अतिथी कट्टा

दिनांक : ८-२-२०१८

‌मोघम मोघे


शब्दांचे जादूगार, अंधारावर ममत्वाचा अधिकार गाजवणारे आणि कवितेला “सखी’ म्हणून आपल्या अस्तित्वातच सामावून घेणारे कवी म्हणजे मा.सुधीर मोघे.
———-

‌१० मार्च २०१०. किर्लोस्करवाडी मधील विस्तीर्ण मैदान. ५ हजार प्रेक्षक बसतील असा शामियाना, मोठे व्यासपीठ, त्यावर मोठा सिनेमाचा पडदा. शामियानामध्ये ठीकठीकाणी स्पिकरची सोय. संध्याकाळचे ७.३० वाजलेले आणि फिल्मची सुरवात होते. मध्यन्तरासोबत अडीच तास ५ हजार प्रेक्षक समोरच्या पडद्ध्यावर उलगडणाऱ्या नाट्याचाच एक भाग होऊन गेलेले. फिल्मच्या शेवटी तिरंगा आकाशात डौलाने फडकत असताना टाळ्यांच्या कडकडाटात, माजी खासदार श्रीनिवास पाटील मोठ्याने सुधीर मोघ्यांना बोलावतात आणि कडकडून मिठी मारून खास कोल्हापुरी फेटा बांधतात.
व्ही.आय.पी. कक्षातील आणि बाकीच्या गावकऱ्याच्या डोळ्याच्या कडा ओलावलेल्या. अनेकांना आपण राहत असलेल्या गावाचा इतिहासच माहीत नसतो. या मातीने काय काय घटना पहिल्या, किती श्रमिकांचे घाम झेलले, किती आव्हाने पेलली, किती पिढ्या पोसल्या, याचीच चर्चा सर्वत्र चालू झालेली.
आणि आम्ही “चित्रकथी” जिंकलो या अवस्थेमध्ये.

फ्लॅश बॅक.

बरोबर एक वर्षाआधी, १ मार्च २००९ च्या सकाळी सुधीर मोघ्यांचा फोन आला. आपल्याला किर्लोस्करांच्या शतकपूर्तीनिमित्त फिल्म करावयाची आहे. आपण वाडीला जात आहोत. वाडी म्हंटलं की माझ्या समोर नरसोबाचीवाडी येते; कारण दुसऱ्या एका फिल्मसाठी आम्ही रेकी करण्यासाठी नरसोबाच्या वाडीला गेलो होतो.

‘वाडीचा काय संबंध ?’ – मी
‘अरे, ती वाडी नाही, ही किर्लोस्करवाडी.’ – इती मोघे.
मोघ्यांचा जन्म, बालपण, आणि वर्षभराची पहिली कोवळी नोकरी वाडीत झाल्यामुळे वाडीचे त्यांचे संबंध, नातवाचे आजीसोबत असावेत तसे मऊ जुनेरयासारखे आहेत.

पुण्याहून वाडीला जाताना गाडीमध्ये मोघ्यांनी अख्खी किर्लोस्कर वाडी आमच्यासमोर उभी केली.

सोबत जुना मित्र आणि प्रथितयश छायाचित्रकार देबू देवघर होताच. मोघे काय, देबू काय, आमची पूर्वीपासूनची ओळख. काही ओळखी किंवा मैत्र कुठे कसे भेटले हे सांगणे जरा कठीणच, पण आठवणींबरोबर काही घटना – परिसर जोडलेले असतात. म्हणजे भूतकाळातील घटना सांगताना, त्या वर्षी धुवाधार पाऊस पडला होता, किंवा भूकंप झाला होता, याच चालीवर म्हणायचे झाले तर-

त्या काळी दत्तात्रय भुवनमध्ये ६ रुपयात थाळी मिळत असे. त्याहीपूर्वी १ रुपया ९० पैशांमध्ये थाळी चवीनं चाखल्याच सुहास बहुलकर अजूनही सांगतो. अर्थात, आजच्यापेक्षा नक्कीच चविष्ट असेल ती. मुद्दा तो नाही. रुपये ६ च्या जमान्यामध्ये, म्हणजे १९८२/८३ मध्ये दुपारच्या वेळी दत्तात्रय भुवनमध्ये खांद्यावर बॅग घेतलेले, पोलो नेक टी शर्ट घातालेले सुधीर मोघे प्रथम पहिले होते. पुण्याहून मुंबईला आलेले किंवा पुण्याकडे निघालेले प्रवासी दिसतात तसे दिसत होते. चार-दोन मराठी सिनेमे पाठीशी असल्यामुळे हॉटेलमधील काही मंडळींनी डोळ्यातून ओळख दाखवल्यामुळे सौजन्य म्हणून ते मोघम हसलेही होते.

त्यानंतर अनंत वेळा डेक्कन क्वीन घाट उतरली असेल. १९८८ च्या सुमारास जागतिक मराठी परिषदेच्या कार्याक्रमामध्ये मोघे मराठी चित्रपटगीतांवर ‘स्मरणयात्रा’ हा कार्यक्रम सादर करणार होते, तेव्हा विनय नेवाळकरांच्या ऑफिसमध्ये विनयनं ओळख करून देताच आम्ही दोघं म्हणालो होतो, ‘अर्थात! आम्ही ओळखतो एकमेकांना.’ खरं म्हणजे, केवळ तोंडओळख किंवा नाव ओळख होती. दोघं जण एकमेकांना नावाने ओळखत होतो. बस्स! कधी एकत्र काम वगैरे केलेलं नव्हतच. पण काही माणसं केवळ ऐकीव माहितीवर ओळखीची वाटत असतात किंवा सहज अक्सेसेबल वाटतात, तसा काहीसा प्रकार आमच्या बाबतीत होता. खरं तर मोघ्याचं नाव वजनदार कवी म्हणून ज्ञात होतं. त्यांच्या समकालीन एका मित्रानं फार चांगलं उदाहरण दिलं होतं.

“सुधीरपेक्षा मोठा असून श्रीकांतला मी ‘अरे, श्रीकांत’ म्हणून हाक मारीन, पण सुधीर मोघ्यांना ‘अहो-जाहो’ च करीन .” फरक बारीक आहे पण बराच बोलका आहे. यथावकाश प्रथेप्रमाणे विनयचं ब्लडप्रेशर वाढवत, उरलेसुरले केस पांढरे करत, टेन्शन देत – घेत मोघ्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत तालीम करत ‘स्मरणयात्रा’ स्मरणीय केली. जागतिक मराठी परिषदेच्या सिनेमाच्या प्रदर्शनानंतरचा आठवणीत राहणारा एकमेव उत्तम प्रयोग. या स्मरणयात्रेने परिषदेला पैसेही मिळवून दिले. मुद्दामून सांगायला हव, कारण मराठी माणसाने निर्माण केलेला मराठी परिषदेचा हा एकमेव यशस्वी उपक्रम – बाकी सर्व मराठी लौकिकास सार्थ ठरवणारे, लाखाचे बारा हजार करणारे. यात माझा फायदा म्हणजे, मोघे दोस्त झाले.

हळू हळू लक्षात येऊ लागलं की आमच्या बऱ्याच आवडीनिवडी एक आहेत. संस्कृतिक विश्वात छाती काढून फिरणाऱ्या अनेक वल्लीबद्दल आमची मतं वेगळी नाहीत. सिनेमाची शौक आणि अभिनेते – अभिनेत्रींबद्दल जिव्हाळा जवळचा आहे. तालुका स्पेस मधील बालपण, जिल्हा पातळीवरील शहरात मोठं होणं आणि राजधानीचं अप्रूप एक आहे आणि या प्रवासात ठाम नकाराची ठिकाणंही सारखीच आहेत.

कवी म्हणून सुधीर मोघे मोठे आहेतच. घरातील कीर्तन, प्रवचन, कथेकरी परंपरेची शिदोरी रक्तात भिनल्यामुळे शब्दांवर विलक्षण हुकुमत आहे. साकी, दिंडी, कटाव आदी जुन्या रचनाबंधांतील अनेक रचना मुखोदगत आहेत. त्यामुळे प्रत्येक रचना गोळीबंद निर्माण होते. अनेकदा नवीन केलेल्या रचना मला कवीच्या मुखी प्रथम ऐकण्याचा योग आलेला आहे, मग भले तो मुंबईच्या भर रहदारीमधील रिक्षात का असेना. मध्यंतरी सिरीयलच्या संगीत दिग्दर्शनाच्या निमित्तानं त्याचं मुंबईतलं येणं – जाणं वाढलं होतं. त्यामुळे संध्याकाळी आमची मैफल जमत असे. आम्ही दोघं खाण्या-पिण्यात चोखंदळ असल्यामुळे मुंबईतील नामचीन गल्लीबोळातली अनेक ठिकाणं आम्ही शोधून काढून ऐष केली होती.
एकदा गोवा सरकारच्या छोटेखानी भोजनलायामध्ये समोरच्या ओळखीच्या व्यक्तीला मी विचारलं, इकडं कसे काय? ‘अरे तुम्ही? किती वर्षांनी भेटताय!’ वगैरे झाल्यावर ते म्हणाले, “इथल्यासारखं प्रिपरेशन मिळत नाही माश्याचं कुठे, म्हणून पॅक करून घेऊन जातोय,”
मी विचारलं, “उर्मिला कशी आहे?”
गप्पा घरगुती होत आहेत पाहून मोघे ताटातल्या परमेश्वराच्या पहिल्या अवतारावर तुटून पडले. थोड्या वेळानं मोघ्यांची ओळख करून देऊन मी म्हणालो, “आणि हे उर्मिला मोतोंडकरचे वडील”
मोघे आनंदानं म्हणाले, “अरे वा! पूर्वीपासूनच उर्मिला आवडते आम्हाला आता आमच्यासारखीच मासेखाऊ आहे म्हटल्यावर अधिकच. उत्तम, छान!”
उत्तम, छान, सुंदर असं म्हणत पिठलं–भाकरी असो व सामीष भोजन; मनसोक्त भिडण्याची मोघ्यांना सवय आहे. आणि दुसरी म्हणजे, मुंबईत म्हणा किंवा पुण्यात म्हणा, निवांत काम करण्यासाठी दहा-पंधरा तरी ऑफिसच्या जागा बनवण्याचा छंद आहे. आमची ओळख झाल्यापासून मुंबईतील निदान चार-पाच जागा तरी मोघ्यांनी पूर्वीच्याच उत्साहानं वर्णिल्या असतील आणि यशावकाश सोडल्या असतील. पुण्यातसुद्धा निदान चार-पाच ठिकाणं हमखास भेटण्याची म्हणून ठरलेली आहेत. मग ते घर, खोली, गॅलरी, गॅरेज, हॉटेल, लॉबी, काहीही असो.
मोघे जागेच्या बाबतीत लकी म्हणता येतील. त्यांनी इच्छा व्यक्त केली कि दहापंधरा जण आमच्या गॅरेजमध्ये बसा, आमचा फ्लॅट रिकामा आहे, पोरं अमेरिकेमध्ये आहेत. तुम्ही वापरा, असं म्हणत हजर होतात. याचे एक रहस्य म्हणजे मोघे या जागांमध्ये अडकत नाहीत. काम संपताच घरमालकाच्या हाती चाव्या देऊन खांद्यावरील बॅगेसकट बाहेर पडतात. “गुंतुनी गुंत्यांत साऱ्या, पाया माझा मोकळा!”
अशा अनंत ठिकाणांवर एकाच वेळी प्रेम करणाऱ्या माणसाला एकाच ठिकाणी बसून काम करुन घेणं किती आनंदचं आणि गमतीचं आहे याचा अनुभव मला त्यांच्याबरोबर काम करताना आला गुरुचरित्रावर चित्रपट करण्याच्या निमित्तानं आम्ही दोघं महाराष्ट्र-कर्नाटक प्रांतातल्या बऱ्याच दत्तस्थानांवर गेलो. पुणे, कोल्हापूर, सांगली, सातार, नरसोबाची वाडी, औदुंबर, बेळगाव, धारवाड… अनेक.

फक्त दत्त आश्रमच नव्हे, तर अनेक पंथांच्या वस्तूंना, आश्रमांना आम्ही भेटी दिल्या. पण मनासारखं काही दिसत नव्हतं. मधेच कधी तरी नरसोबाच्या वाडीला संध्याकाळी देवळापासून दूर नदीच्या काठावरील दगडी घाटावर बसलो असताना देवाळातील संध्याकाळच्या आरतीचा गजर आणि मधूनच ‘हायपिच’मध्येच उठाणारी, “अनंत कोटी ब्रम्हांड नायक” हि घोषणा चित्रपटाचा पोत आणि रंग-संगीताच्या तालावर डोळ्यांसमोर येत होती. पण तेवढचं. आम्ही शोधत असलेला पुराणकाळापासून आज घडीपर्यंतचा धागा जुळत नव्हता. पुढे काही कारणांनी ही फिल्म झाली नाही, पण आमची कामे चालू होती. गोष्टी घडत जातात. ठरवून होतातच असे नाही. किर्लोस्कर फिल्मच्या वेळी पाण्यात बुडालेल्या गावांतील देवळांचे कळसच डोळ्यांसमोर यावेत तशा अनेक अनपेक्षित गोष्टी घडत होत्या. ‘पायापुरता प्रकाश’ किंवा दिव्याने दिवा लागत जावा तशा घटना मार्ग दाखवत जातात.
किर्लोस्करवाडीचा परिसर झाडांनी वेढलेला. या वडा – पिंपळाच्या बरोबरीनेच या मालावर वडार समाजाच्या “मय्यप्पा” देवाचं देऊळ आहे. आजही वाडीला जाग या देवळातील काकड आरतीने येते. ढोल आणि झांजांच्या आवाजाबरोबर या आरतीच्या सुरात कारखान्याचा भोंगा आवाज मिसळतो. हा सारा शंभर वर्षांचा इतिहास येथे राहणाऱ्या, काम केलेल्या निवृत्त झालेल्या किंवा आज कार्यरत असलेल्या गुणवंत कामगारांच्या तोंडूनच वदवून घ्यावा म्हणून आम्ही १० ते ७०, ७० ते ५०, ५० ते ३० अशा वयोगटातील माणसे शोधू लागलो आणि कोणी सांगितले, या मय्यप्पाच्या देवळाचा म्हातारा पुजारी रोज पहाटे आसपासच्या गावाहून एस. टी. ने येतो आणि काकडआरती करून जातो. त्याला गाठायचं ठरवलं.

कट्.
म्हाताऱ्या पुजाऱ्याचं झोपडीवजा खेड्यातील घर म्हाताऱ्याला ऐकू कमी येत होतं, म्हणून त्याच्या कानात ओरडून म्हणालो, ‘किर्लोस्कर कंपनी आहे ना! तिला शंभर वर्ष झाली म्हणून फिल्म करतोय, तुम्ही तुमच्या आठवणी सांगा”
म्हातारा म्हणाला, “कंपनीला शंभर वर्षे झाली! म्हणजे मी कंपनीपेक्षा मोठा आहे वयाने, कारण कंपनीच्या इमारतीचे दगड मी स्वतः हाताने फोडले आहेत.”
आमचा फुटबॉल झालेला.
म्हाताऱ्याने खणखणीत आवाजात सांगितले, “मय्याप्पा’च्या देवळात धोंडी महाराज म्हणून सत्पुरुष येऊन बसत असत. त्यांनी सांगितले होते, ‘या माळरानावर दिवसा दिवे लागतील झाला कि नाही महाराजाचा शबूत खरा. लागत्यात कि नाही कंपनीत दिवसा दिवे.”
आमच्या कॅमेरासमोर साक्षात १०८ वर्षाचा काळच बोलत होता.
पुण्यात आल्यावर मोघ्यांच्या ‘मुक्तछंद’ या घरच्या अंगणातला त्यांचा आवडता खडक आणि त्याच्या समोर ‘बोनसॉय’सारखा दिडफुटी, मोजून चार पानं आणि दोन फुलं असलेला चाफा यांच्या सोबतीला बंगल्याच्या बांधकामाच्या वेळी कापायच्या राहिलेल्या लोखंडी सळ्यांवर गूढ वातावरणनिर्मिती व्हायची. अर्थ समजतोय, भावतोय, पण नकळत निसटूनही जातोय – अशी काहीशी अवस्था व्हायची. अशा वेळी मग “सांज ये गोकुळी, सावळी” किंवा “सखी मंद झाल्या तारका”च्या जन्मकथा निघत असत.
नेमक्या शब्द करण्याच्या ताकदीसोबत मोघे समकालीन किंवा पूर्वसुरींच्या कविता किंवा संगीतरचनेचं अत्यंत मर्मग्राही विश्लेषण करतात. त्या वेळी अनेक संगीकारांच्या कवितेच्या समाजाबद्दल, अगाध ज्ञानाबद्दल अनेक स्फोटक किस्सेही बाहेर येतात.
दोन प्रतिभावान माणसं एकत्र आली की रोजच्या धकाधकीच्या सामान्य घटनांच्या गदारोळीत निर्मितीचे क्षण कसे बहरतात, याचं उदाहरण म्हणजे ‘शापित’ चित्रपटामधल्या ‘दिस येतील, दिस जातील’ या गाण्याचा जन्म.

बाबूजींच्या शिवाजी पार्कमधील घरातील सकाळची वेळ पुण्याहून आलेले मोघे समोर पेटी. त्याच्या बाजूला टेपचा गुंता झालेली कॅसेट आणि आधिच चार कनेक्शन्स असलेल्या प्लग मधून पाचवं कनेक्शन घेतलेला रेकॉर्डर. घरातल्या कामवालीची सकाळची झाडलोट, फोडणीचे वास, कुकरच्या शिट्ट्या आणि पेटीच्या सुरात नाना नानाऽनाना, नाना नाना.
हां लिहा याच्यावर काहीतरी – म्हणून नातीच्या शाळेच्या दप्तराचा बंद निट करणारे बाबूजी. या माहोलमध्ये कवीनं कविता लिहिणं थोर आहे. याही वातावरणामध्ये कदाचित प्रेशर कुकरच्या शिट्टीनं प्रेरित होऊन “तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं?” अशी ओळ सुचली कि मधेच चहाचा कप. पुन्हा मग नाना. ना. ना. नाना. या नानावर “दिस येतील, दिस जातील,’ फिट बसलं कि मग “भोग सरलं” अशी वास्तवाची जाणीव. क्रॉस लाईन सुचण्याआधी “जरा खाली फिरून येतो” म्हणून मोघे शिवाजी पार्कात जाऊनही आले.
पूर्वी ‘दत्तात्रय’मध्ये दिसलात ते तेव्हाच का ? असं मला केव्हापासून त्यांना विचारायचं आहे!
सकाळी ना ना करत सुरु झालेलं गाणं संध्याकाळी संपलं आणि मोघे पुन्हा डेक्कन पकडून पुण्यात दाखल. आजकाल मोघे ही दगदग टाळतात. ज्याला काम हंव तो येईल घरावरी असं म्हणत निवांत कविता करणं चाललेलं असतं.
आमच्या चित्रपटाच्या स्क्रिप्टमध्ये भोजनवळीचा एक प्रसंग होता. असे प्रसंग पडद्यावर फार बोअर होतात. तेव्हा साग्रसंगीत पंचपक्क्वनांची जेवणावळ कशी दाखवावी असा प्रश्न असताना, “स्वच्छ शुभ्रशा लवणाजवळी” अस संपूर्ण पंचपाक्वनापूर्ण ताटाचं वर्णन करणारा कटाव त्यांना सुचला होता. नुसत्या ‘ट’ ला ‘ट’ जोडणाऱ्या चारोळी बहाद्दरां कटाव ऐकून तरी माहित असेल कि नाही कोण जाणे! मोघ्यांची मुळं अशी महाराष्ट्रीय संस्कृतीमध्ये घट्ट रुजल्यामुळेच त्यांचा सशक्त शब्दबहार फुलून येतो. अशा शब्दकळेचे कवी आजकाल फार कमी झालेले आहेत. “चोली के पीछे क्या है ?” च्या जमान्यामध्ये “आँचल में क्या जी… किसीका…” असे हळुवार शब्द कितीपत टिकाव धरतील कोणास ठाऊक. चांगल्याला मरण नाही. अजूनही आशेला जागा आहे. गदिमांबरोबर काम केलेल्या मोघ्यांनी नवीन तरुण कवीमधून आपल्या जातकुळीशी नातं सांगणाऱ्या प्रतिभावान कवींचा रविकिरण मंडळासारखा घाट घालावा. निदान पुण्यात तरी जागेला तोटा नाही आणि आणखी एक निवांत ठिकाण मिळालं तर कोणाला नकोय ? मोघ्यांना तर नक्कीच हवंय. दुपारी पडदे वैगरे लावून वामकुक्षी घेता येईल. कामं काय, होतच राहतील.
हिंदी सिरीयलच्या रेकॉर्डिंगच्या वेळी कधी नव्हे ते १०-१२ व्हायोलीन आणि २ चेलो यांचे पिसेस घेणं चालालं होतं. आजकालच्या सिंथेटिक म्युझिकच्या जमान्यात हृदयाच्या धडकनसारखा जिवंत व्हायोलिनचा आवाज विरळाच. मोघे संगीतकार. फायनल टेक झाल्यावर मिक्सिंग झालेलं गाणं ऐकण्यासाठी झाडून सारे वादक उभे होते. माना डोलवत होते. गाणं संपल्यावर प्रत्येकाच्या तोंडून वाह वाह बाहेर आलं. गाणं संपल्यावर प्रत्येक कलाकाराला एक चांगल्या कलाकृतीमध्ये आपलही योगदान आहे याचा आनंद होता. शेजारी उभा असणारा विनय माझ्या कानात म्हणाला, ‘रेअर दृश्य आहे आजकाल वाजवून झालं कि पैसे घेण्यासाठी जो तो पळतो.’
अचानक एके दिवशी मोघ्यांनी माझ्या समोर काही वॉटर कलरमधील चित्रे ठेवली. गूढ, गर्द, काळोखाकडे जाणारी. रंग एकमेकामध्ये मिसळणारी, सारी व्याकरणं आणि चित्रांच्या प्रचलित व्याख्या मोडणारी. सारी, व्याकरणं आणी चित्राच्या काळ्या रंगात जांभळा. जांभळयामध्ये ऑरेन्ज, ऑरेंजमध्ये गर्द निळा, ह्या गूढ आकृतीबंधामध्ये एक विलक्षण मोकळेपणा होता. काही तरी सांगण्याचा प्रयत्न होता. मी अवाक् झालेलो. ‘हे काय मोघे ? आमच्या पोटावर पाय ?’ म्हणून मी चेष्टेत विचारलं. ‘कशी वाटतात चित्रे?’ तुमचं मत हवंय मोघे म्हणाले. ‘गूढ संध्याकाळच्या वाटतावरणातली.’ – मी म्हणालो.
‘कसं बोललात करेक्ट! असचं काहीसं मनात होतं.
‘खरं सांगू? तुमच्या ‘सांज ये गोकुळी’ मधील करड्या, ग्रे शेड्स आहेत ना, त्यांची आठवण येते. खरं तर ते गाणं म्हणजे एक चित्रच आहे.’ मी म्हणालो.
‘क्या बात है , क्या बात है. केव्हापासून माझ्या मनात चित्रं काढावीत असं रेगाळत होतं, पण धीर होत नव्हता. म्हटलं होऊन जाऊ ध्या आणी काढली ही चित्र, काढू ना ?

अहो विचारता काय ? आता थांबू नका.
नंतर त्यांच्या स्टुडीओमध्ये पुस्तकांपेक्षा रंगांचा आणि चित्रांचाच वावर वाढत गेला.
एकदा पुन्हा भेटल्यावर ‘सांज ये गोकुळी’ गाण्यातील ‘दूर डोंगराची रांग, जशी काजळाची रेष’ या ओळीची जन्मकथा त्यांनी सांगितली. किर्लोस्करवाडीमध्ये प्रसिद्ध चित्रकार आलमेलकर यांचे शाळेत प्रात्यक्षिक होते. ते ब्रश वापरत नसत. हाताच्या बोटांनी चित्र काढत असत पूर्ण चित्र काढून झाल्यावर त्यांनी हाताच्या अंगठ्याला काळा रांग लावून डोळा काढला. ते दृश कित्येक वर्ष त्यांच्या मनात रुतले होते. ते नकळत गाण्यामध्ये काजळाच्या रेषेच्या रुपात प्रकटले आणि आपण ही चित्रं काढावीत ही ऊर्मीही.
सृजनशील कलावंताच्या मनाच्या गाभाऱ्यात कशात काय विरघळेल आणि चित्रातून काव्य आणि काव्यातून चित्रं कसं साकारेल हे सांगणं कठीण आहे. पण मोघ्यांसारखे संवेदनशील कलावंत हे प्रयोग करीत राहणार. ते शब्दांत पकडणे अशक्य आहे.
पुन्हा मनात आलं – इन डिटेल नाही, तरी मोघ्यांवर मोघम तरी लिहायला हवं. अजून आशेला जागा आहे

– रघुवीर कुलकर्णी
raghuvirkul@gmail.com

ठेवणीतले लेख

    आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा



    [recaptcha]

    काही निवडक प्रतिक्रिया:

    नरेंद्र चौधरी


    आपल्या संकेतस्थाळाच्या माध्यमातून असे लक्षात आले कि आपन खूप छान माहिती पुरवत आहात.
    संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया