अतिथी कट्टा

दिनांक : २३-७-२०१८

‌‘कलावंताची कला कसाला लागलीच पाहिजे !’ – रंजना


दिवंगत अभिनेत्री रंजना यांचा २३ जुलै हा जन्मदिन. या चतुरस्त्र अभिनेत्रीनं आपल्या वाट्याला आलेल्या दीड दशकांच्या कारकिर्दीमध्ये खूप वैविध्यपूर्ण काम केलं. स्वत:ला कोणत्याही भूमिकेच्या चौकटीत बांधून घेतलं नाही. त्यामुळेच त्यांच्या बहुतेक सर्व व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या लक्षात राहिल्या. मात्र अपघातारूपी आलेल्या मोठ्या संकटानं त्यांच्या कारकिर्दीला धक्का बसला. अपघातानंतरच्या आजारपणात त्यांना खूप काही सोसावं लागलं. परंतु, या काळातही त्या मनानं खूप घट्ट होत्या. दिवंगत पत्रकार-लेखक वसंत भालेकर यांनी ‘चंदेरी आठ‌वणी’ या पुस्तकात अपघातानंतर रंजना यांची भेट घेऊन त्यांच्याशी सविस्तर बातचीत केली होती. त्याद्वारे रंजना यांचा चित्रपट माध्यमाकडे पाहण्याचा दृष्टिकोण तसेच आजारपणात त्यांना कोणी मानसिक धैर्य दिले, याची माहिती मिळते. आपल्या भूमिकांच्या वेगळेपणाच्या अट्टाहासाबद्दल रंजना यांनी सविस्तर विवेचन केलं आहे. ते आम्ही संपादित स्वरूपात प्रकाशित करीत आहोत.

——

“प्रभू रामचंद्रांना चौदा वर्षे वनवास घडला होता. मला चौदा महिने ! संपला एकदाचा काळाकुट्ट काळ ! चौदा महिने घराबाहेर राहिले आहे ; पण हे घराबाहेर राहणे जीवघेणं. पण अरिष्ट टळलं. मी संकटमुक्त झाले ! ” माझ्या हाती तिळगुळ ठेवीत रंजना उद्गारली. तिचा गोरापान चेहरा अधिकच उजळला होता तेव्हा. डोळ्यात वेगळंच तेज, भविष्याचं स्वप्न तरळू लागलं होतं. तशी ती नेहमीच हसतमुख राहणारी पण यावेळच्या तिच्या हास्यात आगळाच गोडवा होता. कुंडकळ्यासारख्या पांढऱ्याशुभ्र दंतपंक्ती चमकत होत्या. खरं सांगू, माझ्यापुढं तेव्हा दलाल मुळगावकरांनी आपल्या सव्यसाची कुंचल्याने रंगविलेली गोड, आखीव, रेखीव, स्वरूपसुंदरी तरुणीच समूर्त झाली होती. रंजनाचं हे रुपडं भावणारं. मी वत्सलाताईंकडं पाहिलं त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडत होता नुसता !
महालक्ष्मी हाजीअलीच्या इस्पितळात गेले ७-८ महिने ती स्वतःवर इलाज करीत असलेली. त्यापूर्वी बॉम्बे इस्पितळामध्ये. शांतारामबापूंच्या ‘झंझार’ चित्रपटाच्या बाह्य चित्रणासाठी जात असताना बंगळूरजवळ तिच्या गाडीचा भीषण अपघात झाला. आणि १९८४ च्या २२ नोव्हेंबरला हा वनवास सुरू झाला तो थेट १९८६ च्या जानेवारीपर्यंत. हे चौदा महिने तिनं इस्पितळात काढले. पहिले ६-७ महिने तर बिछान्यावर अक्षरशः उताणे झोपून. ना इकडं हलायचा का ना तिकडे. पुढं हालचाल सुरू झाली. जखमी स्नायूंना, हाडांना मजबुती आणण्यासाठी मग या हाजीअलीच्या इस्पितळात शारीरिक व्यायाम सुरू झाला.
रंजनाबरोबर तिची आई वत्सलाताईही. त्यांनाही या तापदायक, क्लेशकारक चौदा महिन्यांच्या, इस्पितळातील वास्तव्याच्या यातना भोगाव्या लागल्या. लाडकी लेक शारीरिक क्लेश सहन करीत असताना, मृत्यूशी निकराने झुंज देत असताना, ही माऊली मानसिक यातना भोगीत होती. रडण्यासाठी डोळ्यात आसवेच उरली नव्हती. तो गंगायमुनेचा पूर प्रारंभीच वाहून गेला होता. धाकटी बहीण विजूताई (संध्या) आपल्या भाचीची ही विकलांग अवस्था बघून वत्सलाताईंना मिठी मारून ओक्साबोक्सी रडे. तेव्हा जड अंतःकरणानं त्यांनाच या हळव्या, भावनाप्रधान बहिणीची समजूत काढावी लागे. पण अनेकदा दोघीही हुंदके देतच राहत आणि मग रंजनाला त्यांना गप्प करावं लागे.
एकूण अवस्थाच तशी होती. रंजनाच्या आयुष्याची दोरी बळकट म्हणूनच ती या भीषण अपघातातून वाचली. तिची इच्छाशक्ती जबरदस्त, आत्मबल विलक्षण म्हणूनच तिनं साऱ्या शारीरिक व मानसिक यातना सहन करताना चेहऱ्यावरील हास्य लोपू दिलं नाही. अक्षरशः पुनर्जन्मच झाला तिचा !
फार कठीण होतं हे सारं. सत्वपरीक्षाच ती. शांतारामबापूंसारखा धीरोदात्त कणखर पुरुषही रंजनाची ही एकूण दयनीय अवस्था बघून डळमळला. आतून पार गलबलून गेला. डोळे पाण्याने डबडबले होते तेव्हा त्यांचे. एवढं भीषण स्वरूप होतं या अपघाताचं. तिच्या शरीराचं हाड न हाड खिळखिळं झालं होतं. अनेक जागी चेचून गेलं होतं. गळ्याच्या वरच्या भागाला कसलीच इजा झाली नव्हती. चेहरा आणि डोकंही अपघातातून वाचलं होतं. त्यामुळं स्मृती जागृत. स्मरणशक्ती ताजी, टवटवीत राहिली. पण शारीरिक हानी अतोनात झालेली. ती यातून वाचलंच याची खात्री तेव्हा प्रगत वैद्यकशास्त्रही देऊ शकत नव्हतं. शांतारामबापू म्हणूनच खूप धास्तावले होते. होणारं टळणार नव्हतं. पण त्यांना मात्र अपराध्यागत वाटत होतं. आपणच या अपघाताला कारण झालो आहोत असं त्यांच्या मनानं घेतलं होतं.
पण त्यांनी स्वतःला सावरलं. या दुखण्यातून रंजनाला बरी करायचीच या जिद्दीनं पुढची पावलं टाकली. केवळ हे वैद्यकीय उपचार करून शांतारामबापू थांबले नाहीत; तर त्यांनी रंजनाला धीर दिला.
“रंजू, तू निश्चित बरी होणार. एकदा तू हिंडायला, फिरायला लागलीस की तुझ्यासाठी झकास भूमिका लिहून घेतो. तुझ्या अभिनयकलेचे रुपेरी पडद्यावर नवरंग फुलवून टाकतो. सारे दिपून जातील तुझं काम बघून बेटा, तसं तू आजच साऱ्यांना नानाविध भूमिकांनी मंत्रमुग्ध केलं आहेस. तू अष्टपैलू अभिनेत्री आहेस हे सिद्ध करून दाखवील आहेस. ऐन तारुण्यात स्त्रीची वृद्धा रंगविणे, ते वृद्धेचं बेअरिंग सांभाळून लोकांना आपलं तरुणपण विसरायला लावणं सोपं नाही, म्हणून तर तुला जनमानसात फार मोठं मानाचं, मोलाचं स्थान लाभलं आहे.” शांतारामबापू तिला धीर देताना म्हणत.
शांतारामबापूंच्या या शब्दांनीच रंजनाच्या मनाची उभारी वाढली. तिचं भावबल वृद्धिंगत केलं. आपण कोणीतरी आहोत याची जाणीव करून दिली. रंजना म्हणूनच आपल्या शारीरिक यातना विसरली. प्रत्येक गोष्टीला कणखर मनानं ती सामोरी गेली. त्यामुळंच कठीणातील कठीण शस्त्रक्रियांनाही तिनं न घाबरता, न डगमगता तोंड दिलं. अशा वेळी वत्सलाबाईंच्या तोंडचं पाणी पळे. पण रंजनाच्या डोळ्यांत पाण्याचं टिपूसही दिसलं नाही.
“माझ्या अंगात किती सुया टोचल्या गेल्या, शरीरात किती तीक्ष्ण हत्यारं फिरली आणि पोटात किती तऱ्हेच्या, किती रंगाच्या गोळ्या गेल्या आहेत, कसलं कसलं औषध मी प्यायले आहे हे माझंच मला आठवत नाही. साऱ्या शरीराला आणि गळ्याला या शस्त्रक्रियेची, या गोळ्यांची, या औषधांची आता इतकी सवय झाली आहे की, या गोळ्या आणि औषधं हेच माझे नित्याचं अन्न बनलं आहे.” रंजना अगदी मोकळेपणानं हसत एका भेटीत मला म्हणाली होती.
“पण हे सारं सहन करण्याची प्रचंड मानसिक शक्ती तरी कुठून आणलीस ?” मी रंजनाला तेव्हा विचारलं होतं. रंजनाची तेव्हाची एकूण अवस्था बघून माझे डोळे भरून आले होते.
महाराष्ट्राच्या या गुणवंत अभिनेत्रीला कुणा पाप्याची दृष्ट लागलेली बघून मन विव्हळू लागलं होतं.

