अतिथी कट्टा

दिनांक : १६-०७-२० १८

‌माझं पुढचं लेखन चित्रपटही असू शकतं…

मानसी ऊर्फ मयुरी देशमुख हे नाव घराघरात पोचलं ते ‘खुलता कळी खुलेना’ या मालिकेमुळे. मानसीचं सुंदर, सोज्वळ, विचारी व्यक्तिमत्त्व प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं. टीव्हीमध्ये प्रचंड लोकप्रियता मिळवल्यानंतर कोणत्याही कलाकाराला चित्रपट, नाटक अशा इतर माध्यमांवरही आपला ठसा उमटवायला खूप वेळ लागतो. मयुरीचा नुकतंच ‘डिअर आजो’ हे नाटक रंगभूमीवर आलंय नि ‘३१ दिवस’ या चित्रपटातून ती मुख्य भूमिका साकारते आहे. यानिमित्तानं मानसी सांगतीय या चित्रपटामधील आपल्या अनुभवाबद्दल तसेच आपल्या पुढील कारकिर्दीबद्दल.

——

स्क्रीन-प्ले, संवाद हे दोन्ही बघूनच मी कलाकृती स्वीकारते. कारण कधी कधी असं होतं की स्क्रीप्ट चांगली वाटते. मात्र संवादांमधून एखाद्या दुसर्‍याच व्यक्तिरेखेला अधिक महत्त्व दिलं जातं. ‘खुलता कळी खुलेना’ करण्यापूर्वी एक मराठी चित्रपट केला होता. परंतु, त्यातील माझा अनुभव खूपच वाईट ठरल्यानं मी तो सोडला. म्हणून कोणतीही कलाकृती स्वीकारण्यापूर्वी मीच आता अधिक काळजी घेणार आहे. तसेच एखाद्या फिल्ममेकरला त्याच्या ‘स्क्रीप्ट’बद्दल खूपच आत्मविश्‍वास असेल तर मग त्यानं आमच्याशी ती ‘शेअर’ करण्यास काहीच हरकत नसावी.

‘डेली सोप’ करीत असताना आपल्याला अंदाज नसतो की ती मालिका कधी संपणार आहे ते. साधारणपणे चांगली मालिका दीड-दोन वर्ष चालते. ‘खुलता कळी खुलेना’ला एक वर्ष झाल्यानंतर मला चित्रपट निर्मात्यांकडून ऑफर्स येऊ लागल्या. परंतु, मला चित्रपटासाठी आवश्यक तेवढा वेळ देणं शक्य नसल्यामुळे मी या ऑफर्सना टाळायचे. चित्रीकरणासाठी एका महिन्यात सलग पाच दिवस सुट्टी मिळणं मला शक्य नव्हतं. त्यामुळे मी निर्माता-दिग्दर्शकाला वेळ देऊ शकणार नव्हते तर चित्रपटाची ‘स्क्रीप्ट’ कशाला ऐकायची अशी माझी भूमिका होती. मात्र ‘३१ दिवस’ चित्रपटाच्या प्रॉडक्शन हाऊसकडून मला खूपच आग्रह झाला. तेव्हा त्यांचं ऑफिस एल्फिन्स्टन रोडला आणि माझं घर दादरला असल्यामुळे मी ती ‘स्क्रीप्ट’ ऐकण्याचं ठरवलं. दिग्दर्शक आशीष भेलकर यांनी खूप चांगल्या पद्धतीनं मला ऐकवली. त्यामुळे अर्थातच मला ती आवडली. परंतु, ‘खुलता…’मुळे माझे हात बांधले असल्यामुळे मी त्यांना ‘खूप छान स्क्रीप्ट आहे, पण मला नाही करता येणार. मी तुमच्या आग्रहाखातर ती ऐकायला आले. ऑल दि बेस्ट…’ एवढंच म्हणू शकले. त्यावर दिग्दर्शकानं माझ्या ‘टाइट शेट्यूल’मधून जसा वेळ मिळेल तसं शूटिंग करण्याची आपली तयारी असल्याचं सांगितलं. परंतु, तेवढाही वेळ मला काढता येईना. तेव्हा मग मीच त्यांना माझ्यासारखी भासणारी, एखादी ‘न्यू कमर’ मुलगी आहे का याचा शोध घेऊ लागले. गेल्या वर्षीच्या जुलै महिन्याचीच गोष्ट. आशीष भेलकर यांचा मला फोन आला. ‘मयुरी, तुझी मालिका बंद होतेय. आता तू आपला चित्रपट निर्धास्तपणे करू शकतेस.’ क्षणभर मला वाटलं की ते आपली गंमतच करताहेत. कारण मी त्या मालिकेत काम करीत असूनही मला त्याची कल्पना नसताना यांना कुठून हे कळलं, असं मला वाटलं. त्यामुळे मी त्यांना गंमतीत म्हटलंही, ‘तुमचा चित्रपट मी करावा म्हणून तुम्ही माझी मालिका बंद करताय की काय.’ परंतु, त्यांची ही माहिती खरी होती. काही कारणांमुळे ‘खुलता कळी…’ लवकर संपविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर लगेचच या चित्रपटाचं काम आम्ही सुरू केलं.

‘डॉ. प्रकाश बाबा आमटे’ या चित्रपटात मी पत्रकाराची छोटीशी भूमिका साकारली होती. नाना पाटेकरांसोबतची ती भूमिका असल्यामुळे माझ्यासाठी ‘स्पेशल’ होती. चार-पाच दिवसांचं ते काम होतं. उमेश कामतबरोबर मी एक फिल्म केलीय. तिचं १०-२० टक्के शूटिंग अजून बाकी असल्यामुळे ती अजून प्रदर्शित झालेली नाही. परंतु डबिंग, गाणी आणि भूमिकेच्या लांबी-रुंदीच्या दृष्टीनं ‘३१ दिवस’ हाच माझा खर्‍या अर्थानं पहिला चित्रपट म्हणावा लागेल.

आपल्याकडे खूप लवकर ‘टाइपकास्ट’ केलं जातं. ‘खुलता…’ ज्यावेळी मी करीत होते, तेव्हा मला जे सगळे रोल्स ऑफर होत होते, ते एखाद्या साध्या, सरळ, समंजस, सोज्वळ मुलीचे होते. बहुतेकांना असं वाटत असावं की मी दुसरं काहीच करू शकत नसावे. ‘३१ दिवस’ ही एक तद्दन कमर्शियल फिल्म आहे. त्यामुळे अशाप्रकारच्या चित्रपटासाठी ज्या गोष्टी आवश्यक असतात, त्या सर्व या चित्रपटात योग्य ठिकाणी पेरल्या गेल्या आहेत. खूप वेगवान कथानक असल्यामुळे प्रेक्षकाचं मन एक-दोन मिनिटांसाठीही विचलीत होणार नाही, याची यात काळजी घेण्यात आली आहे. यात छान नाच-गाणीही आहेत. कमर्शियल चित्रपटासाठीही त्या चित्रपटाशी संबंधित असलेल्या मंडळींना त्यात आपला मेंदू वापरावा लागतो. या चित्रपटात मी साकारलेली ‘मुग्धा’ ही माझ्या अत्यंत लोकप्रिय ठरलेल्या ‘मानसी’पेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. सर्व कलागुण दाखविण्याची संधी असलेलं पॅकेज म्हणजे ही भूमिका आहे. शशांक केतकरबरोबरची माझी जोडी प्रेक्षकांना वेगळी वाटेल, असंही कदाचित या चित्रपटाच्या मेकर्सना वाटलं असावं.

माझे आजोबा राजकपूर नाहीत. मला या इंडस्ट्रीची काहीच माहिती नाही. त्यामुळे मला माझा हात धरून फिल्म मिडीयमची माहिती देणारा दिग्दर्शक हवा होता. मी शिक्षणानं ‘डेंटिस्ट’ आहे. त्यामुळे कला क्षेत्रामध्ये प्रवेश करतानाच मला नक्की माहिती होतं की आपल्याला खूप काही शिकावं लागणार आहे. म्हणून मी सुरुवातीच्या काळात नाट्यशास्त्राचं प्रशिक्षण घेतलं. ‘खुलता कळी..’चं शूटिंग सुरू झाल्यानंतर पहिले तीन महिने मी कॅमेर्‍याशी ‘कम्फर्टेबल’ नव्हते. परंतु, नंतर हळूहळू अनुभवानं मी त्याच्याशी सरावले. फिल्म माध्यमाचीही थोडीफार तीच गंमत आहे. चित्रपटाचं शूटिंग हे तुटकपणे चालतं. टीव्हीसाठी काम करताना तुम्हाला अत्यंत ‘स्पॉंटॅनियस’ राहावं लागतं आणि तुमची स्मरणशक्ती खूप तल्लख असावी लागते. कारण ज्या दिवशी तुमचं शूटिंग असतं त्याच दिवशी तुम्हाला तुमचे प्रसंग आणि संवाद मिळतात.

त्यामुळे कलाकाराला आपल्या व्यक्तिरेखेत जे काही रंग भरायचे आहेत, ते अत्यंत कमी वेळेत भरावे लागतात. चित्रपटामध्ये तुम्हाला तुमच्या भूमिकेचा ‘ग्राफ’ आधीच कळलेला असतो. तसेच हल्ली बहुतेक दिग्दर्शक चित्रीकरणाआधी कार्यशाळा घेत असल्यामुळे कलाकाराला आपली व्यक्तिरेखा कशी विकसित होणार आहे, याची पूर्ण कल्पना येते. त्यामुळे चित्रपटासाठी काम करताना तुम्ही जास्त तयार असता आणि तुम्हाला तुमचे जास्तीत कलागुण दाखविण्याचा ‘स्कोप’ असतो. ‘३१ दिवस’चंच उदाहरण द्यायचं झालं तर ‘लुक टेस्ट’नंतर शूटिंग सुरू व्हायला १ महिना लागला. या मधल्या काळाचा मला खूप चांगला उपयोग करता आला. या काळात मी ‘मानसी’मधून पूर्णतः बाहेर आले आणि हळूहळू ‘मुग्धा’च्या व्यक्तिरेखेत शिरले. ‘प्रॉडक्शन व्हॅल्यू’च्या दृष्टीनंही चित्रपट आणि टीव्ही माध्यमात काम करताना खूप वेगळा अनुभव येतो. टीव्ही मालिकेत तुम्ही बांधले जाता. मात्र चित्रपटाच्या ३० दिवसांच्या शूटिंगमध्ये तुम्हाला आपल्या व्यक्तिरेखेचा संपूर्ण प्रवास अनुभवता येतो. तसेच टीव्ही आणि चित्रपट माध्यमातील आणखी एक फरक म्हणजे मालिकेतील तुमच्या व्यक्तिरेखेचा प्रवास हा सरळसोट पद्धतीनं होतो. चित्रपटाचं शूटिंग कोणत्याही क्रमानं घडू शकतं. त्यामुळे कधी कधी ‘क्लायमॅक्स’चं शूटिंग आधी करावं लागतं, तर सुरुवातीचा भाग नंतर करावा लागतो. त्यामुळे चित्रपटात काम करणं हे खूप चॅलेंजिंग वाटलं.

मी ‘ड्रीमर’ पद्धतीची आहे. मीसुद्धा अनेक फिल्मी स्वप्नं बघितली होती. शाहरुखनं आपल्या मनात अनेक ‘रोमँटिक’ कल्पना पेरल्या आहेत. परंतु, जसजसं मी नाट्यशास्त्राचं प्रशिक्षण घेतलं, तेव्हा कलेबद्दलच्या माझ्या संकल्पना नक्कीच बदलल्या. पण माझ्यात जी लहान मुलगी होती, तिची स्वप्नं या चित्रपटाद्वारे मी ‘एक्सप्लोअर’ करू शकलेय, याचा मला आनंद आहे. मात्र धबधब्यावर शूटिंग करताना आनंदाऐवजी मी घाबरले होते. कारण आम्हाला अगदी धबधब्याच्या टोकावर उभं करण्यात आलं होतं. त्यामुळे मला आणि शशांकलाच खूप काळजी घ्यावी लागली. त्यामुळे पाऊस, धबधबे आदी ठिकाणी भिजणार्‍या व्यावसायिक कलाकारांबद्दल माझा आदर आता आणखी वाढला आहे. वास्तवदर्शी सिनेमा करणं एक वेळ सोपं आहे. परंतु, ‘ड्रीम लँड’ प्रोजेक्ट करणं हे खूप कठीण काम आहे. त्यामुळे चित्रपट करणं हा कधीच ‘जॉय राईड’ प्रकार नसतो. सर्वच कलाकार तसेच तंत्रज्ञांना खूपच ‘स्ट्रगल’ करावा लागतो. तसेच मराठी चित्रपटांमध्ये काम करणं अधिक कठीण असतं. कारण आपल्याकडे बजेटची मर्यादा असल्यामुळे तांत्रिक गोष्टींचं आपल्याला म्हणावं तसं पाठबळ मिळत नाही. तसेच मला स्वतःला कोणताही चित्रपट ‘जॉय राईड’ असू नये असं वाटतं. कारण आपल्याला यातना झाल्याशिवाय आपल्याकडून चांगली कामगिरी घडत नाही.

अभ्यासात मी पहिल्यापासूनच चांगली होते. दहावीत मला चांगले मार्क्स मिळाल्यामुळे सर्वांनी मला विज्ञान शाखा घेण्याचा आग्रह केला. आमचं सगळं कुटुंबच डॉक्टर्स नि इंजिनिअर्सनी भरलं आहे. त्यावेळी मला तेव्हा स्वतःचे असे ठाम विचार नव्हते. बारावीच्या सुट्टीत मी माझ्या कुटुंबियांना माझा कल हा विज्ञानाऐवजी कला शाखेकडे असल्याचं सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु, मला बारावीतही खूप चांगले मार्क्स मिळाल्यामुळे सर्वसाधारण मापदंडांना फॉलो करीत मला वैद्यकीय शिक्षण घ्यावं लागलं. अर्थात थँकफुली ‘एमबीबीएस’ला प्रवेश मिळेल एवढे मार्क्स काही मला न मिळाल्यानं दंतवैद्यकीय शिक्षणाचा मार्ग मी पत्करला. माझा अभ्यास चांगला होता, प्रॅक्टिकली माझा हातही चालत होता, परंतु आतून कुठेतरी मला अपूर्ण वाटत होतं. अगदी खरं सांगायचं तर मी स्वतःला ‘डेंटिस्ट’ म्हणून आरशात पाहूच शकत नव्हते. त्यामुळे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर या क्षेत्रातून बाहेर पडून कलेसारख्या माझ्यासाठी संपूर्ण नव्या क्षेत्रात उडी घेणं ही खूप मोठी ‘रीस्क’ होती. परंतु, ती त्यावेळी मी घेतली नसती तर आयुष्यभर मला पश्‍चात्ताप करावा लागला असता. लोक म्हणतील की तू एक सीट वाया घालवलीस. परंतु, आयुष्य वाया घालवण्यापेक्षा एक सीट वाया गेलेली कधीही चांगली. मी एखादी गोष्ट पुस्तकी शिकलेय, तर तीच मी आयुष्यभर करायला पाहिजे असा आग्रह धरणं चुकीचं आहे. तसं झालं तर मी आयुष्यभर नैराश्यग्रस्त राहिले असते. म्हणूनच इंट्रन्सशीप सुरू असतानाच कलाक्षेत्राकडे वळण्याचा अंतिम निर्णय घेतला. सुरुवातीला काही काळ नादिरा बब्बर यांच्या थिएटर ग्रुपमध्ये मी काम केलं. त्यानंतर शफाअत खान यांच्याकडे नाट्यलेखनाचे धडे घेतले. त्याच काळात ‘डिअर आजो’ हे नाटक मी लिहिलं. मला यश हे सहजासहजी मिळालेलं नाही. सुरुवातीला मी एकांकिका केल्या. मग ‘प्लेझंट सरप्राईज’ हे ‘सुयोग’चं नाटक मी केलं. तिकडून मग ‘झी’ची ‘खुलता…’ मालिका मिळाली. कलाक्षेत्रामध्ये जाण्यामागे आणखी एक मोठं कारण होतं. आपल्याकडे वैद्यकीय क्षेत्राकडे ‘सोशल अवेरनेस’ म्हणून पाहिलं जातं. मात्र मला या क्षेत्रात राहून आपण एकाच पदधतीनं ‘सोशल अवेरनस’ करू शकू असं वाटायचं. परंतु, कलाक्षेत्रात ‘सोशल अवेरनेस’साठी ‘स्काय इज द लिमिट’ आहे. माझ्या ग्लॅमरचा जसा मी ‘सोशल अवेरनेस’साठी उपयोग करू शकते, तसाच उपयोग माझ्या बुद्धीचाही करू शकते.

मी लिहिलेलं ‘डिअर आजो’ हे नाटक सध्या खूप प्रेक्षकांना आवडतंय याचा आनंद आहे. हे नाटक मी स्वतःसाठी लिहिलं. संजय मोनेंनीही मला हे नाटक माझ्या आयुष्यात खूप महत्त्वाचं राहील असं सांगितलं होतं. कारण स्त्रीकेंद्रित भूमिका खूप कमी वेळा नाटक तसेच चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येतात. या नाटकात माझ्या भूमिकेला खूप वेगवेगळ्या शेड्स आहेत. मी लेखिका नसते तर मला नाही वाटत की कोणत्याही दिग्दर्शकानं मला त्यात मुख्य भूमिकेसाठी ‘कास्ट’ केलं असतं. हे नाटक मी पाच वर्षांपूर्वी लिहिलं होतं आणि अजित भुरेंना तेव्हाच मी ऐकवलं होतं. परंतु, ते आता रंगभूमीवर आलं आहे. या नाटकामुळे मी लेखनाबद्दल आता गंभीर झाले आहे. त्यामुळे भविष्यात मी लिहीन. काय, कधी ते मला आत्ता माहीत नाही. कदाचित माझं पुढचं लेखन हे चित्रपटही असेल. एक अभिनेत्री म्हणून मला वेगवेगळ्या भूमिका साकारायच्यात. माझी ती भूक मोठी आहे. जर मला त्या इतर लेखकांकडून मिळाल्या नाहीत तर मीच स्वतःसाठी का लिहू नये? असा माझा स्वतःलाच प्रश्‍न आहे. पुढील प्रवासाबद्दल मी फारसं ठरवलेलं नाही. मात्र आपल्याला चांगलं काम करायचंय हे नक्की ठाऊक आहे. माध्यम आणि भाषेचा मला काही अडसर वाटत नाही. कथा आणि टीम या दोन गोष्टींवर माझं अधिक लक्ष राहील.

अभिनय, लेखनाव्यतिरिक्त मला फिरायला आवडतं, पेंटिंग करायला आवडतं, मला गेटटुगेदर्स आवडतात, इतकं महत्त्वाकांक्षी व्हायचं नाही की आपण आपलं आयुष्यच जगत नाही, असं मी स्वतःलाच सांगून ठेवलंय. फक्त काम, पैसा, प्रसिद्धीला माझं महत्त्व नाही. इतरही काही गोष्टी अशा आहेत की त्या तुमच्या आयुष्याला परीपूर्णता देतात. त्या मला हरवू द्यायच्या नाहीत. तुमचं आयुष्यं जितकं शिस्तबद्ध असेल तेवढं तुम्ही स्वतःला जास्त ‘एक्सप्लोअर’ करू शकता असं मला वाटतं. त्यामुळे तसं आयुष्य मी जगण्याचा प्रयत्न करीत आहे. फिटनेसकडे मी विशेष लक्ष देतेय. किचनमध्ये काही तरी करायला मला आवडतं. ‘खुलता…’मुळे मला किचनमध्ये जायलाही वेळ मिळायचा नाही. परंतु, आता बर्‍यापैकी मी वेळ काढतेय.

-मयुरी देशमुख

ठेवणीतले लेख

    आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा



    [recaptcha]

    काही निवडक प्रतिक्रिया:

    नरेंद्र चौधरी


    आपल्या संकेतस्थाळाच्या माध्यमातून असे लक्षात आले कि आपन खूप छान माहिती पुरवत आहात.
    संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया