अतिथी कट्टा

दिनांक : १४-०५-२०१८

‌‘मराठी चित्रपटसृष्टी आऊटस्टॅंडिंग…’ : करण जोहर

प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षितचं मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण असलेला ‘बकेट लिस्ट’ येत्या २५ मे रोजी प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रख्यात निर्माते-दिग्दर्शक करण जोहर यांच्या ‘धर्मा प्रॉडक्शन’नं ‘प्रेझेंट’ केला आहे. त्यानिमित्तानं या चित्रपटाबद्दल जोहर यांचं मनोगत.
——

गेल्या काही वर्षांमध्ये मराठी भाषेमध्ये खूप चांगल्या चित्रपटांची निर्मिती करण्यात आली आहे. चांगला चित्रपट बनतो तो वेगवेगळ्या आघाड्यांवर. लेखन, अभिनय, दिग्दर्शन या सर्वच बाजूंमध्ये मराठी चित्रपटांनी आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. मराठी चित्रपटांचं ‘नॅरेटिव्ह’ आणि ‘स्टोरीटेलिंग’ अगदी जबरदस्त आहे. त्यामुळेच या भाषेमधील चित्रपटांनी जगभरातील कोट्यवधी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. ‘धर्मा प्रॉडक्शन’ने गेल्या दोन वर्षांमध्ये तेलुगु चित्रपटसृष्टीत खूप चांगलं काम केलं आहे. ‘बकेट लिस्ट’द्वारे आम्ही पहिल्यांदाच मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल टाकतो आहोत आणि माझी अशी अपेक्षा आहे की पुढील काळामध्ये आमच्या संस्थेकडून मराठी चित्रपटांसाठी अशाप्रकारची आणखी पावलं पडावीत. चांगल्या आशयाबरोबरच मराठी चित्रपटांचा व्यवसायदेखील अलीकडच्या काळात वाढला आहे. त्यामुळे माझ्यासारख्या व्यावसायिकानं या गोष्टीचादेखील नक्कीच विचार केला. माझ्या मते कोणतंही क्षेत्र हे कॉमर्स आणि कला यांचं मिश्रण असतं. कलेच्या विक्री प्रक्रियेला आपण ‘कॉमर्स’ म्हणतो. माझ्या मते ज्या चित्रपटांमध्ये चांगला आशय आहे, त्याला चांगलं विक्रीमूल्यही आहे असं मला वाटतं.

म्हणूनच आम्ही मराठीसह इतर भाषांमधील चित्रपटसृष्टीत उतरलो. आम्ही मंडळी ‘चान्स पे डान्स’वाली मंडळी आहोत. जिथं आम्हाला ‘मौका’ दिसतो तिथं आम्ही ‘चौका’ मारण्याचा प्रयत्न करतो. माझ्या मते सध्याचा मराठी सिनेमा हा ‘आऊटस्टॅंडिग’ आहे. म्हणूनच ‘बकेट लिस्ट’द्वारे या चित्रपटसृष्टीशी जोडला गेलोय.

‘बकेट लिस्ट’ ही आमच्यासाठी खरोखरीच एक ‘स्पेशल’ चित्रपट आहे. मी ‘स्पेशल’ हा शब्द यासाठी घेतला की, खरोखरीच या चित्रपटामध्ये काहीतरी ‘स्पेशल’ दडलेलं आहे. हा चित्रपट आशा, प्रेम आणि कुटुंबावर आधारला आहे आणि सरतेशेवटी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा माधुरी दीक्षितचा सिनेमा आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रीयन असलेल्या माधुरीचा हा पहिलाच मराठी चित्रपट आहे. तिनं मराठी चित्रपटांमध्ये काम करावं असं जगभरातील चाहत्यांसह माझीही खूप वर्षांपासूनची इच्छा होती. तिच्या पहिल्या पदार्पणाला आमची साथ आहे, ही माझ्या संस्थेसाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. ‘बकेट लिस्ट’ची ‘कास्टलिस्ट’ तगडी आहे. सुमीत राघवनला मी ‘सुपर अॅक्टर’ म्हणेन. मराठी मनोरंजन क्षेत्रामधील तो सध्याचा एक प्रमुख अभिनेता आहे. त्याच्याबरोबर यापूर्वी एका ‘रिअॅलिटी शो’साठी काम करण्याची संधी मला मिळालेली होती.

हा चित्रपट पूर्ण झाल्यानंतर दिग्दर्शक तेजस देऊसकरनं मला तो दाखवला. मला तो एखाद्या ‘सनशाइन’सारखा वाटला. चित्रपट पाहिल्यानंतर माझ्या चेहऱ्यावर जे हास्य पसरलं, ते बराच काळ तसंच होतं. चित्रपटामधील काही प्रसंग पाहताना डोळे ओलावतातदेखील. मात्र आधीचं हासू काही जात नाही. मी अपेक्षा करतो, की या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर असंच हास्य लक्षावधी प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर उमटेल आणि ते तसंच कायम राहील. माझ्या मते हा चित्रपट प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन तर करीलच. परंतु, तो पाहताना प्रेक्षकांना काहीतरी चांगला ‘मेसेज’ही मिळेल. हा चित्रपट तुम्हाला काही काळ गुंतवून ठेवेल. हा चित्रपट माझ्यासाठी आणखी ‘स्पेशल’ ठरण्यामागचं सर्वात मोठं आणि आणखी एक कारण म्हणजे तो माझ्या वाढदिवशी म्हणजे २५ मे रोजी प्रदर्शित होत आहे. त्यामुळे हा वाढदिवस माझ्यासाठी आणि चित्रपटासाठीही ‘लकी’ ठरावा अशी मी अपेक्षा करतो.

– करण जोहर

ठेवणीतले लेख

    आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा



    [recaptcha]

    काही निवडक प्रतिक्रिया:

    नरेंद्र चौधरी


    आपल्या संकेतस्थाळाच्या माध्यमातून असे लक्षात आले कि आपन खूप छान माहिती पुरवत आहात.
    संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया