अतिथी कट्टा

दिनांक : २५-०५-२०१८

‌माधुरी म्हणते, ‘बेटर लेट दॅन नेव्हर…’

विख्यात अभिनेत्री माधुरी दीक्षित २५ मे पासून प्रदर्शित होणाऱ्या ‘बकेट लिस्ट’ या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करीत आहे. तेजस देऊसकरचं दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटाचं सादरीकरण करण जोहर यांनी केलं आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनानिमित्तानं माधुरीचं हे मनोगत.

——

मराठी चित्रपटांमध्ये प्रदर्शन करण्यासाठी एवढा वेळ का घेतला? हा प्रश्न मला वारंवार विचारला जातो. त्यावरचं माझं एका वाक्यातलं उत्तर म्हणजे ‘बेटर लेट दॅन नेव्हर’…. मी एका चांगल्या पटकथेच्या प्रतीक्षेत होते. ‘बकेट लिस्ट’ची ‘स्क्रीप्ट’ ग्रेट वाटल्यामुळेच मी मराठी चित्रपटामध्ये पदार्पण करण्याचा निर्णय घेतला. माझी ‘बकेट लिस्ट’ कायमच विस्तारत असते. मी प्रत्येक वेळी नवीन चॅलेंज स्वीकारते आणि ते पूर्ण करते. त्यामुळे या गोष्टीला काही अंत नाही. मराठी चित्रपट नक्कीच माझ्या ‌‘बकेट लिस्ट’वर होता. मराठी चित्रपटसृष्टीचा सध्या ‌‘गोल्डन इरा’ सुरू आहे. त्यात मला काम करायला मिळालं हे मी माझं नशीब मानते. खूप चांगले विषय मराठी चित्रपटांमधून लेखक-दिग्दर्शक मंडळी मांडत आहेत. तांत्रिकदृष्ट्याही आपला चित्रपट खूप पुढं गेला आहे. या सगळ्या कारणांमुळे हा मराठी चित्रपट स्वीकारला. या चित्रपटात मी मोटरबाइक चालवली आहे. त्याच्यासाठी मला खूप प्रॅक्टिसही करावी लागली. हे मोठं चॅलेंज होतं माझ्यासाठी. कोणताही रोल करताना ‘मेंटल प्रीपरेशन’ करावं लागतं. ते या रोलसाठी मी केलं.
मला आठवतं की, माझी मॅनेजर मीनाक्षीचा मला फोन आला होता. ‘तेजस नावाचे एक मराठी दिग्दर्शक आहेत. त्यांना तुमची भेट हवी आहे…’ मी लगेचच होकार दिला. मात्र भेटण्यापूर्वी मी त्यांच्याकडून चित्रपटाचं थोडक्यात कथानक मागवलं. ते मला खूप आ‌वडलं. त्यानंतर ‘स्क्रीप्ट नरेशन’साठी तेजस मला भेटले. हे ‘नरेशन’देखील मला खूप आ‌वडलं. या चित्रपटाची मूळ कल्पना खूप छान आहे. मात्र तेजसनी मला जे ‘स्क्रीप्ट’ ऐकवलं ते अजून पूर्ण नव्हतं. म्हणून मग मी त्यांना हे ‘स्क्रीप्ट’ पूर्ण लिहिण्यास सांगितलं आणि त्यानंतर आम्ही भेटायचं ठरलं. त्यानंतर सुमारे सहा आठवडे तेजसनी या ‘स्क्रीप्ट’वर आणखी काम केलं आणि ही पूर्ण ‘स्क्रीप्ट’ त्यांनी मला ऐकवली. तेजस यांचं ‘स्क्रीप्ट नरेशन’ पूर्ण झाल्यानंतर माझ्या तोंडातून पटकन शब्द आहे,

‘आय एम इंट्रेस्टेड. लेट्स डु इट.’ अशा पद्धतीनं या चित्रपटाचा श्रीगणेशा झाला. एका स्त्रीचा, गृहिणीचा खूप इंट्रेस्टिंग असा हा प्रवास आहे. तिच्या या प्र‌वासात जे जे घडतं ते सर्वसामान्य प्रेक्षकांच्या दृष्टीनं खूप मनोरंजक आणि उद्बोधकही आहे. आजच्या काळातली प्रत्येक स्त्री आणि पुरुष या कथानकाला ‘रीलेट’ करेल असं मला वाटतं. तसेच ही केवळ एका गृहिणीची कथा नाही. ती स्वप्नं, इच्छा, आकांक्षा यांचीही कथा आहे. त्यामुळे सर्वसामान्य प्रेक्षकाला ती भावेल असा मला विश्वास आहे. आपल्या कुटुंबासाठी झटत असताना तिचं विश्वच कसं हरवून जातं, याची कहाणी या चित्रपटामधून आम्ही मांडली आहे. सगळ्यांसाठी काम करत असताना शेवटी तिला स्वत:लाच प्रश्न पडतो की आपण कोण आहोत? परंतु, अखेरीस तिला स्वत:ला काय करायचं हे कळतं. मी स्वत: थोड्या काळासाठी ‌‘हाउसवाइफ’ होते. त्यामुळे या चित्रपटातील मुख्य व्यक्तिरेखेशी मला ‘रीलेट’ करता आलं.

या चित्रपटात काम करण्याचा माझा अनुभव खूपच चांगला होता. आमची ‘स्टारकास्ट’ अगदी छान आहे. रेणुका शहाणे यांच्याबरोबर मी सुमारे अडीच दशकांपूर्वी काम केलं होतं. मला अजूनही आठवतंय, मी रेणुकाला पहिल्यांदा भेटले, तेव्हाच आमच्यात एक विशेष असं ‘कनेक्शन’ निर्माण झालं. कदाचित आम्हा दोघींची महाराष्ट्रीयन पार्श्वभूमी त्यास कारणीभूत असावी. दोन दशकांपूर्वीचा खूप चांगला ‘कनेक्ट’ या चित्रपटाच्या वेळीही कायम राहिला. तेजसनं जेव्हा एका व्यक्तिरेखेसाठी मला रेणुकाचं नाव सुचवलं तेव्हा मी ‘वहीं होनी चाहिए’ एवढंच उत्तर त्याला दिलं. मध्यंतरीच्या काळात एक छोटीशी समस्या आली होती. त्यामुळे रेणुकानं ही भूमिका साकारण्यास असमर्थता व्यक्त केली होती. मला हे कळल्यानंतर मी तिला फोन केला नि विचारलं, ‘रेणुका, तू हा चित्रपट करीत नाहीयेस?’ तेव्हा रेणुकानं माझ्या स्वरातील भाव ओळखून लगेचच ‘मी हा चित्रपट करतेय…’ असं उत्तर दिलं. ‘बकेट लिस्ट’मध्येही आम्ही दोघी पुन्हा एकदा बहिणी झालो आहोत. यातला आमचा ‘बॉण्ड’ आणखीनच घट्ट आहे. रणबीर कपूरसोबत ‘ये जवानी है दिवानी’मध्ये मी छोटीशी भूमिका दिली होती. विशेष म्हणजे तोही करण जोहरचाच सिनेमा होता. रणबीर कपूरची मी फॅन आहे. खूप चांगलं काम करतात ते. त्यांच्या कामाचं मला खूप कौतुकही आहे. यापूर्वी एका गाण्यात आम्ही काम केल्यामुळे आमच्यातील केमिस्ट्री खूप चांगली होती. त्यामुळे ‘बकेट लिस्ट’मध्ये त्या प्रसंगासाठी तेजसनी मला रणबीरचं नाव सुचवलं तेव्हा मी लगेचच होकार दिला. मी होकार तर दिला, परंतु रणबीरनंही त्याला पसंती देणं आवश्यक होतं. तशी त्यानं दिली. ‘चार्मिंग बॉय’ असा मी त्याचा उल्लेख करीन. थोडक्यात, सगळ्या टीमनं खूप चांगलं काम केलं. मला आता प्रतीक्षा आहे ती प्रेक्षकांच्या प्रतिसादाची.

– माधुरी दीक्षित

ठेवणीतले लेख

    आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा



    [recaptcha]

    काही निवडक प्रतिक्रिया:

    नरेंद्र चौधरी


    आपल्या संकेतस्थाळाच्या माध्यमातून असे लक्षात आले कि आपन खूप छान माहिती पुरवत आहात.
    संदर्भ:- ई-मेल प्रतिक्रिया