“आसवं ढाळून माझे दुःख, माझ्या यातना थोड्याच कमी होणार आहेत ! प्राप्त परिस्थितीला तोंड देणं भागच पडणार. मग मी का रडावं ?” रंजनानं उलट मलाच सवाल केला.

रंजनाच्या डबिंगवरून आठवलं. चांदवली स्टुडिओचे संचालक बाबा कदम यांच्या ‘हिचं काय चुकलं’ हे रंजनानं अपघातापूर्वीचं तिचं पूर्ण केलेलं चित्र. ते तिच्या डबिंगसाठी थांबलेले. रंजनानं हे डबिंग करण्याचं ठरविलं. मात्र ते ‘राजकमल कला मंदिरा’त व्हावे असा तिचा आग्रह. ज्या कलामंदिरात आपलं कलाजीवन सुरू झालं तेथेच आपल्या पुनर्जन्मानंतरचं पहिलं काम व्हावं अशी तिची श्रद्धा !
ती राजकमल मंदिरात पोहोचली. कुणाच्याही रेकॉर्डिंगला कधीही न येणाऱ्या संध्याताई त्या दिवशी अगोदरपासूनच हजर. किरण शांताराम यांची तारांबळ उडालेली. शांतारामबापू जातीनं आलेले. त्यांनी रंजनाचा खांदा प्रेमभराने थोपटला. पडद्यावर दृश्य सुरू झालं. पण रंजनाच्या तोंडून शब्द उमटेना. वर्षभराचा कालावधी मधे गेलेला. आपल्याला काही सुचत नाही, दिसत नाही अशी केविलवाणी अवस्था तिची झाली होती. शांतारामबापू रेकॉर्डिंगरूममध्ये गेले. स्वतः ध्वनिलेखन यंत्राजवळ बसले. रंजनाला आपले संवाद बोलण्याचा आदेश आला आणि काही क्षणातच चमत्कार घडला. रंजना आपले संवाद भराभरा बोलत गेली. सकाळपासून तिचं डबिंग चाललेलं. आपली आजही कार्यक्षमता कमी झालेली नाही येथपासून आपण एका अडलेल्या निर्मात्याला मार्गाला लावला येथपर्यंत समाधान रंजनाला मिळालं.

किरण शांताराम तर त्या दिवशी कमालीचे खुश झाले होते. आपली बहिण बरी झाली याचा आनंद त्यांना विशेष झाला होता.
“आता परदेशातून व्हीलचेअर आणायची गरज नाही. ” ते हर्षभरानं ओरडलेच. त्यांनी ती तेथून आणण्याची व्यवस्था केली होती.
या डबिंगनंतर मात्र रंजना झपाट्यानं बरी होत गेली. मध्ये काहीच घडलंच नाही असं तिला आज वाटतंय.
“ईश्वरानं माझा चेहरा वाचविला. माझी समरणशक्ती शाबूत ठेवली त्याअर्थी माझ्या हातून आजच्याहूनही अधिक कलेची सेवा व्हावी असंच त्याला वाटत असावं. म्हणूनच मी आता नव्या जोमानं काही तरी करून दाखविण्याच ठरवलंय. माझ्या हातून भव्य दिव्य घडावं असच मला वाटतंय.” रंजना मला उत्साहानं म्हणाली.
रंजनाला मी बालपणापासून पाहतोय. तिची आई मराठी, गुजराती रंगभूमीवरील प्रथितयश अभिनेत्री वत्सलाबाई देशमुख. रंजना माझ्या डोळ्यांदेखतच लहानाची मोठी झाली. तिचं कला जीवन विकसित होत गेलं. ती येथे बालतारका म्हणून चमकली. पुढं ती मराठी रंगभूमीवर काही दिवस वावरली. मग ती चित्रपटसृष्टीतच स्थिरावली.

शांतारामबापूंनी तिला ‘इये मराठीचिये नगरी’ या मराठीतील पहिल्या इस्टमनकलर चित्रात सर्वप्रथम बालतारका म्हणून चमकाविली. संध्या या चित्राची नायिका. रंजनानं येथे आपल्या मावशीचं बालपण रंगवलं होतं. १९६५ ची ही गोष्ट. पुढं मोठ्या आत्मविश्वासानं त्यांनी तिला ‘चानी’ बनविली. रंजनाच्या कलाजीवनाची सुरुवात अशी एका आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या कलातपस्व्याकडे झाली आहे.
अकरा वर्षांपूर्वीचा मला एक प्रसंग आठवतो. ‘चंदनाची चोळी अंग अंग जाळी’ या रंगीत तमाशाप्रधान चित्रात रंजनानं एका मोलकरणीची फर्मास भूमिका केली होती. तिनं तारुण्यात पदार्पण केल्यानंतरही हीच तिची सर्वात महत्वाची पहिलीवहिली भूमिका. ही लंका तशी कजाग, नाचरी, कडकलक्ष्मी. नवऱ्याला सळो की पळो करून सोडणारी रंजनानं ही भूमिका झकास वठविली होती.
दादरच्या ‘प्लाझा’ मध्ये हे चित्र सुरू झालं. पहिल्याच दिवशी सहाच्या खेळाचं मला आमंत्रण होतं. बाल्कनीमध्ये माझ्या शेजारीच खुद्द डॉ. व्ही. शांताराम बसले होते.
‘अण्णा, खरंच छान काम करते ही मुलगी ! मराठी चित्रपटसृष्टीला नजीकच्या काळात प्रभावी नायिका मिळणार.” मी शांतारामबापूंना म्हणालो.
“मिळणार काय म्हणताय, माझ्या पुढच्या चित्राची हीच नायिका आहे. खरोखरीच गुणी आणि मेहनती मुलगी आहे ही . फार मोठं नाव कमाविल.” शांतारामबापू उद्गारले.
एका कलातपस्व्याचे अनुभवाचे हे बोल ते खरे ठरल्याशिवाय कसे राहतील!
रंजना मग शांतारामबापूंच्या ‘झुंज’ द्वारेच १९७५ साली नायिका म्हणून लोकांसमोर आली. शांतारामबापूंचे सुपुत्र किरण शांताराम यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केल होतं. पाठोपाठ तिची ‘चानी ‘ आली. मग ‘असला नवरा नको ग बाई’ त्यानंतर चित्रपटांची मालिकाच सरकू लागली रुपेरी पडद्यावरून : सासुरवाशीण, हळदीकुंकू, सुशीला, सावज, लक्ष्मी, देवधर, भुजंग, नागीण, बाईलवेडा, दुनिया करी सलाम, भालू, ग्यानबाची मेख, हिच खरी दौलत, सुळावरची पोळी, जखमी वाघीण, पाटलीन, गोंधळात गोंधळ, अरे संसार संसार, गुपचूप गुपचूप, सासू वरचढ जावई, हे दान कुंकवाचं, सावित्री, बिन कामाचा नवरा, स्वामींनी अंबाबाई, खिचडी, सगेसोयरे आणि मुंबईचा फौजदार आदी चित्रपटांतील तिच्या विविधढंगी भूमिका पाहणाऱ्यांनी आश्चर्यानं तोंडात बोट घातलं. कारण या प्रत्येक चित्रातील रंजना वेगळी. ती येथे आपली ‘ग्लॅमर गर्ल ‘ ची गोंडस इमेज कुरवाळीत बसली नव्हती. स्त्रीचं विविधरूपी दर्शन तिनं यावेळी घडवीलं होतं. म्हणूनच तिला लोकमान्यतेबरोबर राजमान्यताही मिळाली.

रंजनानं स्वतःला कधी ‘टाईपकास्ट’ होऊ दिल नाही, की कशी कोणतीही भूमिका करताना ती कचरली नाही. ‘नागिणी, ‘अरे संसार संसार ‘, ‘दैवती’ या सारख्या चित्रपटांत तर ती चक्क म्हातारी झालीय. शिक्षिकेपासून तमाशाच्या बोर्डवरील नाची पर्यंत आणि नायिकेपासून खलनायिकेपर्यंतच्या भूमिका रंगविताना तीनं घेतलेले परिश्रम पाहिले, प्रत्येक वेळी तीन स्वीकारलेलं आव्हान आठवलं की मनोमन नमस्कार करतो मी तिला. तिच्यातील कालावंतच तसा समर्थ, कुणीही नतमस्तक व्हावं असा.
रंजनाचं व्यक्तिमत्व गोड, गोंडस पण तीन या व्यक्तिमत्वाला साजेशीरच भूमिका स्वीकारल्या असत्या तर ती चाकोरीबाहेर कधीच पडली नसी. श्रेष्ठ अभिनेत्री न ठरता शोभेची बाहुली वाटली असती. ह्या बाहुल्या हिंदी मराठी चित्रसृष्टीत काय कमी आहेत ?
रंजना शांतारामबापूंची ‘चानी ‘ रंगवीत होती तेव्हा तिनं स्वतःच्या शरीराला एवढे क्लेश दिले होते की ती खंगत चालली होती. इतकी की ‘चानी’ चे संगीत दिग्दर्शक हृदयनाथ मंगेशकर एकदा रंजनाला पाहून हळहळत म्हणाले देखील, “या मुलीला मारून टाकायचा विचार आहे की काय ?”
‘चानी’साठी शांतारामबापूंनी तिची निवड केली तेव्हा ती थोडी बाळसेदार होती. गोल गप्पा.. म्हणूनच तिला अण्णांनी बजावलं होत, ‘रंजू, तुला यावेळी खूप कष्ट करावे लगतील.’ अर्थात ती भूमिकाच एवढी जबरदस्त की कुठल्याही सच्च्या कलावंताला तिची भुरळच पडावी. ती दिवसभर सहा मोसंब्याचा रस आणि थोडा मध टाकून दोन कप कोरा चहा. एवढाच त्या काळातील तिचा आहार होता. त्यामुळं ती झपाट्यानं बारीक होत गेली.
आहार हा असा आणि कष्टांना तर सीमाच नव्हती. पहाटे पाच वाजता उठून टेप केलेल्या संवादांची तयारी चालूच.चानीच्या परकर पोलक्यातील वेशभूषेची रंजनाला सवय व्हावी म्हणून तिचं वेशभूषा अंगावर असे. त्या तशाच अवस्थेत राजकमल कला मंदिरात वावरायचं. प्रारंभी खूप अवघडल्यागत झालं. पण पुढं काहीही वाटेनासं झालं. सारा संकोच गेला.
नारळाच्या झाडावर चढतानाही असेच कष्ट पडले. झाडाच्या बुंध्यापाशी टोकदार दगड, काचा आदींचा खच. हेतू हा की वरून खाली कोसळल्यावर खाली काय काढून ठेवलय याची कल्पना यावी. झाडावर चढून नारळ काढण्याइतकी तिनं प्रगती केली होती. अण्णांना तेच हवं होतं.


एखाद्या भूमिकेसाठी कलावंत असा अपार कष्ट घेऊ लागला की, ती भूमिका संस्ममरणीय ठरली नाही तरच नवल.
‘हीच खरी दौलत’ मधील कामिनी श्रीमंतीत वाढलेली मिजासखोर पतीसह सारं जग टाचेखाली घालायला निघालेली. याच्या उलट ‘देवघर’ मधील सेवाभावी डॉक्टर. ‘लक्ष्मी’ मधील तिची जयमाला वकील, ‘सुशीला’ पॉकेटमारपासून देहविक्रयापर्यंत सारं काही बिनधास्त करणारी. ‘सासुरवाशीण’ मधील दुर्गी नावाप्रमाणेच वाघीण. ती खाष्ट सासू आणि नणंदेचा डॅम्बीस नवरा बाळासाहेब याना चांगलाच धडा शिकवते.

‘गोंधळात गोंधळ’ मधील मंगल आणि ‘मुंबईचा फौजदार’ मधील शकू या गावरान तरुणी म्हणजे रंजनानं रुपेरी पडद्यावर सादर केलेले आगळेच नमुने. सत्तरीतील म्हातारी लील्या रंगविणारी रंजना यावेळी कमालीची मोकळी, रोमँटिक झाली होती. म्हणूनच तिच्या या अभिरेखा तरुण जीवांना गुदगुल्या करून गेल्या.
” ‘असे संसार संसार’ मधील रत्ना वठविणं हे तर तुला जबरदस्त आव्हान होत. तू ते कसं स्वीकारलेस ?” मी रंजनाला विचारलं.
“मामा, या ‘रत्नाच्या’ भूमिकेचा स्पॅन मोठा होता. ती मरताना सत्तरीची असते. मी नववधू म्हणून घरात येत असताना बैलगाडीतही मुटकुळं करून बसले होते. अशी ही खेडवळ, भेदरलेली, काहीशी भित्री, सात्विक, सोजवळ रत्ना परिस्थितीचे चटके बसल्यावर तावूनसुलाखून निघून, हळूहळू कमालीची कठोर बनते. पतीच्या अपघाती निधनानंतरची रत्ना तर अगदी वेगळी, विलक्षण धीट, निश्चयी बनते. सावकाराच्या पापी नजरेपासून स्वतःला वाचवीत, आपल्या मुलांना वाढवून संसाराला लावणारी, अंगाखांद्यावर नातवंडांना खेळविणारी रत्नाक्का ही आजी झाल्यावरही शेवटपर्यंत परिस्थितीशी झुंजत राहते.

“ही भूमिका वठविताना मी खूप काळजी घेतली होती. बाळाला अंगावर पाजतानाच्या प्रसंगात तर माझ्या अभिनयाची कसोटीच लागली होती. एका कुमारिकेनं बाळाला पाजतानाचे सारे भाव चेहऱ्यावर हुबेहूब वठवीणं तस अवघडच ! प्रथम बाळाला पाजताना ज्या यातना होतात त्यात आगळंच सुख आणि आनंद लाभतो. तो मला माझ्या चेहऱ्यावर उमटवायचा होता. पुढं उपासमारीमुळं अंगावरचं दूध आटल्यावर बाळाला पाजतानाचा प्रसंग तर यापेक्षा वेगळा आणि अवघड.

“असेच प्रसंग होते रत्नाक्का आजी झाल्यावरचे. सर्व शरीर जर्जर झालेलं दाखविण्यासाठी मला पोटाचा भाग लपवावा लागला. मी गोरी असल्यामुळं तो भाग अधिक उठून दिसणारा. म्हणून मी सैल, बंदीसारखे ब्लाउज शिवून घेतले. त्यावेळी मी ‘आराधना मधील शर्मिला टागोरांच्या वेशभूषेचा विचार केला होता.
” अशा भूमिकाच कलावंताची कसोटी पाहणाऱ्या. एरव्ही ‘गूपचूप’, ‘बाईलवेडा’, ‘गोंधळात गोंधळ’, ‘मुंबईच फौजदार’, आणि ‘खिचडी’ यासारख्या चित्रपटातील माझ्या भूमिकांचा पिंड, स्वभावधर्म जरी वेगळा असला तरी त्या माझ्या वयाला शोभेसाच आणि रोमँटिकही. तेव्हा त्यासाठी वेगळं बेअरिंग वगैरे सांभाळावे लागतं नाही. ”
“पण तुला काय वाटतं , कलावंतानं टाईपकास्ट व्हावे ? आपल्या चाहत्यांच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत म्हणून ठराविक साच्याच्या सोजवळ भूमिका करीत आपली इमेज जपावी असं ?”

“छे ! छे ! मला असं मुळीच वाटत नाही कलावंतांचे सर्वांगीण दर्शन घडावं असंच मला सदैव वाटत आलं आहे. माझी तरी त्या दृष्टीनेच धडपड चालू असते. प्रत्येक वेळी आपलं वेगळं स्वरूप दिसावं असंच मला वाटत आलं आहे. म्ह्णून तर मी दारू पिणारी, सिगारेट ओढणारी, मटका खेळणारी बिनधास्त ‘सुशीला’ रंगविली. तमाशाच्या बोर्डावर दौलतजादा वसूल करणारी नाची रंगविण्यापूर्वी चक्क तमाशाच्या थिएटरमध्ये लीला गांधी यांच्यासारख्या जाणकार नृत्यप्रवीण अभिनेत्रीला घेऊन गेले. तेथील वातावरण डोळ्यात साठविला. ‘सुशीला, ‘ग्यानबाची मेख’, ‘तमासगीर’ या चित्रपटातून लावणी नृत्यात रंग भरला. मी कजाग, कडक भूमिका केल्या. खलनायिका रंगवल्या. धमाल विनोदी भूमिका वठविल्या. तरीही कुठं उथळ झाले नाही. बोल्ड म्हणजे अंगावरची वस्त्रं उतरविणे नव्हे की साहेबी थाटाचा धुडगूस घालून नव्हे. आपल्या संस्कृतीच्या मर्यादा सांभाळून, आपल्यावर झालेल्या संस्कारांचं भान ठेवून धीटपणा अवश्य दाखवावा. कलावंताची कला कसाला लागलीच पाहिजे !” रंजनाच्या गोऱ्यापान चेहऱ्यावर विलक्षण तेज चमकलं तेव्हा.

– वसंत भालेकर

सौजन्य : रोहन प्रकाशन

पुस्तकाचे नाव : चंदेरी बातचीत

लेखक : वसंत भालेकर

ठेवणीतले लेख

  आपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा  [recaptcha]

  काही निवडक प्रतिक्रिया:

  शांताराम कांबळे

  मला वाटतं होते, मराठी मुलगी फक्त माधुरी दीक्षित ने हिंदी चित्रपट सृष्टीत खूप खूप कामे केली, पण, संध्या, रत्नमाला, नंदा, अशा कितीतरी, मराठी अभिनेत्री होत्या, होऊन गेल्या, याचा मला खूप🎉🎊 खूप अभिमान वाटतो, मी चित्रपट रसिक आहे.

  संदर्भ:- फेसबुक प्रतिक्रिया