अतिथी कट्टा

दिनांक : ०४-०३-२०१९

‌‌‌‌‌‌‌‌लक्ष्याचा आशीर्वाद नेहमीच आमच्यासोबत…
प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक सचिन पिळगांवकर यांचा ‘अशी ही आशिकी’ हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांसमोर आला आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनानिमित्तानं त्यांचं हे मनोगत.

——

दिग्दर्शक म्हणून माझा हा २२वा चित्रपट आहे. परंतु, संपूर्णपणे मी संगीत दिलेला हा पहिलाच चित्रपट आहे. या चित्रपटात पाच गाणी असून ती सगळी परस्परांपेक्षा वेगळी आहेत. त्यापैकी कोणाचीच परस्परांशी तुलना होऊ शकत नाही. तसेच त्यापैकी कोणतं चांगलं नि कोणतं वाईट हे संगीतरसिकांनी ठरवायचं. ज्यांच्या दुनियेकरता ही कलाकृती बनवली आहे मला पुढच्या पिढीला ही थोडीशी जबाबदारी द्यायची होती. म्हणून मी हीरोचं काम केलं नाही. त्यामुळे मी यावेळी ठरवलं की, चला यावेळी आपण कॅमेऱ्यासमोर नको तर कॅमेऱ्यामागं राहूया. मागं राहून असा एक आवाज देऊ. मात्र फक्त आवाज देऊनही चालत नाही. याबद्दलचा एक शेर सांगतो- ‘आवाज देनेसेही कारवॉं नहीं रोके जाते, देखा ये भी जाता है की पुकारा किसने…’ या सगळ्या टीमनं माझ्यावर विश्वास ठेवला. निर्मात्यांचाही मी आभारी आहे. या चित्रपटाचा मी दिग्दर्शक असल्यामुळे मी त्याचा फक्त बाप नव्हे तर आईसुद्धा आहे. कारण चित्रपटाची ‘डिलीव्हरी’ पण मलाच द्यायचीय. त्यामुळे प्रसूतीवेदनांना मला सामोरंच जावं लागलं. त्यावर कोणताही दुसरा उपाय नव्हता. अर्थात अशाप्रकारच्या वेदना मी कित्येक वर्षं सहन करीत आलो आहे.

या चित्रपटात नायक-नायिकेव्यतिरिक्त इतर चौघे जण आहेत. त्यांच्यामुळे खरं तर चित्रपटाला ‘चार चॉंद’ लागले असंही मी म्हणेन. खूप छान काम केलंय त्यांनी. विशेष म्हणजे या सर्वांचा हा पहिलाच चित्रपट आहे. परंतु, त्यांच्यात अभिनयाची कला आहे, हे मी ठामपणे सांगू शकतो. लक्ष्याला जेव्हा मुलगा झाल्याची बातमी पहिल्यांदा माझ्या कानावर आली तेव्हा माझ्या स्वप्नातही आलं नसतं की हा एक दिवस माझ्या चित्रपटाचा हीरो बनेल. अभिनयचा जन्म ज्या दिवशी झाला, त्या दिवशी मी त्याला पाहू शकलो नाही. परंतु, काही दिवसांनंतर मी त्याला पाहिलं. गोंडस, गोल चेहऱ्याचं हे बाळ मला तेव्हाच खूप आवडलं होतं. तेव्हापासूनच तो माझाही मुलगा झाला. फक्त या वेळेला असं वाटतं की आत्ता लक्ष्या आपल्यासोबत हवा होता. त्याला हे बघून खूप छान वाटलं होतं. परंतु, त्याचा आशीर्वाद नेहमीच आपल्यासोबत असणार आहे. त्यामुळे अभिनय या क्षेत्रात भविष्यात जेवढा मोठा होईल, तेवढा अधिक आनंद लक्ष्याला होईल. या चित्रपटात अभिनयनं खूपच छान काम केलं आहे.

हीरो तर आम्हाला मिळाला होता. परंतु, त्याला शोभेल अशी नवीन नायिका निवडणं हे आमच्यासाठी खूप अवघड काम होऊन बसलं होतं. अभिनय जेवढा चांगला अभिनेता आहे, तेवढीच तीही चांगली अभिनेत्री असणं आवश्यक होतं. त्याला ‘कॉम्प्लिमेंट’ करणाऱ्या मुलीच्या आम्ही शोधात होतो. खूप शोध घेतला. भरपूर ठिकाणी फिरलो. खूप मुलींच्या आम्ही ऑडिशन्स घेतल्या. तेव्हा मला माहित नव्हतं की आपल्याला हवी असलेली नायिका ही कोल्हापूरमध्ये दडून बसली आहे. आमची हेमल कोल्हापूरची आहे. कोल्हापूरच्या तांबडा-पांढरा किंवा पांढरा-तांबडासारखी. हेमलचा हा पहिलाच चित्रपट. परंतु, तांबडा-पांढरामध्ये जी ‘व्हेरिएशन्स’ असतात, तशी ती हेमल इंगळेच्या अभिनयातदेखील आहेत. तिचा अभिनय हा अभिनयच्या परफॉर्मन्सला ‘कॉम्प्लिमेंट’ करणारा ठरला. या दोघांनी पडद्यावर खूप धमाल केली आहे. कोल्हापूरचं खरं नाव कलापूर. या कलापूरमधून हेमल आम्हाला सापडली ही खूप आनंदाची गोष्ट आहे. प्रेम, कनफेशन, इमोशन म्हणजे ‘अशी ही आशिकी’. कॉन्फिडंट, फ्रि-मांइडेड असलेले स्वयम आणि अमरजा, या कपलची आशिकीची जर्नी या चित्रपटातून फुलली आहे. सोनू निगम यांनी ‘रकम्मा’ हे गाणे गायले आहे. इतकेच नव्हे तर, सोनू यांनी या चित्रपटातील सगळी गाणी गायली आहेत. ‘मुव्हिंग पिक्चर्स’ आणि ‘सुश्रिया चित्र’ यांनी देखील ‘अशी ही आशिकी’ची निर्मिती केली असून वजीर सिंह, जो राजन आणि सुप्रिया पिळगांवकर हे या चित्रपटाचे निर्माते आहेत.

– सचिन पिळगांवकर

ठेवणीतले लेख

  आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा  [recaptcha]

  काही निवडक प्रतिक्रिया:

  सचिन पारेकर


  शाहू मोडक हे मराठी चित्रपटातील असामान्य कलाकार होते. 'माणूस' मधील त्यांची भूमिका अविस्मरणीय होती.विनम्र अभिवादन!💐💐

  संजय रत्नपारखी
  संदर्भ:- फेसबुक प्रतिक्रिया