अतिथी कट्टा

दिनांक : २१-११-२०१८

‌‌‌‌‌‌‌‌मराठी चित्रपटांचा मी खूप मोठा ‘फॅन’…




पालक-मुलांच्या नात्यावर आधारीत असलेला ‘एक सांगायचंय-अनसेड हार्मनी’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून त्यामधील के. के. मेनन यांच्या अभिनयाचं रसिकांकडून खूप कौतुक झालं आहे. या चित्रपटाद्वारे मेनन यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं आहे. त्यानिमित्तानं के. के. मेनन यांचं हे मनोगत.

——

सर्वप्रथम मी एक गोष्ट स्पष्ट करीन की मी मराठी चित्रपटांचा खूप मोठा ‘फॅन’ आहे. मराठी चित्रपटात मी पहिल्यांदाच काम करीत असलो तरी ही चित्रपटसृष्टी मला काही नवीन नाही. डॉ. श्रीराम लागूसाहेब, विक्रम गोखले, निळू ङ्गुलेंनी गाजविलेल्या काळापासून मी मराठी चित्रपट पाहत आलो आहे. मराठीमधून चित्रपट करण्याची खूप वर्षांची माझी इच्छा होती. त्यामागचं कारण म्हणजे मराठी चित्रपट हा मातीशी जोडला गेलेला आहे. त्यामुळे या चित्रपटाला मातीचा वास लाभलेला असतो. असे मातीशी जोडलेले चित्रपट आणि आशयाला प्राधान्य या परंपरेमधलाच ‘एक सांगायचंय’ हा चित्रपट मला वाटला. लोकेशनं मला जेव्हा या चित्रपटाची गोष्ट ऐकवली तेव्हाच ती मला खूप आवडली होती. या कथानकावर चित्रपट बनला पाहिजे आणि तो चांगलाच बनला पाहिजे, असं माझं मत बनलं. लोकेशनं स्क्रीप्ट ऐकवल्यानंतर अवघ्या वीस मिनिटांमध्ये मी त्याला माझा होकार कळवला होता. त्यानं ज्या पद्धतीनं मला विषय ऐकवला ती पद्धत मला खूप आवडली. लोकेशची या विषयाबद्दलची ‘पॅशन’ मला विशेष भावली. ज्या चित्रपटामध्ये आशयाला मोठं स्थान आहे, तिथं दिग्दर्शकाचं अधिक महत्त्व वाढतं. तसेच माझ्यावरची जबाबदारी मला कळल्यामुळे ती पेलवतानाही तितकीच मजा आली. या चित्रपटाचा विषय आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. परंतु, त्याकडे आपण पुरेशा गांभीर्यानं पाहत नाही. परंतु, हा माहित असलेलाच विषय खूप गांभीर्यानं सांगण्याचा हा चित्रपटामधील पहिलाच प्रयत्न असावा. अशाप्रकारचं सूक्ष्म पण महत्त्वाचं कथानक चित्रपट माध्यमामधून सांगणं हे खूप अवघड काम आहे. कोणताही चित्रपट चांगल्या बनण्याची पहिली पायरी म्हणजे कथेचं उत्तम पटकथेत रुपांतर करणं. हे काम लोकेश गुप्तेंनी खूप छान पद्धतीनं केलं असल्यामुळे पहिली पायरी आम्ही अगदी सहजपणे पार केली. तसेच प्रत्यक्ष कागदावर जी ‘स्क्रीप्ट’ लिहिली गेलीय, त्यापेक्षाही अधिक चांगल्या पद्धतीनं हा चित्रपट बनला आहे. कोणताही चित्रपट करण्यापूर्वी दिग्दर्शकाबरोबर आपली ‘वेव्हलेंग्थ’ जमेल की नाही, याची मी चाचपणी करतो. ती जमेल असं वाटलं तरच मी पुढं जातो. लोकेशबरोबर ती जमल्यामुळेच मी पटकन या चित्रपटाला होकार दिला.

माझं लहानपण महाराष्ट्रातच गेलंय. त्यामुळे मराठी भाषा माझ्या नेहमीच कानावर पडलीय. मराठीमधलं असा कोणताही शब्द किंवा वाक्य नाही की जे मला ठाऊक नाही. मात्र मराठी माणसं जसं स्पष्ट आणि ठणठणीत बोलतात, तसं मला बोलता येत नव्हतं. तसेच ही भाषा बोलताना मला थोडासा संकोच वाटत होता. त्यामुळे कदाचित आतापर्यंत मी मराठी चित्रपट केला नसावा. तुम्ही माझे इतरही काही हिंदी चित्रपट बघा. मला ङ्गार ‘डायलॉगबाजी’मध्ये रस नसतो. भाषेचं ओझं मी कधी माझ्यावर लादत नाही.
मला चित्रभाषेमधून प्रेक्षकांशी संवाद साधायचा असतो. त्यामुळे या चित्रपटामधील मराठी संवाद म्हणताना मी ते सोप्या पद्धतीनं बोलण्याचा प्रयत्न केलाय. अर्थात हे सोपं बोलणं नक्कीच सोपं नव्हतं. शूटिंगच्या सुरुवातीला मी थोडासा नर्व्हसदेखील होतो. परंतु, तो नर्व्हसपणा कमी होईल याची काळजी लोकेशनं खूप चांगल्या पद्धतीनं घेतली.

आपलं मराठी बोलणं कोणाला खटकू नये, एवढी मात्र मी निश्‍चितच काळजी घेतली आहे. चित्रपटामध्ये प्लॉट्स खूप कमी असले तरी ‘मल्हार’ ही भूमिका तशी मला ‘कॉम्प्लेक्स’ वाटली. मला असं वाटतं की, संवादफेक ही एखाद्या अभिनेत्यासाठी खूप महत्त्वाची बाब नाही. त्यापेक्षाही इतर बर्‍याच गोष्टींकडे चांगल्या अभिनेत्यानं लक्ष देणं गरजेचं असतं. तुम्ही जर रेडिओ या माध्यमावरून काही भाष्य करीत असाल तर मग तुमच्या संवादफेकीला महत्त्वाचं असतं. जेव्हा तुम्ही रुपेरी पडद्यासारख्या ‘ऑडिओ-व्हिज्युअल’ माध्यमाद्वारे प्रेक्षकांना प्रत्यक्ष दिसत असता तेव्हा संवादफेकीबरोबरच तुमची देहबोलीही अधिक महत्त्वाची ठरते. तुम्ही काही न बोलताही चेहर्‍यावरील एखाद्या रिऍक्शनद्वारे खूप काही सांगून जाऊ शकता.

काही चित्रपट केल्यानंतर अभिनेत्याला आतून काहीतरी आपल्याला गवसलं असल्याची भावना मिळते. ती भावना हा चित्रपट मला देऊन गेला. लोकेश स्वतः एक उत्तम अभिनेता असल्यामुळे मी पूर्णपणे त्याच्यावर भरवसा ठेवला. मराठी भाषेसाठी कोणताही ‘इन्स्ट्रक्टर’ नेमला नाही. तसेच या चित्रपटाची ‘स्क्रीप्ट’ वाचताना मी तिचं रोमन लिपीमध्ये भाषांतर करून घेतलं नाही. ती मी मराठीमध्येच वाचली. कधी कधी काय होतं की लेखकानं लिहिलेलं चांगलं असतं. परंतु, प्रत्यक्ष शूटिंग करताना कलाकाराला थोडासा त्यात बदल करावा लागतो. लोकेश स्वतः अभिनेते असल्यामुळे हा बदल त्याला स्वतःला ठाऊक होता. त्यामुळे लोकेशबरोबर काम करताना मजा आली. मलासुद्धा त्यांचा हा दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट आहे, असं कधीही वाटलं नाही. सेटवर ते कधीही ‘टेन्स’ वाटले नाहीत. ‘शॉट डिव्हीजन’पासून ते ‘टेकिंग’पर्यंत सर्व गोष्टी त्यांनी खूप छान पद्धतीनं केल्यात. दिग्दर्शनात पदार्पण करणार्‍या व्यक्तीसाठी ही खूप मोठी ‘अचिव्हमेंट’ आहे असं मला वाटतं. एखादी व्यक्तिरेखा समजावून घेतल्यानंतर ती माझ्याकडून कशी साकारली जाते, हे कधीकधी मलादेखील कळत नाही. कामाच्या ओघात ते घडून जातं.

डबिंगच्या वेळीही मला कसलीही अडचण जाणवली नाही. राजेश्वरीबरोबर मी खूप वर्षांनी काम केलं आहे. चांगल्या कलाकारांबरोबर अभिनयाची जुगलबंदी करताना खूपच मजा येते. ती मजा मला राजेश्वरीबरोबर काम करताना आली. मी एखादी ‘रिऍक्शन’ दिली तर मला खात्री असायची की, तिच्याकडूनही काहीतरी तशीच चांगली ‘रिऍक्शन’ येणार. अगदी घडलंही तसंच. या चित्रपटामध्ये काम करणार्‍या चार नवीन मुलांचंही मी विशेष कौतुक करीन. माझ्या मते चित्रपट माध्यमात काम करण्यासाठी जे ‘पॅशन’ लागतं, ते या चौघांमध्येही आहे. तसेच स्वतःला कसं ‘इम्प्रोव्हाइज’ करायला हवं, हे शिकण्याचीही त्यांची तयारी होती. या चित्रपटाशी जोडल्या गेलेल्या प्रत्येक व्यक्तीनं आपलं काम चोख निभावलं आहे. त्यामुळेच हा चित्रपट एका विशिष्ट पातळीच्या पुढे जाऊन पोचला आहे.

मी एका मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलो. त्यामुळे अशाप्रकारच्या घरांमध्ये जसे संस्कार होतात, तसेच संस्कार माझ्यावरही झाले. मी आई-बाबांचा एकुलता एक मुलगा. सर्वसाधारणपणे प्रत्येक घरातील मूल जसं त्याच्या आईशी ‘क्लोज’ असतं, तसं मीही माझ्या आईशीच अधिक जवळ होतो. लहानपण सरल्यानंतर आपण कशा पद्धतीनं वागलं पाहिजे, याची मला आपोआप जाण आली होती. मी अभ्यासात हुशार होतो. तरीदेखील मला कला क्षेत्राकडे जावं वाटलं. आनंदाची गोष्ट म्हणजे मला या क्षेत्रात जाण्यासाठी आई-वडिलांनी फारसा विरोध केला नाही. कालांतरानं मी या क्षेत्रात मोठं यश मिळाल्यानंतरही त्यांनी माझं खूप कौतुक केलंय असं मला वाटत नाही. जेवढं आवश्यक आहे, तेव्हा मात्र ते आवर्जून माझी पाठ थोपटायचे. त्या काळात मध्यमवर्गीय कुटुंबातील मुला-मुलांचा आपल्या आई-वडिलांबरोबर अगदी खुल्या पद्धतीचा संवाद नव्हता. त्यामुळे मीही काही त्यापासून वेगळा नव्हतो. मात्र त्या काळात आजच्याइतक्या अत्याधुनिक सेवासुविधा कोणाकडेच उपलब्ध नव्हत्या. त्यामुळे प्रत्येकाच्या आयुष्यालाच विशिष्ट प्रकारच्या मर्यादा होत्या. तेव्हा आमचं भरपूर संभाषण मित्र तसेच नातेवाईकांशी व्हायचं. परंतु, आताची पिढी ‘सोशल मीडिया’द्वारे सर्वांच्या संपर्कात आहे. आजच्या काळातील ‘ऍव्हेन्यूज’ही वाढले असल्यामुळे मुलांचा आई-वडिलांबरोबरील संवाद वाढणं गरजेचं आहे. हा चित्रपट या गरजेबद्दलच खूप चांगलं भाष्य करण्यात यशस्वी झाला आहे.

– के. के. मेनन

ठेवणीतले लेख

    आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा



    [recaptcha]

    काही निवडक प्रतिक्रिया:

    नरेंद्र चौधरी


    आपल्या संकेतस्थाळाच्या माध्यमातून असे लक्षात आले कि आपन खूप छान माहिती पुरवत आहात.
    संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया