अतिथी कट्टा

दिनांक : १५-०४-२०१९

‌‌‌‌‌‌‌‌‌‘मिरांडा हाऊस’ प्रेक्षकांना खिळवून ठेवेल…
‘सावली’, ‘सावरिया डॉट कॉम’ आणि ‘अ रेनी डे’ या तीन चित्रपटांनंतर गोव्यातील प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक राजेंद्र तालक ‘मिरांडा हाऊस’ नावाची कलाकृती घेऊन येत्या 17 तारखेला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. त्यानिमित्तानं त्यांच्याशी झालेली ही चर्चा.

——

माझ्या यापूर्वीच्या तीन चित्रपटांपेक्षा वेगळा असा रहस्यमय ‘जॉनर’ मी या चित्रपटामधून वापरला आहे. वास्तविक आपल्याकडे या जॉनरचे खूप कमी चित्रपट बनलेत तसेच त्यांचं चांगलं जमून येण्याचं प्रमाणही खूप कमी आहे. या चित्रपटाच्या पोस्टरवरूनच आम्ही त्यात काय सादर करणार आहोत याची प्रेक्षकांना कल्पना येते. चित्रपटाच्या शीर्षकामध्येच रहस्याची झाक प्रेक्षकांना दिसून येईल. मी आधी केलेल्या तीन चित्रपटांना चित्रपटगृहांमध्ये तर चांगला प्रतिसाद मिळालाच, त्याशिवाय आजही हे चित्रपट वाहिन्यांवर जेव्हा लागतात तेव्हा ते खूप आवडल्याची प्रतिक्रिया माझ्यापर्यंत पोचते. एखाद्या फिल्ममेकरसाठी ही खूप आनंदाची गोष्ट आहे. हे सर्व घडलं ते प्रेक्षकांमुळे. त्यांनी दाखवलेल्या विश्वासामुळे मी वेगवेगळे विषय निवडण्याचं धाडस करू शकतो. असंच एक धाडस मी ‘मिरांडा हाऊस’द्वारे केलं आहे.

कोणत्याही रहस्यमय चित्रपटामध्ये सुरुवात, मध्य आणि शेवट हे तीन घटक खूप महत्त्वाचे असतात. प्रेक्षकांना खुर्चीवर खिळवून ठेवेल तो रहस्यपट आपलं वेगळेपण निर्माण करतो. ते करण्याचा प्रयत्न मी ‘मिरांडा हाऊस’मधून केला आहे.

खरं तर या चित्रपटात चार व्यक्तिरेखा पाहायला मिळणार असल्या तरी त्यातली चौथी व्यक्तिरेखा ही अदृश्य आहे. ती आहे खुद्द प्रेक्षकच. पडद्यावर दिसणाऱ्या तीन व्यक्तिरेखांचा मनाचा खेळ या चित्रपटामधून प्रेक्षकांना पाहायला मिळेल आणि ते स्वतः त्यामध्ये गुंतत जातील.

हा चित्रपट प्रदर्शित करण्यापूर्वी मी तो काही समीक्षकांना दाखवला. त्यांना तो खूप आवडला. या चित्रपटाच्या ट्रीटमेंटला त्यांनी उत्तम दाद दिली आहे. या चित्रपटाचं कास्टिंग खूप वेगळं आहे. मिलिंद गुणाजी आणि पल्लवी सुभाष हे लोकप्रिय आणि कसलेले कलाकार या चित्रपटात आहेत, तर या चित्रपटाद्वारे साईंकित कामत प्रथमच चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवत आहे. ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेमधील त्याची कामगिरी खूप उत्तम होती. ती पाहूनच मी त्याला या चित्रपटासाठी कास्ट केलं. त्याचा हा पहिलाच चित्रपट असून त्यानं खूप उत्तम काम केलं आहे. मराठी चित्रपटसृष्टीत एक नवीन स्टार जन्माला आलाय एवढंच मी म्हणेन. साईंकित या चित्रपटात एका पेंटरच्या मुलाची गोष्ट साकारली आहे. मिलिंद गुणाजीनं समर बांदोडकर हा एका आर्टिस्टच्या भूमिकेत आहे. पल्लवी सुभाषच्या वाट्याला मोहिनी ही व्यक्तिरेखा आहे. या व्यक्तिरेखेचे आडनाव मी मुद्दाम सांगत नाही. कारण त्यामध्येही आम्ही काही रहस्याचा धागा ठेवला आहे. आयरिस प्रॉडक्शन हाऊसने या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

‘वेलकम टू माय हाउस’ हा मिलिंदच्या तोंडचा ट्रेलरमधील संवाद आणि त्याचा भारदस्त आवाज प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे. आतापर्यंत खूप हलक्या फुलक्या भूमिकेत पाहायला मिळालेला साईंकित या चित्रपटात एकदम वेगळ्याच व्यक्तिरेखेत पाहायला मिळणार आहे. त्याच्या अगदी विरुद्ध भूमिका साईंकित या चित्रपटात साकारत आहे. मराठी आणि कोकणी भाषेत आम्ही हा चित्रपट निर्मिला आहे. प्रेक्षकांना तो आवडेल अशी अपेक्षा आहे.

– राजेंद्र तालक

ठेवणीतले लेख

  आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा  [recaptcha]

  काही निवडक प्रतिक्रिया:

  नरेंद्र चौधरी


  आपल्या संकेतस्थाळाच्या माध्यमातून असे लक्षात आले कि आपन खूप छान माहिती पुरवत आहात.
  संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया