू रंगभूमीवरून त्यांना मराठीत येताना भालजी पेंढारकरांनी त्यांच्यातला नट जरूर पाहिला असेल. पण तो पाहताना त्यांच्यातील नटाचा त्यांनी फारसा गंभीरपणे विचार केला नव्हता. कारण जयशंकर दानवेंची भालजींना तेव्हा नट म्हणून नव्हे तर सहाय्यक म्हणून खरी आवश्यकता होती. मराठी चित्रपट तेव्हा मराठीबरोबर हिंदीतदेखील निर्माण व्हायचे. या हिंदी चित्रपटासाठी हिंदीवर प्रभुत्व असलेला आणि कलावंतांच्या हिंदी संवादांच्या चांगल्या तालमी घेऊ शकणारा एखादा चांगला तालीम मास्तर प्रत्येक मराठी चित्रसंस्थेला लागायचा.

जयशंकर दानवेंना उर्दू रंगभूमीवरून आपल्या चित्रपटात आणताना भालजींनी त्यांच्यात हा तालीम मास्तरच प्रामुख्याने पाहिला होता. यामुळे सुरुवातीला भालजींच्या चित्रपटात नगण्य अशा छोट्या भूमिकाच त्यांच्या वाट्याला यायच्या आणि या भूमिका करीत असताना भालजींच्या हिंदी चित्रपटातील कलावंतांच्या तालमी घेण्याचे कामच त्यांना प्रामुख्याने करावे लागायचे. हे काम करीत असताना तेव्हा ते भालजींच्या हाताखाली सहाय्यक दिग्दर्शक म्हणून वावरायचे.

‘जयप्रभा’ स्टुडिओत येणारा प्रत्येक कलावंत प्रथम दानवेंच्या तालमीत तयार व्हायचा आणि मग त्याला भालजी बाबांसमोर उभे केले जायचे. हा त्याकाळी ‘जयप्रभा’ स्टुडिओतील शिरस्ता होता. सुरुवातीच्या काळात ‘राजा गोपीचंद’, ‘गोरखनाथ’, ‘थोरांताची कमळा’ या भालजींच्या चित्रपटांत नगण्य भूमिकाच दानवेंच्या वाट्यास आल्या. त्यांच्यातील नटाला भालजींच्या चित्रपटात संधी मिळाली होती १९४३ च्या ‘बहिर्जी नाईक’ या चित्रपटाद्वारे.

‘जयप्रभा’ स्टुडिओत निर्माण झालेल्या आपल्या पहिल्या चित्रपटात खलनायकाची भूमिका बाबुराव पेंढारकर यांनी करावी अशी भालजींची इच्छा होती. पण तोवरच त्यांच्याशी त्यांचे काही मतभेद झाले. या मतभेदात ज्याला फारसा वाव दिला गेला नाही अशा नटाला घेऊन त्याच्याकडून बाबुरावांच्या तोडीची भूमिका करून घ्यायची जिद्द भालजींनी बांधली होती. या जिद्दीतच जयशंकर दानवेंना ती मोठी खलनायकी भूमिका देऊन भालजीनी ती दानवेंच्याकडून बाबुरावांच्या तोडीस तोड करून घेतली.

भालजींनी १९४७ मध्ये आपल्या ‘प्रभाकर पिक्चर्स’च्या ‘जय भवानी’ या चित्रपटाचे दिग्दर्शन करण्याची संधी जयशंकर दानवेंना दिली. नंतरच्या काळात मराठी आणि त्याचबरोबर हिंदी चित्रपटात स्वत:च युग निर्माण करणाऱ्या सुलोचनाबाई या चित्रपटातच सर्वात प्रथम नायिका बनल्या. हे दानवेंनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाच एक ठळक वैशिष्ट्य. ‘जय भवानी’, ‘मीठभाकर’, ‘शिलंगणाचं सोनं’, ‘शिवा रामोशी’, ‘स्वराज्याचा शिलेदार’, ‘छत्रपती शिवाजी’ यासारख्या चित्रपटात आणि त्यानंतरच्या काळात त्यांनी जबरदस्त मुस्लीम भूमिका केल्या. १९६२ मध्ये ‘जावई माझा भला’ या चित्रपटात ऐतखाऊ जावयाच्या भूमिकेत ते दिसले होते. मिस्टर आगलावे ही त्यांच्या खलनायकाची प्रतिमा या चित्रपटाने जोपासली होती. भालजींच्या चित्रपटातील त्यांच्या विशिष्ठ भूमिका आजही अधूमधून आपणास पहावयास मिळतात व त्यांची आठवण येते.

– इसाक मुजावर
(सौजन्य : सकाळ, रंजन पुरवणी, २० नोव्हेंबर १९९३)

ठेवणीतले लेख

    आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा



    [recaptcha]

    काही निवडक प्रतिक्रिया:

    नरेंद्र चौधरी


    आपल्या संकेतस्थाळाच्या माध्यमातून असे लक्षात आले कि आपन खूप छान माहिती पुरवत आहात.
    संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया