अतिथी कट्टा

दिनांक : २८-०९-२०१८

‌‌‌‌‌‌‌‌मी, लता दीनानाथ मंगेशकर


विख्यात पार्श्वगायिका लता मंगेशकर यांनी २८ सप्टेंबर रोजी ९०व्या वर्षात पदार्पण केले. त्यानिमित्तानं खुद्द लतादीदींनी लिहिलेल्या आणि ‘ग्रंथाली’ प्रकाशित ‘फुले वेचिता’ या पुस्तकामधील काही भाग आम्ही संपादित स्वरूपात प्रकाशित करीत आहोत. या भागामध्ये लतादीदींनी आपल्या सुरुवातीचा संघर्षाचा काळ आणि आपले वडील प्रख्यात गायक मा. दीनानाथ मंगेशकर यांनी केलेल्या संस्कारांना उजाळा दिला आहे.

——

मध्यरात्र उलटून गेलेली आहे. उत्तर रात्रीचा गारवा बोचतोय. डोळ्यांवर झोप आहे. बाबांनी झोपेतून उठवले आहे. ते कसल्याशा धार्मिक ग्रंथाचं वाचन करताहेत. बहुतेक ‘हरिविजयाचे’. म्हणताहेत, ऐका ! किती रसाळ शब्द आहेत कवीचे. काव्य वर्णन आहे. त्यांच्या डोळ्यांतून घळाघळा धारा चालल्या आहेत. एरवी आपल्याला भीती वाटायची ते डोळे सौम्य झाले आहेत. अन आपल्याला आवडणारा त्यांचा धारदार आवाज किती संथ लयीत ऐकू येत आहे. डोळ्यावरची झापड उतरतेय, बाबांचे हे वेगळेच रूप मनात खोलवर रुजतेय; धर्मग्रंथाबद्दलच्या आदराचे अधिष्ठान असे पूर्वीच मनात ठसले.

ते असेच पहाटे सर्वाना उठवतात. पोरवयातल्या आमच्या डोळ्यांवर गाढ झोप आहे. बाबानी तंबोरा लावला आहे. त्यांनी लावलेल्या स्वरांनी आमची पहाट उजाडली आहे. त्यांच्या आवाजात आवाज मिसळून गेला आहे ; हे दृश्य अजूनही पुसले जात नाही. बाबांना जाऊन ४६ वर्षांचा, केवढा दीर्घकाळ उलटला आहे, तरीही बाबांची पहिली पुण्यतिथी, बाबांशिवाय काढलेले किती विचित्र दिवस, पुण्यातील आमचं वास्तव्य संपवून आम्ही कोल्हापूरला आलो ; त्यांच्या मायेच्या उबेतून थेट रस्त्यावरच्या उन्हात ! जगण्याच्या विवंचनेत मी मा. विनायकांना म्हटलं, माझ्या वडलांची पुण्यतिथी करायची आहे. मग कोल्हापूरच्या पॅलेस थिएटरात पुण्यतिथी झाली. खूप लोक जमले होते. काही गायक-कलावंत हजेरी लावून गेले. बाबांच्या फोटोला मी हार घातला, डोळे मिटून तंबोरा घेऊन गेले. त्यावेळी बाबांची सर्व पदे मी म्हणायचे. बहुतेक ‘शूरा मी वंदिले’ म्हटले. रागदारीतली एक चीजही म्हटली, बाबांनी शिकवलेली. नंतर सैगलचे ‘मैं क्या जानू क्या जादू है’ म्हटले.

घरी आले तर माई म्हणाली, “किती तोंड वेडीवाकडी करीत होतीस गाताना, त्यांना आवडलं नसतं.” झालं. बाबांच्या पहिल्या पुण्यतिथीच्या दिवशी एक निश्चय मनात कोरला, गाताना मुद्रा संयत असावी. आविर्भाव संयमित असावेत. हे मनात पक्के केले. बाबांना आवडले नसते ना !

आम्ही पुण्यात राजिवडेकरांच्या चाळीत राहत होतो. तेव्हा आमच्या शेजारी शर्मा नावाचे आर्यसमाजी राहत असत. ते मंत्रपठण शिकवीत. बाबांच्या सांगण्यावरून आम्ही भावंडे त्यांच्याकडे मंत्र, संस्कृत शिकायला जात असू. संस्कृतने वाणी शुद्ध होते यावर त्यांची श्रद्धा. त्यानंतर आम्ही पुण्यात घर घेतले. त्या गृह्प्रवेशाच्या वेळी होमहवन झाले. बाबांनी आम्हाला तेव्हा मंत्रपठण करायला लावले . आमच्या नव्या घरात आम्ही मुले धडाधड संस्कृतमंत्र म्हणत आहोत हे बाबा कौतुकाने पाहत होते. पुढे याच घरात असता त्यांचा मृत्यू झाला. आंम्हाला हे घर सोडावे लागले, पण वाणीचे संस्कार पुसले नाहीत. स्वच्छ, शुद्ध शब्दोच्चार हा आम्ही मंगेशकरांनी बालपणीच आत्मसात केलेला संस्कार आहे. पुण्यात असतानाची एक आठवण आहे. त्यावेळी ‘खजांची’ या चित्रपटातल्या लोकप्रिय गाण्यांची स्पर्धा होती. माझ्या मावशीच्या यजमानांच्या आग्रहाने मी पण स्पर्धेत नाव दिले. त्यावेळी बहुतेक बाबा रेडिओच्या कामासाठी मुंबईला आले होते. मात्र आल्यावर त्यांना कळले तेव्हा ते रागावले. ‘बक्षीस मिळवलं नाहीस तर माझं नाक कापलं जाईल ‘ असे त्राग्याने ते म्हणाले. मी मग घाबरले. पण स्पर्धेत जायचेच असे ठरवले. त्यावेळी मला वाटते, ग्लोब टॉकीजमध्ये स्पर्धा होत्या. खूप स्पर्धक होते. पुढे जाऊन परीक्षकांना आपले नाव सांगायचे, मग गाणी म्हणायची असे ठरलेले होते.

मी पुढे झाले आणि धिटाईने म्हटले, ‘मी, लता दीनानाथ मंगेशकर’ अन श्रोत्यांतून टाळ्यांचा कडकडाट झाला. मी माझ्या बाबांची मुलगी आहे, याचा अभिमान त्याक्षणी मनात फुलून आला. नव्हे, कळायला लागल्यापासून माझ्या वडलांच्या बाबतीत नेहमी मला एक अभिमान, गौरव वाटत आलेला आहे. त्याक्षणी ती भावना पुन्हा मनात ताठपणे उभी राहिली. मी दोन गाणी म्हटली आणि मा. दीनानाथ मंगेशकरांची मुलगी पहिला नंबर घेऊन घरी आली. छातीवर लखलखणारी चांदीची पदके आणि बक्षीस मिळालेला दिलरुबा. त्यानंतर केव्हाही गाताना, नकळतसुद्धा, मा. दीनानाथांच्या प्रतिष्ठेचे भान ढळले नाही. बक्षीस मिळालेला दिलरुबा ते एकदा वाजवत होते. समोरून मला वाटते, एक उंदीर पळत गेला म्हणून त्यांनी दिलरुब्याचा गज फेकून मारला व तो तुटला. मी रडू लागले. माझ्या बक्षिसाचा होता ना तो. मग बाबानी मला जवळ घेतले अन म्हणाले, “एवढासा गज तुटला म्हणू रडतेस. तुला नंतर खूप बक्षीस मिळायची आहेत. असं यश डोक्यात जाऊ देऊ नये !”

बाबांचे शब्द खरे झाले. त्यांच्या आशीर्वादाने मला सामान्य माणसांचे अलोट प्रेम लाभले, पुरस्कार मिळाले, पुष्कळ मानसन्मान मिळाले. देशात मिळाले, परदेशात मिळाले. यश संयमाने स्वीकारण्याचा बाबांचा शब्दही मी पाळला आहे. प्रसिद्धीची लाट अंगावरून जात असताना अविचल राहण्याचे सामर्थ्य बाबांच्या शब्दांमुळेच आले. बाबांच्या मृत्यनंतरचे दिवस कठीण होते, परीक्षेचे होते. पहिल्या पाच-सहा वर्षाच्या पुण्यतिथीचे समारंभ आम्ही कधी कुणाला विनंती करून तर कधी स्वतः छोट्या मोठ्या प्रमाणात पण नियमाने केले. एके वर्षी आमच्या वतीने डॉ. भालेराव हे मुंबईतले नाटकप्रेमी गृहस्थ उभे राहिले. साहित्य संघातर्फे मा. दीनानाथ पुण्यतिथीला नाटके केली गेली. कधी गाण्याचा जलसा तर कधी नाटक. एका पुण्यतिथीला आम्ही ‘भावबंधन’ केले होते. त्यांत मी लतिका झाले होते, तर चित्तरंजन कोळतकर घनश्याम, पंढरीनाथ कोल्हापुरे कामना ; पुण्याच्या भानुविलासमध्ये प्रयोग झाला होता. ही बहुतेक ४५ -४७ सालची गोष्ट असेल. वडलांच्या मृत्यूनंतर चाललेली आमची पायपीट पाच-सहा वर्षात संपली. गाण्याची कामे खूप येऊ लागली, नाव झाले, आर्थिक स्थैर्य आले, रसिकांनी खूप कौतुक केले. त्यावेळी बाबांची खूप आठवण झाली. ते असायला हवे होते असे खूप वाटले. पण ते असते तर कदाचित त्यांनी मला सिनेमात गाऊ दिले नसते. कुणास ठाऊक, आज दिसणारी ही लता मंगेशकर वेगळीच झाली असती !

माझा संघर्षाचा काळ थोडा होता, मग उदंड नाव झाले. माझ्या वडिलांवर नियतीने मात्र अन्याय केला. ते फक्त रंगभूमीवर वावरणारे कलावंत नव्हते. संगीताचा त्यांचा अभ्यास सूक्ष्म होता. ते मोठे लयकार होते. त्यांच्या प्रतिभेची झेप विलक्षण होती. फार पूर्वी पंजाबी ढंग त्यांनी महाराष्ट्रात आणला आहे. देशोदेशीच्या खूप चीजांचे भांडार त्यांच्याजवळ होते. त्यांचा उत्कृष्ट उपयोग करण्याचे कौशल्य त्यांच्या ठाई होते. कर्नाटक संगीताचेही ते जाणकार होते. नृत्यकुशल होते. ‘उग्रमंगल’ नाटकात राणी पद्मावतीच्या भूमिकेत ते विलक्षण सुंदर वृती करायचे. सारंगी व दिलरुबा उत्तम वाजवायचे. फार तडफेने गायचे. शास्त्रीय संगीतावर त्यांची विलक्षण पकड होती. अशा गुणी, लोकोत्तर प्रतिभेच्या व्यक्तीच्या वाट्याला यथोचित मानसन्मान आले नाही; त्यांच्या वाट्याला आला तो विपन्नावस्थेतील अंतकाळ.

त्यांच्या यशाचे तुरे माझ्या शिरावर खोवून ते गेले. लता एवढी मोठी होण्यासाठी तिचे वडील मात्र अकालीच दूर अज्ञातात निघून गेले. उपेक्षेचे, मानभंगाचे दुःख पचवून मुलांसाठी फुले अंथरणारा, हा कुणी शापभ्रष्ट यक्ष असावा.

खरे तर, त्यांच्या व्यक्तिमत्वाचे सारे पदर निरखता आले नाही. त्यांच्या कर्तृत्वाचा ठाव घेता आला नाही. पण आज त्यांच्या ध्वनिमुद्रिका ऐकल्यावर असे वाटते, बाबांनी जे केले त्याचा काही अंश तरी आपल्यात येईल का ? त्यांचे गाणे विलक्षण तडफेने असे. त्यांच्या काळी काहींचा असा आक्षेप असे की दीनानाथ येतात, बिजलीच्या वेगाने गाणे संपवून जातात. त्यावेळी गाणाऱ्यांची पद्धत श्रोत्यांना उत्सुकता वाटेल , उत्कंठा वाटेल अशी गायकी असे. संथ आलाप घेत, रंगाच्या स्वराच्या दिशेने हळूहळू वाटचाल करीत.
खूप वर्षांनी एक ज्येष्ठ गायक, बडे गुलाम अली खांनी या आक्षेपाचे उत्तर दिले. त्यांच्यावरही अशाच तर्हेचा आरोप असे. त्यांनी सांगितले, “माझ्याजवळ जे सांगण्यासारखे आहे ते मी उत्कटतेने देतो. श्रोत्याला प्रतीक्षा करायला लावीत नाही. रंगाचे रूप दाखवून टाकतो. जेवढे लवकर देता येईल तेवढे म्हणून, गाणे तीन मिनिटांचे असो किंवा अर्ध्या तासाचे, तुमच्याकडे सांगण्यासारखे जे आहे ते सांगा. ” बडे गुलाम अली खॉ यांच्यासारख्या श्रेष्ठ भारतीय संगीत कलावंताचे उद्गार फार वर्षांपूर्वी माझ्या वडलांनी प्रयोगातून सिद्ध केले होते.

एक कलावंत म्हणून असलेली उदारमनस्कता त्यांच्यात माणूस म्हणूनही होती. अतिथी-अभ्यागताचे नित्य स्वागत असे. आमच्या घरी आल्या गेल्याचा राबता असे. कुणी विन्मुख जायचे नाही. पण आचारात मात्र ते जरा सनातनी होते. त्या वेळी प्रचलित असलेल्या फॅशन्सचे कपडे आम्हाला वापरायची बंदी असे. पावडरसुद्धा लावायची नाही. कपाळाला कुंकू हे हवेच, अन हातात बांगड्याही. मी लहानपणी मुलगे वागतात तशी बहुतेक हूड होते. हातात बांगड्या नाही, कपाळ तसेच ; कित्येक वेळा बाबा रागावून ‘पिंजर लाव ‘ म्हणून ओरडायचे.

एकदा आमच्या नाटक कंपनीत माझ्या जन्मापासून असलेले श्रीपाद जोशी, माझे गाणे मा. विनायकाने ऐकावे म्हणून, बाबांना न सांगताच मला घेऊन गेले होते. बाबांना ते मुळीच आवडले नाही. सदाशिव नेवरेकर म्हणून एक संगीतकार होते. त्यांनी खूप आग्रहाने चित्रपटासाठी गायला बोलावले. वसंतराव जोगळेकरांच्या ‘किती हसले’ या चित्रपटासाठी मी एक गाणे रेकॉर्ड केले, ते प्लेबॅक होते की काय ठाऊक नाही. बाबांनी मात्र नाखुशीने परवानगी दिली होती. हे सर्व झाले मार्च महिन्यात. एप्रिलमध्ये तर बाबा गेले. मी पुढे चित्रपटासाठी गायचे ही नियतीची इच्छा होती. आणि मा. दीनानाथांचीही रंगभूमीवरून जाण्याची वेळ आलेली होती.

बुधवारी दुपारी ते आम्हाला म्हणाले, “मी या शुक्रवारी अकरा वाजून वीस मिनिटांनी या जगात नसेन. पण कदाचित जगलो वाचलो तर दीर्घायुषी होईन. “दुर्दैवाने त्यांचे पहिले भविष्य खरे ठरले. शुक्रवारी, २४ एप्रिल १९४२ रोजी अकरा वाजून वीस मिनिटांनी आमचे बाबा गेले. वैशाख वद्य अष्टमीची जळती दुपार आमच्या सुखी, हसऱ्या कुटुंबात वणवा लावून गेली. मला आठवते, माई सुन्नपणे बसली. मला म्हणाली, ‘तुझे बाबा गेले.’ ती रडत नव्हती. मलाही रडू येईना. आत खूप गुदमरल्यासारखे झाले. पण त्याचक्षणी खूप तीव्रपणे जाणवले, माझ्या भावंडांना, माईला मी सांभाळायला हवे, मी नोकरी करायला हवी, मी पैसे मिळवायला हवेत. माझ्या आजारपणी माझ्या वडलांच्या मृत्यूची भयानकता मला स्पर्शून गेली नव्हती. त्यावेळी, माझे नुकसान काय झाले, मी काय गमावले, ते मला जाणवलंच नाही. आता फार नंतर त्याची दाहकता जाणवत आहे.

पाणीदार टपोऱ्या बदामी डोळ्यांचे, सिंहासारख्या रूपाचे, माझे देखणे बाबा धरणीवर होते. कुणी घरातली भर्जरी शाल त्यांच्यावर पांघरली होती. त्यांचा निरोपही धड घेतला नाही. माझ्या चिमण्या भावंडांचे निष्पाप शैशव, माझे अजाणतेपण, अकाली वैधव्य आलेल्या माझ्या माईचे तारुण्य मागे टाकून ; झपाझप पावले टाकीत माझे बाबा एका अनामिक ओढीने अज्ञातात निघून गेले ; नित्य ज्याचे नाव ते जपून असत त्या मंगेशकडे निघून गेले. किती थोडा काळ लाभला त्यांचा सहवास ! पण आमची अवघी आयुष्ये समृद्ध झाली. अगदी बालपणातच जीवनसंग्रामात उडी घ्यावी लागली ; पण अदृश्यपणे वावरणारी बाबांची सरंक्षक शक्ती होती.

अतिशय प्रतिकूल काळातही बाबांचे, मा. दीनानाथांचे पुण्यस्मरण चुकले नाही. क्वचित प्रसंगी आम्ही रेकॉर्डिंगमध्ये सुद्धा कलावंतांना गायला लावून बाबांची पुण्यतिथी साजरी केली आहे. पुढे समृद्धीचे, सुखाचे दिवस आल्यावर मात्र वैभवाने पण गांभीर्याने संगीतमय पुण्यतीथी केली आहे. आमच्या कार्यक्रमासाठी भारतीय संगीतातले सर्वश्रेष्ठ कलाकार येऊन गेले आहेत.

बडे गुलाम अली खॉ, अमीर खॉ, पं. जसराज, पं. भीमसेन जोशी, अली अकबर, पं. रविशंकर, कुमार गंधर्व, बिरजूमहाराज, गोपीकृष्ण अशी कितीतरी नावे आहेत. हैद्राबादचा महोत्सव तीन दिवस चालला होता. दक्षिणात्य कलावंत हजेरी लावून गेले आहेत. बालमुरली कृष्ण, लालगुडी जयराम, पदमा सुब्रमण्यम, इ. एकदा मी आजारी असताना उषा, हृदयनाथ यांनी अहमदाबादला जाऊन पुण्यतिथी केली आहे. पाकीस्तानातून सलामत नजाकत अलीखान येऊन गेले आहेत.

एवढ्या वर्षांची परंपरा तशीच पुढे चालत राहावी म्हणून माझी भावंडे पुण्यतिथी प्रतिष्ठानची योजना करीत आहेत. २४ एप्रिलचा दिवस एका उद्देशाने साजरा व्हायला हवा अशी कल्पना आहे. आम्हा मंगेशकर भावंडांचे स्वप्नच आहे. की उत्कृष्ट नाट्यकृतीस बक्षीस, मा. दीनानाथांच्या नावे मानचिन्ह, विश्वस्त निधीतून संगीतसंबंधी योजना, गुणवंत जुन्या जाणत्या कलावंतांचा गौरव, उदयोन्मुख कलावंतांना शिष्यवृत्ती, सांगीत महोत्सव, भव्य कलादालन, संगीताविषयक संशोधन कार्य अशा खूप योजना आहेत. बाबांचे पुण्यस्मरण म्हणजे संगीताची समाराधना. इतक्या वर्षांपासून निष्ठेने चालवलेले व्रत ; वादळातल्या दिव्यासारखे जपून आणले आहे. वडलांची स्मृती नृत्य – संगीत – नाट्य या कलांना समर्पित करावी, या कलांना उत्तेजन मिळावे, अशी मंगेशकर कुटुंबीयांची इच्छा आहे.

बाबा, तुम्ही मला म्हटलं होतं ना, ही मोठी मुलगी सर्वांना सांभाळेल म्हणून, तुमचे शब्द मी खरे करावे यासाठी उदंड पुण्याई मला दिलीय ; म्हणूनच आज येथपर्यंत आले. तुमची मुले स्वतःच्या हिमतीने पुढे आली आहेत. त्यांच्या पंखात बळ आले आहे. तुमची आशा तर भारतातली मोठी गायिका आहे. मीना गुणी संगीतकार, उषा मोठी चित्रकार व गायिका अन हृदयनाथ प्रतिभावंत संगीतकार. तृप्त मनाने वृद्द डोळ्यांनी माई सारे पाहतेय.

घरातली मुले विचारतात, बाबांच्या वस्तू दाखव म्हणून, तुमचा धैर्यधराच्या भूमिकेतला कोट आहे, तंबोरा आहे, माझ्या वाढदिवशी दिलेले लॉकेट आहे. ते मुलांना दाखवते. खरे तर, हे सारे तुम्हीच दिलेले आहे. आमच्या धमन्यांतून वाहणारे रक्तही तुमचंच आणि आमच्या कंठातले स्वरही.
तुमच्या मुलांचे वैभव पाहायला तुम्ही हवेत, असे फार फार वाटते.

– लता मंगेशकर
(सौजन्य : ग्रंथाली प्रकाशन)

ठेवणीतले लेख

    आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा



    [recaptcha]

    काही निवडक प्रतिक्रिया:

    नरेंद्र चौधरी


    आपल्या संकेतस्थाळाच्या माध्यमातून असे लक्षात आले कि आपन खूप छान माहिती पुरवत आहात.
    संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया