अतिथी कट्टा

दिनांक : ३०-०४-२०१९

‌‌‌‌‌‌‌‌‌मराठी भाषेच्या सौंदर्यानं नटलेला ‘६६ सदाशिव’




मोहन जोशी आणि वंदना गुप्ते यांची प्रमुख भूमिका असलेला ‘६६ सदाशिव’ चित्रपट येत्या ३ मेपासून प्रदर्शित होत आहे. योगेश देशपांडे यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. त्या निमित्तानं या दोन कलावंतांचं हे मनोगत.

——

मोहन जोशी –

’६६ सदाशिव’ हा सिनेमा येत्या ३ मे रो रसिकांच्या भेटीला येणार आहे. योगेश देशपांडेने या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. योगेश यांचा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच प्रयत्न आहे. योगेशजींचा काही महिन्यांपूर्वी मला या चित्रपटासंदर्भात फोन आला होता. त्यानुसार आम्ही दोघं माझ्या पुण्यातील निवासस्थानी भेटलो. यावेळी देशपांडे यांनी त्यांच्या लेदर बॅगेमधून या चित्रपटाचं स्क्रीप्ट इतक्या छान पद्धतीनं बाहेर काढलं की मी ते पाहून अवाकच झालो. जो माणूस आपल्या चित्रपटाच्या स्क्रीप्टची काळजी घेत असेल तो प्रत्यक्षात चित्रपट किती प्रेमानं बनवेल याची मला खात्री पटली. चित्रपटाची कथा ऐकून मी लगेचच होकार दिला. कारण देशपांडे यांनी खूप चांगल्या पद्धतीनं ही गोष्ट लिहिली होती.

प्रत्यक्ष शूटिंग करण्याचा अनुभव तर अविस्मरणीय असा होता. आपण एका चित्रपटाचं शूटिंग करतोय असं आम्हा कलावंतांना कधी जाणवलंदेखील नाही. वर उल्लेखिल्याप्रमाणे दिग्दर्शक देशपांडे यांचं काम खूपच चांगलं होतं. त्यांच्या नियोजनामुळे ठरलेल्या तारखेपेक्षा तीन दिवस आधीच आमचं शूटिंग संपलं. योगेशजींचा हा पहिलाच चित्रपट. पहिल्यांदा दिग्दर्शन करणाऱ्यांचं नवखेपण मी अनेकदा अनुभवलंय. परंतु, योगेशजींबाबत तसं काहीच वाटलं नाही. या चित्रपटामधील बऱ्याच दृश्यांमध्ये शंभरहून अधिक लोकांची गर्दी होती. परंतु, ती गर्दी असतानाही योगेशजींनी खूप छान चांगल्या पद्धतीनं सीन्स शूट केले. निर्मात्यांचा मी विशेष उल्लेख करीन. त्यांनी आमचे लाड केले. आम्हाला काहीही कमी पडू दिलं नाही. थोडक्यात एक दर्जेदार सिनेमा बनला आहे

वंदना गुप्ते –

मोहन जोशी हा माझा आवडता कलाकार आहे. त्यामुळे त्याच्याबरोबर काम करायला मिळणं ही नेहमीच आनंदाची गोष्ट असते. मोहन स्वतः उत्तम अभिनय करतो आणि दुसऱ्यांच्याही अभिनयाचा तो आस्वाद, आनंद घेतो. ही बाब खूपच कमी कलाकारांमध्ये जाणवते. या चित्रपटाचं शूटिंग करताना सतत जाणवली. मी आजवरच्या कारकीर्दीमध्ये अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. परंतु, चित्रपटाचं डिटेल्ड स्क्रीप्ट क्वचितच आजवर माझ्या हाती पडलं आहे. बहुतेक वेळा शूटिंगसाठी सेटवर गेल्यानंतरच आपले संवाद बघायला मिळतात. परंतु, हा चित्रपट त्यास अपवाद ठरला. पूर्ण स्क्रीप्ट आधीच वाचायला मिळाल्यामुळे प्रत्येकाला आपापल्या भूमिकेकडून काय अपेक्षित आहे हे कळलं.

चित्रपट विनोदी आहे. परंतु, दिग्दर्शक देशपांडे यांनी अत्यंत धीरगंभीर पद्धतीनं या चित्रपटाचं केलेलं नरेशन आजही माझ्या लक्षात आहे. चित्रपटाच्या भाषेचा मी आवर्जून उल्लेख करीन. यातले काही पुणेरी शब्द मोहन जोशी पुण्याचे असूनही त्यांना ठाऊक नव्हते हे विशेष. त्यामुळे या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांना शुद्ध मराठी भाषा ऐकायला मिळेल. सेटवरचं वातावरण अत्यंत छान, हसतंखेळतं होतं. आमचे छायालेखक रेड्डी यांचा मी आवर्जून उल्लेख करीन. त्यांच्या कामातील झपाट्यामुळे चित्रपट वेळेआधी शूट झाला. या चित्रपटामधील मला आवडलेली आणखी एक गोष्ट म्हणजे माझी वेशभूषा. एवढे चांगले कपडे यापूर्वी मराठी चित्रपटामधील माझ्या व्यक्तिरेखेच्या वाट्याला आले नव्हते.

ठेवणीतले लेख

    आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा



    [recaptcha]

    काही निवडक प्रतिक्रिया:

    नरेंद्र चौधरी


    आपल्या संकेतस्थाळाच्या माध्यमातून असे लक्षात आले कि आपन खूप छान माहिती पुरवत आहात.
    संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया