अतिथी कट्टा

दिनांक : २२-०३-२०१९

‌‌‌‌‌‌‌‌‌मराठीत सशक्त व्यक्तिरेखा साकारायच्यात




हिंदी चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध गोविंद नामदेव यांनी ‘सूर सपाटा’ या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे. त्यानिमित्ताने त्यांचे हे मनोगत.

——

मुंबई, महाराष्ट्रात मी गेली अनेक वर्षं राहतोय. याच शहरानं मला मानसन्मान मिळवून दिला. इथल्या मराठी चित्रपटसृष्टीबद्दल मी खूपच ऐकून होतो. मला खरं तर खूप आधीपासून मराठी चित्रपट करण्याची इच्छा होती. मराठी भाषा मला चांगली समजते. परंतु, प्रत्यक्ष नि नीट बोलण्यात अडचण येईल अशी मला भीती वाटायची. त्यामुळे मी इतकी वर्षं मराठी चित्रपट केला नव्हता. मात्र ‘सूर सपाटा’चे दिग्दर्शक मंगेश कंठाळे यांनी या चित्रपटाच्या ‘स्क्रीप्ट’चं जेव्हा मला पहिलं नरेशन केलं तेव्हाच मी या चित्रपटाच्या, मला ऑफर झालेल्या भूमिकेच्या प्रेमात पडलो. आजवर हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये माझ्या वाट्याला सर्वाधिक खलनायक व्यक्तिरेखा आल्या आहेत. ‘सूर सपाटा’मध्ये मी एका शाळेच्या प्राचार्यांची व्यक्तिरेखा साकारली आहे. हे प्राचार्यसुद्धा सुरुवातीला आपल्याला खलनायकच वाटतील. त्यामागचं कारण म्हणजे त्यांना फक्त आणि फक्त मार्क्स हवे असतात. आपल्या शाळेचा शंभर टक्के निकाल लागला पाहिजे, या एकाच उद्देशानं ते झपाटलेले असतात. त्यामुळे हा निकाल लागण्यासाठी वाट्टेल ते करण्याची त्यांची तयारी असते. आपल्या या विचाराशी सहमत नसणाऱ्यांना ते शाळेतून काढून टाकण्यासही मागेपुढे पाहत नसतात.

सिनेमातील तीन प्रमुख व्यक्तिरेखा अभ्यासक, राजकारणी आणि तरुण युवक यांच्यामधील वैचारिक द्वंद सिनेमात दाखवलं आहे. समाजातील एकंदरीत आताचे वातावरण पाहता या तीन व्यक्तिरेखा म्हणजे तीन प्रवृत्ती आहेत. ज्या सिनेमात परखडपणे मांडल्या आहेत. काहीशा भरकटलेल्या तरुणाईचा कान पिळण्यापेक्षा कान उघडण्याचं काम नक्की हा सिनेमा करेल.

प्रतिकांची, प्रतिमांची, पुतळ्यांची पूजा करण्यापेक्षा किंवा ‌‘जय शिवाजी’ जोशात म्हणण्यापेक्षा शिवाजी महाराज नक्की काय म्हणतात हे सांगण्याचा प्रयत्न या चित्रपटामार्फत केला गेला आहे.छत्रपती शिवरायांच्या काळातील शासन नेमकं कसं होतं आणि त्यातून आपण आजच्या काळासाठी काय घ्यायचं आहे, हे या चित्रपटातून मांडण्यात आलं आहे. आपण शिवभक्त आहोत असं अभिमानाने मिरवितो, छातीठोकपणे सांगतो, पण आपण त्यांच्या आदर्शाप्रमाणे वागतो का ? चालतो का? बोलतो का? सगळ्यात महत्वाचे विचार करतो का? याचे उत्तर आपसूक हा सिनेमा पाहिल्यावर मिळेल.

वास्तविक प्राचार्यांची ही भूमिका मला वास्तवात मान्य नाही. कारण मी मुळाच एक स्पोर्ट्स पर्सन आहे. महाविद्यालयीन स्तरावर मी आमच्या कबड्डी टीमचा कर्णधार होतो. त्यामुळे खेळातील संघभावनेचा प्रत्येकाच्या व्यक्तिमत्त्वावर किती सकारात्मक परिणाम होतो, याची मला चांगलीच कल्पना आहे. परंतु, या प्राचार्यांना कला, खेळ, संस्कृती याच्याशी काहीच घेणेदेणे नसते. कबड्डी खेळ हा माझा आवडता असल्यामुळे मी त्याच्याशी पटकन कनेक्ट झालो. मध्यांतरानंतर माझ्या व्यक्तिरेखेत खूप बदल होत जातात. या चित्रपटातील मुलांच्या एका गटासाठी कबड्डी हेच आयुष्य असतं. दिवस-रात्र ते फक्त कबड्डीच खेळत असतात. कबड्डीवरचं त्यांचं हे मनापासूनचं प्रेम पाहून माझं हृदय परिवर्तन होतं आणि मी त्यांना त्यांचं ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करतो. वरून कडक आणि आतून मऊ अशी माझी व्यक्तिरेखा आहे. मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करताना एवढ्या वेगवेगळ्या शेड्स असलेली व्यक्तिरेखा साकारण्याची संधी मिळाल्यामुळे मी खूप आनंदी आहे. उपेंद्र लिमये, संजय जाधव, प्रवीण तरडे या मान्यवरांबरोबर काम करतानाही मला खूप मजा आली. या चित्रपटात बऱ्याच नवीन मुलांना संधी देण्यात आली आहे. परंतु, या सर्वांनी खूपच चांगलं काम केलं आहे.

एक हिंदी कलाकार असूनही या चित्रपटासाठी माझ्या नावाचा विचार केल्याबद्दल मी दिग्दर्शक मंगेश कंठाळे आणि निर्मात्यांचा आभारी आहे. हा मराठी चित्रपट असला तरी त्याचा विषय विश्वव्यापी आहे. त्यामुळे सबटायटल्सद्वारे हा चित्रपट जगभर पोचेल याची मला खात्री आहे. त्यामुळे भविष्यात मराठीत आणखी सशक्त, चांगल्या व्यक्तिरेखा आल्या तर त्या मी निश्चितच साकारीन. किंबहुना तशा व्यक्तिरेखा माझ्या वाट्याला याव्यात, अशी मी अपेक्षा करतो.

– गोविंद नामदेव

ठेवणीतले लेख

    आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा



    [recaptcha]

    काही निवडक प्रतिक्रिया:

    नरेंद्र चौधरी


    आपल्या संकेतस्थाळाच्या माध्यमातून असे लक्षात आले कि आपन खूप छान माहिती पुरवत आहात.
    संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया