अतिथी कट्टा

दिनांक : २१-०४-२०१९

‌‌‌‌‌‌‌‌‌मला वेगळंच काम करायचं आहे!




सैराटच्या यशामुळे लोकप्रियतेच्या शिखरावर पोचलेली अभिनेत्री म्हणजे आर्ची ऊर्फ रिंकू राजगुरू. सैराटच्या प्रदर्शनानंतर तब्बल तीन वर्षांनी रिंकूचा कागर हा दुसरा चित्रपट प्रदर्शित होत आहे. त्यानिमित्तानं तिचं हे मनोगत.

——

कागरचं पोस्टर जेव्हा सोशल मीडियावरून प्रदर्शित झालं तेव्हा अनेकांनी हा चित्रपट राजकारणावर आधारल्याचा तर्क काढला होता. मात्र सैराटमध्ये जशी प्रेक्षकांना एक छान प्रेमाची गोष्ट पाहायला मिळाली होती, तशीच गोष्ट कागरमध्येही आहे. या गोष्टीतले नायक-नायिका आहेत राणी आणि युवराज. या दोन व्यक्तिरेखांमधली एक छान केमिस्ट्री या चित्रपटात पाहायला मिळेल. अर्थातच या प्रेमकहाणीला पार्श्वभूमी आहे ती राजकारणाची. माझी या चित्रपटामधील भूमिका सैराटपेक्षा खूप वेगळी आहे. खूप वेगवेगळ्या छटा आहेत या भूमिकेला. उंबरठ्याच्या आत असलेली मुलगी जेव्हा उंबरठ्याच्या बाहेर पडते तेव्हा काय घडतं याचा प्रवास या चित्रपटामधून दाखविण्यात आला आहे.

राणीच्या व्यक्तिरेखेबद्दल थोडं तपशीलात जाऊन सांगायचं झालं तर ती खूप आत्मविश्वासू मुलगी आहे. ती खूप जिद्दी आहे. आपल्या आयुष्यातला प्रत्येक महत्त्वाचा निर्णय ती खूप विचार करून घेते. सैराटमधील मी साकारलेली आर्ची प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली. मलाही ती व्यक्तिरेखा आवडलीच होती. परंतु, आता कागरमधील राणीदेखील मला तेवढीच प्रिय आहे. सैराट प्रेक्षकांच्या मनावर ठसला तो त्याच्या संगीतामुळे. कागरबाबतही तसंच घडेल असं मला वाटतंय. या चित्रपटामधील गाणीही खूपच सुश्राव्य झाली आहेत. गाण्यांचं शूटिंग खूप छान आहे. गाणं कधी संपतं ते कळतही नाही. प्रत्येक मिरवणुकीत हे गाणं गाजणार.

सैराटच्या कन्नड आवृत्तीतही काम करताना मजा आली. ती इंडस्ट्रीच वेगळी आहे. खूप वेगळ्या पद्धतीनं तिथं काम चालतं. परंतु, ऑफर तर भरपूर येत आहेत. सैराटचं यश विलक्षणच होतं. आमची सगळी टीम अजूनही एकमेकांना वेळ असला की भेटते. या चित्रपटाचं बॉक्स ऑफिसबाहेरील यश म्हणजे आता मुली खूप बिनधास्त झाल्यात. त्यांच्यावरचं दडपण कमी झालंय. आपल्याला हवं तसं त्या आता वागू शकताहेत.

सैराटच्या यशानं तर माझं सगळं जग बदललंय. बॉडीगार्डची गर्दी आजूबाजूला झाली. पूर्वी मी शाळेतच्या मैत्रिणींबरोबर कुठंही फिरू शकायचे. आता एकटीनंच अभ्यास करावा लागतोय. मैत्रिणींबरोबर फारसं भेटू शकत नाही. परंतु, त्याबद्दल फारशी खंत वाटत नाही. कारण आनंद या गोष्टीचाही आहे की एवढं मोठं यश इतक्या लहान वयात कोणालाही आजपर्यंत मिळालेलं नाही. त्यामुळे मी सध्या सगळ्या गोष्टींचा आनंद घेते आहे. अजूनही मला भेटायला फॅन्स घरी येतात. माझ्याखेरीज माझ्या बाईकबरोबरही फोटो काढतात. हे पाहताना खूप छान वाटतं. मात्र खूप वेडे फॅन्ससुद्धा आहेत. त्यांचा त्रासही होतो. सगळ्यांनाच माझ्याबरोबर फोटो काढायचे असतात. परंतु ते शक्य होत नाही. त्यामुळे फॅन्सही समजून घ्यायला हवं.

गेल्या तीन वर्षांमध्ये मी 12 किलो वजन कमी केलंय. स्वतःच्या लुकवर काम केलंय. खूप चित्रपटांना नकार दिलाय. कारण तेच ते मला करायचं नव्हतं. सैराट हिट झाल्यानंतर मला तशाप्रकारचे अनेक चित्रपट ऑफर झाले. ते सगळे मी नाकारले. कागरची गोष्ट मला आवडली. कोणतंही काम करताना मी नागराजअण्णांना विचारते. त्यांची मतं जाणून घेते. मला वेगवेगळं काम करायचंय. या चित्रपटात प्रेम आणि राजकारणाची सांगड घालण्यात आली आहे. कागरचे दिग्दर्शक मकरंदसरांना मी स्क्रिप्ट वाचून दाखवायला सांगितली. त्यांनी ऐकवली नि मला ती आवडली. मराठीत अशा पद्धतीचा चित्रपट अजूनपर्यंत आलेला नाही. या चित्रपटाचं पूर्ण शूटिंग अकलूजमध्ये झालं. ती गोष्टच तिकडची आहे. माझ्याच गावात शूट झाल्यामुळे खूप आनंद झाला. त्यामुळे मला शूटिंग सुरू असताना घरीहबी राहता आलं. तसेच सगळे कलाकार हॉटेलमध्ये राहत असल्याने मी त्यांनाही भेटायला जायचे. कारण एकटीनं राहण्याचा माझा स्वभाव नाही. मकरंदसर खूपच चांगले दिग्दर्शक वाटले. खूप मजा आली त्यांच्याबरोबर काम करताना. त्यांची समजावण्याची पद्धत चांगली. मी त्यांना काहीही विचारू शकते. समोरच्याचा कम्फर्ट झोन बघून ते सीन चित्रीत करतात. या चित्रपटामधील माझा को-स्टार शुभांकरबरोबर हळूहळू माझी मैत्री फुलली. सुरुवातीला आम्ही खूप कमी बोलायचो. तो सेटवर मस्त असतो. खूप जोक्स करायचा. सर्वांना हसवायचा. सैराटनंतर तीन वर्षांनी हा चित्रपट प्रदर्शित येतोय. मधल्या काळातलं दडपण आलं नाही. काहीतरी करण्यापेक्षा थांबलेलं बरं. मला चांगलंच काम करायचं होतं. यापुढं मला अभिनयाबरोबरच ग्रॅज्युएशनही पूर्ण करायचंय.

– रिंकू राजगुरू

ठेवणीतले लेख

    आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा



    [recaptcha]

    काही निवडक प्रतिक्रिया:

    नरेंद्र चौधरी


    आपल्या संकेतस्थाळाच्या माध्यमातून असे लक्षात आले कि आपन खूप छान माहिती पुरवत आहात.
    संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया